16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeसंपादकीयजावई माझा भला!

जावई माझा भला!

एकमत ऑनलाईन

ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर साहेबांच्या देशात प्रचंड अस्थिर राजकीय स्थिती निर्माण झाली आहे. जॉन्सन यांच्या गच्छंतीला कारणीभूत ठरलेले त्यांच्याच मंत्रिमंडळातील वित्तमंत्री ऋषी सुनक हेच खरे तर जॉन्सन यांच्यानंतर पंतप्रधानपदाचे दावेदार होते. मात्र, त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या लिझ ट्रस यांनी निवडणूक प्रचारात ब्रिटनच्या महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला करकपातीचे आश्वासन दिले. त्याची भुरळ पडणे साहजिकच! त्यामुळे करकपातीने ब्रिटनची अर्थव्यवस्था धोक्यात येईल, असे कटू सत्य जाहीरपणे सांगत त्याला विरोध करणा-या ऋषी सुनक यांचा यावेळी पराभव झाला. मात्र, अशी आश्वासने प्रत्यक्षात उतरत नसतातच तर ती केवळ निवडणुका जिंकण्यासाठीचे मृगजळ असते, हे सत्य ब्रिटनच्या जनतेला अवघ्या ४५ दिवसांमध्येच कळले. अवघ्या ४५ दिवसांतच मंत्रिमंडळातील सहकारी व स्वपक्षीय खासदारांनी बंडाचे निशाण फडकवल्याने लिझ ट्रस यांनाही पंतप्रधान पदावरून राजीनामा द्यावा लागला. सप्टेंबर महिन्यात ब्रिटिशांनी जी चूक केली होती त्याचे परिमार्जन आता ऑक्टोबर महिन्यात केले आहे. भारतात दिवाळीची धूम सुरू असताना भारताचे जावई असलेले ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत.

त्यांच्या प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डंट यांनी शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे मागच्या पाच वर्षांतील चौथे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड निश्चित झाली आहे. थेरेसा मे यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द तीन वर्षे १२ दिवसांची होती. बे्रग्झिट प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर या पदावर विराजमान झालेल्या बोरिस जॉन्सन यांचीही कारकीर्द ३ वर्षे ४५ दिवसांत संपुष्टात आली. त्यांच्यानंतर पंतप्रधान बनलेल्या लिझ ट्रस यांनी तर अल्प कारकीर्दीचा नवा विक्रमच प्रस्थापित केला. त्या अवघे ४५ दिवसच आपले पद टिकवू शकल्या. आता पंतप्रधानपदी विराजमान होत असलेल्या ऋषी सुनक यांनीही नवा विक्रम स्थापित केला आहे. ब्रिटनच्या मागच्या २०० वर्षांतील ते सर्वांत तरुण म्हणजेच कमी वयाचे पंतप्रधान ठरले आहेत. इन्फोसिस कंपनीचे सर्वेसर्वा असणा-या नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे जावई असणारे भारतीय वंशाचे ऋषी सुनक वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होत आहेत. भारतावर दीडशे वर्षे राज्य करणा-या साहेबांच्या देशाचे सर्वोच्च पद भारताच्या जावयाकडे आल्याने साहजिकच भारतात कुतुहल व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे देशात ‘जावई माझा भला’ अशीच भावना व्यक्त होणे साहजिकच! मात्र, त्याहीपेक्षा पुढे जाऊन बघितल्यास सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असलेल्या ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेस ऋषी सुनक हेच सावरू शकतात, हा साहेबांनी ऋषी सुनक यांच्या कर्तृत्वावर व क्षमतेवर दाखविलेला विश्वास जास्त महत्त्वाचा व गौरवास्पद आहे! भारतीय वंशाचे व भारताचे जावई असणा-या ऋषी सुनक यांनी साहेबांच्या देशात आपले हे कर्तृत्व सिद्ध केले, ही भारतीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. विशेष म्हणजे ब्रिटनमधील स्थलांतरित आणि आश्रिताचा मुलगा पंतप्रधानपदी बसतो आहे याचा कोणताही विषाद त्या देशातील मतदारांना वाटला नाही एवढा विश्वास भारताच्या या जावयाने आपल्या कामातून कमावला हे कौतुकास्पदच! ऋषी सुनक यांचा जन्म १२ मे १९८० रोजी इंग्लंडमधील साऊथम्पटनमध्ये झाला. त्यांनी विंचेस्टर महाविद्यालयातून राज्यशास्त्राची पदवी प्राप्त केलेली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लिंकन महाविद्यालयातून त्यांनी तत्त्वज्ञान व अर्थशास्त्राचा अभ्यास केला. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले आहे. शिक्षणानंतर ‘गोल्डमन सॅच’ या नामांकित गुंतवणूक कंपनीत त्यांनी काही वर्षे काम केले आहे. आर्थिक क्षेत्राचा त्यांचा अनुभव दांडगा आहे.

त्यामुळेच बोरिस जॉन्सन यांनी आपल्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी सोपवली होती. कोरोना काळात टाळेबंदी लागू झाल्यावर ऋषी सुनक यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडत अत्यंत नावीन्यपूर्ण उपाययोजना करून ब्रिटिश अर्थव्यवस्था सावरली. रोजगार गमावलेल्यांना किमान रोजगार, हॉटेलच्या बिलावर सूट अशा वेगवेगळ्या उपाययोजनांनी त्यांनी अर्थव्यवस्थेतील मागणी कायम राहील याची दक्षता घेतली. अर्थात कोरोनाकाळ संपल्यानंतर ही दौलतजादा थांबविण्याचे अर्थशहाणपणही ऋषी सुनक यांनी कठोरपणे दाखविले आणि फुकटचा प्रवाह कमी केला. जनता मग ती ब्रिटनमधली असो की, भारतातली, फुकटच्या सवयीला आळा आला की, जनतेला त्याचा राग येतोच! त्यावेळी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या हिताचा विचार वा काळजी करावी, असे कुणाला वाटत नाही. उलट अशी काळजी करण्यास सांगणाराच जनतेच्या रोषास पात्र ठरतो. त्यामुळेच जगभरातील राजकीय नेते अर्थशहाणपणापेक्षा राजकीय शहाणपणाला प्राधान्य देतात. मात्र, त्यातून नेत्यांचा राजकीय फायदा होत असला तरी देशाच्या अर्थव्यवस्थेचे आणि या अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक असलेल्या जनतेचे नुकसान अटळच असते.

या नुकसानीचा इशारा देणारा लोकांना आवडत नाही पण म्हणून अर्थसत्याला बगल देऊन चालत नाही. सुनक अर्थशास्त्राच्या या मूल्यावर ठाम राहिले आणि त्यांनी काही काळ जनतेचा रोष ओढवून घेतला. मात्र, अंतिमत: जनतेलाही वास्तवाची जाणीव झाली आणि म्हणूनच सुनक जनतेच्या विश्वासास पात्र ठरले. पंतप्रधानपदावर विराजमान होत असताना सुनक यांच्यासमोर गटांगळ्या खाणा-या ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला सावरण्याबरोबरच महागाईने त्रस्त जनतेला दिलासा मिळवून देण्याचे सर्वांत मोठे आव्हान आहे. ब्रिटनसाठी अत्यंत कठीण असलेल्या काळात ऋषी सुनक यांच्याकडे साहेबांच्या देशाचे नेतृत्व आले आहे.. तिथे त्यांनी आपले कर्र्तृत्व सिद्ध केले तर ते भारतीय वंशाचे असण्याचा किंवा ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत खासदार असण्याचा राजकीयदृष्ट्या अडचणीचे ठरणारे मुद्दे आपोआपच मागे पडतील. त्यांच्यावर होणा-या टीकेला त्यांच्या कर्तबगारीतूनच उत्तर मिळेल व दीर्घकालीन मूल्याधारित राजकारणासाठी हाच एकमेव योग्य मार्ग आहे.

मात्र, सुनक हे आव्हान पेलण्यात अपयशी ठरले तर मात्र वरील मुद्दे त्यांच्याविरुद्ध डोके काढून उभे राहतील. अर्थशहाणपण असणा-या ऋषी सुनक यांना नक्कीच याची जाणीव असणार! ते हा धोका टाळण्यासाठी आपल्या दांडग्या आर्थिक अनुभवाचा कसा वापर करतात, हाच आता उत्सुकतेचा विषय आहे. अर्थात कोरोनाच्या कठीण काळात आपली कर्तबगारी सिद्ध करणा-या ऋषी सुनक यांच्याकडे हे आव्हान स्वीकारण्याची व त्यावर मात करण्याची क्षमता नक्कीच आहे. त्यामुळे ते हे आव्हान पेलवतील व ब्रिटनसह सध्या रशिया-युक्रेन युद्धाने संकटात सापडलेल्या सर्वच युरोपीय देशांनाही या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतील ही अपेक्षा! तूर्त भारताच्या या जावयाने साहेबांच्या देशात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकावल्याचा अभिमान व आनंद प्रत्येक भारतीयाला आहेच. याबद्दल ऋषी सुनक यांचे मनापासून अभिनंदन व त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीस लक्ष-लक्ष शुभेच्छा!

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या