22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeसंपादकीयनवी युद्धचिंता!

नवी युद्धचिंता!

एकमत ऑनलाईन

काही महिन्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे सारे जग युद्धछायेत बुडून गेले असता आता चीन आणि तैवान यांच्यात तणाव निर्माण झाल्यामुळे जगाला नव्या युद्धचिंतेने ग्रासले आहे. या चिंतेचे कारण ठरला तो अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांचा तैवान दौरा. चीनचा विरोध झुगारून अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी तैवान दौरा केल्याने नवी युद्धचिंता निर्माण झाली आहे. चीनने अनेक वर्षांपासून तैवानवर दावा केला आहे. तैवान आपल्याच देशाचा भाग असल्याचे चीन वारंवार सांंगत असल्याने या दोन्ही देशांत तणाव आहे. नॅन्सी पेलोसी यांनी एक दिवसाचा तैवान दौरा आयोजित केल्यानंतर चीनची    सुरू झाली. मात्र चीनच्या विरोधाला न जुमानता पेलोसी यांनी हा दौरा पूर्ण केला. त्यांच्या शिष्टमंडळात पाच सदस्य होते. या दौ-यानंतर गुरुवारी चीनने युद्ध सराव करून तैवानला आणि अप्रत्यक्ष अमेरिकेला इशारा दिला.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) तैवानच्या आसपासच्या परिसरात जल आणि हवाई क्षेत्रात थेट गोळीबार केला. तैवानच्या सामुद्रधुनीच्या पूर्व भागात निश्चित केलेल्या ठिकाणांवर बॉम्बफेक केली. रविवारी दुपारी १२ वाजता लष्कराचा सराव संपेल असे पीएलएच्या वतीने सांगण्यात आले. चीनचे सरकारी माध्यम ‘शिन्हुआ’ने सांगितले की सरावादरम्यान नाकेबंदी, समुद्री लक्ष्यांवर हल्ला, हवाई दल नियंत्रण अशी मोहीम आखण्यात आली आहे. चीनकडून तैवानवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला असला तरी त्यातील काही क्षेपणास्त्रे जपानच्या हद्दीत पडल्याने जपानने त्यास कडवा विरोध केला. तैवानवर चीनने डागलेल्या ११ क्षेपणास्त्रांपैकी काही क्षेपणास्त्रे जपानमध्ये पडली. त्यावर जपानच्या संरक्षण मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. आम्ही त्याबाबत तडजोड करू शकत नाही असेही ते म्हणाले. युद्धाभ्यासात चीनने तैवानच्या उत्तरपूर्व आणि दक्षिण-पश्चिम किनारपट्टीच्या अगदी जवळ क्षेपणास्त्रांचा मारा केला. जमिनीसह हवाई व समुद्री क्षेत्रात चिनी लष्कराद्वारे शक्तिप्रदर्शन सुरू असल्याने खबरदारी म्हणून तैवानने अनेक उड्डाणे रद्द केली आहेत. अशा स्थितीत उद्भवणा-या कोणत्याही संभाव्य स्थितीला तोंड देण्याची तैवानने तयारी केली आहे. अमेरिकेनेदेखील या भागात आपल्या युद्धनौका व हेलिकॉप्टर पाठवले आहे.

पेलोसी यांनी तैवान दौरा केला तर त्यांचे विमान पाडू असा इशारा चीनने दिला होता. परंतु पेलोसी यांनी दौरा केला आणि नंतर त्या दक्षिण कोरियाकडे रवाना झाल्या. त्यांच्या विमानाला अमेरिकेच्या क्षेपणास्त्रविरोधी ११ विमानांचे संरक्षण होते. त्यामुळे पेलोसी यांचे विमान पाडण्याची चीनची हिम्मत झाली नाही. पेलोसी यांच्या दौ-यानंतर तैवानची कोंडी करण्यासाठी चीनने आक्रमक पवित्रा घेतला. तैवानला चहूबाजूंनी घेरण्यात आले आणि ‘लाईव्ह-फायरिंग’ नामक लष्करी प्रदर्शन सुरू केले. याआधी चीनचा तैवानपासून १०० कि. मी. अंतरावर युद्धाभ्यास चालायचा परंतु यावेळी प्रथमच चीनने तैवानपासून अगदी जवळ म्हणजे १९ कि. मी. अंतरावर लष्करी युद्धाभ्यास सुरू केला. त्यामुळे या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला. पेलोसी यांच्या दौ-यानंतर चीनच्या नौदलाने युद्धाभ्यासाला सुरुवात केली. तसेच या भागातील आपल्या लष्करी सामर्थ्यातही वाढ केली. त्यामुळे युद्धाला तोंड फु टण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तैवानच्या संरक्षणाची हमी देणा-या अमेरिकेनेदेखील चीनचा आक्रमक पवित्रा पाहता आपली यूएसएस रोनाल्ड रेगन युद्धनौका तैवानच्या दिशेने पाठविली आहे.

याशिवाय अमेरिकेचे पाणबुडीरोधी हेलिकॉप्टर तैवानच्या हवाई क्षेत्रात घिरट्या घालत होते. चीनकडून सुरू असलेले लष्करी शक्तिप्रदर्शन हे आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणारे आहे. तसेच चीन ‘जैसे थे’ स्थिती बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप तैवानने केला. चीनने हवाई व जलमार्गाची नाकेबंदी केली आहे. चीनने आगळीक केलीच तर संभाव्य स्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे तैवानने म्हटले आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे गत काही दिवसांपासून तैवानच्या विविध मंत्रालयांच्या संकेतस्थळांवर सायबर हल्ले झाले आहेत. जपाननेही चीनच्या आक्रमक पवित्र्यावर चिंता व्यक्त केली आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौ-यामुळे चीन संतापला आहे. परंतु चीनची एकूण रणनीती पाहता तो तैवानवर हल्ला करेल असे वाटत नाही. कारण त्यातून काही साध्य होणार नाही याची चीनला कल्पना आहे. अशा स्थितीत ‘आर्ट ऑफ वॉर’ अंतर्गत न लढता तैवान जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ‘आर्ट ऑफ वॉर’ हा चिनी लष्करी रणनीतीकार आणि विचारवंत सन त्झू याचा सिद्धांत आहे. पाचशे वर्षांपूर्वी त्याने लिहिलेल्या या पुस्तकात शत्रूशी सामना करण्यासाठी तुमची इतकी तयारी पाहिजे की तुम्हाला लढण्याची गरजच पडणार नाही असे म्हटलेले आहे. म्हणजे प्रतिस्पर्ध्यावर इतका दबाव टाका की त्याने स्वत: शरणागती पत्करली पाहिजे.

चीनच्या युद्ध रणनीतीवर याच कलेची छाप दिसून येते. याच रणनीतीची छाप अलीकडे डोकलाम, लडाख भागात दिसून येते. या भागात सीमेवर अतिक्रमण करून भारतासोबतचा तणाव अनेक महिने टिकवून ठेवत दबाव आणण्याची चीनची रणनीती आहे. दक्षिण चीन समुद्रातही हीच रणनीती आखत चीनने जपान, व्हिएतनामसह अनेक देशांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. १९६२ मध्ये भारतावर अचानक हल्ला करून भारतावर दबाव वाढवला होता. चीनने तिबेटवर अचानक हल्ला करून तिबेटींचे बंड कमजोर केले होते. महाशक्ती म्हणून चीन पुढे आला असला तरी अमेरिकन महाशक्ती त्याच्यावर वरताण करणारी आहे. त्यामुळे चीन तैवानवर हल्ला करणार नाही मात्र तैवान व अमेरिकेला धमकी देत राहील. अमेरिकी लष्कराच्या तुलनेत चीनचे लष्करी सामर्थ्य कमी आहे. त्यामुळे चीन आणखी काही दशके आपली लष्करी आणि आर्थिक ताकद वाढवण्यावर भर देईल असे दिसते. नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौ-यावरून जगभरातील विविध देशांनी सावध पवित्रा घेतला आहे. चीनसोबत घनिष्ठ संबंध असलेल्या उत्तर कोरिया व रशियाने पेलोसी यांच्या दौ-यावरून चीनने घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे समर्थन केले आहे.

चीनला आपल्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे रशियाने म्हटले आहे. उत्तर कोरियानेसुद्धा अमेरिका चीनच्या अंतर्गत प्रकरणात नाक खुपसत असल्याचे म्हटले असून पेलोसी यांच्या दौ-याचा निषेध केला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस आणि जपानने पेलोसी यांच्या दौ-यावर थेट भाष्य करणे टाळले आहे. मात्र चीनने सुरू केलेल्या लष्करी कारवायांवर चिंता व्यक्त केली आहे. जगाची महासत्ता बनण्यास चीन उत्सुक आहे. त्याची विस्तारवादाची हौस काही नवी नाही. त्यासाठी त्याचे छोट्या देशांवर बळजबरी करणे, भारताबरोबर कुरापती काढणे सुरू आहे. आर्थिक आणि भौगोलिक पातळ्यांवर चीनची दुस-यावर आक्रमण करण्याची लालसा वेळीच ठेचावी लागेल. कोरोनासारख्या विषाणूच्या फै लावाबाबत चीनची जगभर नाचक्की झाली आहे. आपली गेलेली पत, प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी तैवान-वाद उकरून काढण्याचा चीनचा प्रयत्न आहे. तैवान हा आपलाच भूभाग असल्याचा चीनचा दावा आहे. तैवान जरी स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र मानत असले तरी चीन त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यायला तयार नाही. तैवानच्या निमित्ताने दोन महासत्ता समोरासमोर उभ्या राहिल्याने जगाची डोकेदुखी वाढली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या