27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeसंपादकीयआता दुसरा अंक !

आता दुसरा अंक !

एकमत ऑनलाईन

महाराष्ट्रात राज्यसभेसाठीच्या सहा जागांसाठी झालेली निवडणूक प्रचंड नाट्यमय ठरली. आपल्याकडे १७० आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा करणा-या महाविकास आघाडीला भाजपने धोबीपछाड देत आपला तिसरा उमेदवार निवडून आणला. या निवडणुकीवरून राज्यातील वातावरण प्रचंड तापविण्यात दोन्ही बाजूंनी कुठलीच कसर बाकी ठेवण्यात आलेली नसल्याने ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची ठरली होती. अशा अटीतटीच्या सामन्यात नाट्य कसे निर्माण करायचे याचे कसब सध्याच्या सर्वच नेत्यांनी चांगलेच अवगत केलेले आहे. त्यामुळे मतदान सुरळीत पार पडूनही मतमोजणीच्या वेळी ‘आक्षेपनाट्य’ रंगविण्यात आले. त्यामुळे सुमारे ९ तास मतमोजणी खोळंबली व सर्वांचाच जीव टांगणीला लागला. या आक्षेपनाट्यात भाजपची सरशी होऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत बाद ठरविले, हा शिवसेनेला पहिला जबर धक्का होता. इतर चार आक्षेपांना मात्र निवडणूक आयोगाने क्लीन चिट दिली. मात्र, तरीही महाविकास आघाडीचे नेते, विशेषत: शिवसेना नेते आपला दुसरा उमेदवार निवडून येण्याबाबत आत्मविश्वास व्यक्त करत होते. मात्र, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची रणनीती महाविकास आघाडीच्या रणनीतीवर पूर्णपणे भारी ठरली आणि त्यांनी चमत्कार घडविला.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ३३ मते मिळवून आघाडीवर असणारे शिवसेनेचे संजय पवार दुस-या फेरीअखेर मात्र पराभूत झाले. भाजपच्या धनंजय महाडिक यांनी ४१ मते प्राप्त करत विजय मिळविला. हा महाविकास आघाडीच्या विशेषत: शिवसेनेच्या रणनीतीला भाजपने दिलेला जबरदस्त धक्का आहे. या निकालाचे चर्वितचर्वण आता दीर्घकाळ सुरू राहणे अटळच. शिवाय त्यावरून उडालेला राजकीय धुरळाही लवकर खाली बसणे कठीणच. त्यामुळे त्यावर भाष्य हा वेळेचा अपव्ययच, तो टाळलेलाच बरा! मात्र, या निकालाने महाविकास आघाडीच्या आत्मविश्वासास, ऐक्यास जबरदस्त धक्का बसला आहे. शिवाय भाजपला हलके न घेण्याचा गंभीर इशाराही शिवसेना व महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळाला आहे. त्यावर महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी गंभीर आत्मचिंतन करायला हवे कारण विधान परिषदेच्या १० जागांच्या निवडणुकीच्या निमित्ताने अवघ्या १० दिवसांतच या नाट्याचा दुसरा अंक रंगणार आहे. पहिल्या अंकात यश मिळाल्याने भाजप नेत्यांना स्फुरण चढणे साहजिकच. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने जी खेळी केली तीच खेळी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने पुन्हा केली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठीही भाजपने सहा उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे आहे. ते पेलण्यासाठी राज्यसभा निवडणुकीत झालेला पराभव शक्य तेवढ्या लवकर विसरून महाविकास आघाडीला कामाला लागणे भाग आहे.

विशेष म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकीत खुले मतदान असतानाही भाजपने महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे. विधान परिषदेसाठी तर आमदारांना गुप्त मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे पक्षाचा व्हिप असला तरी आमदारांना पक्ष प्रतोदाला मतदान दाखविण्याचे बंधन नाही. त्यामुळे सगळ्याच उमेदवारांना अखेरपर्यंत धास्तीच राहणार आहे. काँगे्रसने विधान परिषदेसाठी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे असे दोन उमेदवार दिले आहेत. संख्याबळ पाहता काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी बरीच धावपळ करावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तीन तर शिवसेनेने दोन उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे आणि शिवाजीराव गर्जे रिंगणात आहेत तर सेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पडवी रिंगणात आहेत. थोडक्यात महाविकास आघाडीने एकूण सात उमेदवार रिंगणात उतरवले आहेत तर भाजपने आपले पाच व सदाभाऊ खोत यांना पुरस्कृत करत त्यांच्या रूपाने सहावा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. १३ जून अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यादिवशी हे सर्व १३ उमेदवार रिंगणात कायम राहिले तर राज्यसभा निवडणूक नाट्याचा दुसरा अंक अटळच आहे. भाजपने नियोजनबद्ध खेळी केलेली असल्याने त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता नाही. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेण्याचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची धाकधूक थोडीफार कमी होईल.

या सगळ्या स्थितीमुळे विधान परिषद निवडणुकीतही पुन्हा घोडेबाजार होणे अटळच! आणि अशा घोडेबाजारात आपण सर्वांपेक्षा सरस आहोत हे भाजपने वेळोवेळी सिद्ध केलेलेच असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची चिंता नक्कीच वाढली आहे . सर्व उमेदवारी अर्ज कायम ठेवायचे की, सेफ गेम खेळायचा यावर महाविकास आघाडीच्या कर्त्याधर्त्यांना गांभीर्याने विचार करावा लागेल कारण भाजप सलग दुस-यांदा महाविकास आघाडीला धोबीपछाड देण्यात यशस्वी ठरला तर त्याचे गंभीर परिणाम सरकारच्या स्थैर्यावर व राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांवर होणे अटळ आहे. भाजपने महाविकास आघाडीत असंतोष असल्याचे कथानक मांडण्यास तात्काळ सुरुवात केलीच आहे . तीन पक्षांचे सरकार असल्याने या कथानक निर्मितीस बळ देणा-या अनेक घटनाही घडलेल्या आहेत. त्या पुन्हा उकरून काढण्याचा भाजप प्रयत्न करणार हे उघडच! शिवाय जास्तीत जास्त अपक्षांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप साम, दाम, दंड, भेद या सर्व नीतींचा मुक्तहस्ते वापर करणार हेही उघडच! अशावेळी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना आपले ऐक्य व विश्वास कायम ठेवण्याबरोबरच पक्षात होऊ शकणारी नाराजांची पळापळ रोखणे आणि त्याचबरोबर आपल्या सोबतच्या अपक्षांना भाजपच्या गळाला लागू न देणे अशी तिहेरी तारेवरची कसरत पार पाडावी लागेल.

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यसभा निवडणूक निकालाने केवळ महाविकास आघाडी सरकारच्याच नव्हे तर त्यांच्या समर्थकांच्या आत्मविश्वासाला धक्का दिला आहे. त्याची पुनरावृत्ती विधान परिषद निवडणुकीत झाल्यास महाविकास आघाडी सरकारच्या ऐक्याला तडे जाण्यास सुरुवात होईल, हे सांगण्यासाठी कुठल्या राजकीय पंडिताची वा ज्योतिषाची अजिबात गरज नाही. त्यामुळे राज्यसभा निवडणूक निकालाच्या निमित्ताने उधळलेला भाजपचा वारू विधान परिषद निवडणुकीत तातडीने रोखण्याला महाविकास आघाडीच्या कर्त्याधर्त्यांनी प्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे. भाजपच्या खेळीला बळी पडून विधान परिषद निवडणूक प्रतिष्ठेची करायची की, व्यवहार्य विचार करून ‘सेफ गेम’ खेळायचा हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्रितरीत्या ठरवावे लागेल . भाजप तर कुठलीही निवडणूक ही पूर्ण शक्तीनिशीच लढवतो, हे वारंवार सिद्धच झालेले आहे. आता तर ऐन निवडणुकीच्या हंगामात सुरुवातीलाच मोठे यश प्राप्त झाल्याने भाजपच्या अंगात हत्तीचे बळ संचारणे साहजिकच. त्यामुळे भाजप ही निवडणूक पूर्ण प्रतिष्ठेची करणार हे उघडच! त्याला महाविकास आघाडी सरकार कसे उत्तर देते यावर या निवडणूक नाट्याच्या दुस-या अंकातील रंगत अवलंबून राहणार आहे व त्याचेच पडसाद राज्यातील इतर सर्व निवडणुकांवर उमटणार आहेत, हे मात्र निश्चित!

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या