22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeसंपादकीयआता दुसरा सामना!

आता दुसरा सामना!

एकमत ऑनलाईन

राज्यातील राज्यसभा निवडणुकीचे कवित्व अद्याप ताजे असतानाच आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील महाविकास आघाडी सरकार व विरोधी पक्ष भाजपमध्ये दुस-या सामन्याचे रणशिंग फुंकले गेले आहे. राज्यसभेचा पहिला सामना हा खुला होता कारण तिथे गुप्त मतदान नव्हते. तरीही भाजपने या सामन्याचा निकाल आपल्या बाजूने फिरविण्याची करामत करून दाखविली. त्यासाठी भाजप व अपक्षांवर शिवसेना प्रवक्त्यांकडून अनेक आरोप झाले तरी त्याला फारसे महत्त्व उरत नाही कारण एकदा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरल्यावर ‘जो जीता वही सिकंदर’ हेच अंतिम सत्य असते, अशा स्थितीत पराभवासाठी इतरांवर खापर फोडणे, आगपाखड करणे याने आत्मसांत्वनाशिवाय दुसरे काहीही हाती लागत नाहीच! शिवाय अशा थयथयाटाने फक्त हसूच होते व भविष्यात हा थयथयाट नुकसानदायक ठरू शकतो. असो! राज्यातला राजकारणाचा स्तर सध्या एवढ्या खालच्या पातळीवर पोहोचलाय की, त्यात या शहाणपणाच्या गोष्टींचे भान बाळगण्याची अपेक्षा आता कुठल्याच बाजूकडून राहिलेली नाही. त्यामुळे सामान्यांच्या हाती हे राजकीय तमाशे निमूटपणे बघत राहण्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. मूळ मुद्दा हा की, राज्यसभेच्या सामन्या पाठोपाठ राज्यात विधान परिषदेचा दुसरा सामना होणे व तो पहिल्या सामन्यापेक्षा जास्त रंगतदार होणे अटळ बनले आहे कारण अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस उलटून गेल्यावर विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत.

उमेदवारांच्या विजयासाठी आवश्यक असणा-या मतांचे गणित पाहता दोन्ही बाजूंच्या उमेदवारांची मदार ही पुन्हा छोटे पक्ष, अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचण्यावर आणि दुस-या पक्षातील मते फोडण्यावर राहणार हे उघडच! त्यामुळे साहजिकच हल्ली राजकीय क्षेत्रात परवलीचा शब्द बनलेला घोडेबाजार रंगणार हे ढळढळीत सत्य! राजकीय पक्षांनी स्वत:च्या कुरघोडीच्या राजकारणासाठी बाजार भरविण्याची स्थिती निर्माण करायची आणि नंतर शहाजोगपणे या बाजारातील चढ्या बोलींवर नाक मुरडत घोडेबाजाराचे आरोप एकमेकांवर करायचे हा खरं तर शुद्ध दांभिकपणाच! बाजार भरल्यावर वस्तूसाठी एकपेक्षा जास्त ग्राहक असणार व ती वस्तू प्राप्त करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे बोली लावणार, हा सरळ साधा व्यवहार! बाजार भरवायचा आणि वर पुन्हा बाजाराच्या व्यवहारावर नाक मुरडायचे यात काय हशिल? मात्र, राजकीय क्षेत्रात ‘आपला तो बाळ्या, लोकाचं ते कार्टं’ हीच संस्कृती रुजली असल्याने अशा बाजाराचे कवित्व प्रत्येकजण आपापल्या परीने सांगतच राहतो. सर्वसामान्यांना आता सत्यही माहिती आहे व राजकीय पक्षांचे वागणेही त्यांच्या अंगवळणी पडलेय त्यामुळे अशा आरोप-प्रत्यारोपांना व एकमेकांची धुणी काढण्याला काहीच अर्थ राहिलेला नाही, हेच सत्य! मात्र, राजकीय पक्षांना व नेतेमंडळीला हे सत्य काही केल्या पचनी पडत नाही एवढंच! पुन्हा असो!! उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन भाजपने आपण ही निवडणूक बिनविरोध करण्यास तयार असल्याचे दाखविण्याची खेळी केली पण प्रत्यक्षात ती लटकीच! संख्याबळाचे गणित घातल्यास भाजपकडे पाच उमेदवार निवडून आणण्याचे स्वबळ नाही.

भाजपचे त्यांना पाठिंबा असलेल्या अपक्षांसहचे एकूण संख्याबळ ११४ आहे. याचाच अर्थ असा की, भाजपला पाचही उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक १३० मते मिळविण्यासाठी १६ मते कमी पडतात. राज्यसभा निवडणुकीत भाजपने काही लहान पक्ष व अपक्ष गळाला लावून ९ अतिरिक्त मते मिळवत आपला तिसरा उमेदवार विजयी केला होता. ही मते या निवडणुकीतही भाजप आपल्याकडेच राखण्यात यशस्वी ठरेल असे गृहित धरले तरी भाजपचे संख्याबळ १२३ होते. तरीही पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला आणखी सात मते कमी पडतात. याचाच अर्थ उमेदवार निवडून आणायचा तर फोडाफोडी व घोडेबाजार करावा लागणे अटळच! मात्र, हे सर्व ज्ञात असूनही भाजपने सहा उमेदवारांना अर्ज भरायला लावून त्यापैकी एकच अर्ज मागे घेण्याची खेळी करत महाविकास आघाडीवर दबाव निर्माण करण्याची खेळी केली. त्यावरून महाविकास आघाडीत खळबळही झाली व काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे घ्यावा, असा प्रस्ताव मांडला गेला.

मात्र, भाजपला एक जागा अतिरिक्त का द्यायची? असा सवाल करत काँग्रेस दोन उमेदवार कायम ठेवण्यावर ठाम राहिली. खरं तर हा दुसरा सामना रंगवायचाच, हे भाजपने पक्के केलेलेच होते. त्यामुळे या निवडणुकीत कुणाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचा प्रयत्न भाजप करणार? हाच काय तो खरा उत्सुकतेचा प्रश्न! त्याची धास्ती आता हमखास निवडून येण्याची हमी असलेल्या उमेदवारांना निकाल लागेपर्यंत राहणार हे नक्की! कारण ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या आत्मविश्वासाला धक्का देण्याबरोबरच आघाडीत परस्पर अविश्वासाचे वातावरण तयार करण्याची धूर्त चाल भाजपने केली होती. आघाडीतील तीनही पक्षांचे एकही मत न फुटल्याने विजय मिळवूनही भाजपची आघाडीत अविश्वास पेरण्याची चाल फारशी यशस्वी झाली नाहीच! विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने पुन्हा हीच चाल केली आहे. ती अयशस्वी ठरवण्याचे आव्हान आता आघाडीच्या कर्त्याधर्त्यांवर आहे. हे लक्षात आल्यानेच शरद पवार यांनी विधान परिषदेत तीनही पक्षांचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे व सूक्ष्म नियोजन करण्याची गरज असल्याचा सल्ला दिला आहे. तसेच आपल्यासोबतच्या सर्व अपक्ष व छोट्या पक्षांनाही विश्वासात घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आघाडीने राज्यसभेचे कवित्व सोडून देऊन पवारांच्या सल्ल्यानुसार एकत्रितपणे तयारीला लागायला हवे तरच सरकारच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण करण्याची भाजपची चाल अयशस्वी ठरेल! गमविण्यासारखे काही नसल्याने भाजपवर या निवडणुकीचा दबाव असणार नाही. तो सरकारवर आहे कारण या निवडणुकीत पुन्हा निकालाची पुनरावृत्ती झाली तर सरकारसाठी व या सरकारमधील तीनही पक्षांसाठी ती धोक्याची घंटाच ठरेल. या निवडणुकीचे पडसाद राज्यात मनपासह होऊ घातलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये उमटणे अटळ आहे. त्यामुळे अशा स्थितीत ‘तुमचे तुम्ही बघा’ ही भूमिका अंगलट येणारीच ठरेल यात शंका नाही. मुंबई मनपा सेनेचा जीव आहे व भाजप तिथेच सेनेला पराभूत करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार हे उघड आहे. अशावेळी आघाडीचे भक्कम ऐक्य हेच भाजपला एकमेव उत्तर आहे. रुसव्याफुगव्यात त्याकडे दुर्लक्ष झाले तर भाजपला जे हवे ते आयतेच घडेल. त्यामुळे आता महाविकास आघाडीला पूर्ण ताकद पणाला लावून हा दुसरा सामना जिंकावाच लागेल तरच आव्हानही कायम राहील आणि प्रतिष्ठाही, हे मात्र निश्चित!

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या