24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeसंपादकीयओल्ड इज गोल्ड!

ओल्ड इज गोल्ड!

एकमत ऑनलाईन

जगातील सर्वाधिक लोकप्रिय इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) टी-२० स्पर्धेची सांगता विजयादशमीला (१५ ऑक्टोबर) झाली. कोरोना महामारीने जैव-सुरक्षित परिघात शिरकाव केल्याने आयपीएलची ही स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवावी लागली. आयपीएल स्पर्धेचा १४ वा हंगाम भारतात सुरू झाला होता परंतु कोरोनाने त्यात खंड पाडल्यानंतर स्पर्धेचा दुसरा टप्पा चार महिन्यांनंतर संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात आला. आयपीएल स्पर्धेने आजवर अनेक क्रिकेटपटूंना मालामाल केले आहे. विशेषत: तरुणाईला या स्पर्धेने आपलेसे केले आहे. जागतिक क्रिकेटमध्ये आज भारतीय क्रिकेटने जो वरचष्मा गाजवला आहे, त्याला आयपीएल स्पर्धाच कारणीभूत आहे. आज भारतीय संघातील एकेका जागेसाठी चार-चार स्पर्धक उपलब्ध झाले आहेत ते आयपीएलमुळेच. तरुणाईचा उसळता उत्साह म्हणजे आयपीएल!

जगातील अनेक क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न बाळगून असतात. त्यामुळे या स्पर्धेला अनेक ‘जळाऊ’ स्पर्धकही निर्माण झाले. दहशतवाद अंगीकारल्यामुळे या स्पर्धेत पाकिस्तानी क्रिकेटपटूंना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट जगत या स्पर्धेवर कायम खार खाऊन असते. शेवटी नुकसान झाले ते पाक क्रिकेट कौशल्याचेच! आयपीएलच्या धर्तीवरच ऑस्ट्रेलियात ‘बिग बॅश लीग’ खेळवली जाते परंतु तिला अजूनतरी ‘तेज’ प्राप्त झालेले नाही. आयपीएल स्पर्धेतील सहभागी संघांना प्रत्येकी चार परदेशी खेळाडूंना घेण्याची मुभा आहे. या परदेशी खेळाडूंच्या कौशल्याचा लाभ अन्य भारतीय क्रिकेटपटूंना, त्या फ्रँचायजीला आणि पर्यायाने भारतीय क्रिकेटला होतो. तरुणाईला सुवर्णसंधी म्हणजे आयपीएल असे चित्र दिसत असल्याने स्पर्धेत सहभागी फ्रँचायजीमध्ये तरुणाईचा भरणा असतो.

चेन्नई सुपरकिंग्ज हा एकच संघ असा आहे की ज्यात ज्येष्ठांचा भरणा आहे. चाळीशी गाठलेला महेंद्रसिंह धोनी हा या संघाचा कर्णधार. यंदा या संघाने मोईन अली आणि रॉबिन उथप्पा हे दोन नवे खेळाडू घेतले तेही ज्येष्ठच. चेन्नईनंतर मुंबई इंडियन्सचा संघही ज्येष्ठांचा भासतो. यंदाची स्पर्धा पार पडण्याआधी ही स्पर्धा मुंबई इंडियन्सने पाच वेळा, चेन्नईने तीन वेळा, कोलकाता आणि हैदराबादने प्रत्येकी दोन वेळा तर राजस्थान रॉयल्सने एकदा जिंकली होती. प्रख्यात लेग स्पीनर शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स या स्पर्धेचा पहिला विजेता. चेन्नईने या स्पर्धेआधी आठ वेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती आणि तीन वेळा (२०१०, २०११ आणि २०१८) जेतेपद पटकावले होते. केकेआरने दोन वेळा (२०१२, २०१४) अंतिम फेरी गाठली होती आणि दोन्ही वेळा जेतेपद पटकावले होते. २०१२ मध्ये त्यांनी अंतिम फेरीत चेन्नईला पराभूत केले होते. यंदा त्यांनी तिस-यांदा अंतिम फेरी गाठली होती त्यामुळे इजा-बिजा-तिजा होणार काय याबाबत उत्सुकता होती.

ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली केकेआरने यंदाच्या स्पर्धेत पहिल्या टप्प्यात फक्त दोन सामने जिंकले होते परंतु दुस-या टप्प्यात पाच सामने जिंकून अंतिम सामन्याकडे आगेकूच केली होती. प्ले ऑफमध्ये त्यांनी ऋषभ पंतच्या दिल्ली संघाला पराभूत केले होते, राहुल त्रिपाठीने अश्विनच्या शेवटच्या षटकात पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून दिल्लीवर मात केली होती. त्यामुळे चेन्नई विरुद्ध कोलकाता अशी अंतिम लढत होती. २०२१ च्या हंगामात दोन्ही सामन्यांत चेन्नईने कोलकाताला हरवले होते, त्यामुळे चेन्नईचे पारडे जड वाटत होते. चेन्नईपुढे कोलकाताच्या शुभमन गिल, नवोदित व्यंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठीला रोखण्याचे आव्हान होते. शिवाय वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण आणि शाकिब अल हसन या फिरकी त्रिकुटाचा सामना करायचा होता. केकेआरला ऋतुराज आणि फाफ डू प्लेसिसच्या बॅटवर अंकुश ठेवायचा होता शिवाय शार्दुल ठाकूर, ब्राव्हो, दीपक चहर आणि हॅजलवुडच्या तेज मा-याला तोंड द्यायचे होते.

चेन्नईने सर्वाधिक अंतिम सामने गमावल्याने केकेआरला संधी होती. दुबईची खेळपट्टी प्रारंभी फलंदाजांना अनुकूल असते, नंतर ती धीमी होत जाते असे दिसून आले होते. त्यामुळे टॉसलाही महत्त्व होते. यंदाच्या स्पर्धेत ११ पैकी ९ सामने लक्ष्याचा पाठलाग करणा-या संघाने जिंकले होते. नाणेफेकीचा कौल केकेआरच्या बाजूने लागला म्हणजे त्यांचे अर्धे काम सोपे झाले. दुबईच्या खेळपट्टीवर १७० धावसंख्या पुरेशी होती. ऋतुराज-प्लेसिस या सलामी जोडीने ६१ धावांची भागीदारी करून मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. प्लेसिसने ५९ चेंडूत ७ चौकार व ३ षटकारांसह ८६ धावा काढताना उथप्पाबरोबर ६३ आणि मोईन अली समवेत ६८ धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या १९२ वर नेऊन ठेवली. या धावसंख्येचा पाठलाग करताना केकेआरच्या गिल-अय्यर या सलामी जोडीने ९१ धावांची दणदणीत सलामी दिली. परंतु नंतर केकेआरची मधली फळी साफ कोसळली. ३४ धावांत ८ गडी गारद झाले. शार्दुल ठाकूरने ३, हॅजलवुड, जडेजा आणि ब्राव्होने प्रत्येकी दोन तर दीपक चहरने एक बळी घेतला.

केकेआरला १६५ धावा जमवता आल्या. चेन्नईने २७ धावांनी विजय मिळवत चौथ्यांदा आयपीएल चषक उंचावला. कर्णधार म्हणून धोनीचा हा ३०० वा सामना होता. ज्येष्ठांचा संघ म्हणून हेटाळणी झालेल्या चेन्नई संघाचा धोनी हा बुढा कर्णधार परंतु ‘शेर बुढा हुआ तो भी शिकार करना नही छोडता’हे त्याने सिद्ध केले. धोनीने केकेआरच्या ‘कमबॅक’चे कौतुक केले आणि यंदाची स्पर्धा जिंकण्यास ख-या अर्थाने तेच पात्र होते अशी स्तुतिसुमने उधळली परंतु दडपणाखालीसुद्धा डोके शांत ठेवत रणनीती आखणारा कुशल कर्णधार आणि कठीण समयी आपल्या बॅटने सामन्याचे चित्र बदलणारा फलंदाज ही धोनीची खासियत कायम आहे. अनुभवाचे मोल मोठे असते हे ज्येष्ठांचा भरणा असलेल्या चेन्नई संघाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, ‘ओल्ड इज गोल्ड’!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या