32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeसंपादकीय‘ऑन-ऑफ’ च्या कात्रीत शिक्षण

‘ऑन-ऑफ’ च्या कात्रीत शिक्षण

एकमत ऑनलाईन

कोरोना महामारीने माणसाला पूर्णत: ग्रासले आहे. असे एकही क्षेत्र उरले नाही की ज्याला या महामारीची झळ पोहोचली नाही. राजकीय, सामाजिक, आरोग्य, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राला कोरोना विषाणूचा जबरदस्त फटका बसला, माणसाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शिक्षण अत्यावश्यक आहे. परंतु या क्षेत्रालाही कोरोना विषाणूने पछाडले. मानवी जीवनात शिक्षणाला अतिशय महत्त्व आहे. शिक्षणच नसेल तर ‘विद्येविना मती गेली’ची वेळ येते. आता कोरोनाने विद्येवरच आघात केल्यामुळे माणसाची मती, गती तर जाणारच शिवाय नीतीही बदलण्याचा धोका आहे. या महामारीने माणसासमोर अनंत समस्या उभ्या केल्या आहेत.

राज्यातील कोरोनाची वाढती परिस्थिती लक्षात घेता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करून पुढच्या इयत्तेत पाठवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने रुग्णसंख्येचा आकडा वाढत गेला. राज्यावर पुन्हा एकदा टाळेबंदीची टांगती तलवार आली. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे अशक्य झाले. वर्षभर शाळाच न भरल्याने परीक्षा ती काय घेणार? इथे पाटोद्याचे माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांचे भाषण आठवते. आपल्या प्रत्येक भाषणात पेरे-पाटील सांगतात, ‘माझे सातवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे कारण जिल्हा परिषद शाळेत नापास करीत नाहीत म्हणून मी सातवीपर्यंत शिकलो!’ कोरोना विषाणूने यंदा तशीच वेळ आणली. कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले होते परंतु पहिली ते चौथीच्या शाळा बंद होत्या.

पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु काही ठिकाणी या शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. जेथे सुरू होत्या तिथेही अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. अशा परिस्थितीमुळे शिक्षण विभागाला पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. नववीतील विद्यार्थ्यांच्याही शाळा यंदा ऑनलाईनच झाल्या आहेत. बहुतेक ठिकाणी प्रात्यक्षिके, सत्र परीक्षा, चाचणी परीक्षा झालेल्या नाहीत. अकरावीचे वर्गच नोव्हेंबरमध्ये सुरू झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे हा प्रश्न होता. दुसरीकडे कडक निर्बंध, कोरोनाचे वाढते रुग्ण यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, रद्द करण्यात याव्यात अशा मागण्या पालक करत होते.

मात्र दहावी, बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्यावर शिक्षण मंडळ ठाम राहिले. या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विभागातील अधिका-यांची बैठक घेतली. त्यावेळी विविध पर्यायांबाबत चर्चा झाली. परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असून राज्य मंडळाची तयारीही अंतिम टप्प्यात आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांना जूनमध्ये अजून एक संधी देण्यात येणार आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात ढकलण्यात आले असले तरी प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सुरुवातीला आधीच्या वर्गातील घटकांचे अध्यापन करण्यात येणार आहे. शिक्षण हक्क कायद्यातील सुधारणेनुसार अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आधीच्या वर्गात बसण्याची तरतूद राज्याने मान्य केली नसल्याने राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गत अनेक वर्षांपासून पुढील वर्गात प्रवेश दिला जातो.

तरीही विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून ते कशात मागे आहेत ते पाहणे अपेक्षित आहे. यंदा मात्र या शैक्षणिक वर्षात राज्यातील बहुतेक शाळा भरल्या. ऑनलाईन वर्गासाठी पुरेशी साधने नसणे, विद्यार्थी-शिक्षक संवाद विकसित न होणे, अध्ययन सामग्रीचा अभाव अशा अनेक समस्यांना गेल्या शैक्षणिक वर्षात तोंड द्यावे लागले. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांचे मूल्यमापन न करताच त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. कोरोनाकालीन परिस्थितीत हे आवश्यक होते. कारण एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनसुद्धा शाळा बंदच होत्या. विशेषत: आदिवासी भागात आणि सरकारी शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांचे यामुळे जास्त शैक्षणिक नुकसान झाले आहे. ऑनलाईन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना म्हणावा तितका फायदा होत नाही असेही दिसून आले आहे.

कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने ‘ऑफलाईन’ परीक्षा घेणे शक्य नाही. ऑनलाईन परीक्षा घ्याव्या तर सर्वच विद्यार्थ्यांकडे त्यासाठी लागणारी साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय योग्य वाटत असला तरी अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे कुठलेच मूल्यमापन न करता सरसकट उत्तीर्ण करण्याचा दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होणार आहे त्याचे काय? त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने आवश्यक शिक्षण देऊन त्यांचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी लागेल. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात अशी काही जणांची मागणी होती.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे या परीक्षांबाबत शासन आणि शिक्षण मंडळ काय निर्णय घेते याबाबत चिंता होती परंतु या परीक्षा ऑफलाईनच होतील असे शालेय शिक्षणमंत्र्यांनी घोषित केल्याने शिक्षणाशी संबंधित असलेल्या घटकांमधील संभ्रम दूर झाला आहे. राज्य मंडळाने नेहमीपेक्षा वेगळ्या अशा अनेक विद्यार्थीकेंद्री उपाययोजना जाहीर केल्या आहेत. ‘शाळा तेथे परीक्षा केंद्र’ देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. दहावीला प्रात्यक्षिकांऐवजी गृहपाठ पद्धतीने अंतर्गत मूल्यमापन, बारावीला पाच ते सहा प्रात्यक्षिकांवरच परीक्षा असे मूल्यमापन पद्धतीतील काही महत्त्वाचे बदल आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग परिस्थितीमुळे काही किंवा सर्वच विषयांची परीक्षा देणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी विशेष परीक्षा आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेत ज्यांना अपेक्षित यश मिळणार नाही त्यांच्यासाठी तिसरी फेरपरीक्षा आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाकाळात शाळा बंद ठेवल्याने मोठे नुकसान झाले हे खरे आहे पण परीक्षांचा विचार देखील या पार्श्वभूमीवर करणे आवश्यक आहे.

जिंदादिल सागर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या