22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeसंपादकीयएक-दो-तीन-चार...!

एक-दो-तीन-चार…!

एकमत ऑनलाईन

देशातील कोरोना महामारीचे ‘तेजाब’मधील माधुरी दीक्षितच्या गाण्यासारखे झालेय! एक-दो-तीन-चार-पाँच-छे-सात-आठ…! कोरोनाच्या पहिल्या दोन लाटा आल्या. दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर आहे. त्यातच आता तिसरी लाट येण्याची वार्ता आहे. तसे या लाटेचे येणे दुस-या लाटेपासूनच गाजत आहे.निर्बंध आणि नियमांचे काटेकोरपणे पालन केले नाही आणि गर्दी टाळली नाही तर देशात पुढील सहा ते आठ आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा इशारा ‘एम्स’चे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य असून ती सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता आहे असे देशातील साथरोग तज्ज्ञांनी याआधीच सूचित केले आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेत देशातील आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडली होती. अनेक राज्यांत वैद्यकीय ऑक्सिजनचा भीषण तुटवडा निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी रेमडेसिविर मिळेनासे झाले होते. या इंजेक्शनमुळे काळाबाजारवाल्यांचे उखळ पांढरे झाले होते. अखेर दुसरी लाट गाशा गुंडाळत असल्याचे दिसल्याने लोकांमध्ये समाधानाची लाट पसरली असतानाच रणदीप गुलेरिया यांनी देशात कोरोनाच्या तिस-या लाटेचा इशारा दिल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात दुसरी लाट ओसरू लागल्याने अनेक ठिकाणी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. निर्बंध शिथिल केल्यानंतर ब-याच ठिकाणी बाजारपेठा आणि अन्यत्र ठिकाणी गर्दी उसळू लागली. म्हणून केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना अत्यंत महत्त्वाच्या अशा ‘पंचसूत्रीय रणनीती’ची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन, चाचण्या, रुग्णांचा शोध, उपचार आणि लसीकरणावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इथे मुख्य अडचण अशी की, केंद्राने लसीकरणाबाबतचे नवे धोरण जाहीर केले असले तरी अजूनही अनेक राज्यांना पुरेशा प्रमाणात लसमात्रा मिळत नाहीत मग लसीकरण कसे राबवणार? केंद्राने २१ जूनपासून २१ ते ४४ वयोगटाचे लसीकरण जाहीर केले खरे परंतु पुरेशा लसमात्राच उपलब्ध नसल्याने काही राज्यांनी ३० ते ४५ वयोगटाचेच लसीकरण केले जाईल असे म्हटले आहे. म्हणजे लसीकरणाबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये अजूनही समन्वयाचा अभाव आहे. महाराष्ट्रात बहुतेक जिल्ह्यांत निर्बंध कायम आहेत. रुग्णसंख्या आणि संसर्गदर कमी झाल्याने राज्यातील २५ जिल्हे निर्बंधमुक्त होऊ शकले असते परंतु संभाव्य तिस-या लाटेची भीती, गर्दी टाळण्यासाठी केंद्राने दिलेला इशारा या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल करण्याचे टाळण्यात आले.

केंद्र सरकार लसींच्या मात्रा खरेदी करून त्या राज्यांना मोफत पुरवणार असले तरी त्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. लोकसंख्या, संसर्गाचे प्रमाण आणि लसीकरणातील प्रगती या निकषांवर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसमात्रांचा पुरवठा केला जाणार आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप दोन कोटी ८७ लाख लसमात्रा उपलब्ध असून त्यांना येत्या तीन दिवसांत आणखी सुमारे ५२ लाख २६ हजार लसमात्रा उपलब्ध करून दिल्या जातील असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाचा विषाणू अत्यंत संक्रमणशील आहे. डेल्टा या उत्परिवर्तीत विषाणूमुळे इंग्लंडमध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. लसीकरणाची लक्ष्यपूर्ती करणे आणि डेल्टा विषाणू या आव्हानांचा एकाचवेळी सामना करण्याची वेळ इंग्लंडवर आली आहे. कोरोनाचा डेल्टा प्रकार सर्वप्रथम भारतात दिसून आला होता.

इंग्लंडमध्ये ज्येष्ठ नागरिकांना दुसरी मात्रा देण्यावर भर देण्यात आला आहे. त्यावरच तिसरी लाट रोखणे अवलंबून राहील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तेथे सर्व प्रौढ व्यक्तींचे लसीकरण केले जात आहे. हे लसीकरण तिसरी लाट रोखण्यास पुरेसे ठरेल असे ठामपणे सांगता येत नाही असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. रुग्णसंख्येत वाढ दिसत असली तरी ही वाढ गत आठवड्यात वर्तविलेल्या अंदाजाइतकी नाही. त्यामुळे लसीकरण मोहीम आणि डेल्टाचे संक्रमण यांच्यातच जणू काही स्पर्धा सुरू आहे. तज्ज्ञांनी पुढे म्हटले आहे की, जितक्या लवकर लसीकरण पूर्ण होईल, ज्येष्ठ नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात यश येईल तेवढ्या प्रमाणात रुग्णांना रुग्णालयात ठेवण्याची गरज भासणार नाही.या आधी केवळ लसीकरण कमी झाल्याने इंग्लंडमध्ये स्थिती गंभीर बनली होती. ज्येष्ठांचे लसीकरण पूर्ण केले, रुग्णालयात दाखल करण्याची गरज कमी झाली, मृत्यूचे प्रमाण वाढले नाही तर स्थिती पूर्वपदावर येऊ शकेल असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. यापासून भारताने योग्य तो धडा घेतला पाहिजे.

आपल्याकडेही तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिस-या लाटेचा धोका प्रामुख्याने लहान मुलांना संभवतो असेही म्हटले जात आहे. त्यादृष्टीने पूर्वतयारीही सुरू असल्याचे सांगितले जाते. परंतु बोलणे जेव्हा लसीकरणावर येते तेव्हा तेथेच घोडे पेंड खाते! लसीकरणाबाबत आजही देशात गोंधळाचेच वातावरण आहे. केंद्र सरकार ७५ टक्के लसमात्रा मोफत पुरवणार असले तरी उर्वरित २५ टक्के मात्रा खासगी रुग्णालये खरेदी करताना दिसत नाहीत. म्हणजे खासगी रुग्णालये लसमात्रा खरेदी करण्याबाबत अनास्था दाखवत आहेत की त्यांना लसमात्राच उपलब्ध होत नाहीत याबाबत काही कळावयास मार्ग नाही. खासगी रुग्णालयांना लसमात्रा देण्यास लसनिर्मिती करणा-या कंपन्या तयार नाहीत का? अथवा लसमात्रांचे अवास्तव दर लावले जात आहेत का या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? याबाबत केंद्र सरकारनेच पुढाकार घ्यायला हवा. देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण होणे आवश्यक आहे.

आजवर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सुमारे २८ कोटी ५१ लाख लसमात्रा मोफत पुरवण्यात आल्या आहेत पैकी सुमारे २५ कोटी ६३ लाख २८ हजार लसमात्रा वापरण्यात आल्या आहेत. याचा अर्थ असा की लसीकरण अत्यंत मंदगतीने सुरू आहे. लसीकरणाचा वेग असाच राहिला तर सुमारे शंभर कोटी जनतेचे लसीकरण कधी पूर्ण होणार? शिवाय त्याला आणखी किती महिन्यांचा कालावधी लागू शकतो? लसीकरणाची प्रगती अशीच राहिली तर तीनच काय आणखी चार-पाच-सहा लाटाही धडकू शकतात.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या