22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeसंपादकीयदोलायमान अवस्था!

दोलायमान अवस्था!

एकमत ऑनलाईन

राज्यातील कोरोना स्थितीत झपाट्याने सुधार होत असल्याने राज्य सरकार सुखावले आहे. परंतु राज्याचे पोट ज्यावर अवलंबून आहे ते शेती क्षेत्र अजूनही तहानलेले असल्यामुळे सुख म्हणजे नक्की काय असते.. असा प्रश्न पडतो. अन्नपूर्णा आनंदी दिसली की अख्खे घर समाधानी दिसते. राज्याला पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा आहे. केरळमध्ये ३ जून रोजी मोसमी वारे दाखल झाले. या वा-यांनी अरबी समुद्रातून वेगाने प्रवास करत दोनच दिवसांत महाराष्ट्र गाठले. मात्र, पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि अनुकूल वातावरण न मिळाल्याने मोसमी वा-यांना फारशी प्रगती करता आली नाही. राज्यात मोसमी वारे पोहोचले खरे परंतु शेतक-यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. कोकण, विदर्भात चांगला पाऊस झाला पण पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड्यात आभाळाकडे डोळे लागले आहेत. ब-याच ठिकाणी पाऊस येत असल्याची चाहूल लागते परंतु अखेर ती हूलच ठरते.

केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर दहा दिवसांत तो देशाच्या बहुतांश भागात पोहोचला परंतु गत तीन-चार दिवसांपासून मोसमी वा-यांची प्रगती झाली नाही. त्याच्या वाटचालीस पोषक वातावरण तयार झाले नाही. गत महिन्यात अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे मोसमी वा-याच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. हे चक्रीवादळ पश्चिम किना-याला धडकत असतानाच बंगालच्या उपसागरात मोसमी वा-याने प्रगती करत अंदमान-निकोबार बेटावर हजेरी लावली. दरम्यान बंगालच्या उपसागरात ‘यास’चक्रीवादळाची निर्मिती झाली. त्यामुळे मोसमी वा-यांना गती मिळून संपूर्ण अंदमान बेटासह दक्षिण अरबी समुद्रातील लक्षद्वीप, कोमोरीन भागात मजल मारली. त्यानंतर मात्र वा-यांची दिशा आणि ढगांची निर्मिती यांचे प्रमाण कमी झाल्याने केरळमधील मोसमी वा-यांचे आगमन लांबले. मृग नक्षत्र डोळ्यासमोर ठेवून मराठवाड्यातील शेतक-यांनी पेरणीपूर्व तयारी केली होती. प्रारंभी थोडा पाऊस झाला पण औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात पावसाने अचानक दडी मारली. त्यामुळे शेतक-यांचे आभाळाकडे डोळे लागले आहेत.

हिंगोली, परभणी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातही ब-यापैकी पाऊस झाला. रोहिण्या व मृगाचा पाऊस झाल्यानंतर काही ठिकाणी शेतक-यांनी पेरणीची घाई केली. काही ठिकाणी कपाशीची लागवड करण्यात आली पण नंतर पावसाने दडी मारल्याने तसेच ऊन व वा-यामुळे पेरा करपू लागला. मान्सूनच्या पहिल्या पावसाने दिलासा दिला खरा पण नंतर चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे बळिराजा पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हिंगोली जिल्ह्यात पेरणीयोग्य ओलावा झाल्याने सोयाबीन, मूग, उडदाचा पेरा सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात रिमझिम पाऊस झाला पण खरीप पेरणीसाठी हा पाऊस पुरेसा नाही. कळंब, लोहारा तालुक्यात काही ठिकाणी अचानक पाऊस झाला. त्यामुळे मशागतीच्या कामाचा खोळंबा झाला. पुरेशी ओल झाल्याशिवाय खरिपाची पेरणी करू नये असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. सध्या शेतकरी बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करीत आहेत. लातूर जिल्ह्यात ६० पैकी १४ मंडलांत पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. उदगीर, अहमदपूर, चाकूर, रेणापूर, देवणी येथे चार दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी शेतक-यांनी पेरणी सुरू केली.

खरीप पेरणीपूर्वी सलग ७० ते १०० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. सध्या तशी स्थिती नसल्याने तूर्त पेरणी नको असा सल्ला देण्यात आला आहे. आगामी आठ दिवसांत पेरणीयोग्य पाऊस होईल अशी स्थिती नाही. पेरणीपूर्वी शेतक-यांना अनंत समस्यांना सामोरे जावे लागते. बी-बियाणे, खते मिळतील की नाही याची त्याला धास्ती असते. खरिपाच्या हंगामात रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीवरून नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु केंद्र सरकारने शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. डीएपी खतावरील अनुदान आणखी ७०० रुपयांनी वाढविण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतक-यांना डीएपी खताची २४०० रुपयांची गोणी १२०० रुपयांना म्हणजे जुन्याच दरात मिळणार आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवर सुमारे १४,७७५ कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. गतवर्षी डीएपी खताचा भाव १७०० रुपये होता. सरकारने ५०० रुपयांचे अनुदान दिल्याने शेतक-यांना खताचे पोते १२०० रुपयांना मिळत होते. यंदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डीएपीची किंमत २४०० रुपयांवर पोहोचली.

देशातील कोरोना संकट आणि शेतक-यांकडून होणारा विरोध लक्षात घेऊन सरकारने ५०० रुपयांवरील अनुदानात आणखी ७०० रुपयांची वाढ केली. या वाढीव अनुदानामुळे डीएपी जुन्याच दरात म्हणजे १२०० रुपयांना मिळणार आहे. युरियावर सरासरी ९०० रुपयांचे अनुदान दिले जात आहे. हे झाले खतांचे पण शेतमजुरांचे काय? आजकाल शेतीच्या कामासाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. देशात एकीकडे धान्याची गोदामे धान्याने ओसंडून वाहत आहेत तर दुसरीकडे तेलबियांची व खाद्यतेलाची आयात करावी लागते. तेलबियांची लागवड करायची तर शेतमजुरांवर अवलंबून रहावे लागते. त्यासाठी शेतमजूरच उपलब्ध होत नाहीत. गव्हाचे पीक घेतल्यावर कापणीपासून ते पुढील प्रक्रियेसाठी यांत्रिक साधने सहज उपलब्ध आहेत परंतु तेलबियांसाठी मजुरांवरच अवलंबून रहावे लागते. उत्पादन खर्च व प्रत्यक्ष उत्पादने याचे प्रमाण दिवसेंदिवस व्यस्त होत चालले आहे. बियाणांचे व खतांचे चढे दर, वाढती मजुरी, बोगस बियाणे, दुबार पेरणीचे संकट, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

जमिनीला आलेल्या चढ्या भावामुळे लागवडीखालील सुपीक जमीन अकृषित करण्याकडे कल व अपप्रवृत्ती वाढत आहे. गावामधील शेतीशी संंबंधित उद्योग, व्यवसाय नष्ट झाले आहेत. शेतीवर अनावश्यक तंत्रज्ञान थोपले गेले आहे, त्यामुळे शेतीचा फायदा होण्याऐवजी नुकसानच झाले आहे. आज देशात ८६ टक्के शेतकरी अल्प, अत्यल्प झाले असताना जगात सर्वांत जास्त ट्रॅक्टर भारतात आहेत. शेतीत ट्रॅक्टरला वर्षभर पुरेल इतके काम नसते. देशी बियाणांवर रोग कमी पडतो. परंतु जास्त उत्पादनाच्या लालसेपोटी शेतक-यांवर बीटीसारखे बियाणे लादण्यात आले आहे. बीटी बियाणांची रोगप्रतिकारक शक्तीही संपली आहे. शिवाय बीटी उत्पादनांचा खर्चही शेतक-यांना न झेपणारा आहे. एकंदरीत शेतक-यांची अवस्था दोलायमान अन् नाजूक बनली आहे.

पावती दाखवून देणगी परत घ्यावी; साक्षी महाराजांचे आवाहन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या