22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeसंपादकीयकालबाह्य संकल्पना?

कालबाह्य संकल्पना?

एकमत ऑनलाईन

राजकीय आखाड्यात भाजपने पर्यायाने नरेंद्र मोदी यांनी मारलेली मुसंडी रोखण्यासाठी विरोधक सतत प्रयत्नशील असतात. एखाद्या राज्यात यश मिळतेही परंतु सर्वसाधारणपणे मोदींचा जोर अजूनही कायम आहे. निर्भेळ यश मिळवण्यासाठी सतत अथक मेहनत करावी लागते. मातब्बर शक्तीला रोखण्यासाठी छोट्या छोट्या शक्तींची एकजूट होणे आवश्यक असते. स्वत:चे इगो बाजूला ठेवून एकी करावी लागते. परंतु ब-याच वेळा एकी होतच नाही, एकीत बेकी झाल्याचेच दिसते. मंगळवारी नवी दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत तेच दिसून आले. बैठकीत देशातील सध्याची राजकीय परिस्थिती, जनतेला भेडसावणारे प्रश्न आणि केंद्र सरकारची वादग्रस्त धोरणे या मुद्यांवर चर्चा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते तरी, संभाव्य बिगर भाजप महाआघाडीच्या पर्यायाची चाचपणी हाच बैठकीचा प्रमुख हेतू असल्याचे मानले जात होते.

पश्चिम बंगालमधील निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला भरघोस यश मिळवून देण्यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा मोठा वाटा होता. याच प्रशांत किशोर यांनी मुंबईत ११ जून रोजी पवारांशी तीन तास चर्चा केली होती. त्यानंतर नवी दिल्लीतही दीड तास चर्चा झाली होती. बंद दाराआड झालेल्या या चर्चेमुळे हे दोघेही भाजपविरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा होती. त्यानंतर लगेच मंगळवारी काँग्रेसेतर विरोधी पक्षांची बैठक बोलावण्याचा निर्णय झाला. या दोघांच्या वाढत्या सक्रियतेमुळे ते देशाला तिस-या आघाडीचा पर्याय देण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात होते. बैठकीत २०२४ मधील लोकसभा निवडणुकीतच नव्हे तर उत्तर प्रदेशसारख्या राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपविरोधात एकत्रितपणे लढण्याची…. आखली जाऊ शकेल असा अंदाज होता.

माजी केंद्रीय मंत्री व मोदींचे विरोधक मानले जाणा-या यशवंत सिन्हा यांच्या ‘राष्ट्रमंच’ या बिगर राजकीय संस्थेने ही बैठक आयोजित केली होती. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष आदी १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीचे निमंत्रण होते. काँग्रेसच्या जी-२३ गटातील नेते कपिल सिब्बल यांनाही निमंत्रण होते परंतु त्यांनी उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. यशवंत सिन्हा हे तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. बैठकीत काँग्रेसचा सहभाग नसणार हे आधीच स्पष्ट झाले होते. तर शिवसेनेला बैठकीचे निमंत्रण नव्हते. राष्ट्रमंचच्या बॅनरखाली होणा-या बैठकीवर अधिक भाष्य करण्यास काँगे्रसचे खासदार राहुल गांधी यांनी नकार दिला होता. ही राजकारणावर चर्चेची वेळ नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त करून राहुल गांधी म्हणाले, सध्या माझे देशातील परिस्थितीवर लक्ष केंद्रित असून ही परिस्थिती चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचे माझे उद्दिष्ट आहे.

कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक पावले उचलण्याकरिता सरकारला भाग पाडण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे राजकारणावर चर्चा करून या मुद्यावरून मला भटकायचे नाही. राजकारणावर चर्चा करण्याची वेळ व स्थान वेगळे आहे. वेळ आल्यावर त्यावर बोलेन असे राहुल गांधी म्हणाले होते. खरे तर काँग्रेसलाही बैठकीचे निमंत्रण होते परंतु त्यांच्या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे बैठकीच्या यशासंबंधी साशंकता होती. अखेर मंगळवारी पवारांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला उपस्थित असणा-या नेत्यांनी या बैठकीचा केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात मोर्चेबांधणीबाबत कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. कोरोना व्यवस्थापन, घटनात्मक संस्थांवरील हल्ले, वाढती बेरोजगारी व महागाईच्या मुद्यावर बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले. विद्यमान राजकीय स्थिती व देशापुढील आव्हानांवर सुमारे अडीच तास चर्चा झाली.

या वेळी भाजपविरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या मुद्यावरही चर्चा झाली पण माकप नेते निलोत्पल बसू यांनी ही शक्यता फेटाळून लावली. ही राजकीय बैठक नव्हती तर समविचारी लोकांची चर्चा होती असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांनी ही बैठक पवारांनी नव्हे तर यशवंत सिन्हा यांनी बोलावल्याचे स्पष्ट केले. काही माध्यमे ही बैठक पवारांनी बोलावल्याचा दावा करत आहेत पण त्यात तथ्य नाही. ही बैठक पवारांच्या घरी झाली असली तरी राष्ट्रमंचचे प्रमुख सिन्हा यांनी बोलावली होती. काँग्रेसला या बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोपही मेमन यांनी फेटाळला. राष्ट्रमंचच्या विचारसरणीच्या लोकांना या बैठकीचे निमंत्रण होते, त्यात सर्वपक्षीय नेते होते. कोणताही भेदभाव नव्हता. आम्ही काँग्रेसच्या नेत्यांनाही निमंत्रण दिले होते पण पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्यांना येता आले नाही अशी सारवासारवही मेमन यांनी केली. काँग्रेसला डावलून भाजपविरोधात महाआघाडी स्थापण्याचा कोणताही प्रयत्न नाही असे राष्ट्रमंचने म्हटले आहे.

अडीच तास चाललेल्या बैठकीत महाआघाडीची शक्यता तूर्तास तरी संपुष्टात आली आहे. बिगर भाजप-बिगर काँग्रेस तिसरी आघाडी स्थापण्याबाबत प्रसार माध्यमातून चर्चा झाली असली तरी ही बैठक राजकीय नव्हती. काँग्रेसला बाजूला सारून पवारांनी राजकीय पाऊल उचलले नाही असे सांगण्यात येत आहे. तिसरी आघाडी भाजपला आव्हान देऊ शकत नाही असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. माझा तिस-या किंवा चौथ्या आघाडीवर विश्वास नाही. अशी एखादी आघाडी भाजपला यशस्वी आव्हान देऊ शकेल असे वाटत नाही असेही ते म्हणाले. प्रशांत किशोर आपल्या मतावर ठाम असतील तर त्यांनी शरद पवारांशी कसली खलबते केली ते सांगायला हवे. तिसरी आघाडी ही एक कालबा संकल्पना आहे. विद्यमान राजकीय स्थितीत ती अनुकूल नाही असे प्रशांत किशोर यांचे मत आहे.

शरद पवार आणि आपण यापूर्वी एकत्र काम केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या समवेतची भेट केवळ एकमेकांना चांगल्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी होती असेही किशोर यांनी म्हटले आहे. राज्यावर भाजपविरोधात कोणते मुद्दे काम करतील व कोणते नाही यावर या दोघांची चर्चा झाली म्हणे. सध्या तरी त्यांच्या योजनेत तिस-या आघाडीची कोणतीही संकल्पना नाही म्हणे. दोघेही मातब्बर रणनीतीकार तेव्हा ‘जब मिलेंगे दो यार तब खूब जमेगा रंग’!

अर्थझळा सुसह्य करण्यासाठी…

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या