28.8 C
Latur
Saturday, February 4, 2023
Homeसंपादकीयराजकीय ‘काव-काव’!

राजकीय ‘काव-काव’!

एकमत ऑनलाईन

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. आता हा प्रश्न जास्त काळ भिजत ठेवता येणार नाही, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या ताज्या सुनावणीत केली होती. निमित्त होते कर्नाटकने या प्रकरणात आपली बाजू मांडण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्याचे! सर्वोच्च न्यायालयाने मागणी फेटाळल्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमा प्रश्नावर अचानक आक्रमक पवित्रा घेतला व हा वाद राजकीयदृष्ट्या पेटवण्याची चाल खेळली. हा त्यांचा राजकीय कावा व अपरिहार्यताही! कारण येत्या वर्षभरात कर्नाटकात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि त्यानंतरच्या काळात देशाला लोकसभा निवडणुकीचे वेध लागणार आहेत. बोम्मई यांना मुख्यमंत्री म्हणून फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. उलट त्यांची कामगिरी ही निस्तेज व निष्प्रभ ठरलेली आहे आणि त्यामुळे केवळ बोम्मईंनाच नाही तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही आपल्या ताब्यातील एकमेव दक्षिणेतील राज्य असलेल्या कर्नाटकातील भवितव्याबाबत चिंता लागलेली आहे. अशा स्थितीत राजकीय पक्षांचा आवडता फंडा असतो तो अस्मितेची लढाई सुरू करून जनतेला त्यावर पेटवण्याचा व या आगीवर आपल्या राजकीय स्वार्थाच्या पोळ्या भाजून घेण्याचा! बोम्मई व भाजपचा सीमावाद पेटविण्याचा प्रयत्न हा त्याचाच भाग! हा बोम्मई यांचा राजकीय कावा जसा तसेच त्यांची अपरिहार्यताही! याच बोम्मई महाशयांनी अस्मितेच्या राजकारणाचा एक प्रयत्न म्हणून कर्नाटकात अगोदर हिजाबचा वाद पेटवण्याचा प्रयत्न करून पाहिला.

मात्र त्यातून त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. हिजाब वादाने जी धग निर्माण केली ती कर्नाटक निवडणुकीच्या मतदानापर्यंत टिकणे व त्यातून राजकीय पोळी भाजली जाणे अवघडच हे लक्षात आल्यावर बोम्मई व त्यांच्या भाजपला आपली राजकीय पोळी भाजून देणा-या दुस-या हुकमी अस्मितेच्या मुद्याची अत्यंत तीव्रतेने गरज होती. अशावेळी भारताच्या स्वातंत्र्यापासून धगधगत असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाएवढा हुकमी अस्मितेचा मुद्दा तो कोणता? त्यामुळे बोम्मई यांनी हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना व त्यावर केवळ तेथेच तड लागण्याचा एकमेव पर्याय शिल्लक असतानाही या मुद्यावरून राजकीय आखाडा तापवण्याची चाल खेळली व आज पुन्हा एकवार सीमावाद ज्या पद्धतीने पेटला आहे हे पाहता बोम्मईंची ही चाल यशस्वीच ठरली असेच म्हणावे लागेल! कर्नाटकातील सध्याची भाजपची राजवट ही लोकांनी निवडून दिल्याच्या राजमार्गाने आलेली नाही तर फोडाफोडीचे राजकारण करून भाजपने या राज्यात सत्ता बळकावली आहे हे येथे लक्षात घ्यावे लागेल.

सत्ताप्राप्तीनंतर बोम्मईंच्या निष्क्रिय कारभाराने या राज्यात भाजपची वारंवार लाज निघाली आहे. त्यातच राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेस या राज्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याने काँग्रेससाठी सकारात्मक वातावरण निर्माण झालेले आहे. याचा परिणाम येणा-या विधानसभा निवडणुकीत होण्याची भीती बोम्मई व भाजपला आहे. यामुळेच या सगळ्यास उत्तर म्हणून बोम्मईंनी सीमावादाचा हुकमी अस्मितेचा मुद्दा पेटवून दिला आहे. त्यावरून महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप नेत्यांची राजकीय कोंडी होत असली तरी भाजपचे केंद्रीय नेतृत्व या वादात मौन बाळगून आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रात अडचण झाली तरी सध्या कर्नाटकात हा वाद पेटणे आवश्यकच, या रणनीतीला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे मूक समर्थनच आहे. या राज्यात सत्ता टिकवण्यासाठी भाजपला बेळगाव, हुबळी, धारवाड या प्रांतातील समर्थनाची गरज आहे. या भागातून १८ आमदार निवडले जातात. राजधानी बंगळुरू-म्हैसूर हा भाग लिंगायत-वोक्कलिंग विभागणीने भाजपची काळजी वाढवत आहे. अशावेळी हक्काच्या संख्याबळासाठी सीमाभाग महत्त्वाचा ठरतो आणि त्यावरून अस्मितेची लढाई पेटविता येते म्हणूनच कर्नाटकचा हा राजकीय कावा सुरू झाला आहे.

ही आग कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीपर्यंत विझणार नाही याची दक्षता बोम्मई व भाजपकडून घेतली जाणार, हे उघडच! कदाचित निवडणूक पार पडल्यावर सर्वोच्च न्यायालयात हा वाद असल्याचे व न्यायालयाचा निर्णय शिरोधार्य असल्याची आठवण करून देत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून ही आग थंड करण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्वाेच्च न्यायालयात या वादाची तड कधी व कशी लागेल, हे कुणालाच माहीत नाही. त्यामुळे तोवर या अस्मितेच्या मुद्याचा राजकीय स्वार्थासाठीचा वापर अटळच! ही झाली कर्नाटकी ‘काव-काव’ची पार्श्वभूमी! ती महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना कळत नाही, असे म्हणणे धाडसाचेच! मग जर हे कळते व या वादाचा भाजपला राजकीय फायदा मिळणार आहे हे स्पष्टपणे दिसते तेव्हा त्यावर शांत राहून भाजपला शह देण्याचे सोडून महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी या आगीत तेल ओतण्याचे कारण काय? हा प्रश्नच! त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर हेच दिसते की, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनाही या अस्मितेच्या लढाईचा राजकीय फायदा उठवायचा आहे. त्यामुळेच कर्नाटकी कोल्हेकुईला डरकाळ्यांनी उत्तर देण्याची स्पर्धा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. शिवसेना पक्षाचे राजकारणच मुळात अस्मितेच्या मुद्यावर आहे.

शिंदेंच्या बंडाने पक्षात फूट पडून झालेल्या पडझडीतून सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांना अशा अस्मितेच्या मुद्यावरील संघर्षाची गरजच आहे. शिवाय शिंदे-फडणवीस सरकारची पुरती कोंडी करायची तर महाविकास आघाडी भक्कम पाहिजे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंना बळ देण्याची कुठलीच संधी सोडण्याचा प्रश्न येत नाही. राष्ट्रवादीसोबत राहणे हे राज्यातील काँग्रेसचे ठरलेले धोरण! त्यामुळे सीमावादावरून शिंदे-फडणवीस सरकारची शक्य तेवढी कोंडी करण्याचीच महाविकास आघाडीची रणनीती राहणार हे स्पष्टच! त्याचा फायदा राज्यातल्या महानगरपालिका व इतर होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला होऊ शकतो. कदाचित यामुळेच कर्नाटकच्या काव-कावकडे दुर्लक्ष करण्यातच राजकीय शहाणपण असतानाही महाराष्ट्रातील राजकीय पक्ष हा शहाणपणा दाखवायला तयारी नाहीत. उलट केवळ कर्नाटकच नव्हे तर तेलंगण, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमेवर असणारी महाराष्ट्रातील गावे त्या राज्यात जाण्याची मागणी करतायत! ही मागणी करण्यामागे दबावाचे राजकारण आहे, हे मान्य केले तरी यामुळे नवे सीमावाद सुरू होऊ शकतात, याचे भान राज्यातल्या राजकीय पक्षांना उरले आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.

हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामाच्या आठवणी लिहिताना या संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ म्हणतात, ‘भारतासारख्या विस्तृत देशात कोणताही आकृतिबंध स्वीकारला तरी कसल्या ना कसल्या अडचणी उत्पन्न होत राहणारच! सहिष्णुता आणि समजूतदारपणा दाखवूनच या अडचणीतून मार्ग निघतील.’ सध्या नेमका याच वृत्तीचा सर्वच राजकीय पक्षांना आपल्या राजकीय स्वार्थासमोर साफ विसर पडल्याचेच चित्र आहे. त्यातूनच अस्मितेच्या मुद्यांवरची ‘राजकीय काव-काव’ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातून जो संघर्ष निर्माण होतो त्याचा राजकीय फायदा या राजकीय पक्षांना मिळतो खरा पण त्यात भरडली जाते ती सामान्य जनता! या जनतेचे कुणाला सोयरसुतक आहे का? असाच प्रश्न सध्याची परिस्थिती पाहून निर्माण होतो, हे मात्र निश्चित! त्यामुळे आता जनतेनेच शहाणपण दाखवावे, हेच भल्याचे!!

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या