23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeसंपादकीयलोकानुनय की अर्थशहाणपण?

लोकानुनय की अर्थशहाणपण?

एकमत ऑनलाईन

सध्या देशोदेशींच्या राजकारणात लोकानुनयी राजकारणाचीच चलती आहे व या राजकारणासमोर अर्थशहाणपणा नेहमीच पराभूत होताना दिसतो आहे. मागच्या काही वर्षांत तर जगातील सर्वच राष्ट्रांना ‘रेवडी राजकारणा’ने ग्रासलेले पहायला मिळते आहे. रेवडी राजकारण अंतिमत: जनतेच्या खिशावर व देशाच्या अर्थव्यवस्थेवर उलटणारे असते याचा वारंवार अनुभव येऊनही सर्वसामान्यांच्या मनातले ‘मोफत’चे आकर्षण काही केल्या कमी होत नाहीच. आपल्या देशात तर आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात रोजच याचा अनुभव घेतो आहोतच. मात्र, ज्या देशांमध्ये लोकशाही प्रगल्भ झाल्याचा, मतदार सुज्ञ व जबाबदार असल्याचा ढोल बडविला जातो तेथेही लोकानुनयाच्या राजकारणाने अर्थशहाणपणाला मात द्यावी, ही चिंताजनक बाब! सध्या ब्रिटनमध्ये हीच चिंता व्यक्त होतेय आणि त्याचे कारण आहे ते पंतप्रधान पदासाठीच्या निवडणुकीत लिस ट्रस यांनी प्रतिस्पर्धी ऋषी सुनक यांच्यावर मिळविलेला विजय! या निवडणुकीतील सुनक यांच्या शेवटच्या टप्प्यातल्या पिछाडीला ‘गोरे विरुद्ध तपकिरी’चा रंग दिला जात असला तरी ते पूर्ण सत्य नाही.

देशाची अर्थव्यवस्था गटांगळ्या खात असताना निवडणुकीतील विजयासाठी आपण अर्थशहाणपणाला फाटा देऊन लोकानुनयाचा मार्ग स्वीकारणार नाही, अशी पूर्णत: ‘अराजकीय’ भूमिका सुनक यांनी घेतली आणि तेच त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले आहे. लिस ट्रस यांचा लौकिक बौद्धिकदृष्ट्या अत्यंत अप्रामाणिक पण राजकीयदृष्ट्या अत्यंत चतुर असाच! आजच्या राजकारणासाठी त्या एकदम ‘फिट’! त्यांनी आपल्या लौकिकास अनुसरून देशात अभूतपूर्व आर्थिक संकट अनुभवत असलेल्या सामान्यांना अर्थशहाणपण शिकवण्याचा नसता उद्योग न करता त्यावर लोकानुनयी घोषणेचा जालिम उपाय करून आपले इप्सित साध्य करण्याचा चतुर राजकीय मार्ग अवलंबिला व अत्यंत प्रगल्भ मानल्या जाणा-या ब्रिटिशांना त्याची भुरळ पडली.

त्यामुळे सुरुवातीच्या फे-यांमध्ये आघाडीवर असणारे सुनक नंतर पिछाडीवर गेले आणि शेवटी पराभूत झाले. एरवी भारतात ब्रिटनच्या राजकारणाबाबत सर्वसामान्यांना कुतुहल अथवा उत्कंठा असण्याचे कारण नाही. मात्र, ऋषी सुनक भारतीय वंशाचे व इन्फोसिसच्या नारायण-सुधा मूर्ती यांचे जावई असल्याने व त्यांच्या याच वैशिष्ट्याची माध्यमांमध्ये जोरदार चर्चा रंगल्याने सामान्य भारतीयांची उत्कंठा ताणली गेली होती. दुसरे प्रमुख कारण म्हणजे इकडे महाराष्ट्रात बंडाचा झेंडा फडकावून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हायला भाग पाडले आणि तिकडे ऋषी सुनक यांच्या बंडाने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पायउतार व्हावे लागले होते. शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळाल्याने सकृतदर्शनी त्यांचे बंड जसे यशस्वी ठरले तसेच काहीसे सुनक यांच्याबाबतीतही घडेल हा भारतीयांचा आशावाद! ऋषी सुनक यांच्या रूपाने एक भारतीय ब्रिटनचा पंतप्रधान होणे हा भारतीयांसाठीचा राष्ट्रवादाची भावना उचंबळून टाकणारा ‘काव्यगत न्याय’ ठरला असता. मात्र, तसे काही घडले नाहीच कारण ऋषी सुनक यांनी राजकीय चातुर्यापेक्षा जबाबदार अर्थशहाणपणास प्राधान्य दिले.

ब्रिटनची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी बोरिस जॉन्सन यांच्या कार्यकाळात करण्यात आलेली करवाढ योग्यच यावर ऋषी सुनक कायम राहिले. खरे तर ज्यांच्या विरोधात बंड केले त्यांच्या काळातील निर्णयात आपण सहभागी असलो तरी त्याची तमा न बाळगता ‘पलटूराम’ बनत त्या निर्णयांना चुकीचे ठरवायचे असते हे ‘राजकीय शहाणपण’ भारतीय वंशाचे असूनही सुनक यांना असू नये हे आश्चर्यच! त्याउलट ट्रस यांनी अगदी बरोब्बर हा राजकीय शहाणपणा पूर्ण चातुर्याने आत्मसात केला व देशोदेशींच्या मध्यमवर्गास सदोदित भुरळ घालणारी ‘प्राप्तिकरात कपात’ ही लोकानुनयी घोषणा करून टाकली. त्यांच्या या राजकीय शहाणपणासमोर सुनक यांचे अर्थशहाणपण मागे पडले. ट्रसबाई युनायटेड किंगडमच्या नव्या पंतप्रधान झाल्या. त्या ब्रिटनच्या तिस-या महिला पंतप्रधान बनल्या व त्यांच्यासमोर पोलादी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचा आदर्श आहे वगैरे कौतुक-गीते गायिली जात असली व त्या कशा भारतस्नेही आहेत याचे दाखले देणारे पोवाडे गायिले जात असले तरी त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास पाहता त्यांच्या प्रामाणिकपणावर कितपत विश्वास ठेवावा, हाच प्रश्न! या ट्रसबाईंनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात डाव्या विचारसरणीपासून केली आणि तेथून उडी मारत त्या उजव्या विचारसरणीच्या हुजूर पक्षात आल्या व त्यांनी चक्क पंतप्रधानपदही प्राप्त केले. विशेष म्हणजे आजही या ट्रसबाईंचे आई-वडील मजूर पक्षात आहेत व पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ आहेत.

आपली कन्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अंतिम फे रीतपोहोचल्याचे कळल्यावर ट्रसबाईंच्या वडिलांनी अक्षरश: कपाळावर हात मारून घेतला. त्याचा सविस्तर वृत्तांतच ब्रिटनच्या काही वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केला आहे. सांगायचा मुद्दा हा की, ट्रसबाईंचा ब्रिटनमधील आजवरचा लौकिक हा ‘पलटूराम’ असाच आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपला हा लौकिक केवळ राजकीय बाबतीतच नाही तर अनेक आर्थिक व सामाजिक बाबतीतही दाखवून दिला आहे. त्याचे ठळक उदाहरण म्हणजे २०१६ पर्यंत त्या कडव्या ‘ब्रेग्झिट’विरोधी होत्या आणि आता त्या ‘ब्रेग्झिट’च्या कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या राजकीय व वैचारिक कोलांटउड्यांची आणखी बरीच उदाहरणे देता येतील पण तो निव्वळ जागेचा अपव्ययच ठरेल ! मूळ मुद्दा हा की, जबाबदार अर्थशहाणपण दाखविणा-या सुनक यांना पराभूत करून लोकानुनयी राजकारणाची कास धरणा-या ट्रसबाईंच्या हाती अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असलेल्या ब्रिटनचा कारभार गेला आहे. ‘मला अनेक कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत,’ असे आवेशपूर्ण उद्गार ट्रसबाईंनी आपल्या निवडीनंतर काढले असले तरी त्यांचा हा आवेश कितपत टिकणार व देशाची गटांगळ्या खात असलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी त्या कितपत प्रामाणिकपणे झटणार याबाबत शंकाच आहे.

पंतप्रधान पदासाठीच्या पसंतीबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ब्रिटनच्या सामान्यांनी ऋषी सुनक यांनाच भरभरून पसंती दिली होती. याचाच अर्थ दोन वर्षांनंतरच्या निवडणुकीत ऋषी सुनक हे पुन्हा ट्रसबाईंचे तगडे प्रतिस्पर्धी असणार आहेत. चतुर राजकारणी असलेल्या ट्रसबाईंना येती दोन वर्षे सतत ही बाब खुपत राहणार हे उघड! त्यावरचा सोपा उपाय म्हणून या ट्रसबाई लोकानुनयाच्या हुकमी एक्क्याचा मनसोक्त वापर करू शकतात. त्यांनी तसा तो केला तर आताच गटांगळ्या खात असलेली महासत्ता ब्रिटनची अर्थव्यवस्था पुरती डबघाईला गेल्याशिवाय राहणार नाही. अर्थभान असणा-या ब्रिटिश नागरिकांना म्हणूनच या ट्रसबाईंच्या हाती कारभार गेल्याची व किमान दोन वर्षे तरी तो त्यांच्याच हाती राहण्याची चिंता सतावते आहे. ट्रसबाई राजकारण बाजूला ठेवून अर्थशहाणपणाचा मार्ग धरणार की, राजकीय चातुर्याने अर्थशहाणपणाला झाकोळून टाकण्याचा सरधोपट लोकानुनयी मार्गच अवलंबिणार यावरच एकवेळ ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नव्हता त्या महासत्ता ब्रिटिशांचे आर्थिक भविष्य अवलंबून असणार आहे, हे मात्र निश्चित!

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या