23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeसंपादकीयरस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते?

रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते?

एकमत ऑनलाईन

बई-पुणे एक्स्प्रेस वे आठ लेनचा करून वारंवार होणा-या अपघातांची ठिकाणे शोधून तेथील दोष दूर केले जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिले. मराठा समाजाचे नेते, माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या गाडीला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल कुटुंबियांसह अनेकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यांचे निरसन होण्यासाठी या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळात केली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई-पुणे महामार्गावरील अपघात स्थळांचा शोध घेऊन त्रुटी सुधारण्याचे काम सुरू आहे. त्रुटी दूर केल्यानंतर महामार्गावरची कोंडी व अपघातांची शक्यता कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला. विश्वास वगैरे ठीक आहे पण येथे मुख्य प्रश्न असा की, महामार्गावरील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता तो आठ पदरी केल्याने अपघातांचे प्रमाण कमी होईल याची शाश्वती काय ?

राज्यातील वाहतूक व्यवस्था आणि रस्त्यांचे जाळे खड्ड्यात घालण्याचे पुण्यकर्म सर्वपक्षीय राज्यकर्ते, भ्रष्ट प्रवृत्तीचे नोकरशहा, कंत्राटदार, स्थानिक समाजसेवक कम राजकीय कार्यकर्ते नित्यनेमाणे करीत असतात. राज्यात सर्वत्र हीच स्थिती आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणारे लाखो कोकणवासी सुखकारक व जलद प्रवास करता येईल, अशी आशा बाळगून आहेत. मात्र त्यांच्या नशिबी घोर निराशाच येणार आहे. दरवर्षी ना मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होते ना रस्ते चांगले होतात. गणेशोत्सव जवळ आला की, रस्ता डागडुजीचे आदेश दिले जातात. खड्डेयुक्त रस्ते हे जणू आपल्या वाहतूक व्यवस्थेचे वास्तव बनले आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चून खड्डे बुजवण्याचे दावे केले जातात, पैसे खर्च होतात मात्र खड्डे तसेच राहतात. दूर कशाला? लातूर परिसरातही रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. लातूर-औसा राष्ट्रीय महामार्गाचे काम गत दीड-दोन वर्षांपासून सुरू आहे. सिमेंट-काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी वासनगाव, पेठ, बुधोडा या ठिकाणी पुलाचे काम अद्यापही सुरू आहे. या ठिकाणी वाहनधारकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यावर गिट्टी टाकल्याने मोठ्या वाहनांच्या वेगामुळे या गिट्टीचा मार अनेक छोट्या वाहनधारकांना आणि दुचाकीस्वारांना बसतो. पेठ पुलावर मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उठत असल्याने समोेरून येणारे वाहन दिसत नाही. आता बुधोडापासून वन-वे वाहतूक सुरू झाली आहे पण लातूरहून वन-वे रस्त्याकडे वळताना टाकण्यात आलेल्या गिट्टीमुळे दुचाकी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. अनेक वाहने घसरून अपघात होत आहेत. वासनगाव पुलावर मोठे खड्डे पडल्याने त्यातून मार्ग काढणे वाहनधारकांना कठीण जात आहे. राष्ट्रीय महामार्ग तयार करणा-या अधिका-यांना, कंत्राटदारांना या अडचणींची कल्पना येत नसेल काय ? खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनावरून पडल्याने अनेक अपघात होत आहेत. जोरदार पावसामुळे रस्त्यांची चाळण होते, त्यामुळे खड्ड्यांमधून प्रवास करणे आव्हानात्मक असते. गत दोन वर्षे कोरोना महामारीमुळे बहुतेक जणांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू होते. त्यामुळे खड्ड्यांमधून प्रवास करण्याची गरज तुलनेने कमी होती. परंतु आता दैनंदिन कामे सुरू झाली आहेत. आता खड्ड्यांमधून प्रवास करणे अनिवार्य झाले आहे. लहान-मोठ्या शहरांत हीच स्थिती आहे. रोजच्या प्रवासामध्ये खड्ड्यांमुळे उद्भवणा-या पाठ, कंबर आणि मानेच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. एक खड्डा चुकवण्याच्या नादात दुस-या खड्ड्यात गाडी जाते आणि जोरदार झटका बसल्याने पाठ, मान आणि कंबरेवर त्याचा विपरित परिणाम होतो. ‘स्लीप डिस्क’ चा त्रासही उद्भवू शकतो.

बेशिस्त वाहतूक, असुरक्षित रस्ते आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे आदी कारणांमुळे राज्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याबाबत केवळ चिंता व्यक्त केल्याने अपघातांचे प्रमाण कमी होईल, असे नाही. हे प्रमाण कमी व्हावे असे वाटत असेल तर पायाभूत सेवा-सुविधांचा विकास अत्यावश्यक आहे. व्यापार करण्याच्या उद्देशाने आलेल्या इंग्रजांनी देशावर दीडशे वर्षे राज्य केले. आपला जम बसविण्यासाठी सर्वप्रथम त्यांनी काय केले असेल तर ते म्हणजे रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या पायाभूत सेवा-सुविधांचा विकास. रस्ते म्हणजे विकासाचा मार्ग, मग तो सामान्य नागरिकांचा असो, जिल्ह्याचा असो, राज्याचा असो वा देशाचा ! रस्त्यांशिवाय मालवाहतूक होऊ शकत नाही, उद्योगधंद्यांना चालना मिळू शकत नाही. रस्त्यांशिवाय प्रगती अशक्य म्हणूनच देशाच्या सर्वांगीण विकासात रस्त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. इंग्रजांनी देशात सर्वप्रथम रस्त्यांचे जाळे विणले होते आणि पर्यायी रेल्वेमार्गही उभारला होता. देश स्वतंत्र झाल्यानंतरही देशातील शेतमालाची वाहतूक प्रामुख्याने रस्तामार्गानेच होत आहे. भारतीय महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्या माध्यमातून देशात नवे रस्ते बांधणे आणि आहे त्या रस्त्यांच्या डागडुजीचे काम केले जात आहे. गत काही वर्षांत रस्त्यांच्या कामावरील केंद्रीय अर्थसंकल्पीय तरतुदीतही मोठी वाढ करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात सुमारे दोन लाख कोटी रुपये रस्तेबांधणी व दुरुस्तीवर खर्च केले जाणार आहेत.

देशात २६ हरित एक्स्प्रेस वे बांधले जाणार आहेत. शिवाय लॉजिस्टीक पार्क उभारले जाणार आहेत. रस्ते मार्गाने मुंबईतील नरिमन पॉईंट येथून दिल्लीला १२ तासांत पोहोचण्याचे स्वप्न असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या रस्ते पायाभूत सुविधा मानकांच्या धर्तीवर २०२४ अखेरपर्यंत बिहार आणि उत्तर प्रदेशसह सर्व भारतीय रस्त्यांच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. रस्ते बांधणीसाठी सिमेंट आणि इतर कच्च्या मालाला पर्यावरणपूरक पर्याय शोधले जाणार आहेत. बँका कर्ज देण्यास तयार आहेत पण प्रश्न आहे तो मानसिकतेचा. प्रकल्प वेळेवर पूर्ण होत नाहीत ही गडकरींची खंत आहे. प्रकल्प आखताना ते वेळेत पूर्ण कसे होतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. परंतु सरकार वेळेवर निर्णय घेत नाही ही मोठी समस्या आहे. असे सांगत गडकरी यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. रस्त्यांच्या डागडुजीबाबत न्यायालयाने आदेश दिले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. जमिनीवरचे वास्तव सामान्यांची घोर निराशा करणारे आहे. खरे तर, महामार्गाची नियमित देखभाल व्हायला हवी, महामार्गावर सार्वजनिक स्वच्छतागृहे, पोलिसांचा त्वरित प्रतिसाद मिळेल अशी संपर्क व्यवस्था, वैद्यकीय सुविधा पुरविणारी आरोग्य व्यवस्था उपलब्ध असायलाच हवी तरच मनुष्यहानी थांबू शकेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या