24.8 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeसंपादकीयपुनश्च हरिओम!

पुनश्च हरिओम!

एकमत ऑनलाईन

नैसर्गिक आपत्तीसमोर माणसाचे काहीच चालत नाही. भूकंप, अतिवृष्टी, ढगफुटी, महापूर, दरडी कोसळणे अशा विविध रूपांतून निसर्ग माणसाच्या धैर्याची, सहनशीलतेची परीक्षा घेत असतो. अशी संकटे कोसळल्यानंतर माणूस हताश होतो, किंकर्तव्यमूढ होऊन जातो. त्याची मती काम करत नाही. परंतु त्याला डोक्याला हात लावून बसून चालत नाही. त्याला फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्यावीच लागते. कंबरडे मोडले तरी त्याला दु:ख विसरून सावरावे लागते आणि पुनश्च हरिओम म्हणावे लागते. गत ४-५ दिवसांपासून महाराष्ट्रावर भीषण संकट कोसळले आहे. अतिवृष्टी, ढगफुटी, महापूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांनी राज्य हादरून गेले आहे. रायगड, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दीडशेपेक्षा अधिक बळी गेले असून अनेकजण बेपत्ता आहेत.

महाड तालुक्यात दुर्गम डोंगराळ भागात वसलेले तळीये गाव तर अक्षरश: जमीनदोस्त झाले आहे. या गावातील ३२ घरांवर दरड कोसळून ही कुटुंबे मातीच्या ढिगा-याखाली गाडली गेली. तळीये गावातील कोंडाळकर वाडीवर कोसळलेल्या दरडीचा ढिगारा सुमारे एक किलोमीटरपर्यंत पसरल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे ९० च्या दशकात किल्लारी परिसरात झालेल्या भूकंपाची आठवण येते. राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून आणि पुरामुळे गत ४-५ दिवसांत १४५ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला तर ६० हून अधिक जखमी झाले. बेपत्ता असलेल्या सुमारे शंभरहून अधिक नागरिकांचा शोध सुरू आहे. सुमारे १ लाख ३५ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७४ वर पोहोचला. रायगडमध्ये ५३, रत्नागिरी जिल्ह्यात ३ तर सातारा जिल्ह्यात १८ जणांचा बळी गेला.

तुफानी पावसामुळे महाड तालुक्यातील तळीये येथे दरड कोसळल्याने त्यातील मृतांची संख्या ४२ वर पोहोचली तर ४३ ग्रामस्थ बेपत्ता आहेत. दरडीचा धोका असलेल्या गावांच्या पुनर्वसनाबरोबरच कोकणातील नद्यांना येणारे पूर आणि त्यामुळे निर्माण होणारी गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन त्याचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी तळीये गावाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली आणि दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन केले. पश्चिम महाराष्ट्रात चार दिवस कहर माजवणा-या पावसाने शनिवारी विश्रांती घेतली. मात्र, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना आलेला पूर कायम आहे. मुंबईतही दरडीचा धोका असल्याचे दिसून आले आहे. शहरात २९९ वसाहतींना हा धोका संभवतो. पैकी ६० वसाहती धोकादायक स्थितीत तर २० वसाहती अति धोकादायक स्थितीत आहेत. संकटग्रस्तांना सावरण्यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

दरड कोसळून पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या महाड तालुक्यातील तळीयेचे पुनर्वसन म्हाडातर्फे करण्यात येणार आहे. कोकणसह डोंगर आणि द-यांच्या परिसरात असलेल्या गावांची नव्याने यादी तयार करण्यात येणार असून त्यांचे पुणे जिल्ह्यातील माळीणप्रमाणे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार आहे. राज्यातील आपत्तीग्रस्त भागातील प्रत्येक कुटुंबास १० किलो गहू, १० किलो तांदूळ, पाच किलो डाळ आणि पाच लिटर घासलेट मोफत पुरविले जाणार आहे. आपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळ्यांची संख्या दुप्पट केली जाणार आहे. आपत्तीग्रस्तांच्या मदतीला आणखी हात पुढे येतीलही परंतु आपत्तीग्रस्तांची मानसिक स्थिती सावरणार कशी? निसर्गाच्या फटक्यात जीवित हानी आणि वित्तहानी होत असते. ज्यांना फटका बसतो तो शारीरिक तर असतोच परंतु मानसिक फटका हा कधीही भरून निघणारा नसतो. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या चालीवर ‘नेमेचि येते संकटमालिका’ असे म्हणावे लागते. संकट कोसळण्याची शक्यता माणसाला कळते खरी परंतु त्याला नेहमीप्रमाणे उशिरा जाग येते.

मुंबईत पावसामुळे चेंबूर, विक्रोळीत दरड कोसळून ३१ जण मरण पावले पण मुंबईच्या टेकड्या-दरड परिसरात बांधकामे होतातच कशी? हे सारे अनधिकृत स्वरूपाचे बळी आहेत. याला जबाबदार त्या त्या वेळचे सत्ताधारी व मुंबई महापालिका आहे. अशी अनधिकृत घरे बांधली कशी जातात? यातील दोषींना शिक्षा झाल्याचे ऐकिवात आहे का? मुंबईचे हे प्रातिनिधिक उदाहरण पुरेसे आणि खूप बोलके आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात असे अपघात होत असतील तर त्याची जबाबदारी स्थानिक नगरसेवक, आमदार-खासदार यांची आहे. पंतप्रधान-मुख्यमंत्री यांनी आर्थिक मदत जाहीर करणे आता नित्याचे झाले आहे. हा पैसा सामान्य नागरिकांचा असतो. खरे तर ज्या भागात आपत्ती घडली त्या भागातील लोकप्रतिनिधी-महापालिका अधिकारी यांच्यावर कारवाई करून त्यांच्या मालमत्ता जप्त करून तो पैसा बळी गेलेल्यांना द्यायला हवा. आर्थिक मदतीने प्रश्न संपणार नाहीत. भिंती किंवा दरडी कोसळण्याचे प्रकार थांबवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तसेच सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरते, संसार वाहून जातात, कुठे जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी शिरते, पाणीपुरवठा ठप्प होतो, कुठे संरक्षक भिंत कोसळते तर कुठे दरडी कोसळून बळी जातात. असे झाले की राज्य सरकार, केंद्र सरकार आर्थिक मदत जाहीर करते. हे सारे झाले म्हणजे प्रश्न संपले असे होत नाही. मुंबईत गत सहा वर्षांत ४९ हजारांहून अधिक आपत्कालीन घटना घडल्या आणि त्यात एक हजाराहून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला. शहरीकरणाची स्वत:ची अशी एक प्रक्रिया असते मात्र गत दोन-तीन दशकांत देशातील शहरीकरणाची प्रक्रिया बकालीकरणाच्या दिशेने प्रवास करते आहे. ‘गरिबांसाठी घरे’ या गोंडस नावाखाली मिठागरे विकासकांच्या घशात गेली. अगदी खेटून उभ्या असणा-या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या इमारतींमुळे सामान्यांना ऊन, वारा दुर्मिळ झाला आहे. सातत्याने सुरू असलेली बांधकामे, प्लास्टिकचा भस्मासुर, खारफुटीवर होत असलेल्या अतिक्रमणांंमुळे पावसाळ्यात मुंबईची ‘तुंबई’ होत असते.

ओढे-नाले आणि नैसर्गिक जलस्रोतांवर अनिर्बंध बांधकामे उभी राहिली आहेत. हाच प्रकार सर्वत्र होत आहे. त्यामुळे निसर्ग डोळे वटारणारच. गत तीन-चार दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर शनिवारी ओसरला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने विश्रांती घेतली असली तरी कोल्हापूरभोवतीचा पुराचा विळखा कायम आहे. राज्यावर मोठे संकट आले आहे, त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होऊ नये हे पाहण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. निसर्गाच्या फटक्यातून सावरण्यासाठी पुनश्च हरिओम म्हणत कामाला लागले पाहिजे.

अपत्यहिन दांपत्यांच्या चेह-यावर हास्य फुलविणारे ; टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानातून ८० लाख बालकांचा जन्म

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या