कोरोना विषाणू, लॉकडाऊन, महागाई अशा समस्यांना सामोरे जात असतानाच जनतेला नैसर्गिक फटकेही सहन करावे लागत आहेत. हवामान बदलाला तर नेहमीच सामोरे जावे लागते. सध्या महाराष्ट्रात थंडीची लाट सुरू आहे. थंड हवामानात वरचेवर घसरण सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. मुंबई, ठाण्यासह उत्तर महाराष्ट्रात तापमानातील घसरण आणखी दोन दिवस कायम राहील असे हवामान विभागाने म्हटले आहे. येत्या दोन दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढेल असा अंदाज आहे.
वाढत्या थंडीमुळे सकाळी धुके पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मुंबईतील तापमान सरासरीपेक्षा ४.४ अंश सेल्सिअसवर घसरले. राज्याची उपराजधानी नागपूरसह विदर्भात आणि मराठवाड्यातही थंडीचा जोर वाढला आहे. काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटही झाली. उत्तरेकडून येणा-या थंडीच्या लाटेमुळे राज्यात थंडी वाढली आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशात थंडीचा जोर वाढला आहे. तेथून थंड वारे वाहत असल्याने महाराष्ट्रातही हुडहुडीत वाढ झाली आहे. सोमवारी नाशिकमध्ये ७.३ अंश सेल्सिअस तर जळगावात ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकणातही तापमानात मोठी घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रात पुण्यासह सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांत रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली आहे.
मराठवाड्यातही तीच परिस्थिती आहे. ११ ते १५ जानेवारी दरम्यान थंडी आणखी वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने डिसेंबरच्या अखेरीस महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती ती ब-याच अंशी खरी ठरली. अलीकडे हवामान खात्याचे अंदाज तंतोतंत खरे ठरत आहेत. पूर्वी तसे घडत नव्हते. याचाच अर्थ असा की, शास्त्रीय आधाराच्या जोरावर हवामान खात्याच्या कामकाजात सुधारणा झाली आहे. उत्तर भारतात पाऊस आणि बर्फवृष्टी झाल्याने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पावसामुळे रस्ते बंद झाले आहेत. उत्तराखंडमध्ये पाऊस व बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे पर्यटक अडचणीत सापडले आहेत. एक हजार फूट उंचीवर असलेली गावे बर्फाने झाकली गेली आहेत. जम्मू-काश्मीरमध्येही हिमवर्षाव सुरू आहे.
कडाक्याची थंडी आणि हिमवर्षावात आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर भारतीय जवान आपले कर्तव्य पार पाडत आहेत. ही गोष्ट जनतेसाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रात बहुतांश भागात रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. कमाल तापमानही सरासरीखाली गेल्याने दिवसाही गारवा जाणवतो आहे. उत्तरेकडून येणा-या बाष्पामुळे राज्याच्या बहुतांश भागात पावसाळी स्थिती होती. राज्यात काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला असून कापूस, संत्रा, केळी, पपई, ज्वारी, मका, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
मराठवाडा आणि विदर्भात गत तीन दिवसांपासून पाऊस आणि गारपीट सुरू आहे. त्यामुळे धुळे, जळगाव आणि वर्धा जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून गहू, हरभरा, कापूस, ज्वारी, केळी, तूर, कांदा, करडी, मोहरी पिकांचे तसेच भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. डिसेंबर अखेरीस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ६० हजार हेक्टर शेतीक्षेत्र बाधित झाले होते. हातातोंडाशी आलेली जिरायत आणि बागायती पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बीड, लातूर जिल्ह्यातील एक लाख ४० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. ११ जानेवारी रोजी पहाटे लातूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू,ज्वारी व कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. चाकूर तालुक्यात वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाल्याने शेतातील भाजीपाला, कांदा, गहू, ज्वारी, हरभरा पिकाचे नुकसान झाले. वादळी वारा व पावसामुळे ज्वारी आडवी झाली. घरणी, आष्टामोड परिसरात गारांचा पाऊस झाला. त्यामुळे ज्वारीचे पीक आडवे झाले तर तुरीचे काढून ठेवलेले पीक भिजले.
जोरदार वारा व पावसामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला. शिरूर अनंतपाळ तालुक्यातही ९ व १० जानेवारी रोजी रात्री झालेल्या पावसामुळे ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या परिसरात परतीचा चांगला पाऊस झाल्याने रबी पेर मोठ्या प्रमाणावर झाली होती. वारंवार अवकाळीचे संकट का येत आहे यावर आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. पर्यावरणातील असंतुलन हे यामागचे मुख्य कारण आहे. अर्थात याला मानवी कर्तृत्वच कारणीभूत आहे.
काँक्रिटची जंगले वाढत आहेत. वाहन, मोबाईल क्रांती, टॉवर, रसायनांचा वापर, खनिजांचा अति वापर, जंकफूड, फॅशन, यांत्रिक संसाधने, प्लास्टिकचा वाढता वापर, प्राणघातक कच-यात सातत्याने होत असलेली वाढ, वाढते प्रदूषण, अन्नभेसळ, प्राण्यांची शिकार, जंगलतोड यामुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. आपणच निसर्गाच्या जिवावर उठत असू तर तो गप्प राहील कसा? माणसाने कितीही प्रगती केली तरी तो अखेर निसर्गासमोर शून्यच आहे. जगण्याला आवश्यक असलेले ऑक्सिजन, पाणी, सूर्यप्रकाश आपण बनवू शकत नाही. तरीसुद्धा चीन प्रतिसूर्य बनवण्याच्या प्रयत्नात आहे.
अर्थात त्याचा आत्मघात आणि पर्यायाने मानवाचा घात होणार असे दिसते. मानव विज्ञानाशिवाय हजारो वर्षांपासून जगत आला पण तो निसर्गाशिवाय एक क्षणही जगू शकणार नाही. निसर्गाने माणसाला जगण्याला भरभरून दिले आहे. परंतु अतिलोभापोटी तो निसर्गालाच संपवायला निघाला आहे, सोन्याचे अंडे देते म्हणून कोंंबडीच कापल्यावर दुसरे काय होणार?