24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeसंपादकीयनिव्वळ औपचारिकता !

निव्वळ औपचारिकता !

एकमत ऑनलाईन

राष्ट्रपतिपदासाठी आज १८ जुलै मतदान होते आहे. रालोआकडून द्रौपदी मुर्मू तर विरोधकांचे संयुक्त उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा रिंगणात आहेत खरे पण या निवडणुकीसाठी सगळीच प्रक्रिया निव्वळ औपचारिकताच ठरली आहे. भाजपने आदिवासी कर्तबगार महिला म्हणून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्याची जी स्मार्ट खेळी केली आहे त्याने विरोधक पुरते चितपट झाले आहेत. विशेष म्हणजे ही खेळी करताना भाजपने केवळ आपल्या उमेदवाराचा विजय सुनिश्चित केला नाही तर या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित होऊ पाहत असलेल्या विरोधकांच्या ऐक्यालाही पुरता सुरुंग लावला आहे. भाजपचे हे दुहेरी यश आहे आणि विरोधकांची पुन्हा एकवार झालेली फरफट ! मागच्या सात वर्षांपासून भाजप विरोधी पक्षांना आपल्या मुद्यांवर फरफटत आणून निवडणुका जिंकण्याचे तंत्र वापरतो आहे आणि तरीही विरोधकांना अद्याप भाजपच्या या तंत्राला उत्तर शोधता आलेले नाहीच. हे विरोधी पक्षांचे अपयशच! राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे अपयश पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यात यशवंत सिन्हा बळीचा बकराच ठरले कारण ज्यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपला आव्हान देण्यात पुढाकार घेतला त्या ममता बॅनर्जी यांनीच भाजपने मुर्मू यांची उमेदवारी जाहीर केल्यावर दिलेली प्रतिक्रिया ही या चालीने चितपट झाल्याची कबुलीच होती! ‘हे नाव आधीच कळले असते तर मुर्मू यांच्या निवडीचा सर्वसहमतीने विचार करता आला असता,’ ही ममतांची प्रतिक्रिया होती.

ती पुरेशी बोलकी व ही निवडणूक एकतर्फी होण्याची कबुली देणारीच होती. झालेही तसेच! विरोधकांच्या ऐक्याची हवा काढून घेत भाजपने आपल्या पटकथेप्रमाणे या नाट्याचा शेवट अगोदरच निश्चित करून टाकला. तसेही विरोधी पक्षांना ही लढत रंगतदार करायची तर आपले अभेद्य ऐक्य निर्माण करणे आवश्यक होते.हे कठीण काम आणखी महाकठीण कसे होईल याची व्यवस्था मुर्मू यांना उमेदवारी देत भाजपने चोख करून टाकली. त्यातच महाराष्ट्रातील सत्तांतराच्या नाट्याची भर पडली. महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेला खासदारांच्याच आग्रहाखातर मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करावा लागला. एकनाथ शिंदे गटाने तर अगोदरच भाजपसोबत पाट लावून सत्ता स्थापन केलेली असल्याने भाजपची चिंता मिटली. उरलीसुरली धुगधुगी झारखंड मुक्ती मोर्चानेही मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने संपुष्टात आली आहे. मुर्मू यांना जवळपास ६१ टक्के मते निश्चित झाल्याने त्यांचा एकतर्फी विजय सुनिश्चित झाला आहे व विरोधकांचा भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी ठरला आहे.

अर्थात हे होण्याचे भाकित ‘एकमत’ने मुर्मू यांची उमेदवारी जाहीर होताच व्यक्त केले होते. तसेही भाजप व मित्रपक्ष असे मिळून रालोआकडे अगोदरच ५० टक्के मते होती. त्यात भाजपने ‘कर्तबगार आदिवासी महिला’ हे कार्ड खेळल्याने भाजपसोबत नसणा-या अनेक राजकीय पक्षांची राजकीय गोची झाली. त्यांना विरोधकांच्या आघाडीत सामिल होणे अवघड बनले. बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, तेलगू देसम् पक्ष, संयुक्त जनता दल, अण्णा द्रमुक, शिरोमणी अकाली दल, शिवसेना व झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षांनी द्रौपदी मुर्मू यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. किंबहुना या पक्षांना तसा पाठिंबा जाहीर करणे भाग पडेल याची सोयच भाजपने करून टाकली. अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी कुंपणावर उभी असली तरी शेवटच्या क्षणी ते मुर्मू यांच्या पारड्यात आपली मते टाकण्याचीच शक्यता जास्त! एकंदर भाजपने जोरदार रणनीतीच्या बळावर या निवडणुकीत एकहाती वर्चस्व निर्माण केले आहे. भाजपसोबत असणा-या संयुक्त जनता दलाकडे २१ खासदार आहेत. राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्ष, अपना दल आणि ईशान्य भारतातील छोट्या पक्षांकडील खासदारांची संख्या लक्षात घेता मुर्मू यांना किमान ४४० खासदारांचा पाठिंबा मिळणार आहे तर विरोधकांच्या आघाडीचे संयुक्त उमेदवार असणा-या यशवंत सिन्हा यांना केवळ १८० खासदारांचा पाठिंबा मिळणार आहे.

खरे तर भाजपने अगोदरच द्रौपदी मुर्मू यांचे नाव जाहीर केले असते तर एकतर ममता म्हणाल्या तसे सर्वसहमतीने त्यांच्या निवडीचा मार्ग प्रशस्त झाला असता किंवा संभाव्य समीकरणे लक्षात घेऊन विरोधकांनी ऐक्याचा फुगा न फुगवण्याचा निर्णय घेतला असता. मात्र, भाजपला बहुधा हे दोन्ही होऊ द्यायचे नव्हते. या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या उमेदवाराचा हमखास विजय सुनिश्चित करतानाच या निमित्ताने एकत्र येऊ पाहणा-या, आव्हान देऊ पाहणा-या विरोधकांना तोंडघशी पाडत अशा आघाडीसाठी प्रयत्न करणा-यांना, पुढाकार घेणा-यांना हतोत्साहित करायचे, हीच भाजपची रणनीती असावी. त्यामुळे विरोधकांनी आपला उमेदवार निश्चित करेपर्यंत भाजपने आपले पत्ते उघडलेच नाहीत. शेवटच्या क्षणी पत्ते उघडून विरोधकांचे परतीचे वा सन्मानाने पराभव स्वीकारण्याचे मार्गच भाजपने पुरते बंद करून टाकले. त्यामुळे अटळ पराभव स्पष्ट असतानाही मेलेल्या मनाने विरोधी आघाडीला निवडणुकीला सामोरे जाणे व नामुष्की सहन करायला लागणे भाजपने भाग पाडले आहे. भाजपने ही रणनीती यशस्वी करून मुर्मू यांचा विजय तर सुनिश्चित केलाच पण या निवडणुकी पाठोपाठ होऊ घातलेल्या उपराष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांच्या संभाव्य आघाडीला मानसिकदृष्ट्या कसा सुरुंग लावता येईल याची व्यवस्था केली आहे.

काँग्रेसने नमते घेत विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी प्रयत्न केले तरीही अशी आघाडी यशस्वी होणार नाही, अशीच रणनीती आखण्याचेच भाजपने ठरवले असल्याचे स्पष्ट दिसते आहे. शिवाय वारंवार असे प्रयत्न व्हावेत व ते अपयशी ठरून काँग्रेस तोंडघशी पडावी, अशीच रणनीती भाजप आखताना दिसतो आहे आणि काँग्रेसच्या दुर्दैवाने भाजपची ही रणनीती यशस्वी ठरते आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी काँग्रेसला भाजपच्या या रणनीतीवर उत्तर शोधावेच लागेल तरच भाजपसमोर कडवे आव्हान उभे करता येईल. हे कसे व कधी घडणार? यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. तूर्त भाजपने राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांना व विरोधी पक्षांच्या ऐक्याला पुरता धोबीपछाड दिला आहे, हे सत्य मान्य करावे लागेल. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होणेच केवळ बाकी आहे. त्यांचा एकतर्फी व दणदणीत विजय सुनिश्चित आहे. बाकी राजकारण काही असो व त्यात कोणीही जिंको पण देशाला पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून प्राप्त झाली आहे, ही स्वागतार्ह बाब ! त्यामुळे मुर्मू यांचे खुल्या दिलाने अभिनंदन व स्वागत व्हायला हवे, हे मात्र निश्चित !

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या