29.9 C
Latur
Tuesday, March 21, 2023
Homeसंपादकीयजिभेवर खडीसाखर ठेवा!

जिभेवर खडीसाखर ठेवा!

एकमत ऑनलाईन

तोंड गोड तर सारेच गोड असे म्हणतात. मृदू आणि गोड बोलण्याने अनेक कटू प्रसंगांचा सामना करण्याची वेळ येत नाही. संक्रांतीला ‘तिळगुळ घ्या गोड बोला’ असे यासाठीच म्हटले जाते. शीघ्रकोपीपणा, रागीट स्वभाव अनेक समस्या निर्माण करतो. म्हणून जिभेवर नियंत्रण ठेवावे लागते, केवळ खातानाच नव्हे तर बोलताना सुद्धा! सध्या न्यायालयात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाची लढाई सुरू आहे. वर्चस्वाच्या या लढाईत एखादा निर्णय ठाकरे गटाच्या विरोधात गेला की उद्धव ठाकरे अकांडतांडव करतात. त्यांची जीभ सैल सुटते. शिंदे गटाला न्यायालयाची चपराक बसली की एकनाथरावांची जीभ घसरते. न्यायालयात दोन्ही गटांचे वकील कायद्याचा कीस पाडत आहेत. त्यातील मौज दोन्ही गटांनी अनुभवायला हवी. एखाद्या गोष्टीबद्दल आलेल्या अत्यंतिक क्रोधामुळे विवेकावरचे नियंत्रण सुटत जाते. अविवेकामुळे विस्मरण होते. विस्मरणामुळे निश्चयात्मक बुद्धी नष्ट होते आणि बुद्धिनाश झाला की सर्वस्वाचा नाश होतो. जोपर्यंत उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत प्राप्त परिस्थितीत शांत चित्तानेच अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करायला हवा. स्वत:ची कर्तव्ये, जबाबदारी, उद्दिष्टे, स्वत:चे समाजातील स्थान यांचा विसर पडता कामा नये. काय, केव्हा आणि कुठे विसरायचे याचेही भान ठेवायला हवे.

सामान्य माणूस स्वत:ला सामान्य समजतो तर प्रतिभावंत व्यक्ती स्वत:ची मनोवृत्ती कायम सकारात्मक बनविण्याचा प्रयत्न करीत असते. असो. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना मानून पक्षाचे नाव व चिन्ह बहाल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास तूर्तास नकार दिला आहे. यावर दोन आठवड्यांनंतर पुढील सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने लगेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर पुढील सुनावणी होईपर्यंत ठाकरे गटाच्या आमदार-खासदारांविरोधात अपात्रतेची कारवाई केली जाणार नाही, अशी तोंडी हमी शिंदे गटाच्या वतीने न्यायालयात देण्यात आली आहे. आयोगाच्या निकालाच्या आधारे शिंदे गटाकडून शिवसेनेची बँक खाती व मालमत्ता ताब्यात घेतली जात असल्यामुळे आयोगाच्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केली. मात्र न्यायालयाने ती मान्य केली नाही. बँक खाती वा मालमत्तांचा आदेशाशी संबंध नाही.

या बाबी राजकीय पक्षांतर्गत असून त्या संदर्भात अन्य कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे. सध्या न्यायालयात जे काही चालू आहे त्यावरून ठाकरे गटाचे भवितव्य काय असा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी शिवसेना नावाच्या वादळाचा जन्म झाला. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाचा पक्ष जेव्हा निर्माण केला. त्यावेळी त्यांचे वर्चस्व, दरारा इतका मोठा होता की, त्यांच्यापुढे बंडाची भाषा करण्याची हिंमत कोणामध्येही नव्हती. बाळासाहेबांच्या उतारवयात अनेकांनी बंड केले आणि ते इतर पक्षात सामील झाले. तरी देखील बाळासाहेबांनी ताठ मानेने राजकारण केले. दिल्लीश्वर देखील त्यांना टरकून होते. आता तो दबदबा बाळासाहेबांसोबतच संपला आहे. आज शिवसेना ठाकरे कुटुंबाच्या हातून निसटली आहे. प्रश्न इतक्यावरच संपतो असे नाही तर यापुढे खरे प्रश्न निर्माण होतात. त्यातून उद्धव ठाकरे पुन्हा उभारी घेतील किंवा कायमचे संपतील. हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर उभे आहेत. त्यांनी लढण्याचा निर्णय घेतला आहे,

परंतु आगामी राजकारण ठाकरे कुटुंबियांसाठी सोपे नाही. पक्षातील ४० आमदार आणि १३ खासदार बाहेर पडले आहेत. जे उरले आहेत ते देखील कधी बाहेर पडतील ते सांगता येत नाही. आगामी काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळी कोर्टकचे-या करत आपली बाजू मांडायची की स्थानिक पातळीवर पक्षाचे संघटन वाढवायचे असे प्रश्न ठाकरेंसमोर उभे राहतील. ठाकरे गटाबरोबर वंचित बहुजन आघाडीने मैत्री केली आहे. परंतु ते कधी साथ सोडतील ते सांगता येत नाही. कारण वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, आमची युती ही ठाकरे गटाशी झाली आहे, महाविकास आघाडीसोबत नाही. ठाकरे गटाने काँग्रेस व राष्ट्रवादीची साथ सोडावी अन्यथा आम्ही त्यांची साथ सोडू असे संकेत प्रकाश आंबेडकरांनी दिले आहेत. मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. म्हणजे ठाकरे गटाची चहुबाजूने होणारी कोंडी ठाकरे गटाचे खच्चीकरण करताना दिसून येते. एकतर ठाकरे गटाने शरण यावे किंवा त्यांचे नामोनिशाण राहू नये अशी काळजी घेतली जात आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हातातून गेल्यामुळे उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

भाजपचे नेते असोत की निवडणूक आयोग असो, त्यांच्यावर जहरी टीका करण्याची एकही संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीत. त्यांनी चक्क निवडणूक आयोगच बरखास्त करा असे म्हटले आहे. त्यांच्या टीकेतून संताप व्यक्त होताना दिसतो. खरे तर राजकीय लढाई आक्रमक होऊन कधीच लढायची नसते. उलट डोकं शांत ठेवून शत्रूला नामोहरम करायचे असते. ते सोडून त्याला गाडल्याशिवाय राहणार नाही. सारे चोर आहेत असा संताप व्यक्त करताना ठाकरे दिसतात. असा संताप व्यक्त करणेच सोडून देणे ठाकरे यांच्या हिताचे ठरणार आहे. त्यांनी जिभेवर खडीसाखर ठेवून पुढील चाली खेळल्या पाहिजेत. आगामी लढा लढण्यासाठी शांत आणि थंड डोक्याने पुढील रणनीती आखली पाहिजे. तरच काही तरी हाती लागण्याची शक्यता आहे. निसर्ग नियमाप्रमाणे बदल हा सृष्टीचा तसेच मानवाचा स्थायीभाव आहे. तेव्हा व्यक्ती असो वा संघटना ती जशी जन्मभर जिंकू शकत नाही तसा तिचा पराभवही होणारच असतो. कधी पीछेहाट होते तर कधी यशही मिळते. उद्याची संधी सोडायची नसेल तर आज शांत राहणे आवश्यक आहे अन्यथा शेवट हा होणारच!

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या