23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeसंपादकीयचमत्काराची पुनरावृत्ती !

चमत्काराची पुनरावृत्ती !

एकमत ऑनलाईन

विधान परिषद निवडणुकीच्या आदल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्या कोण चमत्कार घडवतो ते राज्याला दिसेलच, असे आवेशपूर्ण आव्हान भाजपला दिले होते. त्यांच्या या वक्तव्याने मविआचे सहाही उमेदवार विजयी होणारच असा विश्वास निर्माण झाला होता. मात्र, निकालात घडले उलटेच! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मविआच्या सर्व धुरंधरांना धोबीपछाड देत राज्यसभेतील चमत्काराची जोरदार पुनरावृत्ती केली. आपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपकडे अत्यंत अल्प संख्याबळ असतानाही त्या उमेदवाराच्या विजयाची पूर्ण तजवीज फडणवीस यांनी आपल्या रणनीतीद्वारे केली. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने अपक्ष व लहान पक्षांच्या आमदारांना गळाला लावून अतिरिक्त १० मते प्राप्त केली होती. विधान परिषदेत फडणवीसांनी आपल्या रणनीतीने हा आकडा थेट दुप्पट करण्याचा चमत्कार घडवून दाखविला. त्याचा थेट फटका काँग्रेसचे पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना बसला. काँग्रेसकडे ४४ मते असताना प्रत्यक्षात या पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना मिळून पहिल्या पसंतीची ४१ मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. याचाच अर्थ काँग्रेसची तीन मते फुटली.

शिवसेनेच्या सचिन अहिर व आमशा पडवी यांना पहिल्या पसंतीची प्रत्येकी २६ मते मिळून ते विजयी झाले. शिवसेनेने आपली अतिरिक्त मते काँग्रेस उमेदवाराला देण्याचा शब्द दिला होता. मात्र, प्रत्यक्षात तसे घडलेच नाही. प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची १७ मते प्राप्त झाली तेव्हाच फडणवीसांनी कोणता चमत्कार घडवला हे स्पष्ट झाले होते. कारण भाजपचे जे चार उमेदवार पहिल्या पसंतीची मते घेऊन विजयी झाले त्यांच्या मतांची गोळाबेरीज ११६ होते. याचाच अर्थ भाजप आमदार व काही समर्थक अपक्ष यांच्याशिवाय ३ अतिरिक्त पहिल्या पसंतीची मते भाजपने बाहेरून आपल्याकडे वळवली. असे असतानाही लाड यांना जी १७ पहिल्या पसंतीची मते मिळाली तो चमत्कार क्रॉस व्होटिंगशिवाय निव्वळ अशक्यच. भाजपने या निवडणुकीत आपले पाच उमेदवार विजयी करताना एकूण १३३ मते मिळवली. याचाच अर्थ भाजपने २० मते फोडली आहेत. काँग्रेसची ३ मते फुटली, शिवसेनेची ३ व शिवसेनेच्या सहयोगी अपक्षांची १२ मते फुटली. पाचव्या उमेदवारासाठी पक्षाकडे एकही मत नसताना भाजपचे लाड विजयी झाले आणि सहज सोपा व हमखास विजय होणारच असे मानले जात असलेल्या काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची विशेष काळजी घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे ५१ आमदार व राष्ट्रवादीला पाठिंबा असणारे सहा अपक्ष असे ५७ मते या दोन उमेदवारांना मिळाली. भाजप एकनाथ खडसेंना पराभूत करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असे वातावरण भाजपने पद्धतशीरपणे तयार केले होते.

या जाळ्यात राष्ट्रवादीचे नेते बरोबर अडकले व त्यांनी आपल्या दोन उमेदवारांच्या विजयासाठी ५२ मतांची गरज असतानाही त्यांना अतिरिक्त पाच मते देण्याची रणनीती आखली. एकनाथ खडसेंना पहिल्या पसंतीची ३ अतिरिक्त मते मिळाली तर रामराजे निंबाळकरांना पहिल्या पसंतीची २ अतिरिक्त मते मिळाली. शिवसेनेची ३ व राष्ट्रवादीची ५ अशी ही आठ अतिरिक्त मते आघाडीच्या रणनीतीतील विसंवादाने काँग्रेस उमेदवाराला मिळू शकली नाहीत आणि म्हणूनच पहिल्या पसंतीची २२ मते मिळूनही चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. ही फडणवीसांची यशस्वी चाल होती. आपले लक्ष्य खडसे असल्याचे वातावरण निर्माण करून भाजपने बरोबर राष्ट्रवादीला अतिरिक्त काळजी घ्यायला लावली आणि त्याचवेळी शिवसेना व सहयोगी अपक्ष आमदारांना गळाला लावत आघाडीत पूर्ण फाटाफूट घडवली. फडणवीस यांची निवडणूक रणनीती व कौशल्य मविआच्या सर्व धुरंधरांपेक्षा सरस असल्याचेच पुन्हा एकदा सिद्ध झाले. मविआला या निवडणुकीत केवळ १५१ मते प्राप्त करता आली तर भाजपने १३३ मते प्राप्त केली व विजयाची तसेच सरकारला जोरदार धक्का देण्याची पुनरावृत्ती केली. अशी पुनरावृत्ती झाली तर महाविकास आघाडीचे स्थैर्य धोक्यात येऊ शकते, हे भाकित ‘एकमत’ने याच ठिकाणी ‘आता दुसरा सामना’ या मथळ्याच्या अग्रलेखातून व्यक्त केले होते आणि ते सेनानेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाने आता पूर्णपणे सत्य ठरले आहे.

विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह गुजरातमधील सूरत शहर गाठत राज्याच्या राजकारणात जोरदार भूकंप घडवला आहे. या बंडावर पहिली प्रतिक्रिया म्हणून सेनेने उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ‘वर्षा’ बंगल्यावर झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून दूर केले आहे. मात्र, या बैठकीला शिवसेनेच्या अवघ्या १८ आमदारांचीच उपस्थिती होती आणि त्यामुळे ठाकरे सरकारच्या भवितव्याबाबत धोक्याची घंटा वाजली आहे. साहजिकच मुंबई व दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शिंदेंचे बंड सत्तेविना तडफडत असलेल्या भाजपला मिळालेली प्रचंड मोठी संधी आहे व भाजप सर्वशक्तीनिशी त्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न करणार हे सुस्पष्टच! त्या अनुषंगाने भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ सुरू केले आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांचे बंड शमविण्यासाठी खास दूत रवाना केले आहेत. त्यांना शिंदेंचे मन वळविण्यात यश मिळणार का? या प्रश्नापेक्षा त्यांची शिंदेंसोबत भेट होऊ दिली जाणार का? हा प्रश्न जास्त कळीचा आहे. एकनाथ शिंदेंनी सेनेने काँगे्रस व राष्ट्रवादीसोबत जाऊ नये, अशी भूमिका घेतली आहे व त्यांच्या या भूमिकेला बहुतांश सेना आमदारांचा पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून शिंदेंच्या या भूमिकेवर काय भूमिका घेतात यावर पुढील सर्व घटनाक्रम अवलंबून राहणार आहे. फोडाफोडीत तरबेज भाजपने व्यवस्थित डाव रचून सरकारला अडचणीत आणले आहे.

भाजपच्या या डावाला महाविकास आघाडीचे नेते एकत्रितपणे उत्तर देतात की, तिथेही सेनेला एकट्यानेच लढावे लागेल? हा खरा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. भाजप केवळ सेना आमदारांची फूट व अपक्षांना गळाला लावून स्वस्थ बसणार नाहीच तर सरकार स्थापनेसाठी संपूर्ण व स्पष्ट बहुमताचे संख्याबळ प्राप्त करण्याचा प्रयत्न भाजप करणार हे सध्याच्या घडामोडींमधून स्पष्ट होते आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँगे्र्रसलाही आपल्या पक्षात फाटाफूट होऊ नये यासाठी दक्ष रहावे लागेल. विशेषत: काँग्रेसला ही दक्षता जास्त घ्यावी लागेल कारण या निवडणुकीत त्यांची ३ मते अगोदरच फुटली आहेत. एकंदर राज्यात निवडणुकांचा मोसम सुरू होत असतानाच भाजपने आघाडी सरकारच्या स्थैर्याला चूड लावत वातावरण तापविले आहे. भाजपच्या या डावाला आघाडीचे धुरंधर नेते आता कसे सामोरे जातात हे येत्या काही दिवसांत कळेलच! तूर्त तरी विधान परिषद निवडणुकीत चमत्काराची पुनरावृत्ती करत फडणवीस यांनी आघाडीच्या सर्व धुरंधरांना पुरता धोबीपछाड दिला आहे, हे मान्यच करावे लागेल. शिवाय या चमत्काराने आघाडी सरकार संकटात सापडले आहे, हे मात्र निश्चित!

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या