36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeसंपादकीयमातीशास्त्राचा सन्मान!

मातीशास्त्राचा सन्मान!

एकमत ऑनलाईन

कोरोनाच्या महामारीने मानवजातीला सर्वच बाजूंनी संकटात टाकले आहे़ ही महामारी अटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी धडपड सुरू असताना त्याला फारसे यश येताना दिसत नाही़ आरोग्यतज्ज्ञ, वैज्ञानिक, संशोधक कोरोनावर लस, औषध शोधण्याचा अटोकाट प्रयत्न करीत आहेत पण त्याच्या घटकाभर रंजकता निर्माण करणा-या प्रसार माध्यमांतील बातम्यांव्यतिरिक्त फारसे काही ठोस हाती लागताना दिसत नाही. वैज्ञानिकांचे व संशोधकांचे कोरोनावर रामबाण औषध शोधण्याचे प्रयत्न यशस्वी झाले तरी हे औषध किंवा लस बाजारात येऊन ती सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होण्यास किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणे अटळच आहे.

तोवर जगणे कुलूपबंद करता येणार नाहीच याची जाणीव आता जगाला स्पष्टपणे झाली आहे़ त्यामुळे धोका पत्करून ठाणबंद करून टाकलेले देश मोकळे करण्याशिवाय त्या-त्या देशांच्या राज्यकर्त्यांसमोर दुसरा कुठलाही पर्याय शिल्लकच राहिलेला नाही़ ठाणबंदी शिथिल करून जगरहाटीला सुरुवात केल्यानंतर लगेचच जग कोरोनापूर्व काळाप्रमाणे पूर्वपदावर येईल व सर्व काही पूर्वीप्रमाणे सुरळीत होईल, असा आशावाद भाबडेपणाच! मात्र, ठाणबंदी उठल्याने आजवर रोखला गेलेला कोरोना संसर्गाचा वेग वाढणे अपरिहार्यच! आपल्या देशाचेच उदाहरण घ्यायचे तर ते समोरच आहे.

ठाणबंदी अद्याप पूर्णपणे उठवलेली नसतानाही देशात कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख दररोज वाढतच आहे आणि नवे विक्रम स्थापन करतो आहे़ ठाणबंदी असताना कोरोना रुग्णसंख्येत आपण जगात दहाव्या क्रमांकावर होतो़ मात्र, ती शिथिल होताच आपण आता थेट चौथ्या क्रमांकावर आलो आहोत! असो!! या स्थितीची कारणे व त्यासाठी कारणीभूत घटक यावर या अगोदरही सविस्तर चर्चा झालेली आहे़ आणखीही ती होत राहणार! तूर्त आपला हा विषय नाही़ मूळ मुद्दा कोरोना हे केवळ आरोग्य संकट राहिलेले नाही तर या संकटाच्या हातात हात घालून इतर अनेक संकटे मानवजातीवर चाल करून आलेली आहेत़ त्यातले सर्वांत प्रमुख संकट आहे ते अन्न आणीबाणीचे व जगातील गरिबी वाढून त्याच्या परिणामी उपासमारीत भर पडण्याचे!

संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुखांनी नुकताच तसा स्पष्ट इशारा देत जगातील अन्न सुरक्षेची साखळी तातडीने मजबूत करण्याची गरज व्यक्त केली आहे़ या इशाºयानुसार कोरोनाच्या संकटामुळे या वर्षी जगात ४़९ कोटी अतिरिक्त लोक गरिबीच्या खाईत लोटले जाण्याची शक्यता आहे सरळ, सोप्या भाषेत सांगायचे तर जगातील गरिबांच्या सध्याच्या संख्येत ४़९ कोटींची भर पडणार आहे़ अर्थातच त्याचा थेट फटका हा लाखो बालकांना बसणार आहे व त्यांचा विकास खुंटणार आहे़ सध्याच्या परिस्थितीत जगातील ८२ कोटींहून अधिक लोक उपासमारीच्या खाईत लोटले गेले आहेत.

पाच वर्षांखालील १४़४ कोटी बालकांचा विकासच खुंटला आहे़ जागतिक जीडीपीतील प्रत्येक एक टक्क्याची घसरण सात लाख अतिरिक्त बालकांच्या विकासास बाधा ठरणार आहे़ या संकटात आशेचा किरण म्हणून जग बघतेय ते कृषी क्षेत्राकडे! इतर सर्व क्षेत्रांना लवकर पूर्वपदावर येणे अत्यंत कठीण आहे़ त्यातील अडचणींची मालिका अद्याप कायम आहे़ आपल्या देशापुरता विचार केला तर या संकटकाळात केवळ कृषि क्षेत्रच देशाला तारू शकेल, यावर तज्ज्ञांचे जवळपास एकमत आहे़ कृषिप्रधान देश असे बिरूद मिरवत धोरणात्मक पातळीवर मात्र कृषि क्षेत्राला अत्यंत नगण्य प्राधान्यक्रम दिला गेल्याने आज देशात कृषि क्षेत्राची दैन्यावस्था असताना या संकटकाळात आता हेच क्षेत्र देशासाठी एकमेव आशेचा किरण ठरावे, हा काव्यगत न्यायच! असो!

मात्र, अत्यंत योगायोगाची बाब म्हणजे अशा या संकटकाळात कृषि क्षेत्राच्या विकासासाठी आयुष्य झिजवणा-या भारतीय वंशाच्याच अमेरिकेतील शास्त्रज्ञ डॉ. रतन लाल यांना कृषि क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा ‘जागतिक अन्न पुरस्कार’ मिळाला आहे़ कृषि क्षेत्राच्या उन्नतीसाठी आवश्यक असणाºया मातीच्या आरोग्यावर संशोधन करून ते सुधारण्यासाठी प्रयत्न करणारे व जगातील अनेक लहान शेतक-यांना कृषि क्षेत्रातून उन्नतीचा व विकासाचा मार्ग दाखविणारे डॉ़ रतन लाल हे हा मानाचा पुरस्कार मिळवणारे डॉ़ एम़ एस़ स्वामीनाथन यांच्यानंतरचे दुसरे भारतीय ठरले आहेत़ वर्ल्ड फूड प्राईज फाऊंडेशनने दिलेल्या माहितीनुसार डॉ़ लाल मागच्या पाच दशकांपासून जगातल्या चार खंडांमधील सुमारे ५०० दशलक्ष छोट्या शेतकºयांना मातीसंगोपनाचे अनोेखे तंत्र शिकवत असून त्याद्वारे त्यांनी जगातील दोन अब्ज लोकांना अन्नसुरक्षा आणि पोषण उपलब्ध करून दिले आहे.

डॉ़ लाल यांच्या मते भारत कृषिप्रधान देश असला तरी देशातील जमिनीचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे़ चांगल्या जमिनीसाठी जमिनीच्या वरच्या थरात दोन ते तीन टक्के नैसर्गिक घटक असायला हवेत़ मात्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, मध्य भारतात हे प्रमाण ०.५ ते ०.२ टक्के एवढेच आहे़ डॉ़ लाल म्हणतात की, जमिनीच्या आरोग्यावर मानवजातीचे आरोग्य अवलंबून आहे, ही बाब मानवजातीला लक्षात घ्यावी लागेल़ भारतात मातीचे आरोग्य सांभाळण्यासाठी धोरण ठरविणे आवश्यक बनले आहे, असा इशारा देताना डॉ़ लाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत नक्कीच काहीतरी करतील, असा आशावादही व्यक्त केला आहे. १९४४ साली पश्चिम पंजाबमधील कारयाल या खेड्यात जन्मलेल्या भारत मातेच्या या सुपुत्रास मिळालेला अत्यंत प्रतिष्ठेचा हा पुरस्कार प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलविणाराच आहे़ त्यांच्यावर देशातून व मोदी सरकारकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होणे अत्यंत साहजिकच, त्यात वावगे काहीच नाही.

मात्र, मूळ प्रश्न हा आहे की, आपण फक्त आनंद व अभिमान व्यक्त करून थांबणार की, डॉ़ लाल जे काही सांगतायत ते गांभीर्याने घेणार? हाच! आपण भारतीय, मग त्यात सरकारही आले, भारतीयाला मिळालेल्या यशाचा व सन्मानाचा भरपूर आनंद, अभिमान, गर्व वगैरे व्यक्त करतो खरे पण तो जे सांगतोय ते गांभीर्याने घेतच नाही, त्यावर अंमलबजावणी तर लांबच! भारतीय म्हणून आपली ही अत्यंत वाईट खोड आहे़विविध क्षेत्रांत जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवणारे भारतीय काही कमी नाहीतच! मात्र, त्यांच्या कार्याचा, संशोधनाचा, ज्ञानाचा भारताने किती व कसा उपयोग करून घेतला? कितपत प्रगती साधली, हा संशोधनाचाच विषय ठरावा! आपल्याकडे या मंडळींच्या वक्तव्यांचा वापर होतो तो केवळ राजकीय चिखलफेकीसाठीच! याला कुठलाही राजकीय पक्ष अपवाद ठरत नाही, हे विशेष! असो!!

आता कोरोनाच्या संकटकाळात कृषि क्षेत्र देशाचे एकमेव तारणहार ठरण्याची स्थिती निर्माण झालेली असताना तरी किमान डॉ़ लाल यांच्या सल्ल्याला सरकारने गांभीर्याने घ्यावे, ही अपेक्षा! कारण देशात आज ज्या शेतकºयांच्या आत्महत्या होतायत, त्या शेती परवडणारी ठरत नाही, आतबट्ट्याची ठरतेय म्हणून! आत्महत्येचा मार्ग स्वीकारणारे बहुतांश शेतकरी हे छोटे शेतकरी आहेत़ ज्यांची शेती ही निसर्गावर अवलंबून आहे़ कोरडवाहू आहे़ अशावेळी कमी जागा, कमी रसायने, कमी नांगरण किंवा अल्प मशागत, कमी पाणी, कमी पोषक घटक असतानाही मातीचे आरोग्य सुधारून भरघोस उत्पादनाचा मंत्र देणाºया डॉ़ लाल यांच्या संशोधनाचा व ज्ञानाचा वापर करून देशाने त्यासाठीचे ठोस धोरण तयार करायला हवे व बळिराजाची दुर्दशा संपवायला हवी! तरच जगाला मातीशास्त्राची ओळख करून देणाºया व त्याची महती पटवून देणाºया या भारत मातेच्या सुपुत्राची आयुष्यभराची मेहनत व योगदान कारणी लागेल! अन्यथा या पुरस्काराबद्दलचा आनंद, अभिमान व गर्व वृथाच ठरेल, हे मात्र निश्चित!

Read More  अलर्ट ! 30 जूननंतर बदलणार ATM मधून पैसे काढण्याचा ‘हा’ नियम, जाणून घ्या

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या