28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeसंपादकीयसुडाचा सामना!

सुडाचा सामना!

एकमत ऑनलाईन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या श्री गणेश दर्शनाच्या निमित्ताने झालेल्या मुंबई दौ-यात त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना व राज्यातील नेत्यांना जो संदेश दिला आहे त्यातून आता राज्यात येत्या काळात सूड उगवण्याचे राजकारण रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागची २५ वर्षे एकमेकांचे जिवलग मित्र असणारे भाजप व शिवसेना आता एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत व या दोन माजी मित्रांमध्ये आता सुडाचा सामना रंगणार हे आता स्पष्टच! या सामन्यातील पहिली लढत असेल ती मुंबई महापालिकेची निवडणूक! उद्धव ठाकरे यांनी भाजपवर व विशेषत: अमित शहांवर शब्द पाळला नसल्याची तोफ डागत काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत घरोबा करत केलेला महाविकास आघाडीचा प्रयोग भाजप व भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या किती जिव्हारी लागला आहे, हे ही शहा यांच्या ताज्या वक्तव्याने पुन्हा एकवार स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेत फूट पाडून शिंदे यांच्या नेतृत्वात वेगळा गट निर्माण करणे आणि ठाकरे सरकार पाडणे, हे ही भाजपच्या शिवसेनेसोबत सुरू केलेल्या सुडाच्या सामन्याचाच भाग होता हे ही आता भाजपनेच अप्रत्यक्षरीत्या कबूल केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात शिंदेंच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन होण्याचे श्रेय अमित शहा यांचेच असल्याचे सांगून पडद्यामागे काय काय घडले याचे संकेतच दिले आहेत. एकंदर शहा यांच्या या दौ-याने भाजपच्या मनात असणारी सुडाची भावना व भाजपचे सूड उगवण्याचे आगामी मिशन या दोन्ही बाबींचे चित्र आता सुस्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पुरती बेचिराख करायची हीच भाजपची योजना आहे आणि या योजनेतील प्रमुख सलामीचे खेळाडू एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळेच भाजपने राज्यातील आमदारांचे आपले संख्याबळ जास्त असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेवरच आपला हक्क सांगण्याची व आमचीच खरी शिवसेना हा दावा करण्याच्या नाट्याची स्क्रिप्टही भाजपनेच लिहिली आहे, हे ही ताज्या घडामोडीतून स्पष्ट झाले आहे.

शिवसेना कुणाची? हा वाद न्यायालयात प्रलंबित असतानाही देशाचे केंद्रीय गृहमंत्री खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असा निर्वाळा देऊन टाकतात याचा काय अर्थ निघतो हे जाणकारांना सांगणे न लगे ! थोडक्यात येत्या काळात उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच पक्षातून विस्थापित करण्याचे व त्यांचे पक्षचिन्हही ताब्यात घेण्याचे भाजपचे मनसुबे आहेत आणि भाजप शिंदेंना पुढे करून त्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार, हे यातून स्पष्ट होते. उद्धव ठाकरे यांच्यावर सूड उगवण्यासाठी शिवसेनेचा जीव की प्राण असणारी मुंबई महापालिका त्यांच्याकडून हिसकावून घेण्याचा चंग भाजपने बांधल्याचे अगोदरच स्पष्ट होते. भाजपच्या शिर्ष नेतृत्वाचीही तीच इच्छा आहे यावर अमित शहा यांनी आपल्या वक्तव्याने शिक्कामोर्तबच केले आहे. राज्यात सध्या भाजप-मनसे युतीची जोरदार चर्चा सुरू असताना त्यावर ‘ब्र’ शब्दही न काढता शहा यांनी शिंदे गट व भाजप मुंबई महापालिका एकत्र लढवतील अशी घोषणा करून टाकली. शिवाय त्यांनी मुंंबई मनपात १५० नगरसेवक निवडून आणण्याचे व महापौर भाजपचाच बनवण्याचे लक्ष्य पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहे.

हे लक्ष्य निर्धारित करतानाच उद्धव ठाकरेंना धोकेबाज ठरवून त्यांना पक्का धडा शिकवा, जमिनीवर आणा असा आदेशही शहा यांनी पक्षकार्यकर्त्यांना दिला आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग करताना शिवसेना भाजपविरुद्ध प्रचंड आक्रमक झालेली असतानाही व भाजपच्या शिर्ष नेतृत्वावर शब्द न पाळण्याचा आरोप होत असतानाही भाजपचे केंद्रीय नेतृत्व आक्रमक पलटवार करत नसल्याबद्दल त्यावेळी आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र भाजपने त्यावेळीच सेनेला पक्का धडा शिकवण्याचे व पुरते उद्ध्वस्त करण्याचे ठरवले होते हे आता स्पष्ट झाले आहे. सुडाग्नीने पेटलेला भाजप योग्य वेळेची प्रतीक्षा करत होता व संधी प्राप्त होताच भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला. अर्थात केवळ ठाकरे सरकार पाडणे व सत्ता प्राप्त करणे एवढाच भाजपचा हेतू असता तर भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलेच नसते. मात्र, भाजपने शिंदेंना मुख्यमंत्री बनवले व मर्जी नसतानाही देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास भाग पाडले. हे धक्कातंत्र का याचा सुस्पष्ट उलगडाच अमित शहा यांनी आपल्या ताज्या वक्तव्यातून केला आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी आडून बसत भाजपचे मांडलिकत्व स्वीकारण्यास नकार देणा-या उद्धव ठाकरे यांना आता संपवले पाहिजे, हाच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय झाला होता आणि त्यामुळेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने उद्धव ठाकरे यांच्याशी कुठलीही तडजोड न करण्याचे पक्के केले होते. त्याऐवजी राष्ट्रवादीला जवळ करून महाविकास आघाडी जन्मापूर्वीच संपविण्याचा भाजपने प्रयत्न केला. शरद पवार यांच्यामुळे तो यशस्वी झाला नाही, हे अलहिदा! मात्र, तो जर त्यावेळी यशस्वी झाला असता तर भाजपने त्यावेळीच शिवसेना फोडली असती. शरद पवार यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीमुळे ही फूट दोन वर्षे लांबली, एवढाच या घडामोडीचा अन्वयार्थ ! असो!! शहा यांच्या दौ-याने भाजपला आता हिंदुत्वाच्या मतपेढीत मित्रपक्षाचाही वाटा नको असल्याचेच स्पष्ट झाले आहे. शतप्रतिशत भाजप मिशनमध्ये भाजप केवळ विरोधी पक्षांनाच नव्हे तर एकवेळ पक्के मित्र राहिलेल्या पक्षांनाही संपवत निघाला आहे. महाराष्ट्रात या योजनेचा भाग म्हणून उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्याची भाषा वापरली जातेय तर बिहारमध्ये भाजपचे मांडलिकत्व नाकारणारे नितीश कुमार हे भाजपच्या सुडाच्या सामन्याचे पुढील लक्ष्य असणार आहेत, हे उघड आहे.

महाराष्ट्रात भाजपने तगडे नियोजन करून उद्धव ठाकरेंना पुरते जाळ्यात अडकवले आहे. भाजपच्या योजनेनुसार सगळ्या गोष्टी घडत गेल्या तर उद्धव ठाकरेंना पक्षाचा ताबा गमवावा लागण्याची शक्यता आहे. अशावेळी नवा पक्ष व नवे पक्षचिन्ह घेऊन उद्धव ठाकरेंना जनतेसमोर जावे लागेल. उद्धव ठाकरे त्यासाठी कितपत तयार आहेत? हा खरा प्रश्न! या प्रश्नाच्या उत्तरावरच भाजप-सेनेतला हा सुडाचा सामना तुल्यबळ होणार की एकतर्फी होणार हे अवलंबून असणार आहे. मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जोरदार हादरे देण्याचे भाजपचे मनसुबे व योजना शहा यांच्या मुंबई दौ-यातून स्पष्टच झाली आहे. या सुडाच्या सामन्याला उद्धव ठाकरे कसे उत्तर देतात यावर त्यांच्या पक्षाचे भविष्य व भवितव्य अवलंबून राहणार आहे. शिवाय महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंचे दोन मित्रपक्ष या सुडाच्या सामन्यात मित्राच्या मदतीला उभे राहणार की पे्रक्षक म्हणून सामना पाहणार? यावरही या सामन्याचा रिझल्ट अवलंबून असणार आहेच. एकंदर भाजपने आता उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचाच हे पक्के ठरवल्याचे शहांनी स्पष्ट केल्याने राज्यात येत्या काळात सुडाचा सामना रंगणे अटळ, हे मात्र निश्चित!

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या