24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeसंपादकीय‘अफवादात्मक’ लसीकरण!

‘अफवादात्मक’ लसीकरण!

एकमत ऑनलाईन

कोरोना विषाणूचा धोका कमी झालेला नसून अफवांवर विश्वास न ठेवता सर्व नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच ‘मन की बात’मध्ये केले आहे. ‘मन की बात’चे आतापर्यंत ७८ एपिसोड झाले असून लवकरच त्याची शतकपूर्ती होईल. या कार्यक्रमात त्यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक केले. भारतीय शास्त्रज्ञांची असामान्य कामगिरी व विज्ञानावर विश्वास ठेवायला हवा असेही ते म्हणाले. भारतीय शास्त्रज्ञांनी अथक परिश्रमानंतर बनविलेली कोरोना लस पूर्णत: सुरक्षित आहे. कोरोना साथीचे सावट अजूनही कायम आहे. त्यासाठीच केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे असेही मोदींनी सांगितले. पुण्यातील सीरम संस्था कोविशील्ड लसीचे उत्पादन करते. या लसीचे संशोधन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत झाले. हैदराबादेत तयार होणारी कोवॅक्सिनही बाहेरची. मग या लसी भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केल्या असे पंतप्रधान मोदी सांगतात ती अफवाच म्हणायची काय? आपल्याकडे अफवांचा केवळ पूर येतो असे नव्हे तर महापूर येतो.

सर्वांना मोफत लस देण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आल्यानंतर त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्येही लसीकरण मोहीम जोमाने सुरू आहे. महाराष्ट्रात ६० लाखांहून अधिक लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत ही अफवा नव्हे. अगोदर प्रत्येक नागरिकाला लस द्या आणि नंतर ‘मन की बात’ ऐकवा असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे ही अफवा नव्हे. देशात कोरोनाची तिसरी लाट येत्या डिसेंबर महिन्यात येण्याची शक्यता आहे असे केंद्र सरकारने कोरोना साथीबाबत नेमलेल्या कार्यगटाचे प्रमुख डॉ. अरोरा यांनी म्हटले आहे. त्यांनी तिस-या लाटेबाबत केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. ते म्हणतात, दुस-या व तिस-या लाटेदरम्यान सहा ते आठ महिन्यांचा कालावधी आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्यात देशातील सर्वांना कोरोना लस देण्याचे काम आपल्याला पूर्ण करायचे आहे. दर दिवशी एक कोटी लोकांना लस देण्याचे केंद्र सकारचे उद्दिष्ट आहे आणि त्यादृष्टीने पावले टाकली जात आहेत. सारे भारतीय खचितच ही अफवा मानणार नाहीत कारण २१ जून रोजी देशात ८५ लाखांच्या पुढे विक्रमी लसीकरण झाले होते.

डेल्टा प्लस हा नवा घातक विषाणू देशात आढळून आला आहे. पण त्या विषाणूमुळेच तिसरी लाट येईल असे पुरावे अद्याप तरी हाती लागलेले नाहीत पण ही शक्यता नाकारता येत नाही. ज्या देशामध्ये एकूण लोकसंख्येपैकी २० टक्क्यांहून अधिक लोकांना लस देण्यात आली तिथे तिसरी लाट आलेली नाही. त्यामुळे भारतातही लसीकरण वेगाने केल्यास तिसरी लाट टाळता येणे शक्य आहे असे मत काही वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे. मोठ्या प्रमाणावरील लसीकरणाने कोरोनाच्या आगामी लाटा थोपवता येतील यावर आमचा विश्वास आहे. वैज्ञानिकांचे हे मत आम्ही अफवा मानत नाही. वर्ष अखेरपर्यंत देशाला पाच कंपन्यांकडून कोरोना लसीचे १८६ ते १८८ कोटी डोस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. आतापर्यंत प्रौढ व्यक्तींपैकी ५.६ टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत असे केंद्राने म्हटले आहे. आता कोर्टातच ही माहिती देण्यात आल्याने ती अफवा आहे असे म्हणता येत नाही. अर्थात कोर्टातही ‘देवाशपथ खरे सांगेन’ अशी शपथ घेत खोटे सांगितले जाते ही बाब वेगळी.

परंतु कोर्टाबाहेर ज्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या अफवा वाटू लागतात. कोरोना महामारीमुळे जगाला गंभीर परिणाम भोगावे लागले आहेत. भारतासह सारे जग गत अनेक महिन्यांपासून कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमात्र उपाय असल्याचे सारे जग ओळखून आहे. अनेक देश लसीकरणावर भर देताना दिसत आहेत. कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणात एकूण लसी देण्यासंदर्भात अमेरिकेला मागे टाकून भारताने नवा मैलाचा टप्पा गाठल्याचे सांगितले जात आहे. भारतात कोरोना लसीकरण अभियानाची सुरुवात १६ जानेवारी २०२१ रोजी तर अमेरिकेत या अभियानाला १४ डिसेंबर २०२० रोजी सुरुवात झाली. मात्र तरीही भारतात आतापर्यंत ३२.३६ कोटींपेक्षा अधिक नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशातील सक्रिय रुग्णसंख्येतही सातत्याने घट होताना दिसत आहे. या आकडेवारीनुसार भारताने अमेरिकेलाही मागे टाकल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात नेमके काय आहे? भारताची लोकसंख्या अमेरिकेपेक्षा जास्त आहे. त्यानुसार भारतात केवळ १९ टक्के तर अमेरिकेत ५४ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. या संदर्भात उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे संचालक आनंद महिंद्रा यांनी ट्विटद्वारा प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, भारताने एकूण लोकसंख्येच्या तुलनेत फक्त १९ टक्के नागरिकांचे लसीकरण केले आहे तर अमेरिकेने ५४ टक्के नागरिकांचे लसीकरण केले आहे मग आपण अमेरिकेवर कशी काय मात केली.

जगासोबत स्पर्धेत राहण्यासाठी आपली लोकसंख्या आपल्याला कायम वेगाने धावण्यासाठी प्रवृत्त करते. तसे झाले तरच आपण जगातील सर्वांत इनोव्हेटिव्ह देश होण्याचे मानकरी ठरू. म्हणजे भारताच्या आरोग्य मंत्रालयाने केलेला दावा अफवाच म्हणावी लागेल. चीनची लोकसंख्या सुमारे १४० कोटी आहे. त्यांनीही १०० कोटी लोकसंख्येचे लसीकरण केले आहे. यावर भारतीय आरोग्य मंत्रालयाचे काय म्हणणे आहे? आपण त्यांच्या पासंगालाही पुरतो काय? भारतात गत २४ तासांत सुमारे ४६ हजार नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. सध्या देशात सुमारे ५ लाख ३७ हजार सक्रिय रुग्ण असून रिकव्हरी रेट ९६.९२ टक्के आहे. लसीकरणाबाबत केंद्र सरकारचे धोरण रोज बदलत असते. आता खासगी रुग्णालयांना थेट लस खरेदी करता येणार नाही म्हणे. गत दीड वर्षापासून अधिक काळ निर्बंध वाढवणे-कमी करणे हेच सुरू आहे. राजकीय नेते, मंत्री, आमदार, खासदार यांचे दौरे, निषेध मोर्चे, धरणे, मोठ्या लोकांचे लग्न समारंभ, निवडणुका यांना मात्र मोकळीक! सरकारने निर्बंध घालावेत पण भेदभाव नको. देशात १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या सुमारे ९४ कोटी आहे. उर्वरित ३८ कोटी लोकसंख्या ही १८ वर्षांखालील आहे. यापैकी सुमारे ८ कोटी मुले पाच-सहा वर्षांखालील आहेत. त्यांचे लसीकरण कधी होणार? लसीकरण झाल्याशिवाय प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण सुरू होणार नसेल तर मग या मुलांचे लसीकरण कधी होणार? या संदर्भात अफवांचे पीक येऊ नये म्हणजे झाले!

हदगाव तालुक्यात वृक्षांची कत्तल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या