29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeसंपादकीयडब्ल्यूएचओ-चीनचे साटेलोटे

डब्ल्यूएचओ-चीनचे साटेलोटे

एकमत ऑनलाईन

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि चीन यांच्यात साटेलोटे आहे यात शंका नाही. त्यांचे मेतकूट कशामुळे आहे हे कळण्यास मार्ग नाही. चीनच्या चुकांवर वारंवार पांघरूण घालण्याचे काम या संघटनेने केले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार चीनमधूनच झाला हे सा-या जगाला माहीत आहे; परंतु जागतिक आरोग्य संघटनेने नेहमीच चीनची पाठराखण केली. त्यामुळे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खूपच संतापले होते. डब्ल्यूएचओने चीनबरोबर हातमिळवणी केली आहे असा आरोप करत त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी बंद केला होता. जागतिक रेट्यामुळे संघटना नमली आणि तिने चीनमध्ये जाऊन कोरोना महामारीचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. पण नंतर चीनही बिथरला आणि त्याने जागतिक पथकाला आपल्या देशात येण्यास परवानगी नाकारली.

चीनच्या वुहान शहरात डिसेंबर २०१९ मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. परंतु त्याआधी दोन महिने या आजाराचा कोणताही थांगपत्ता न लागता प्रसार सुरू होता असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. सध्या जगाला कोरोना महामारीने वेढले आहे. त्यातून सावरण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय कराराची गरज आहे असा विचार जागतिक स्तरावर व्यक्त होत आहे. कोरोना महामारीचा एकजुटीने सामना करावा लागेल. हा विषाणू पुन्हा डोके वर काढणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील एखादा करार करण्याचे आवाहन २३ देशांच्या प्रमुखांनी केले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मर्केल, फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासह ग्रीस, रवांडा, केनिया, दक्षिण कोरिया, चिली अशा २३ देशांच्या प्रमुखांनी एकजुटीची हाक दिली आहे.

विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रॉस घेब्रेयेसस यांचाही समावेश आहे. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती सुरक्षित होत नाही तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही असे या नेत्यांनी म्हटले आहे. दुस-या महायुद्धानंतरचे सर्वांत मोठे जागतिक संकट म्हणजे कोरोना महामारी. या महामारीचा सामना करण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज आहे. दुस-या महायुद्धानंतर ज्याप्रमाणे जगाला सावरण्यासाठी सर्व देश एकवटले होते, तशीच वेळ आता आली आहे. संयुक्त राष्ट्राच्या नेतृत्वाखाली एक आंतरराष्ट्रीय करार करून त्याद्वारे जगाला या महामारीतून बाहेर काढण्याची निकड व्यक्त केली जात आहे. दरम्यानच्या काळात डब्ल्यूएचओ व चीन यांच्यातील बिघडलेले संबंध पुन्हा मधुर बनले आणि चीनने जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाला हिरवा कंदिल दाखवला.

एच -१ बी व्हिसा जारी करण्यावरील बंदी हटविली

कदाचित संघटना आपल्या विरोधात जाणार नाही याची चीनला खात्री असावी. नाहीतरी ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’ असेच दोघातील संबंध आहेत, नेमके तसेच झाले! कोरोना विषाणूची उत्पत्ती कशी झाली याबाबत जगभरात संशोधन सुरू आहे. याबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. २०१९ मध्ये वुहान येथील प्रयोगशाळेत हा विषाणू जन्माला आला इथपासून ते ‘फ्रोजन फूड’च्या माध्यमातून हा विषाणू तयार झाला असे दावे केले गेले. कोरोना विषाणूच्या उत्पत्तीसंदर्भात संशोधन करण्यासाठी ‘हू’(डब्ल्यूएचओ) चे एक पथक चीनमध्ये गेले आहे. या अभ्यास पथकाचा अहवाल अजून प्रसिद्ध झालेला नाही. परंतु त्यातील काही माहिती फुटली आहे. त्यानुसार कोरोना विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून पसरला असण्याची शक्यता फारच कमी आहे.

उलट वटवाघळामधून हा विषाणू एखाद्या जनावरामध्ये गेला असावा आणि तिथून तो माणसामध्ये पसरला असल्याची शक्यता सर्वाधिक आहे. वटवाघळामधून थेट माणसाच्या शरीरात संक्रमण होण्याची शक्यता कमी आहे. तसेच ‘कोल्ड चेन’ खाद्य उत्पादनाच्या माध्यमातून संक्रमण होण्याची शक्यता आहे. मात्र ही घटना दुर्मिळच म्हणावी लागेल असेही अभ्यासगटाला वाटते. अर्थात या पथकासमवेत चिनी अधिकारीही आहेत, तेव्हा सत्य बाहेर येण्याची शक्यता कमी आहे. अहवाल प्रसिद्ध होण्याला विलंब होतोय यामागे चीनचा दबाव हेही कारण असू शकते. खवल्या मांजर देखील कोरोना विषाणूसंदर्भात अति संवेदनशील असल्याचे अहवालात म्हटले आहे. म्हणजेच ते कोरोना विषाणूचे वाहक ठरू शकतात. डिसेंबर २०१९ मध्ये हा विषाणू वुहानमधील ‘सीफूड’ बाजारात सापडला होता का याबाबत ठोस निष्कर्ष पथकाला काढता आलेला नाही.

याचा अर्थच असा की चीनला दोषमुक्त करायचे असेल तर खवल्या मांजर, सीफूड किंवा एखाद्या जनावराला ‘टार्गेट’ करावे लागेल! जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने वुहान प्रयोगशाळेतून कोरोना विषाणू पसरला गेल्याची शक्यता फारच कमी असल्याचे म्हटल्याने चीनला एक प्रकारे क्लीन चिटच देण्यात आली आहे. पथकाचा अहवाल ४०० पानांचा असल्याचे सांगण्यात येते. यात अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरितच असणार! कोरोना महामारीचा चीनमध्ये उद्रेक झाला असला तरी देशाने त्यावर तातडीने नियंत्रण मिळवले परंतु उर्वरित जग या महामारीच्या दुस-या-तिस-या लाटेला सामोरे जात आहे असे प्रशस्तिपत्रही डब्ल्यूएचओने चीनला दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने श्रीमंत देशांना कोरोना लसीचे किमान एक कोटी डोस त्वरित दान करण्याचे आवाहन केले आहे. मात्र अद्याप एकाही देशाने त्याला प्रतिसाद दिलेला नाही. जगभरात उपलब्ध असलेले कोरोना लसीचे सुमारे ४६ कोटी डोसपैकी बहुतेक डोस १० देशांकडे आहेत. पैकी २८ टक्के डोस एकट्या अमेरिकेकडे आहेत.

चीननेही कोरोना लसीचे उत्पादन केले असून त्याचे वितरण आपल्या मित्र देशांना केले आहे मात्र लसींबाबत विश्वासाचे वातावरण नाही. पाकिस्तानलाही चीनने लसपुरवठा केला आहे. परंतु तेथील जनता ही लस घ्यायला तयार नाही. पाकिस्तानी नागरिकांना भारताची लस हवी आहे. भारतीय लसीच्या सुमारे २ कोटी मात्रा त्यांना मिळणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानात आनंदाचे वातावरण आहे. एक महाशक्ती देश म्हणून चीनने आपली पाठ कितीही थोपटून घेतली तरी त्यांचे पितळ उघडे पडणारच. चीनवर आरोप करण्याची हिम्मत जागतिक आरोग्य संघटनेमध्ये नाही. एव्हाना चीनने अनेक पुरावे नष्टही केले असतील. त्यामुळे अभ्यास दौ-यावर गेलेल्या पथकाच्या हाती काहीही लागणार नाही. चीनसारख्या साम्राज्यवादी देशासमोर जागतिक आरोग्य संघटनेने लोटांगण घातलेलेच दिसेल!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या