24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeसंपादकीयसावित्रीच्या लेकींचा झेंडा!

सावित्रीच्या लेकींचा झेंडा!

एकमत ऑनलाईन

देशात सध्या काळाचे घड्याळ उलटे फिरवण्याचे जोरकस प्रयत्न होत आहेत. परिणामी धर्माच्या, रूढीच्या, परंपरेच्या नावावर पुन्हा एकवार महिलांवर नव्याने बंधने लादण्याचा, त्यांना दुय्यम दर्जाचे ठरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्याच परिणामी अगोदरच समाजाच्या नसानसांत भिनलेल्या पुरुषी वर्चस्वाच्या प्रवृत्तीला नवे धुमारे फुटून त्यातून महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होते आहे. विशेष म्हणजे या अत्याचारांविरुद्धचा आक्रोश राज्यकर्त्यांच्या पक्षीय राजकारणाने पुरते बधिर झालेल्या कानांवर काही केल्या पडत नाहीत आणि हे आक्रोश ऐकून समाज सुधारणेसाठी सरसावणारे संवेदनशील समाजसुधारक दुर्मिळच झाले आहेत.

अशा या स्थितीत महिलांच्या लढाईचे अस्त्र म्हणजे त्यांचे शिक्षण व त्यातून येणारे स्वावलंबन! देशातील तरुण पिढीतील मुलींना याची पुरती जाणीव झालीय व त्या या अस्त्राद्वारे आपली लढाई लढण्यासच नव्हे तर ती जिंकण्यास सज्ज झाल्या आहेत, हे अभिमानास्पदच! सर्वच क्षेत्रांत महिला आपल्या कर्तृत्वाने अभिमानास्पद कामगिरी करतायत आणि दिवसेंदिवस अशी उदाहरणेही आता अपवादात्मक न राहता मोठ्या संख्येने पहायला मिळतायत आणि त्याचेच ताजे उदाहरण म्हणजे नुकताच जाहीर झालेला केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल! देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या या स्पर्धा परीक्षेच्या निकालात देशातील सावित्रीच्या लेकींनी आपला झेंडा फडकावत आम्ही आता पाळण्याची दोरी सोडून देशाच्या प्रशासनाची दोरी आपल्या हाती घेण्यास सज्ज झालो असल्याचा दमदार संदेश देशाला दिला आहे. यावेळी या परीक्षेच्या निकाल यादीत पहिल्या चार क्रमांकावर सावित्रीच्या लेकींनी आपली मोहर उमटवली आहे, एवढेच नव्हे तर देशातील पहिल्या दहा क्रमांकात सहा मुलींनी स्थान प्राप्त केले आहे. देशातील सर्व मुलींसाठी व महिलांसाठी हा अत्यंत अभिमानाचा व गौरवाचाच क्षण! कारण ज्या स्पर्धा परीक्षेस देशातील लाखो विद्यार्थी प्रचंड कठोर मेहनत करून बसतात त्यातले काही शे विद्यार्थ्यांनाच या परीक्षेत यश मिळते.

यावरून या परीक्षेची काठीण्य पातळी लक्षात यावी व ती पार करण्यासाठी लागणा-या कठोर परिश्रमांचीही कल्पना यावी. अशा स्थितीत जर या उत्तीर्णांच्या यादीवर मुली आपला झेंडा फडकावत असतील तर ते देशातील तमाम महिलांसाठी केवळ अभिमानास्पदच नव्हे तर प्रेरणादायकही ठरते. म्हणूनच या सावित्रीच्या लेकींना त्यांच्या उत्तुंग यशाबद्दल देशाने अभिमानाने सलाम ठोकायला हवा. या निकालात नवी दिल्लीची श्रुती शर्मा ही देशात प्रथम आली आहे तर अंकिता अग्रवाल, गामिनी सिंगला व ऐश्वर्या शर्मा अनुक्रमे दुस-या, तिस-या व चौथ्या क्रमांकावर आहेत. तर महाराष्ट्रातून सर्वप्रथम येण्याचा मान मुंबईच्या प्रियंवदा म्हाडदळकरने पटकावला आहे. जिवाची बाजी लावून ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कठोर प्रयत्न करणा-या सर्वच उमेदवारांचे अभिनंदन करतानाच त्यात यशस्वी ठरलेल्यांचे विशेष अभिनंदन केलेच पाहिजे. अयशस्वी ठरलेल्यांचे सांत्वन करण्याच्या नादात यशस्वी ठरलेल्यांच्या मेहनतीवर मनापासून अभिनंदनाचा वर्षाव न करण्याचा कोतेपणा हा त्यांच्यावरचा अन्यायच ठरेल! शेवटी ही स्पर्धा परीक्षा आहे व त्यासाठी प्रयत्न करणा-या प्रत्येकाला ती किती कठीण आहे याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच ही स्पर्धा परीक्षा देणारे मानसिकदृष्ट्या वारंवार प्रयत्न करण्यास सज्ज असतात.

पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल अशी भाबडी आशा सहसा कुणी ठेवत नाहीच. त्यामुळेच यश न मिळालेल्यांना सांत्वनाची नव्हे तर प्रोत्साहनाची गरज आहे. त्यातूनच त्यांना पुन्हा नव्या दमाने या स्पर्धेला सामोरे जाण्याची उमेद प्राप्त होईल. मात्र, हल्ली मनमोकळ्या अभिनंदनापेक्षा उगाच सांत्वनाचा ट्रेंड आलाय व त्यातून कपोलकल्पित विवंचनांवर चर्वितचर्वणाची फॅशन रूढ झालीय. यातून देशाच्या भावी पिढीला कठोर संघर्षासाठी सज्ज करायचे सोडून आपण त्यांना कमकुवत करण्याचाच प्रयत्न करतो आहोत, हे लक्षात घ्यायला हवे! असो!! हल्ली या स्पर्धा परीक्षांचे आकर्षण प्रचंड वाढले आहे हे मान्यच! त्यासाठी मुले आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे खर्च करतात, हे ही मान्य. मात्र, तत्पूर्वी त्यांनी या परीक्षेचे स्वरूप लक्षात घेऊन स्वत:ला मानसिकदृष्ट्या सज्ज केलेले असते व त्यांचे पालकही आपल्या मुलांचे स्वप्न साकार करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या तयार असतात, हे लक्षात घ्यायला हवे. हल्ली मागचापुढचा विचार न करता व तयारी न करता या परीक्षेत उतरणा-यांची संख्या अत्यल्पच आहे, हे परीक्षेत उतरणा-या उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेवर नजर टाकली तर सहज लक्षात येते.

चांगल्या उदरनिर्वाहाची सोय होईल याची शाश्वती देणारे शिक्षण पूर्ण करून नंतर ठरवून या स्पर्धा परीक्षेत उतरणा-या उमेदवारांची संख्या आता लक्षणीय ठरावी इतकी आहे. त्यामुळे अपयशाने उमेदवार मंडळी पुरती कोलमडून पडतील असा सूर लावणे हा त्यांच्या क्षमतेवरचा अन्याय आहे. असो! या निकालाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे परीक्षेत उत्तीर्ण होणा-यांत ग्रामीण भागातील उमेदवारांचा वाढता टक्का! अडथळ्यांच्या अनेक शर्यतींवर जिद्द व कठोर मेहनतीने मात करत यश मिळविणा-या या ग्रामीण भागातून आलेल्या उमेदवारांचे विशेष अभिनंदन करायलाच हवे! प्रशासकीय अधिकारी बनून आपल्या गावाची व कुटुंबाची उन्नती साधण्याचे स्वप्न पाहणा-या ग्रामीण भागातील तरुण-तरुणींची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, हे देशासाठी नक्कीच आशादायक चित्र आहे. तावून-सुलाखून निघालेली गुणवत्ता प्रशासनात येत असेल, देशातील परिस्थिती बदलण्याचे स्वप्न बघत असेल तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे.

ही मंडळी आपल्या गुणवत्तेने नक्कीच देशाचे चित्र बदलू शकतात. मात्र, प्रशासनात दाखल झाल्यावर तेथील व्यवस्थेचा एक भाग बनून राहण्याऐवजी त्यांनी ‘लोकसेवे’चे ब्रीद कायम स्मरणात ठेवायला हवे. आपण ज्या परिस्थितीतून आलो त्याची नाळ न तोडता त्या परिस्थितीचे सदोदित भान ठेवून ती बदलण्यासाठी प्रयत्नरत राहिलो तरच आपल्या गुणवत्तेचा देशाला, समाजाला फायदा आहे याचे भान यशस्वी उमेदवारांनी ठेवायला हवे! देशाची, समाजाची स्थिती बदलण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले तरच या गुणवत्तेला खरा अर्थ आहे व मानही आहे. अन्यथा पैसा कमवण्याच्या अनेक मार्गांपैकी एक मार्ग, एवढीच या गुणवत्तेचीही किंमत ठरते, याचे भान यशस्वी उमेदवारांनी ठेवायला हवे. असो!! तूर्त या परीक्षेत यश प्राप्त करणा-या सर्व उमेदवारांचे मनापासून अभिनंदन व या परीक्षेत झेंडा फडकावणा-या सावित्रीच्या लेकींचे विशेष अभिनंदन! जे या प्रयत्नात यशस्वी ठरले नाहीत त्यांना पुढील प्रयत्नासाठी शुभेच्छा!

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या