21.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home संपादकीय विज्ञानवादी संमेलनाध्यक्ष डॉ. नारळीकर!

विज्ञानवादी संमेलनाध्यक्ष डॉ. नारळीकर!

एकमत ऑनलाईन

मातृभूमीची ओढ प्रत्येकाला असते, प्रत्येक सच्चा भारतीयाला असते. मातृभूमीच्या प्रेमापोटी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी अनेक भारतीय वीर हसतमुखाने मृत्यूला सामोरे गेले हा इतिहास आपल्या समोर आहे. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना केली ती मातृभूमीच्या प्रेमापोटीच. स्वातंत्र्यवीर, क्रांतीकारक सावरकरांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ अशी तळमळ व्यक्त केली ती मातृभूमीची धूळ माथी लावण्यासाठीच. जिने जन्म दिला त्या मातेचे ऋण फेडणे अशक्यच असते परंतु तिची सेवा करण्यातच जीवनाचा अन्त व्हावा ही मनिषा असते. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला भूमातेची याद येतेच येते. माणसाला मातृभाषेचा विसर कधीच पडत नाही. कारण तिनेच त्याचे लालन-पालन केलेले असत. त्याच्या जडणघडणीत तिचाच मायेचा हात असतो.

मानसिक, वैचारिक विकास मातृभाषेतूनच घडतो. म्हणूनच ‘मराठी असे आमुची मायबोली’ असे अभिमानाने म्हटले जाते. आपल्या भाषेचा विकास व्हावा, साता समुद्रापलिकडे तिने जावे, मातृभाषेत उत्तमोत्तम साहित्य निर्माण व्हावे असे प्रत्येकाची इच्छा असते. त्यातूनच मातृभाषेचे संमेलन भरवण्याची कल्पना साकार झाली. मातृभाषा मराठीची आजवर ९३ अखिल भारतीय संमेलने भरवण्यात आली आहेत. यंदा ९४ वे अखिल भारतीय मराठी संमेलन नाशिक येथे भरवण्याचे निश्चित झाले आहे. यंदा संमेलनाच्या आयोजनासंबंधी नाशिक आणि दिल्लीचे प्रस्ताव होते. संमेलन स्थळाच्या आयोजनावरून बराच गदारोळ माजला. अखेर या शर्यतीत नाशिकने बाजी मारली. साहित्य हे जीवनाला मार्गदर्शन करते. साहित्य हे बंधुभाव, सहिष्णुता शिकवते या तत्वाला विसंगत अशी साहित्य महामंडळातील सदस्यांची वागणूक होती. मुळात साहित्य संमेलन नाशिकला झाले काय किंवा दिल्लीत झाले काय, वाचकांच्या साहित्य जाणिवेत यामुळे कोणतीही भर पडणार नव्हती. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी संमेलन दिल्लीला घेतले तर उपयोग होईल ही काही सदस्यांची भावना त्यांना वास्तवाचे भान नसल्याचेच लक्षण होते.

खरे पाहता मराठी भाषा किती जुनी आहे आणि तीत ज्ञाननिर्मिती किती झाली या निकषांवर हा अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे. मुळात कोणत्याही प्रश्नावरून एकमेकांचा पाय ओढण्याची मराठी सवय काही जात नाही! संयुक्त महाराष्ट्रसंबंधीचा वाद वर्षानुवर्षे सुरुच आहे. राज्यात सत्तेवर येणारे प्रत्येक सरकार कर्नाटकातील मराठी भाषिकांना न्याय देऊ अशी गर्जना ठोकते… पुढे काहीच होत नाही. सर्वोच्च न्यायालयात २००४ पासून प्रलंबित असलेला सीमावादाचा खटला जलद सुनावणी होऊन निकालात निघावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करताना दिसत नाही. कर्नाटकच्या ज्या गावात मराठी भाषिक बहुसंख्येने राहतात ती गावे महाराष्ट्रात सामील करून घेण्यास आपले सरकार वचनबद्ध आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच म्हटले आहे. मराठी भाषेचा समृद्ध वारसापुढे चालवण्यासाठी मराठीत बोला, मराठीतून व्यवहार करा आणि मराठीचा आग्रह धरा असे आवाहन मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे. असो. संमेलनस्थळाचा वाद तर मिटला. आता संमेलनाध्यक्ष पदावरून वादावादी होते की काय अशी भीती वाटत होती परंतु तसे काही झाले नाही ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.

टीआरपी घोटाळा प्रकरणी महामुव्हीवर मोठी कारवाई

२६ ते २८ मार्च दरम्यान नाशिकमध्ये होणा-या ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची बहुमताने निवड झाली. अध्यक्षपदासाठी डॉ. नारळीकर, कथाकार भारत सासणे, विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे, विज्ञान कथालेखक बाळ फोंडके, कीर्तन परंपरेचे अभ्यासक रामचंद्र देखणे, साहित्यिक मनोहर शहाणे अशी सहा नावे सुचवण्यात आली होती. परंतु कोणत्याही नावावर एकमत झाले नाही. अखेर मतदान होऊन डॉ. नारळीकर यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. तंत्रज्ञानाचा वापर करणा-या समाजामध्ये विज्ञानवादाचा अभाव आहे. हातामध्ये मोबाईल असूनही बहुतेकजण अंधश्रद्धेला खतपाणी घालताना दिसतात. २१ व्या शतकातही समाजाची धारणा बदललेली दिसत नाही. गोमातेमध्ये ३३ हजार देव असल्याची भावना अधिकाधिक दृढ होत चालली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनीसुद्धा विज्ञानावादाची कास धरा असे म्हटले होते. व्याख्यान, प्रदर्शन, कार्यशाळा आणि विज्ञानकथा अशा विविध माध्यमातून समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार केला पाहिजे.

विज्ञान हे साहित्यातून कसे मांडता येईल यावर माझा भर राहील, असे डॉ. नारळीकरांनी म्हटले आहे. सुशिक्षित लोकांमध्येही अंधश्रद्धा वृत्ती आढळते ती दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. साहित्यातून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी तसेच विज्ञान प्रसारासाठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा उपयोग करता येईल असा विश्वास डॉ. नारळीकरांना वाटतो. प्रो. फ्रॉइड यांच्याबरोबर वैज्ञानिक सिद्धांत मांडणारे डॉ. नारळीकर जागतिक स्तरावर पोहोचले परंतु ते मराठी भाषेला विसरले नाहीत ही मराठी भाषिकांसाठी अभिमानाची बाब आहे. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ. नारळीकर यांची अ.भा. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड ही मराठी भाषिकांनी त्यांना दिलेली मानवंदनाच होय, असे मावळते संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटो यांनी म्हटले आहे. अनेक वर्षे मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर विज्ञान लेखनाची योग्य दखल घेतली जात नव्हती. आता संमेलनाध्यक्षपदी डॉ. नारळीकर यांची निवड झाल्याने विज्ञानविषयक साहित्यही मुख्य प्रवाहात येऊ शकेल. आकाशाशी नाते जडलेला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा वैज्ञानिक संमेलनाध्यक्ष झाला. हा मराठी भाषेचा गौरवच म्हणता येईल.

मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठापासून राजकीय नेत्यांना दूर ठेवले जाईल असे कौतिकराव ठाले पाटील यांनी म्हटले होते. परंतु हा विचार विरघळून जाणार असे दिसते.साहित्य संमेलन नाशिकला होत असल्याबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आनंद व्यक्त केला आहे. संमेलनाला पूर्णत: मदत करण्याची तसेच साहित्यिकांचा योग्य सन्मान ठेवण्याची ग्वाही भुजबळांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा यंदा सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम आहे. संमेलनाचे उद्घाटन साहित्यिकाच्याच हस्ते केले जाईल असे ठाले पाटलांनी म्हटले असले तरी प्रत्यक्षात काय होते ते लवकरच स्पष्ट होईल.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या