29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeसंपादकीयशिक्षणावर संक्रांत !

शिक्षणावर संक्रांत !

एकमत ऑनलाईन

कोरोनाने मागच्या दोन वर्षांपासून जगाला वेठीला धरलेय. या विषाणूची नवनवी रूपं जगातल्या कुठल्या ना कुठल्या देशात जन्माला येतात आणि मग जगभर त्याचे हाकारे अन् इशारे देण्याची स्पर्धाच सुरू होते. कोरोना विषाणू पहिल्यांदा आला त्यावेळी त्याबाबत खूपच कमी माहिती असल्याने आरोग्यतज्ज्ञांसह सरकार व प्रशासनात संभ्रमाचे वातावरण असणे अत्यंत साहजिकच होते. त्यातून उलटसुलट निर्णय होणे, गोंधळ निर्माण होणे व या निर्णयांचे विपरीत परिणाम सर्वसामान्यांच्या जगण्यावर होेणे या बाबी घडल्या. मात्र, हे होणे साहजिकच होते हे लक्षात घेऊन नागरिकांनी त्या सहनही केल्या. तथापि, त्यामुळे संभ्रमावस्थेतील या निर्णयामागची आकलनशून्यता, अतार्किकता व अवैज्ञानिकता फार काळ लपणारी नव्हतीच. ती लवकरच उघडकीस आली. त्यामुळेच ज्या देशांमधील नागरिक जागृत आहेत तिथे अशा अवैज्ञानिक निर्णयांना कडाडून विरोध झाला व त्या देशांच्या सरकार-प्रशासनालाही आपली चूक मान्य करून नव्या व योग्य उपाययोजना कराव्या लागल्या. त्यानुसार आता कोरोनासोबतच्या दोन वर्षांच्या सहवासाला जगातले बहुतांश देश सरावलेले आहेत. कोरोनाची नवनवी रूपे मानवजातीवर हल्ला करतच राहणार त्यामुळे त्याची दहशत बाळगून काहीच होणार नाही तर योग्य खबरदारी घेत व उपाययोजना करत हा हल्ला परतवत राहणे व जनजीवन जास्तीत जास्त सुरळीत ठेवण्यावर भर देणे हेच सूत्र जगाने स्वीकारलेले पहायला मिळते. त्यामुळेच आज जगातील अनेक देशांनी कोरोनाचे हल्ले होत असतानाही आपल्या देशातील जनजीवन, अर्थकारण, शिक्षण आदी अनेक बाबी जास्तीत जास्त कशा सुरळीत सुरू राहतील किंवा कशा सुरळीत सुरू ठेवता येतील यावरच लक्ष केंद्रित केलेले पहायला मिळते. मात्र, या सगळ्याला अपवाद म्हणजे आपला महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणारा भारत देश! कोरोनाचा दोन वर्षांचा अनुभव घेऊनही आपण अद्याप कोरोना लढ्यात पहिल्या दिवशी जसे चाचपडत होतो तसेच आजही चाचपडत आहोत आणि टाळेबंदी, निर्बंध हेच कोरोनावरचे रामबाण औषध असल्याची धारणा घट्ट करून घेतल्याच्या परिणामी त्याच अवैज्ञानिक, अतार्किक व आकलनशून्य उपायांची उजळणी करत आहोत.

या अवैज्ञानिक उपायांनी घडवलेला प्रमाद जगजाहीर आहे व त्याचे भयंकर परिणाम देशातील जनता भोगते आहे. त्यातून सामान्यांमध्ये ‘कोरोना झाला तरी ठीक पण टाळेबंदीचे सरकारी उपचार नको’ अशीच इच्छा व्यक्त होतेय. मात्र, आपल्या या लोकशाही देशात सरकारने लोकेच्छेचा सन्मान वगैरे करायला हवा, हे सूत्र फक्त पल्लेदार भाषणांपुरते व पुस्तकांतील परिच्छेदापुरतेच शिल्लक राहिलेले आहे. प्रत्यक्षात सत्ताधा-यांची, सरकारची व प्रशासनाची इच्छा म्हणजेच लोकेच्छा हे सूत्र केव्हाच रूढ करून टाकण्यात आलेले आहे. त्यामुळे ‘आले सरकार-प्रशासनाच्या मना तेथे कोणाचे चालेना’ अशीच स्थिती वारंवार जनतेला अनुभवावी लागते. अर्थात आताशा सरकार-प्रशासनालाही आपल्या आकलनशून्य निर्णयांनी होणा-या प्रमादांची झळ बसते आहेच. पण तरीही बंद-निर्बंधांवरचे सरकार-प्रशासनाचे प्रेम तसूभरही कमी होताना दिसत नाही. मग सरकार-प्रशासन आपले हे अतूट प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या सोयीने बंद-निर्बंधांचा उपचार करून आम्ही कोरोनाशी कसे जोमाने लढतो आहोत, हे ओरडून ओरडून जगाला सांगते, स्वत:ची पाठ थोपटून घेते. सरकार-प्रशासनाचे हे त्यांच्या सोयीचे बंद-निर्बंध प्रेम किती अतार्किक व फोल आहे हे सगळ्या जगाला ढळढळीत दिसत असतानाही सरकार-प्रशासनाला ना त्याची फिकीर आहे, ना खेद, ना खंत! याचा उत्कृष्ट पुरावा म्हणजे सध्या राज्यात ओमिक्रॉनच्या अनुषंगाने सरकारने लावलेले नवे निर्बंध! या नव्या निर्बंधांतर्गत राज्यातील शासकीय कार्यालये, खाजगी कार्यालये, बाजारपेठा, उद्योगधंदे, सार्वजनिक वाहतूक, राजकीय, सामाजिक समारंभ, निवडणुकीचे प्रचार एवढेच नाही तर मॉल, चित्रपटगृहे, उपाहारगृहे, मद्यालये, मंदिरे, वगैरे सर्व काही सुरू आहे.

मात्र, अपवाद फक्त आणि फक्त शिक्षणाचा! ओमिक्रॉन बहुधा शाळा महाविद्यालया- ंमध्येच मुक्कामी असावा त्यामुळे त्याला तेथून बाहेर पडू न देण्याच्या वज्रनिर्धाराने आपल्या मायबाप सरकारने राज्यातल्या तमाम शाळा, महाविद्यालये कडकडीत बंद करून ओमिक्रॉनला तेथे कोंडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गंमत म्हणजे याच शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी जेथे खाजगी शिकवण्या, क्लासला जातात तेथे मात्र ओमिक्रॉन फिरकत नसल्याने मायबाप सरकारने या शिकवण्या, क्लासेस निर्बंधांचे काटेकोर (?) पालन करून सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. आता सरकारच्या अफलातून निर्णयाला १० दिवस उलटून गेल्यावरही सरकारला आपल्या अतार्किक व विरोधाभासाने परिपूर्ण निर्णयाची अजिबात जाणीवही झालेली नाही की खेदही वाटलेला नाही. त्यामुळेच राज्याचे आरोग्यमंत्री ‘फेब्रुवारी महिन्यापर्यंत शाळा बंदच’, असे टेचात सांगतात. राज्यातील शिक्षणतज्ज्ञ, आरोग्यतज्ज्ञ एवढेच नव्हे तर सर्वसामान्य पालक आणि स्वत: विद्यार्थीही हा अतार्किक व अवैज्ञानिक असलेला निर्णय दुरुस्त करा, मुलांचे शैक्षणिक आयुष्य बर्बाद करू नका, असा कंठशोष करीत असले तरी तो सरकारच्या कानापर्यंत पोहोचत नसल्याने सरकार नामक यंत्रणेच्या मेंदूवर त्याचा काही परिणाम होण्याची शक्यता नाही. हे फक्त आणि फक्त आपल्याच देशात घडतेय! का? तर त्याचे उत्तर सुस्पष्ट आहे आणि ते म्हणजे सरकारने शिक्षण हा विषय केव्हाचाच ‘ऑप्शन’ला (ऐच्छिक) टाकला आहे. शाळांमधील विद्यार्थी राजकारण्यांचे मतदार सध्या तरी नाहीत. त्यामुळे त्यांच्या भवितव्यावर डोके खर्ची घालण्याची व परिश्रम घेण्याची गरजच काय? हाच सरळसोट व्यवहार्य प्रश्न! त्यामुळे उगाच विविध उपाययोजनांचे श्रम घेऊन शाळा-महाविद्यालये सुरू ठेवण्याचे झंझट कशाला? त्यापेक्षा ‘बंद’चे फर्मान काढले की सगळी जबाबदारी संपली! मुलांनी कसे शिकायचे? शिकायचे की शिक्षण सोडून द्यायचे? हे ती मुले व त्यांना जन्माला घालणारे त्यांचे पालक बघून घेतील! त्यांच्या पाल्यांच्या भवितव्याची चिंता सरकार, प्रशासनाने का करावी? असाच सरकार-प्रशासनाचा सरळसोट व्यवहार्य विचार! त्यामुळेच कोरोनाकाळात शाळाबंदीने अमूक लाख मुले शिक्षणप्रवाहाच्या बाहेर गेली.

अमूक हजार मुलींचे बालविवाह झाले, अमूक लाख मुले बालकामगार बनली वगैरे वगैरे सांगणारे कितीही सर्वेक्षण अथवा अभ्यास अहवाल आले तरी त्याकडे ढुंकून बघण्याची तसदी आपले मायबाप सरकार अजिबात घेत नाही. ‘रोजी रोटी सुरू राहिली पाहिजे’ हे सरकारला उमगते पण तेवढेच अत्यावश्यक असणारे शिक्षण सुरू राहिले पाहिजे, हे मात्र सरकार कळवून घेऊ इच्छित नाही. त्यामुळेच तज्ज्ञ मंडळी शिक्षण सुरू ठेवण्याचे विविध उपाय, पर्याय, कल्पना वगैरे सुचवित असले तरी सरकार-प्रशासनाला त्याकडे लक्ष देण्याची गरजच नाही कारण शिक्षण ऑप्शनला टाकण्याचं सरकारचं ‘ठरलं’ आहे व कोरोना काळात सरकारने ते ‘करूनही दाखवलं’ आहे. त्यामुळे कोरोनाची शिक्षणावरची संक्रांत अटळच! आता ही सरकारी संक्रांत घालवायची तर विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, संस्थाचालक यांनाच सरकारला जागे करावे लागेल! मात्र, ही मंडळीही सरकारप्रमाणेच शिक्षण ‘ऑप्शन’ला टाकून सुट्यांची मजा घेण्याच्या मूडमध्ये रममाण झाली तर राज्यातील शिक्षणाचा पुरता बट्ट्याबोळ अटळ, हे मात्र निश्चित!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या