27.3 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeसंपादकीयहात दाखवून अवलक्षण!

हात दाखवून अवलक्षण!

एकमत ऑनलाईन

फाजिल आत्मविश्वास माणसाला तोंडावर पाडतो. मात्र, ज्याच्यात असा फाजिल आत्मविश्वास निर्माण झालाय त्याला तोंडावर पडल्याशिवाय त्याची जाणीव होत नाहीच! त्यामुळे अशा फाजिल आत्मविश्वासातून ती व्यक्ती नको त्या गोष्टीत हात तर घालतेच पण अकारण त्या गोष्टी प्रतिष्ठेच्या करते आणि मग सरतेशेवटी ‘हात दाखवून अवलक्षण’ची प्रचीती त्याला येते! अर्थात हे एकट्या व्यक्तीपुरते नव्हे तर सार्वत्रिक सत्य आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणूक निकालातून शिक्षक व पदवीधर अशा राज्यातल्या सुशिक्षित मानल्या जाणा-या मतदारांनी स्वत:ला निवडणुकीत ‘अजेय’ मानत असलेल्या भाजपला हाच धडा शिकवला आहे. पक्ष राज्यात सत्तेत असला, यंत्रणा हातात असल्या आणि बक्कळ पैसा खर्च करण्याची तयारी असली की निवडणुकीचे निकाल आपल्या बाजूनेच फिरवता येतात व आपल्या राजकीय खेळ्या यशस्वी ठरतात, या फाजिल आत्मविश्वासाने भारलेल्या राज्यातील भाजप नेत्यांना ताज्या निकालांनी दिवसा तारे दाखविले आहेत. फाजिल आत्मविश्वासामुळे या निवडणुकीत भाजपची फट्फजिती तर झालीच पण स्वत:च्या बालेकिल्ल्यात दणदणीत पराभवाची नामुष्की सहन करण्याची वेळ भाजपवर आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशा दिग्गजांचे होम ग्राऊंड असलेल्या विदर्भात नागपूर व अमरावती या दोन्ही जागा भाजपला गमवाव्या लागल्या. सत्यजित तांबेंच्या राजकीय खेळीचे व त्यांच्या दणदणीत विजयाचे श्रेय घेण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी सत्य परिस्थिती पाहता तो केविलवाणाच ठरतो कारण सत्यजित तांबे हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत व अपक्ष म्हणूनच विधान परिषदेत प्रवेश करणार आहेत.

भाजपला या निवडणुकीत मिळालेला एकमेव दिलासा म्हणजे कोकणातला ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय! म्हात्रेंच्या विजयात भाजपचे कर्तृत्व किती हा संशोधनाचाच विषय! त्या तुलनेत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी या निवडणुकीत बराच गोंधळ करूनही मतदारांनी आघाडीलाच पसंती दिली. मराठवाड्यात राष्ट्रवादी काँगे्रसचे विक्रम काळे यांनी प्रतिकूल वातावरण असल्याचे चित्र असतानाही विजयाचा चौकार मारलाच! भाजपने काळे यांना रोखण्यासाठी पूर्वाश्रमीचे काँग्रेसी असणा-या किरण पाटलांना गळाला लावून मैदानात उतरवले खरे पण मतदारांनी भाजपची ही राजकीय खेळी नाकारलीच! उलट मराठवाडा शिक्षक संघाच्या सूर्यकांत विश्वासराव यांनी घेतलेली मते हीच चर्चेचा विषय ठरली आहेत. सूर्यकांत विश्वासराव यांना १४ हजार १२८ एवढी मते पडली. दुस-या पसंतीच्या मतांच्या आधारे किरण पाटील दुस-या क्रमांकावर पोहोचले. नाशिक मतदारसंघात तर भाजपने आपला उमेदवार रिंगणात उतरवला नव्हता. म्हात्रेंची उमेदवारी ही भाजपचा नवा मित्र असणा-या शिंदे गटाची भेट आहे. जिथे भाजपचा गड आहे अशा विदर्भातील दोन्ही मतदारसंघांत भाजपला पराभव पत्करावा लागणे व दोन्ही जागांवर पाणी सोडावे लागणे, हे खरे तर निवडणूक निकालाचे ठळक वैशिष्ट्य आहे.

महाविकास आघाडीने या दोन्ही जागा भाजपकडून खेचून घेतल्या हे आघाडीला मिळालेले ठळक यश व मोठा दिलासाही! सत्ता हाती नसतानाही एकत्र आलो तर सत्तेवर असणा-या भाजपलाही रोखता येते, हीच शिकवण सुशिक्षित मतदारांनी या निकालांतून महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिली आहे. ती त्यांनी कायमची स्मरणात ठेवली तर राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकांचा हंगाम आघाडीसाठी सुकर ठरू शकतो. असो! विधान परिषदेची ही निवडणूक म्हणजे राज्यातील जनतेचा सार्वत्रिक कौल नाही, हे मान्यच! त्यामुळे या निकालांनी लगोलग राज्यात सत्ताधा-यांविरोधात कौल आहे, असे निष्कर्ष काढणे उताविळपणाचेच! मात्र सत्ता, यंत्रणांचा वापर व पैसा आणि त्या जोरावर केली जाणारी फोडाफोडी हाच निवडणुका जिंकण्याचा राजमार्ग आहे, या भ्रमाला मात्र या निकालांनी जोरदार तडा गेला आहे. आणि राज्यातल्या भाजपच्या धुरिणांसाठीचा तो धडा आहे. जिंकून येणे या एकमेव निकषाच्या पूर्ततेसाठी राजकीय फोडाफोडी वा पळवापळवी करायची आणि ती पक्षावर थोपताना पक्षशिस्तीचा बडगा उगारायचा, हे सूत्र आता फार काळ मान्य होणारे नाही, हेच नागपूर व अमरावतीतील पराभवाने राज्यातल्या भाजप नेत्यांना दाखवून दिले आहे.

केवळ स्वपक्षातील कार्यकर्तेच नव्हे तर सामान्य जनताही अशा फोडाफोडीच्या वा पळवापळवीच्या राजकीय खेळ्यांना वैतागली आहे हाच संदेश मराठवाडा, अमरावती व नागपूरच्या निकालाने दिला आहे. तो भाजपच्या नेत्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. असो! या निवडणूक निकालांनी महाविकास आघाडीला मात्र आत्मविश्वासाचे बळ नक्कीच दिले आहे. त्यामुळे आघाडी कसबा व पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत आत्मविश्वासाने व एकीने उतरेल, हे निश्चित! त्यामुळे या पोटनिवडणुकीतही आता भाजपचा चांगलाच कस लागणार आहे. आघाडीने या पोटनिवडणुकीतही भाजपला नमविले तर मात्र भाजपच्या आत्मविश्वासाचा फुगा फुटण्यास फारसा वेळ लागणार नाही की, त्याच्या परिणामी राज्यातले राजकीय वातावरण बदलण्यासही वेळ लागणार नाही. असे घडल्यास राज्यात होऊ घातलेल्या महापालिका, स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजप-शिंदे गटाचा मोठा कस लागेल. याचा विचार भाजपमध्ये नक्कीच सुरू झाला असणार कारण पराभव सहजपणे स्वीकारणे भाजपच्या ‘डीएनए’मध्ये नाहीच! हे लक्षात घेता आता भाजपला रोखायचे तर आघाडीतील तीनही पक्षांना विसंवाद, गोंधळ कमी करून एकवाक्यतेवर व ऐक्यावर भर द्यायला हवा.

आघाडीतील विसंवाद व निर्णय प्रक्रियेतील गोंधळ हा भाजपच्या पथ्यावर पडणाराच आणि भाजप त्याचा पुरेपूर फायदा उचलणार, हे स्पष्टच! त्यामुळे आता आघाडीने राज्यात होणारी प्रत्येक निवडणूक ही येत्या विधानसभा निवडणुकीची ठोस पायाभरणी या विचारातूनच लढवायला हवी. अशी पायाभरणी झाली तरच भाजपने निवडणुका जिंकण्याचे जे नवे सूत्र रूढ करण्याचा चंग बांधला आहे ते रोखता येईल. अन्यथा आघाडीतला विसंवाद भाजपच्या पथ्यावर पडणाराच! निवडणूक निकालांची ही शिकवण आघाडीतील तीनही पक्षांचे प्रमुख नेते लक्षात घेतील, ही आशा! असो! तूर्त राजकीय खेळ्या केल्याने वा सत्तेचे बळ असल्याने मतदारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष मतदार खपवून घेणार नाहीत, हाच इशारा या निकालांद्वारे सुशिक्षित मतदारांनी सर्वच राजकीय पक्षांना दिला आहे. तो लक्षात घेऊन येत्या काळात राज्यातले सर्वच राजकीय पक्ष आपल्या कार्यशैलीत बदल करतील व जनतेच्या प्रश्नांवर, मुद्यांवर राजकारणास प्राधान्य देतील, अशी अपेक्षा करूया! हे घडले नाही तर आज जे भाजपबाबत मतदारांनी घडविले ते इतर राजकीय पक्षांच्या वाट्याला येऊ शकते, हे मात्र निश्चित! मतदारच राजा आहे, हा या निकालांनी दिलेला संदेश सर्वच राजकीय पक्षांनी ध्यानात घ्यावा, हीच माफक अपेक्षा!

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या