23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसंपादकीयपेरले तेच उगवले!

पेरले तेच उगवले!

एकमत ऑनलाईन

निवडणुकीत धार्मिक मुद्यावर धु्रवीकरण करण्याच्या खेळ्या आता भारतीय राजकारणात फारशा नव्या राहिलेल्या नाहीत. मात्र निवडणूक संपली की सत्तेवर येणा-याने अशा खेळ्यांसाठी ज्यांचा वापर केला त्यांना व धर्मानुयायांना राज्य सांभाळताना दूर ठेवायचे असते. हाच जगाचा परिपाठ आहे व इतिहासही आहे. स्वत: नरेंद्र मोदी व अमित शहा या विद्यमान सत्ताधारी भाजप पक्षाच्या अजेय जोडीलाही हा परिपाठ चांगलाच ज्ञात आहे. त्यामुळेच सलग दुसरा विजय प्राप्त करत देशाची सत्ता मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणेला ‘सबका विश्वास’ अशी जोड दिली होती. मात्र, आजवर या पक्षाने राजकारणासाठी जो कट्टरतावाद वर्षानुवर्षे पेरलाय त्यातून त्याची विषारी फळे आता सत्ताधारी पक्षास चाखावी लागणार अशीच चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे ही विषवल्ली एवढी फोफावली आहे की, ती नियंत्रित करण्यात सत्ताधारी पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनाही अपयश येते आहे.

शिवाय ज्यांच्या समर्थनाने सत्ता प्राप्त केली त्यांचाही रोष सहन करण्याची वेळ सत्ताधा-यांवर आली आहे. थोडक्यात राजकारणासाठी जे विष पेरले त्याची फळे चाखण्याशिवाय पर्याय नाही, अशीच विचित्र स्थिती सहन करण्याची वेळ आता भाजपवर आली आहे. विशेष म्हणजे आता हे प्रकरण देशापुरते मर्यादित न राहता जागतिक पातळीवर पोहोचले आहे आणि त्यातून देशाच्या परराष्ट्र धोरणाला व व्यापारी संबंधांना धक्का बसला आहे. निमित्त आहे ते नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल या पक्षातील वाचाळवीरांच्या वादग्रस्त वक्तव्याचे! नुपूर शर्मा यांनी वृत्तवाहिनीवरील चर्चेत वादग्रस्त वक्तव्य केले आणि त्याचे पडसाद कानपूरमध्ये दंगल उसळण्यात दिसले. तेव्हाच खरे तर सत्ताधारी पक्ष ही आपली जबाबदारी ओळखून भाजपने तातडीने कारवाई करायला हवी होती. मात्र, आपल्या कार्यशैलीनुसार भाजपने दहा दिवस मौन बाळगले. त्यामागे अशा घटनांमधून मिळणारा राजकीय फायदा हेच गणित! हे गणित भाजपने आजवर अनेक वेळा यशस्वीपणे वापरलेले आहेच. मात्र, यावेळी हा वाद आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आणि त्याचे जोरदार पडसाद उमटले त्यामुळे सत्ताधा-यांचे गणित बिघडले.

अरब देशांनी या वादावरून सत्ताधारी भाजपला धारेवर धरल्यावर मात्र भाजपचे तोंड उघडले व भाजपने नुपूर शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तथापि त्याचा कितपत फायदा होतो हे पहावे लागेल कारण मिळालेली संधी साधत तत्परतेने या वादात पाकने उडी घेतली आहे. भारतात मुस्लिमांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत इस्लामिक राष्ट्रांच्या संघटनेने (ओआयसी) संयुक्त राष्ट्रांकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तर काही अरब राष्ट्रांनी केवळ निलंबनाची कारवाई पुरेशी नाही तर भारताने या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. देशांतर्गतही नुपूर शर्मांचे निलंबन पुरेसे नाही त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. एकंदर काय तर प्रवक्तेपदी अशा वाचाळवीरांना नियुक्त करणे कसे अंगलट येते याचा पुरेपूर अनुभव सध्या सत्ताधारी भाजपला घ्यावा लागतो आहे. भाजपच्या या वाचाळवीरांनी सर्वच बाजूंनी भाजपची पुरती गोची केली आहे. दुर्दैवाने एका राजकीय पक्षाची गोची इथवरच हे प्रकरण मर्यादित राहात नाही कारण हा पक्ष सत्तेवर आहे. त्यामुळे केवळ या पक्षाचीच नव्हे तर देशाचीच गोची झाली आहे.

त्यातून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या सन्मानार्थ आयोजित मेजवानी रद्द होण्याच्या देशासाठीच्या अपमानास्पद घटनेला सामोरे जाण्याची वेळ आली. मेजवानी रद्द करताना कोरोनाचे कारण पुढे करण्यात आले असले तरी मूळ कारण काही लपून राहिलेलेच नाही. थोडक्यात ज्या वाचाळवीरांचा भाजपने आजवर फायदा उचलला त्यांच्यामुळेच हा पक्ष आता पुरता गोत्यात आला आहे. आखाती देशांशी चांगले संबंध ठेवण्याचाच भारत आजवर प्रयत्न करत आला आहे व त्यात भारताला यशही प्राप्त झालेय. भारतीयांसाठी आखाती देश रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देत असल्याने या देशांमधील भारतीय नागरिकांची संख्याही प्रचंड आहे. त्यामुळे या देशांशी कायम चांगले संबंध राहतील याची काळजी भारताने सदोदीत घेतली आहे व त्यास २०१४ साली देशात सत्तेवर आलेले मोदी सरकारही अपवाद नाही. आपल्या वक्तव्याने आपण स्वपक्षाच्या सरकारलाच अडचणीत आणतो आहोत याचे पक्ष प्रवक्त्यानेच भान ठेवू नये, ही बाब विचित्र वाटत असली तरी कधी ना कधी या रस्त्यावर हे होणे अटळच होते.

कारण राजकीय फायद्यासाठी धरलेली ही वाट चुकीचीच आहे. नुपूर शर्मांना निलंबित केल्याने व कोरडे खुलासे केल्याने त्याचे पापक्षालन होणार नाहीच. जी विषवल्ली खत-पाणी घालून वाढविली त्याची विषारी फळे ती पेरणा-यास कधी ना कधी चाखावी लागणे अटळच! भाजपला आता याचा चांगला अनुभव या घटनेने दिला आहे. त्यातून हे सरकार कोणता धडा घेते, हे आता पहावे लागेल. तसेच आखाती देशांमध्ये जी आग या वादाने लावली ती विझविताना सरकारचे कसब पणाला लागणार आहेच. त्याबरोबरच हा केवळ एकट्या भाजपसाठीच धडा नाही तर इतर राजकीय पक्षांनीही त्यातून बोध घेण्याची गरज आहे कारण हल्ली सर्वच राजकीय पक्षांमध्ये अशा वाचाळवीरांचे उदंड पीक आले आहे व या पक्षांचे सर्वोच्च नेते या वाचाळवीरांबाबत मौन बाळगून त्यांना बळ देण्यात धन्यता मानतायत! यातून या वाचाळवीरांना बेताल बडबडीचे बळच प्राप्त होते. वृत्तवाहिन्यांवरील स्फोटक व आक्रस्ताळ्या चर्चांमधून पदोपदी याचा अनुभव येतो. टीआरपी वाढविण्याच्या नादात स्फोटक चर्चांचा निर्माण झालेला पायंडा कसा देशासाठीच नुकसानदायक ठरतो याची प्रचितीच या घटनेच्या निमित्ताने आली आहे.

प्रश्न हाच की, यातून आपण काही बोध घेणार की, आपले वर्तन ‘ये रे माझ्या मागल्या’ असेच राहणार? धार्मिक विद्वेष हा कधीच कुणाचे भले करू शकत नाही, हाच जगाचा इतिहास आहे. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी असा प्रयत्न कायम देशांच्या अंगलटच येतो आणि त्यातून हा द्वेष निर्माण करणारेही सुटू शकत नाहीत. नुपूर शर्मांनाही आता ज्याप्रकारे धमक्या येतायत, हात, मुंडके छाटण्याची भाषा वापरली जातेय, त्यातून त्यांनाही याचा अनुभव येतोच आहे. यातून भाजपसह सर्वच राजकीय पक्ष धडा घेणार की नाही? आपल्या कार्यपद्धतीत व राजकारणात बदल करणार की नाही? हे खरे कळीचे प्रश्न! राजकीय पक्ष आपल्या फायद्यासाठी जी विषवल्ली वाढवत आहेत त्याला विषारी फळेच लागणार व ती सर्वांसाठीच घातक ठरणार, हे खरे तर सामान्यांनी पक्के लक्षात ठेवले पाहिजे व अशा प्रयत्नांना कडाडून विरोध केला पाहिजे. शेवटी पेरले तेच उगवणार, हेच जगातील अंतिम सत्य! ते जितक्या लवकर आपल्याला कळेल तेवढे नुकसान कमी होईल, हे मात्र निश्चित!

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या