26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeसंपादकीयश्रीलंका ‘एशियन किंग’!

श्रीलंका ‘एशियन किंग’!

एकमत ऑनलाईन

आशिया चषकाचा किताब पटकावण्यासाठी श्रीलंका आणि पाकिस्तान या अव्वल चारमधील पहिल्या दोन संघांत ११ सप्टेंबर रविवार रोजी अंतिम लढत झाली या रोमहर्षक लढतीत श्रीलंकेने पाकिस्तानवर २३ धावांनी मात करून मोठ्या दिमाखात आशिया चषक उंचावला. टी-२० ची ही लढत कमालीची रंगली. श्रीलंकेने शानदार विजय मिळवल्याने ते आगामी टी-२०विश्वचषक स्पर्धेत मोठ्या आत्मविश्वासाने उतरतील. आगामी विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेकडे होते परंतु श्रीलंकेची अस्थिर आर्थिक स्थिती आणि राजकीय वातावरण यामुळे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यंदाची स्पर्धा जिंकणे हा दोन्ही देशांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा विषय बनला होता. श्रीलंकेने स्पर्धा जिंकल्यास अत्यंत हलाखीचे जीवन जगणा-या आपल्या देशबांधवांच्या चेह-यावर हास्य फुलणार होते. पाकिस्तानची स्थितीही फार काही वेगळी नव्हती. तेथे आलेल्या महापुरामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले होते आणि लक्षावधी लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनेही अंतिम लढत जिंकणे महत्त्वाचे होते. दुबईमध्ये प्रेक्षक नेहमीच पाकिस्तानच्या बाजूने असतात. त्यामुळे त्या आघाडीविरुद्धही श्रीलंकेला लढा द्यावा लागणार होता. आर्थिक संकटाशी झुंज देत आणि इतिहासातील सर्वांत वाईट लोकशाही अशांततेचा सामना करीत असलेल्या श्रीलंकन जनतेला दासुन शनाकाच्या नेतृत्वाखालील क्रिकेट संघाने आनंद साजरा करण्याची संधी दिली. परंतु ही संधी त्यांनी त्यांच्या घरच्या मैदानावर दिली असती तर हा आनंद द्विगुणित झाला असता. या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध पराभूत झाल्यानंतर श्रीलंकेने आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा केली. त्यानंतरचे चारही सामने जिंकताना त्यांनी आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावत नेला. हे चारही सामने त्यांनी धावांचा पाठलाग करीत जिंकले. कुशल मेंडिस आणि निसांका या सलामीवीरांनी आपली भूमिका सुरेख वठवली. दानुष्का गुणतिलका, भानुका राजपक्षे,

कर्णधार दासुन शनाका आणि चामिका करुणारत्ने यांनी आपल्या कामगिरीत सातत्य राखले. अष्टपैलू वानिंदु हसरंगामुळे संघात संतुलन राखले गेले. श्रीलंकन संघाच्या शानदार कामगिरीला जोड मिळाली ती त्यांच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाची. ‘कॅचेस विन मॅचेस’ असे का म्हटले जाते ते श्रीलंकन संघाने सिद्ध करून दाखवले. याउलट पाकिस्तानी संघाची कामगिरी राहिली. कर्णधार बाबर आझमचे फलंदाजीतील अपयश पाक संघाला पराभवाच्या गर्तेत ढकलण्यास कारणीभूत ठरले. साखळीतील पाच सामन्यांत तो फक्त ६३ धावा जमवू शकला. त्याचा सलामीचा साथीदार मोहम्मद रिझवानने मात्र आपल्या कामगिरीत सातत्य राखले खरे परंतु त्याचा संथ खेळ संघाला उभारी देऊ शकला नाही. खरे तर रिझवान हा पाकिस्तानी फलंदाजीची ‘रीढ की हड्डी’ आहे. परंतु फलंदाजीतील त्याचा स्ट्राईक रेट पाकसाठी ‘कु-हाडीचा दांडा गोतास काळ’ ठरला. मजबूत पाय रोवल्यानंतरही त्याला धावांची गती वाढवता आली नाही.

प्रत्येक वेळी तो मोक्याच्या क्षणी बाद होत गेला. संघाची अर्धी षटके पूर्ण होईपर्यंत तो मैदानावर असायचा मात्र त्याच्या वैयक्तिक धावा जेमतेम अर्धशतकापर्यंत पोहोचायच्या. अंतिम लढतीतही हेच चित्र दिसले. मधल्या फळीतील फखर झमान, इफ्तिकार अहमद, खुशदिल शाहच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता. पाकची गोलंदाजी मात्र भेदक होती. नसीम शाहच्या गोलंदाजीत सातत्याने सुधारणा होताना दिसली. हॅरिस रौफ आणि मोहम्मद हुसैनने चांगला वेगवान मारा केला. फिरकीपटू शादाब खान आणि डावखुरा मोहम्मद नवाज यांनीही प्रभावी मारा केला. पाकचे क्षेत्ररक्षणही चांगले झाले. फलंदाजांनी मात्र नियमितपणे दगा देण्याचे काम केले. आसिफ अलीचा षटकार मारण्यात हातखंडा असल्याचे सांगण्यात येत होते. अंतिम सामन्यात पहिल्याच चेंडूवर तो त्रिफळाचित झाला! टी-२० मध्ये टॉस महत्त्वाचा मानला जातो. कारण बहुतांश वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ पराभूत होताना दिसतो.टॉस जिंकणा-या संघाला धावांचा पाठलाग करणे सोपे जाते.

यंदाच्या स्पर्धेतही तसेच घडले. बहुतांश वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ पराभूत झाला. मात्र अंतिम सामन्यात वेगळेच घडले. टॉस पाकने जिंकला पण प्रथम फलंदाजी करणा-या श्रीलंकेने सामना जिंकला ! ६० धावांच्या आत अर्धा संघ गारद झाला असतानाही श्रीलंकेने १७० धावांपर्यंत मजल मारली. शेवटच्या १० षटकांत श्रीलंकेने १०३ धावा झोडल्या. स्पर्धेची अंतिम लढत भारत-पाकिस्तान संघात होईल असाच सा-यांचा होरा होता परंतु श्रीलंकेने अफलातून प्रदर्शन करीत सारीच समिकरणे बिघडवली. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर सलग पाच सामने जिंकत श्रीलंकेने चषक पटकावला. पाकविरुद्ध अंतिम सामन्यात हसरंगाच्या २१ चेंडंूत ३६ धावा आणि तीन बळी, भानुका राजपक्षेच्या ४५ चेंडूंत नाबाद ७१ धावा आणि प्रमोद मदुशनचे ३४ धावांत ४ बळींच्या जोरावर श्रीलंकेने ‘आशियाचा राजा’ ठरण्याचा बहुमान मिळवला. विजयासाठी १७१ धावांचा पाठलाग करताना पाकचा डाव २० षटकांत १४७ धावांत आटोपला. श्रीलंकेच्या डावात नसीम शाहने पहिल्याच षटकांत कुशल मेंडिसचा भोपळ्यावर त्रिफळा उडवला. नंतर रौफने निसांका (८) आणि गुणतिलका (१) चे बळी घेतले.

फिरकीपटू इफ्तिकार अहमदने धनंजया डिसिल्वा (२८) तर शादाबने कर्णधार शनाकाला (२) बाद करून श्रीलंकेची ५ बाद ५८ अशी दारुण स्थिती केली होती. परंतु हसरंगा-भानुकाने सहाव्या विकेटसाठी ५८ धावांची तर भानुका-चामिका करुणारत्नेने सातव्या विकेटसाठी ५४ धावांची नाबाद भागीदारी करीत श्रीलंकेला सुस्थितीत नेले. पाकच्या डावात बाबर आझम अवघ्या ५ धावांवर परतला. रिझवानच्या ५५ (४९ चेंडू) आणि इफ्तिकारच्या ३२ (३१ चेंडू) धावांमुळे पाकला १४७ धावांपर्यंत मजल मारता आली. या विजयासह श्रीलंकेने १ कोटी ५९ लाख ५३ हजार रुपयांचे पहिले बक्षीस मिळवले. उपविजेत्या पाकला ७९ लाख ६६ हजार रुपयांचे दुसरे बक्षीस मिळाले. आठ वर्षांनंतर श्रीलंकेला विजेतेपदाचा आनंद लुटता आला. आतापर्यंत सर्वाधिक ७ वेळा भारताने आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. श्रीलंकेने ६ वेळा तर पाकने दोन वेळा हा चषक जिंकला आहे. टी-२० मध्ये एक-दोन षटकांत खेळाचे पारडे बदलू शकते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. हसरंगाने एका षटकांत ३ बळी घेत पाकला पराभवाच्या खाईत ढकलले. भानुका सामनावीर तर हसरंगा मालिकावीर ठरला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या