24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeसंपादकीयराजकीय रंगकर्मी!

राजकीय रंगकर्मी!

एकमत ऑनलाईन

राजकीय क्षेत्रात आजकाल एकमेकांवर तोंडसुख घेण्याचे प्रकार वाढले आहेत. एखाद्या व्यक्तीने कोणत्या पक्षात प्रवेश करावा किंवा एखाद्या पक्षाने कोणाला प्रवेश द्यावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात दुस-याने दखल देण्याचे काहीच कारण नाही. मजेची गोष्ट म्हणजे जे अशी दखल देण्याचा प्रयत्न करतात त्यांनीही स्वत: तेच केलेले असते. पण नको त्या गोष्टीत तोंड घालण्याची वाईट खोड त्यांना लागलेली असते. त्यातूनच बेछूट विधाने, वक्तव्ये केली जातात आणि विनाकारण वाद उत्पन्न करण्याचा उपद्व्याप केला जातो. अशी विधाने करण्यामागे चर्चेत राहण्याचा त्या व्यक्तीचा प्रयत्न असेलही परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याचा पक्षही त्याची पाठराखण करतो. हा दुर्गुण सा-याच पक्षात दिसून येतो.

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. (एव्हाना त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला असेलही) त्या अनुषंगाने टीका करताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा साखर कारखानदार, उद्योगपती व रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे. राज्यात दिवसेंदिवस चालत असलेले वाढते अत्याचार, सर्वसामान्यांवरील अन्याय हे महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीयतेचेच फलित होय अशी टीका करत दरेकरांनी एका दगडात दोन पक्षी मारले. दरेकर यांनी केलेल्या विधानावरून भाजपची चांगलीच गोची झाली परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र प्रवीण दरेकर यांची पाठराखण केली. दरेकर यांनी विधान केले असले तरी त्यांच्या मनात अश्लिल अर्थ नव्हता असे सांगत पाटील यांनी दरेकरांना क्लिन चिट देऊन टाकली. दरेकर जे वाक्य बोलले ते बोली भाषेत बोलले जाते.

आपण दररोजच्या बोलण्यात हा वाक्यप्रचार वापरत असतो. त्यामुळे उगाच पराचा कावळा करू नका असे पाटील म्हणाले. एखादा विषय समजावून सांगण्यासाठी आपण अशा वाक्यप्रचाराचा अनेकदा वापर करत असतो. दरेकरांची हीच भूमिका सरकारला समजली नसावी. राज्य सरकारला गरीब जनतेचे काहीही देणेघेणे नाही. त्यांना केवळ श्रीमंत वर्ग आणि राजकीय दृष्ट्या प्रभावी असणा-या लोकांची काळजी आहे अशी टीका करत चंद्रकांत पाटील यांनीही हात धुवून घेतले. दरेकर यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीच्या गोटात तीव्र पडसाद उमटले. अनेकांनी दरेकरांवर टीका केली आणि दरेकर यांनी विधान मागे घेऊन माफी मागावी अशी मागणी केली. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही दरेकर यांनी माफी मागावी अन्यथा गाल रंगविण्याची भाषा केली. दरेकर यांनी महिलांसंदर्भात केलेल्या अवमानकारक विधानवरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे दरेकरांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसने निदर्शने केली.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्यातील महिलांची दरेकर यांनी माफी मागावी अशी मागणी केली. दरेकर यांच्या विधानावरून त्यांच्या पक्षाची संस्कृती दिसून येते,त्यांच्या बोलण्यातून वैचारिक दारिद्रय दिसून येते असे सांगून चाकणकर म्हणाल्या, माफी न मागितल्यास महिलांचा अपमान करणा-याचे थोबाड आणि गाल रंगविल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही दिला. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनीही दरेकरांना इशारा देताना म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस हा महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. दरेकर फार चुकीचं बोलले. त्यांना महिलांचा आदर करता येत नसेल तर अवहेलना तरी करू नका. त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना खूप त्रास होईल. सगळ्या पक्षांमध्ये लोककलावंत आहेत. पुणेकर राष्ट्रवादीत जात आहेत म्हणून दरेकरांनी असे वक्तव्य करावयास नको होते.

त्यांच्या वक्तव्यामुळे लावणी क्षेत्रातील महिलांना वाईट वाटणे साहजिक आहे एखादी महिला मोठ्या कष्टाने घडत असेल तर तिच्या मार्गात आडकाठी आणणे योग्य नाही. गाल रंगवण्याचा इशारा मिळाल्यावरही दरेकर गप्प बसतील कसे? चाकणकरांना उत्तर देताना ते म्हणाले, मी कुणाच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देत नाही. कारण अशा वक्तव्यामुळेच त्यांना थोडीफार प्रसिद्धी मिळते. पण गाल सर्वांनाच रंगवता येतात. त्यामुळे कुणीही अतिरेकी भाषा करू नये मी जे म्हणालो ती केवळ मराठीतील एक म्हण आहे. तेव्हा हा सारा ‘वड्याचं तेल वांग्यावर’ काढण्याचा प्रकार आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. दरेकरांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या प्रिया बेर्डे म्हणाल्या, भाजपमध्येही अनेक दिग्गज कलाकार आहेत. हेमामालिनी, स्मृती इराणी, अमृता फडणवीस या सर्व महिलांबद्दलही तुम्ही असंच बोलणार काय? कुठल्याही महिलेबद्दल किंवा कलाकाराबद्दल असं बोलणं चुकीचं आहे, निंदनीय आहे कधीही टीका करताना या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं असतं.

प्रत्येकवेळी आपण किती चांगले आहोत हे दाखवण्यासाठी दुस-याला नावं ठेवणं कितपत योग्य आहे? यासाठी तुम्ही कोणती पातळी गाठता याचे आता कोणतेही तारतम्य उरलेले नाही. कोरोना काळात या कलावंतांनीच आपल्या तोंडाला रंग फासून तुमचे मनोरंजन केले आहे. त्यांच्याबद्दलच तुम्ही आता असे बोलत असाल तर याचा विरोध करावाच लागेल. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस हे चांगले नेते आहेत. त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना बोलताना तारतम्य बाळगण्याचा सल्ला द्यायला हवा होता. परंतु त्यांनीच अशा नेत्यांची पाठराखण केल्यावर काय बोलायचे? राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेही उच्च दर्जाचे रंगकर्मीच म्हटले पाहिजेत. काही दिवसापूर्वी एका मुलाखती दरम्यान ते म्हणाले, सध्या काँग्रेस पक्षाची अवस्था जमीन गेलेल्या जमीनदारासारखी झाली आहे. वास्तविक पाहता शरद पवार काँग्रेसमध्येच लहानाचे मोठे झाले. अनेक मान-सन्मान, पदे काँग्रेसमध्येच मिळाली. तरीही त्यांनी अखेर काँग्रेसवरच दुगण्या झाडल्या!

राज्य घटनेच्या मुलभूत तत्वांशी बांधील असलेल्यांनी टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे आणि लोकशाही तसेच राज्यघटना टिकवण्यासाठी एकत्र लढा द्यावा असे आवाहन महसूलमंत्री व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पवारांना केले होते. त्यावर टीका करताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, काँग्रेसची माडी मोडकळीस आल्याचे पाहून पवारांनी ती सोडली आणि आपली नवी माडी बांधली. आता पवारांनी कॉंग्रेसच्या माडीला टेकू दिला आहे. एकूण काय, सा-याच पक्षात रंगकर्मी आहेत. त्यामुळे आता उदंड झाले रंगकर्मी असे म्हणायची वेळ आली आहे!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या