23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeसंपादकीयदसरा मेळाव्यावरून संघर्ष

दसरा मेळाव्यावरून संघर्ष

एकमत ऑनलाईन

शिवसेना कोणाची, हा वाद सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असताना शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा घेण्याचा हक्क आमचा आहे, असा दावा बंडखोर शिंदे गटाने केला आहे. दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगीचे पत्र स्थानिक नेते सदा सरवणकर महापालिकेला देतात. यंदा मात्र सरवणकर यांनी बंडखोर गटाकडून पत्र पाठवत सवता सुभा निर्माण केला आहे. दुसरीकडे शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी देखील परवानगीसाठीचे पत्र महापालिकेला दिले आहे. शिवसेनेच्या ५५ वर्षांपासून सुरू असलेल्या पारंपरिक दसरा मेळाव्यावरून निर्माण झालेला वाद न्यायालयात पोहोचण्याची शक्यता आहे. शिवसेना व बंडखोर अशा दोन्ही बाजूंनी परवानगीसाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल झाल्याने प्रशासनासमोर संकट उभे राहिले आहे. एकाला परवानगी दिल्यास दुसरा न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहे.

यापूर्वी आवाजाच्या तीव्रतेच्या मुद्यावर शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला, मात्र बाळासाहेबांच्या हयातीत तो यशस्वी होऊ शकला नाही. कोरोनामुळे दसरा मेळाव्यात खंड पडला, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी निर्बंधांचे पालन करत मेळावा ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न दोन वर्षे केला. यंदा कोरोनाचे संकट काहीसे दूर झाल्याने निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा शिवसेना दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे भाजपवर हल्लाबोल करतील आणि वातावरण ढवळून टाकतील अशी भीती सत्ताधा-यांना आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मेळावा होणार नाही असा प्रयत्न केला जात आहे, असे उद्धव समर्थकांना वाटते. काल-परवापर्यंत महापालिकेवर शिवसेनेचा एकछत्री अंमल होता. पण लोकप्रतिनिधींची मुदत संपल्याने आता प्रशासकाच्या हातात महापालिकेचा कारभार असून त्यावर राज्य शासनाचे नियंत्रण आहे.

त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी कोणाला शिवाजी पार्क मैदान उपलब्ध होणार, दसरा मेळाव्यात कोणाचा आवाज घुमणार याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. मुंबईतील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला बाळासाहेबांमुळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. दस-याला मुंबईत जाऊन बाळासाहेबांच्या विचाराचे सोने लुटायचे, हा शिवसैनिकांचा परिपाठ होता. यंदा मात्र विचाराचे सोने मिळणार की नाही याबाबत संभ्रम आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा काही औरच होता. त्यांचा जनमानसावर असलेला प्रभाव, त्यांचा परखडपणा, आक्रमकता, त्यांची ठाकरी भाषा या त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि नेतृत्वामुळे मजबूत झालेल्या शिवसेना संघटनेला त्यांच्या हयातीतच फुटीचे ग्रहण लागले होते. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे या नेत्यांनी शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेबांना देखील शिवसेनेच्या भवितव्याबाबत चिंता वाटत होती. म्हणूनच त्यांनी उद्धव आणि अन्य नेत्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला होता. त्या वेळी आलेल्या अडचणींना तोंड देण्यात आले खरे पण पक्षात सारे काही आलबेल नव्हते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ५० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांचा गट बाहेर पडल्यानंतर शिवसेनेच्या पक्षांतर्गत अडचणी आणखी वाढल्या आहेत.

भाजपच्या मदतीने शिंदे गट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौ-यात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता याचा पुनरुच्चार करून उद्धव यांना डिवचले आहे. दसरा मेळाव्याला मैदान मिळू न देणे ही शिंदे गटाची खेळी आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी शिवसेनेलाच धडा शिकवला. तेव्हापासून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात जो संघर्ष सुरू आहे तो दिवसेंदिवस वाढतोच आहे. बाळासाहेबांच्या काळातही शिवसेनेत अनेकवेळा बंड झाले होते परंतु त्यावेळी जितक्या तीव्र प्रतिक्रिया उमटायच्या तशा आता उमटल्या नाहीत. त्यावेळी बंडखोरांना फिरणे मुश्कील व्हायचे. शिवसैनिक राडा करायचे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यानंतर राडा संस्कृतीत बदल केला. बाळासाहेबांच्या काळात गद्दारांना धडा शिकवला जायचा. शिवसैनिक इतके आक्रमक होते की, बंड करण्याअगोदर बंडखोर अनेकदा विचार करायचे. शिवसेनेचा तसा दरारा आज नाही. उद्धव ठाकरे मवाळ आहेत, बाळासाहेबांइतके ते कडवे नाहीत. शिवसेनेला हिंदुत्वाबरोबरच प्रबोधनकारांच्या मार्गावरून नेण्याचा उद्धव यांचा प्रयत्न आहे. येथे उद्धव यांचा वैचारिक गोंधळ दिसतो.

हिंदुत्व सोडवत नाही आणि पुरोगामी विचारांच्या पक्षांबरोबर तर जायचे आहे! शिंदे आणि ठाकरे यांच्यात खरी शिवसेना कुणाची याचा फै सला करण्यासाठी न्यायालयीन आणि निवडणूक आयोगाच्या पातळीवर संघर्ष सुरू आहे. शिवसेनेतून आम्ही बाहेर पडलेलो नाही, असा दावा शिंदे गट मोठ्या हुशारीने करीत आहे. कोणत्याही पक्षात विलीन होण्याचे टाळण्यामागे अपात्रतेची कारवाई होऊ नये, हेच कारण आहे. एकीकडे न्यायालयीन लढे चालू असताना जनतेच्या दरबारात जायची तयारी शिंदे यांनी केली आहे. उद्धव हेही जनतेच्या दरबाराची भाषा करीत आहेत. परंतु बंड झाल्यानंतरच उद्धव यांनी लोकांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांच्या मतदार संघात जाऊन सभा घेतल्या. त्यांच्या सभांना चांगली गर्दीही झाली. परंतु पक्षप्रमुख म्हणून उद्धव यांनी शिवसैनिकांच्या मनात जो विश्वास निर्माण करायला हवा होता तो केला नाही. बाळासाहेबांच्या तुलनेत उद्धव यांना मर्यादा आहेत. खरे तर त्यांनी आता बाहेर पडले पाहिजे. सैरभैर झालेल्या शिवसैनिकांना धीर द्यायला हवा.

बंडखोरांचे बंड मोडीत काढून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना पुन्हा नव्या जोमाने उभी राहील, असा विश्वास द्यायला हवा, परंतु तसे करण्यात उद्धव कमी पडले आहेत. पुढच्या काही महिन्यांत उद्धव दौरे करणार असले तरी त्यांची खरी परीक्षा आता येणा-या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत आहे. शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने ‘ईडी’ चा प्रतिवाद केला, तसा प्रतिवाद , प्रतिकार शिवसेनेला करता आला नाही. दसरा मेळाव्यावरून शिवसेनेची कोंडी केली जात असताना संघर्षाची भूमिका न घेता सर्वसमावेशक भूमिका घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. मेळावे घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण यावरून वाद टाळले पाहिजेत. सामोपचाराने यावर तोडगा काढता येईल असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दसरा मेळाव्याच्या सभेनंतर कुणामागे किती जनता आहे हे समजेल असे सांगत मुख्यमंत्र्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या