22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeसंपादकीयसर्वे सन्तु निरामय:!

सर्वे सन्तु निरामय:!

एकमत ऑनलाईन

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने दिवाळीआधी सारे निर्बंध शिथिल होतील, सर्व प्रकारची दुकाने, उपाहारगृहे, मॉलच्या वेळमर्यादेत वाढ करण्यात येईल असा अंदाज होता तो खरा ठरला. या आधी सर्व व्यापारी दुकाने, बार, उपाहारगृहे, मॉल रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. उपाहारगृहांमध्ये एकूण क्षमतेच्या ५० टक्के इतक्याच ग्राहकांना प्रवेशास मुभा देण्यात आली होती. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी व्यापारी तसेच उपाहारगृहांच्या मालकांनी केली होती. विशेषत: उपाहारगृहांना रात्री १० पर्यंतच मुभा असल्याने रात्री उशिरा बाहेर पडणा-यांची गैरसोय होत होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शाळा, महाविद्यालये, चित्रपट, नाट्यगृहे खुली करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. राज्यात सोमवारी १४८५ नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली तर २७ जणांचा मृत्यू झाला. सुमारे २ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात सुमारे २८ हजार सक्रिय रुग्ण आहेत.

देशातही गत २३१ दिवसांतील निचांकी रुग्णसंख्या आढळून आली. गत २४ तासांत कोरोनाचे सुमारे १३ हजार रुग्ण आढळून आले तर १६४ जणांचा मृत्यू झाला. देशाचा रिकव्हरी रेटही सुधारला आहे. सध्या तो ९८.१४ टक्के नोंदवण्यात आला आहे. दररोजचा पॉझिटिव्हिटी रेट १.११ टक्के आहे. याचाच अर्थ असा की झपाट्याने कोरोनारुग्णांत घट होत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिस-या लाटेचा धोका अद्यापही कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी बेसावध राहू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. मुलांच्या लसीकरणाबाबतचा घोळ अजूनही सुरूच आहे. १८ वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाबाबत अंतिम निर्णय वैज्ञानिक तर्क, लसपुरवठा आदी मुद्यांच्या आधारावर घेण्यात येईल असे कोरोना कृतिदलाचे अध्यक्ष व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. अनेक देशांनी मुलांचे लसीकरण सुरू केले आहे मात्र आपल्याकडे मुलांच्या लसीकरणाबाबत सर्वंकष विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या देशात १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी झायडस केडिलाच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे.

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला २ ते १८ वयोगटासाठी आपत्कालीन वापरास परवानगी द्यावी अशी शिफारस तज्ज्ञ समितीने औषध महानियंत्रकांकडे केली आहे. त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा कोव्हॅक्सिन लसीचा आपत्कालीन वापराच्या लसींमध्ये समावेश करण्यास अजून परवानगी दिलेली नाही. त्यांना लसीची सुरक्षितता आणि प्रभाव निश्चितीसाठी आणखी माहिती हवी आहे. वापराची शिफारस करण्यापूर्वी ही लस किती सुरक्षित व प्रभावी आहे हे निश्चित करण्यासाठी आणखी मूल्यांकनाची गरज असल्याचे डब्ल्यूएचओचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे. भारत बायोटेकने लसीसंबंधी संपूर्ण माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्यांना परवानगी देण्यासंदर्भात विलंब होत आहे. कोणत्याही लसीला मान्यता देतानाच्या प्रमाणित पद्धतींना फाटा देऊन घाईघाईने निर्णय दिला जात नाही. संबंधित लसीला परवानगी देताना तिची सुरक्षितता व परिणामकारकता यांचा परिपूर्ण आढावा घेतला जातो. कमी व मध्यम उत्पन्न गटातील देशांना ही लस योग्य आहे की नाही हेही ठरवावे लागते. कुठलीही लस न घेण्यापेक्षा कुठलीतरी मान्यताप्राप्त लस घेणे केव्हाही चांगले.

दोन मात्रा घेणे हे एका मात्रेपेक्षा नेहमीच चांगले असते असाही एक मतप्रवाह आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने गत काही दिवसांत जनजीवन पूर्णत: मोकळे केले आहे. आता सर्व व्यवहार खुले करण्यात आले आहेत. ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे, प्रार्थनास्थळे खुली करण्यात आली आहेत. तुळजापूर, शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर, त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांची गर्दी सुरू झाली आहे. २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये, २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे खुली होत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, ‘हिवाळी पहाट’सारखे कार्यक्रम तसेच अशा सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना आता कोणतीही अडचण राहणार नाही. अर्थात मार्गदर्शक सूचना पाळाव्याच लागतील. दुकाने, उपाहारगृहे, मॉलच्या वेळमर्यादा ठरविण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये रात्री १२ पर्यंत व्यवहार खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. करमणूक उद्यानेही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दोन दिवसांत जारी करण्यात येणार असून त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल.

महाराष्ट्रातील लसीकरणाने देशात सर्वाधिक वेग पकडला होता, आता त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. आपले सामाजिक, सांस्कृतिक जीवन खुले होत असताना आपण जितकी काळजी घेऊ, तितका या खुल्या व सार्वजनिक जीवनाचा आनंद प्रत्येक घटकाला मिळणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठेत गर्दी ओसंडून वाहत आहे. इतके दिवस तिस-या लाटेची भीती घालण्यात येत होती परंतु आता तिची शक्यता दिसत नाही. म्हणून गाफील राहून चालणार नाही. अर्थात राज्यातील आरोग्यविषयक जबाबदा-या आणि छोटी-मोठी काळजी ही सरकारी स्तरापासून वैयक्तिक पातळीवर सर्वांनी घ्यायला हवी. देशात पॉझिटिव्हिटी रेट संदर्भात महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर आहे. तामिळनाडू व आंध्र प्रदेश अनुक्रमे पहिल्या व दुस-या क्रमांकावर आहेत. कोरोना व्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यांच्या उपचाराकडे पुरेसे लक्ष देणे आवश्यक आहे. कोरोनाकाळात अन्य रोगांकडे दुर्लक्ष झाले होते.

महाराष्ट्रात ६ कोटी २३ लाख लोकांनी कोरोनाची पहिली मात्रा घेतली आहे. सुमारे २ कोटी ७६ लाख लोकांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. मुलांच्या लसीकरणाबाबतही काही सकारात्मक गोष्टी घडत आहेत. लसपुरवठ्याबाबत केंद्राचा सावळागोंधळ ब-याच प्रमाणात कमी झाला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी एकजुटीने काम केले तर काय होऊ शकते हे आता सर्वांच्याच लक्षात आले असेल. खुल्या-मोकळ्या सार्वजनिक जीवनाची दारे, खिडक्या उघडल्या गेल्या आहेत. तेव्हा सूर्यकिरण घरे उजळून टाकणारच… सर्वे सन्तु निरामय:!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या