22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeसंपादकीयश्रेयवादासाठी लढाई!

श्रेयवादासाठी लढाई!

एकमत ऑनलाईन

या मायावी दुनियेत पुण्य लाटण्यासाठी किंवा भागीदार होण्यासाठी सारेच चढाओढ करतात परंतु पापाचे वाटेकरी होण्यास कोणीच तयार नसतो. कालची योग्य गोष्ट आज अयोग्य ठरते आणि आजची अयोग्य गोष्ट उद्या योग्य ठरते. कधी, कोठे, काय होईल ते सांगताच येत नाही. सत्ताधारी चुकत असतील तर वेळीच त्यांना खडसावू शकणा-या संस्थासुद्धा काही काळ मूग गिळून गप्प असतात आणि जेव्हा अतिरेक होतो तेव्हा या संस्थांना अचानक जाग येते. त्यांना आपल्या कर्तव्याची जाण येऊ लागते. परंतु तोवर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते. देशात कोरोना संसर्गाच्या दुस-या लाटेने उच्छाद मांडला अणि एकच गोंधळ उडाला. चुकीचे खापर फोडण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. केंद्र राज्यांकडे बोट दाखवू लागले तर राज्ये केंद्राकडे बोटे दाखवू लागली.

कोणत्याही गोष्टीच्या तुटवड्याला राज्ये जबाबदार आहेत असे केंद्र सरकार म्हणू लागले तर तुटवड्याला केंद्राचे धोरण जबाबदार असल्याचे राज्ये म्हणू लागली. अर्थात टाळी एका हाताने वाजत नाही हेही खरेच! १ मे पासून देशात १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जाईल अशी घोषणा केंद्राने केली आणि त्यासाठी महाराष्ट्रात श्रेय लाटण्याची लढाई सुरू झाली. देशात आणि राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असल्याने त्याला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरणाची गरज होतीच. लस पुरवठ्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारचे कधीच एकमत नव्हते आणि नाही. आता केंद्राने नवी घोषणा केल्याने त्याला प्रतिसाद देण्यासाठी राज्य सरकारही सरसावले आहे. आता राज्य सरकारनेही नागरिकांना मोफत लस देण्याचे ठरविले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यासाठी अनुकूल असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

स्वस्त दरात लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक दर्जाचे टेंडर काढले जाणार असल्याची माहितीही दिली. नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक टेंडरबाबत विधीवत घोषणा केली. सर्वांना मोफत लस देण्यासाठी सरकारी तिजोरीतून खर्च करून हा कार्यक्रम हाती घेण्यात येईल असे नवाब मलिक म्हणाले होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विटच्या माध्यमातून मोफत लस देण्याची घोषणा केली आणि नंतर आपले ट्विट डिलीटही केले. लसीकरणाबाबत उच्चस्तरीय समिती निर्णय घेईल. त्यासाठी थोडा वेळ प्रतीक्षा करू असे आदित्य ठाकरे म्हणाले. १ मे पासून मोफत लसीकरणाबाबत शासन स्तरावर कोणताही निर्णय झाला नसताना संभाव्य मोफत लसीकरणाबाबत आगाऊ घोषणा करण्याची घाई नवाब मलिक आणि आदित्य ठाकरे यांनी का केली? याचा उघड उघड आणि सरळ सरळ अर्थ असा की ‘सबसे पहले’श्रेय लाटण्यासाठी ही लढाई खेळली गेली. यालाच म्हणतात ‘तीन तिघाडी काम बिघाडी’!

मुदगल शिवारात मोबाईल, पैशासाठी युवकाचा निघृण खून

महाआघाडी सरकारला ही बिघाडी परवडणारी नाही. मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीत मोफत लसीकरणाबाबत चर्चा झाली होती. मोफत लस देण्याच्या निर्णयावर एकमत झाले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही होकार दिला होता. त्याबाबत लवकरात लवकर जागतिक निविदा देण्याचे ठरले होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही मोफत लसीकरण करावे अशी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भूमिका असून त्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत आणि मुख्यमंत्रीच निर्णय घेतील असे म्हटले होते. सर्वांना मोफत लस द्यावी ही काँग्रेस पक्षाची पहिल्यापासूनची भूमिका आहे. पक्षाने तशी आग्रहाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मोफत लस देण्याबाबत अजून कोणताही अधिकृत निर्णय झाला नसला तरी त्याबाबतची घोषणा करण्याची जी चढाओढ सुरू आहे त्यावरून थोरात यांनी श्रेयवादाची लढाई सुरू होणे योग्य नाही असा टोला राष्ट्रवादीला लगावला आहे.

राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणायची असेल तर मोफत लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणात राबविणे हाच त्यावरचा प्रभावी उपाय आहे. मोफत लसीकरणाचा उद्देश चांगला आणि योग्य असला तरी नागरिकांनी लस मोफत घ्यायची की पैसे देऊन हा विषय ऐच्छिक ठेवायला हवा. म्हणजे ज्यांची ऐपत पैसे देऊन घेण्याची आहे त्यांना ती तशी घेऊ द्यावी. पर्यायाने सर्वसामान्य गरिबांना मोफत लस मिळू शकेल. राज्य सरकारने शिक्षणाची पुरती वाट लावली आहे. घटकेत एक घटकेत दुसरेच निर्णय जाहीर होत आहेत. कोरोना आपली परीक्षा घेतोय अशी ‘मन की बात’ पंतप्रधान मोदींनी केलीय. देशाने कोरोनाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केला. त्यानंतर आपण नव्या दमाने सुरुवातही केली पण दुस-या लाटेने देशाला हादरवून टाकले. ही महामारी देशाचे धैर्य व आपल्या सहनशक्तीची परीक्षा घेत आहे असे पंतप्रधान म्हणाले.

सरकारने शिक्षणाची परीक्षा घेतली आता कोरोना तुमची परीक्षा घेतोय इतकेच! यातही श्रेयवाद लाटू नका म्हणजे झाले! इतके दिवस जनता मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत होती, सोशल डिस्टन्स पाळत होती. आता घरातही मास्क वापरा असा सल्ला केंद्राने दिला आहे. कोरोनाच्या सद्यस्थितीमुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. विनाकारण घाबरल्याने फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होते. म्हणून नागरिकांनी आपल्या घरातही मास्क वापरणे सुरू केले पाहिजे असे केंद्र सरकारने म्हटले आहे. असे सल्ले देणे म्हणजे घाबरवणे नाही तर दुसरे काय? सध्या जनतेवर विविध माहितीचा धबधबा कोसळतोय. काय खरे काय खोटे हेच जनतेला समजेनासे झालेय. या आधी महिलांनी मासिक पाळीच्या पाच दिवस आधी आणि नंतर पाच दिवस लस घेऊ नये असा सल्ला देण्यात आला होता. आता केंद्र म्हणतेय, महिलांना मासिक पाळी सुरू असतानाही लस घेता येईल. केंद्र सरकारने कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, ती तुटेल तेव्हा तुटेल. सध्या जनतेपुढे एकच प्रश्न आहे. टू बी ऑर नॉट टू बी… दॅट इज द क्वेश्चन!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या