25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeसंपादकीयस्वप्न आणि वास्तवातील फरक!

स्वप्न आणि वास्तवातील फरक!

एकमत ऑनलाईन

कोरोनाचे संकट व त्याची त्या-त्या देशांकडून झालेली हाताळणी या विषयाचे विश्लेषण खरे तर सद्य परिस्थितीत घाईचे किंवा अपरिपक्व, अकालीच ठरू शकते. कारण अद्याप कोरोना विषाणूवर कुठल्याही देशाने संपूर्ण विजय प्राप्त केल्याचे ठामपणे म्हणता येत नाही. हा विषाणू दिवसागणिक व देशागणिक आपले रूप बदलून नव्याने आक्रमण चढवतो आहे. त्यामुळे तो दहा तोंडांच्या रावणाप्रमाणेच शक्तिशाली ठरलाय! त्याचे एक शीर उडवल्याच्या आनंदात आपण असतानाच तो विकट हास्य करत पुन्हा आपल्यासमोर दैत्याप्रमाणेच उभा राहतो. या दैत्याचा प्राण कशात आहे हेच जगाला बराच काळ कळले नव्हते. मात्र, आता ते संशोधकांना ब-यापैकी कळले आहे कारण संशोधकांनी कोरोना दैत्याची शक्ती क्षीण करून टाकणारे लसीकरणाचे दिव्यास्त्र शोधून काढले आहे. त्यामुळे या दिव्यास्त्राचा सुयोग्य वापर करून कोरोना दैत्याची शक्ती जास्तीत जास्त क्षीण करण्यात यश प्राप्त करणे म्हणजे या संकटाची योग्य हाताळणी केली गेली, असा निकष निश्चित करायला सध्या तरी काही हरकत नसावी! या निकषावर तपासणी केली तर इस्रायल हा देश कोरोना हाताळणीत सर्वांत यशस्वी देश ठरल्याचा निष्कर्ष हाती येतो.

मात्र, आपल्या देशाची त्या देशाशी तुलना करावयास गेलो तर लोकसंख्या, देशाचे आकारमान यासह अनेक आक्षेपांचा महापूरच येणे अटळ! त्यामुळे कोरोनाच्या संकटाची विदारकता, देशाचे आकारमान हे जास्तीत जास्त जवळचे असणारा देश म्हणून आपण अमेरिकेशी भारताची तुलना करू शकतो. या तुलनेमागे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे मागच्या काही वर्षांपासून आपणही अमेरिकेच्या बरोबरीने जगातील एक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहतो आहोत व अधूनमधून महासत्ता ठरण्याच्या नजीक दोन-चार पावलांवर पोहोचल्याचे दावेही करत आहोत. असो! लहरी ट्रम्प यांचा पराभव करून जो बायडेन यांनी जानेवारीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा आज भारतात कोरोनाच्या दुस-या लाटेने थैमान घातल्याने जी स्थिती उत्पन्न झाली आहे तशीच अमेरिकेतील स्थिती होती. त्यामुळे साहजिकच कोरोना संकटावर नियंत्रण मिळविणे हा जो बायडेन यांच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय होता. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी पहिला संकल्प सोडला तो १०० दिवसांत २०० दशलक्ष नागरिकांचे लसीकरण करण्याचा! त्यांनी हे उद्दिष्ट १०० दिवस पूर्ण होण्यास दोन दिवस बाकी असतानाच पूर्ण केले आहे. त्यामुळेच जानेवारीत ते सत्तेवर आल्यावर रोजचे दीड ते दोन लाख रुग्ण व सात ते आठ हजार मृत्यू ही अमेरिकेची असलेली स्थिती आज रोजचे ५० हजार रुग्ण व ७०० च्या जवळपास मृत्यू अशी नियंत्रणात आली आहे.

इथून पुढे रुग्णांची संख्या व मृत्यू हे दिवसेंदिवस लक्षणीय म्हणावेत असे घटत जाणार आहेत कारण आजच्या घडीला अर्ध्याहून अधिक अमेरिकी जनतेला लसीचा पहिला डोस देऊन झाला आहे तर ३० टक्के अमेरिकी जनतेला दोन्ही डोस देऊन लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. हे पाहता येत्या तीन महिन्यांत अमेरिका कोरोनामुक्त होईल व चार जुलैचा देशाचा स्वातंत्र्यदिन अमेरिकी जनता पूर्वीप्रमाणे जल्लोषात साजरा करेल, हे बायडेन यांनी देशवासियांना दिलेले आश्वासन पूर्ण झालेले असेल. गेल्या वर्षभर सुरू असलेल्या ऑनलाईन शाळा ऑगस्ट महिन्यात पूर्ववत ऑफलाईन म्हणजेच प्रत्यक्ष सुरू झालेल्या असतील! आताच्या घडीला अमेरिकेतील लसीकरण कार्यक्रम एवढ्या सुरळीतपणे सुरू आहे की, आता अपॉईंटमेंटशिवाय लोकांना रस्त्याने जातानाही सहज मोफत लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. आता या महासत्तेची बरोबरी करण्याचे स्वप्न पाहणा-या आपल्या भारतातील स्थिती काय आहे ते पाहूया! जानेवारीच्या मध्यास आपल्याकडेही लसीकरणाला सुरुवात झाली.

फेबु्रवारीच्या अखेरीस देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत प्राप्त होण्यास सुरुवात झाली व मार्चमध्ये महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये दुस-या लाटेचा उद्रेकही झाला! रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरचा प्रचंड तुटवडा देशात सुरू झाला व ओघाने त्याचा काळा बाजारही सुरू झाला. त्यावरून केंद्र व राज्यात ‘ब्लेमगेम’ सुरू झाला आणि राजकारणही रंगले! तेच पुढे सरकून आता लसीकरणावरून राजकारण सुरू झाले आहे. लसीकरणास सुरुवात झाल्यावर देश म्हणून त्यात एकदिलाने सहभागी होण्याऐवजी त्यात अफवांचा बाजार भरवून खोडे घालण्यात धन्यता मानली गेली. त्यातून लसीकरणाऐवजी प्राधान्याने राजकारण रंगले! या रंगलेल्या राजकारणाला देशातील जनताही बळी पडली. परिणामी कोरोनाच्या दुस-या लाटेने घराघरांत थैमान घालेपर्यंत कुणालाच, ना केंद्र सरकारला, ना राज्य सरकारांना, ना जनतेला, लसीकरण वेगाने व सर्वोच्च प्राधान्याने होणे निकडीचे वाटले! परिस्थिती अंगलट आल्यावर मात्र लसीकरणावरून बोंबाबोंब सुरू झाली.

त्यात राजकारण्यांनी तर ‘उलट्या बोंबा’ मारण्यास सुरुवात केली. केंद्रानेही परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात येताच या अपयशाचे घोंगडे राज्यांवर टाकण्याची ‘चतुर राजकीय चाल’ खेळून राज्यांची ‘गोची’ केली. हा खेळ सध्या देशात पुरता रंगलाय व थेट सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला. सर्वोच्च न्यायालयाने कोरोना संकट हाताळणीत अगदी सुरुवातीपासून आपल्या देशात आकलनशून्यतेने जो धोरणलकवा निर्माण झालाय त्याची स्पष्ट जाणीवच केंद्र सरकारला करून दिली. ती योग्यच कारण हे संकट हाताळण्याची सर्वोच्च जबाबदारी केंद्राचीच! केंद्रातील सत्ताधीशांनीही ती स्वमर्जीने व आग्रहाने स्वत:वर घेतलेली होती व सर्व अधिकार स्वत:च्या हाती ठेवले होते. त्यामुळे त्यातून येणारे यश-अपयश सर्वस्वी त्यांचेच हे नाकारता येणारच नाही. मात्र, त्याने राजकारण रंगवता येईल पण कोरोनाचे थैमान कसे रोखणार? लोकांचे प्राण कसे वाचवणार? हे खरे प्रश्न! मात्र, सध्या देशातील राजकारणाचा स्तरच एवढा खालावलाय की, असे प्रश्न कुणाला पडण्याचा व त्याची उत्तरे शोधण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट ‘कायम बोंबलत राहणे’ या आवडत्या कृतीसाठी सध्याची परिस्थिती म्हणजे ‘सुगीचेच दिवस’! त्याचा मनसोक्त आनंद आज देशभर घेतला जातोय! हा आनंद घेणा-यांना तो लखलाभ!!

मात्र, त्याच्या परिणामी झाले काय, तर जे लसीकरणाचे दिव्यास्त्र वापरून अमेरिकेने कोरोना संकट १०० दिवसांत नियंत्रणात आणले तेच दिव्यास्त्र आपल्याही हाती असताना व आपण जगातील लसनिर्मितीत अग्रणी देश म्हणून जगभर मिरवत असतानाही लसीकरणाऐवजी प्राधान्याने राजकारणात मग्न राहिल्याने सध्याच्या घडीला जगातील एकूण रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण भारतात असण्याच्या विदारक स्थितीला सामोरे जात आहोत. विशेष म्हणजे आपल्या या धोरणलकव्याने व त्याला मिळालेल्या राजकारणाच्या टॉनिकने परिस्थिती एवढी बिघडली आहे की, आता सर्वोच्च न्यायालयाने जागे केले म्हणून डोळे उघडले तरी सगळाच अंधार आहे कारण हा अंधार निर्माण होऊ नये याचे पूर्वनियोजनच आपल्या देशात नाही. त्यामुळे आता आग लागल्यावर ती विझविण्यासाठी विहीर खोदण्यापासूनची तयारी करावी लागतेय! याने आग कशी विझणार? हा खरा प्रश्न! त्याचे उत्तर शोधायचे तर स्वप्नातून वास्तवात यावे लागते व सर्वोच्च प्राधान्याने उपाय शोधावे लागतात!

जो बायडेन यांनी वास्तवाचे भान ठेवून कोरोना संकटावर उपाय काढले म्हणून अमेरिका या संकटावर नियंत्रण मिळवत महासत्ता पदाला सार्थ ठरली! आपण फक्त महासत्ता होण्याचे स्वप्नच बघतो, ही स्वप्ने देश म्हणून एकदिलाने वास्तवात उतरवण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळेच आपली ही आजची स्थिती आहे. स्वप्न आणि वास्तवातील फरक तो हाच! त्याच्या जबाबदारीवरूनही आपल्याकडे ‘ब्लेमगेम’चे राजकारण रंगू शकते किंबहुना ते रंगलेच आहे व दररोज आपण त्यात माखून निघतो आहोत. मात्र त्याने या सगळ्या स्थितीला सत्ताधारी, यंत्रणा, व्यवस्था, राजकारणी हे जेवढे जबाबदार तेवढेच त्यांच्यामागे मेंढरासारखे वाहवत जाणारे तुम्ही-आम्ही, सामान्य जनताही तेवढीच जबाबदार, हे सत्य नाकारता येणारच नाही कारण आपणच आपल्या व देशाच्या ब-यावाईटासाठी सजग नसू, आग्रही नसू, जागरूक नसू तर इतरांना दोष काय द्यावा? आणि तरीही आपल्याला दोष देण्याची ही उबळ रोखता येत नसेल तर मग आपल्यात आणि ‘ब्लेमगेम’ रंगवण्यात धन्यता मानणा-या राजकारण्यांमध्ये फरक तो काय? हाच या घडीचा कळीचा प्रश्न!

रेमडेसिव्हीरचा गैरवापर केल्यास खाजगी हॉस्पिटलवर कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या