19.6 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeसंपादकीयराजयोगी पर्वाची अखेर!

राजयोगी पर्वाची अखेर!

एकमत ऑनलाईन

जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने देशाच्या राजकारणाला जशी मोठी कलाटणी दिली होती तशीच कलाटणी ही राजकीय नेत्याच्या तोवर स्थापित व्याख्येलाही दिली. या नव्या व्याख्येतून अनेक नव्या राजकीय नेत्यांचा राजकारणात उदय झाला व ध्यानीमनी नसताना त्यांच्या राजकीय कारकीर्दीलाही सुरुवात झाली. बिहारमध्ये जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून जे चार प्रमुख राजकीय नेते घडले व उदयाला आले ते म्हणजे रामविलास पासवान, लालूप्रसाद यादव, नितीशकुमार आणि सुशील मोदी! या चारही नेत्यांनी आपली राजकीय पकड बिहारवर तयार केली व त्यांची राजकीय कारकीर्द बहरतही गेली. या प्रवासात सर्वांच्याच राजकीय वाटचालीत चढ-उतार आले. मात्र, यात खरे ‘राजयोगी’ठरले ते रामविलास पासवान! बिहारच्या राजकारणात रामविलास पासवान यांची ताकद राष्ट्रीय पक्षांनाही वेळोवेळी मान्य करावी लागलेलीच आहे. त्यांना बिहारमध्ये दोन विशेषणे त्यांच्या कार्यशैलीतून व राजकारणाच्या पद्धतीतून मिळाली. एक विशेषण म्हणजे राजकीय हवामानाचा शास्त्रज्ञ आणि दुसरे म्हणजे ‘सहा टक्के मतांचा राजा’! पहिले विशेषण त्यांनी दाखविलेल्या राजकीय चाणाक्षतेतून त्यांना मिळाले.

राजकारणात स्वत:च्या राजकीय क्षमतेबाबत व्यर्थ दुराभिमान न बाळगता बेरजेचे राजकारण करण्याची लवचिकता दाखवत स्वत:चे स्थान व ताकद कायम ठेवण्याचे कसब रामविलास पासवान यांनी सातत्याने दाखविले. त्यामुळे ते सर्वच राजकीय पक्षांचे कायम मित्रही राहिले व विश्वासू साथीदारही ! त्यातून त्यांनी कायम सत्तेत राहण्याचा ‘राजयोग’ प्राप्त केला आणि या राजयोगाच्या आधारे बिहारमधील आपले स्थान, अस्तित्व व प्रस्थ कायम ठेवण्यात यश मिळविले. यामुळेच त्यांच्या नावावर सहा पंतप्रधानांसोबत त्यांच्या मंत्रिमंडळात काम करणारा मंत्री असा विक्रम नोंदविला गेला आणि आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी तो अबाधितही ठेवला. जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील चार शिष्यांनी आपल्या राजकीय वाटचालीत पुढे जे वेगवेगळे मार्ग स्वीकारले त्यात स्वत:च्या क्षमतेबाबत व्यर्थ समज न बाळगता बेरजेच्या राजकारणाचा मार्ग स्वीकारणारे रामविलास पासवान यांची राजकीय कारकीर्द म्हणूनच स्थिर, स्वतंत्र अस्तित्व टिकविणारी, वेगळी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सत्ताकारणाच्या राजकारणातील यशस्वी कारकीर्द ठरली आणि ते राजयोगी ठरले.

‘सहा टक्के मतांचा राजा’ हे जे त्यांना दुसरे बिरूद मिळाले ते त्यांनी त्यांच्या मतपेढीवर निर्माण केलेल्या निर्विवाद वर्चस्वामुळे! रामविलास पासवान ज्यांच्यासोबत असतील त्यांच्याकडे आपली ही मते हस्तांतरित करू शकत होते एवढी त्यांची आपल्या मतपेढीवर निर्विवाद पकड होती. इतर कुठल्याही राजकीय नेत्यात ही किमया नाहीच! यामुळे कुठलाही राजकीय पक्ष रामविलास पासवान यांच्या पक्षाशी आघाडी किंवा मैत्री करण्यास कायम उत्सुकच असायचा! २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही भाजपने बिहारमध्ये पासवान यांच्यासोबत आघाडी केली व त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांच्या पक्षाला सहा जागाही आनंदाने सोडल्या यातच पासवान यांचा करिष्मा स्पष्ट होतो. केवळ २०१४ मध्येच नाही तर २०१९ मध्येही पासवान यांनी आपले हे राजकीय कौशल्य व ताकद दाखवून दिली. शिवाय त्यांनी आपले हे राजकीय कौशल्य आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत सातत्याने दाखवून दिले व सिद्धही केले आणि त्यामुळेच ते राजकीय हवामान शास्त्रज्ञही ठरले. यावेळच्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीतही पासवान यांच्या पक्षाने बिहारमध्ये रालोआतून बाहेर पडण्याचा व नितीशकुमारांचा उघड विरोध करण्याचा पवित्रा घेतला. मात्र, त्याचवेळी केंद्रात रालोआत कायम राहण्याची भूमिका घेतली.

मांजरा खोऱ्यातील कोरड्या प्रकल्पांचा अभ्यास करावा

‘मोदी से बैर नही, नितीश तेरी खैर नही’, अशी घोषणा त्यांच्या लोकजनशक्ती पार्टीने दिली आहे. त्यांच्या या भूमिकेने राजकीय जाणकारांनाही कोड्यात टाकले आहे. बिहारमधील नितीशकुमार यांच्या वर्चस्वाला यामुळे मोठे आव्हान मिळण्याची शक्यता व्यक्त होते आहे. मात्र, ही राजकीय खेळी पूर्ण करण्याअगोदरच काळाने रामविलास पासवान यांच्यावर घाला घातला. त्यांच्या निधनाने बिहारच्या राजकारणात मोठी पोकळी तर निर्माण झालीच आहे पण त्यांनी राज्यात केलेल्या या आगळ्या-वेगळ्या राजकीय खेळीच्या यशापयशावरही प्रश्नचिन्ह लागले आहे. त्यांचे पुत्र चिराग पासवान या शोकातून किती लवकर स्वत:ला सावरतात व त्यांची खेळी कितपत यशस्वी करतात हे येणारा काळच ठरवेल. मात्र, या खेळीमागे बिहारचे आजवर अप्राप्त मुख्यमंत्रिपद प्राप्त करण्याची पासवान यांची तीव्र इच्छा हे प्रमुख कारण असू शकते. कारण या राजयोगी ठरलेल्या नेत्याला त्याच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत बिहारच्या मुख्यमंत्रिपदाने कायम हुलकावणी दिलेली आहे. ही त्यांची खंत शेवटपर्यंत कायमच राहिली. कदाचित त्यांनी आयुष्यभर केलेल्या बेरजेच्या राजकारणाचा हा ‘साईड इफेक्ट’ असावा! असो!

मात्र, त्यांच्या बेरजेच्या राजकारणाने त्यांना केवळ दलित नेता या प्रतिमेतून बाहेर पडण्यास व सवर्णांचाही नेता बनण्यात मोठे यश मिळाले, हे सत्यही नाकारता येत नाहीच! त्यातून त्यांनी ‘लोकनायक’ हे बिरूद प्राप्त केले व स्वत: विक्रमी मतांनी निवडून येतानाच इतरांनाही विक्रमी मतांनी निवडून आणण्याची ताकद त्यांनी प्राप्त केली होती. आणीबाणीत दोन वर्षे तुरुंगवास भोगून बाहेर आल्यानंतरही स्वाभाविक व सहज मानला जाणारा प्रस्थापितांविरुद्ध विद्रोहाचा व संघर्षाचा मार्ग न निवडता त्यांनी दीर्घकालीन हिताचा, परिपक्व, बेरजेच्या राजकारणाचा मार्ग स्वीकारून स्वत:चे स्थान भक्कम केले हे रामविलास पासवान यांंचे राजकीय चातुर्य व वेगळेपण! यामुळेच ते आपली प्रदीर्घ व स्थिर राजकीय कारकीर्द यशस्वी करू शकले. आक्रस्ताळेपणाला जातीची जोड देऊन राजकारण करू इच्छिणा-यांच्या मांदियाळीत म्हणूनच रामविलास पासवान केवळ वेगळेच ठरले नाहीत तर सर्वमान्य, लोकनायक ठरले! दलित नेत्याची एक प्रस्थापित प्रतिमा त्यांनी कधीच स्वीकारली नाही की, मान्यही केली नाही. मग ती कपड्यांच्या पेहरावात असो की, भारतीय समाजातील जातीच्या उतरंडीतील संघर्षाबाबत असो, त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले.

मांजरा खोऱ्यातील कोरड्या प्रकल्पांचा अभ्यास करावा

त्यामुळे ज्या मोदींच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात गुजरातमध्ये दंगली झाल्यावरून केंद्रातले मंत्रिपद सोडले त्याच मोदींच्या केंद्रातील मंत्रिमंडळात मंत्री होताना व या सरकारचा दलित चेहरा हे बिरूद मिळवताना रामविलास पासवान यांना कुठलीही अडचण आली नाही! ते कायम आपल्या मतदारांच्या हितासाठी बांधील राहिले व आपल्या बेरजेच्या राजकारणाने त्यांना लाभ मिळवून देत राहिले! ही त्यांची बांधीलकीच त्यांना लोकनायक बनवणारी ठरली! या लोकनायकास ‘एकमत’ची विनम्र व भावपूर्ण आदरांजली! त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील हवामान शास्त्रज्ञाची पोकळी निर्माण झाली आहे व एका राजयोगी पर्वाची अखेर झाली आहे!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या