21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeसंपादकीय...हाती आले धुपाटणे !

…हाती आले धुपाटणे !

एकमत ऑनलाईन

दररोज एकनाथ शिंदे गटाची सरशी सुरूच आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अवस्था ‘तेल गेले, तूप गेले, हाती आले धुपाटणे’अशी झाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर २० जूनला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत मोठी फूट पाडली. एकापाठोपाठ एक असे शिवसेनेचे ४० आमदार शिंदे गटात दाखल झाले. त्यानंतर भाजपबरोबर सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रिपद मिळवल्यानंतर शिंदे यांनी पक्ष संघटनेत फू ट पाडण्यासाठी पक्ष पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांना आपल्याकडे वळवण्यावर लक्ष केंद्रित केले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेना खासदारांमध्ये फू ट पडली.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची खासदारांची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्य केल्यानंतरही पक्षाचे १२ खासदार सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात दाखल झाले. सोमवारी संध्याकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावली होती. पण या बैठकीला विनायक राऊत, अरविंद सावंत, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे आणि राज्यसभेतील खासदार अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या. शिंदे गटाचा शिवसेनेमध्ये फू ट पाडण्याचा सातत्याने केला जाणारा खेळ म्हणजे कॉमेडी एक्स्प्रेसचा भाग दोन असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केली होती. या बंडखोर गटाला अजून मान्यता नाही तरी शिंदे गट शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करत आहे, हा प्रकार हास्यास्पद आहे.

शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष असून गट नव्हे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून अनेकजण फु टून बाहेर पडले आहेत. या फु टीर गटांना शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा अधिकार नाही असे राऊत म्हणाले. शिवसेना खासदारांमध्ये फू ट पडत असताना ‘मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही’ असा दावा करणारे शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन करून बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा केल्याचा आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. रामदास कदम यांनी टीका करताच त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय ‘ईडी’च्या कारवाईची टांगती तलवार असलेले माजी खासदार आनंद अडसूळ हे शिंदे गटाबरोबर गेल्याने त्यांचीही हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी गौप्यस्फोटांचे स्फोट होत राहिल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकामागून एक हादरे बसत राहिले. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला होता, असा दावा शिवसेनेचे लोकसभेतील बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात जूनमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेना-भाजप युतीबाबत चर्चा झाली होती.

युतीबाबत ठाकरे यांची भूमिका सकारात्मक होती. शिवसेनेच्या खासदारांबरोबर ठाकरे यांच्या तीन-चार बैठका झाल्या. त्यात त्यांनी युतीसाठी खासदारांनीही प्रयत्न करावेत असे सुचवल्याचा गौप्यस्फोट शेवाळे यांनी केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिवसेनेच्या १२ खासदारांचे स्वागत केले. या खासदारांनी लोकसभेत गट तयार करून लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले. त्यानुसार लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल शेवाळे यांना गटनेते आणि भावना गवळी यांना मुख्य प्रतोद म्हणून मान्यता दिली. खासदार राहुल शेवाळे यांच्या गौप्यस्फ ोटानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन युतीसाठी आग्रही असलेल्या खासदारांनी युती तोडल्याबद्दल भाजपला जाब का विचारला नाही असा सवाल केला. युतीचा शब्द पाळला गेला असता तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले असते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची फसवणूक भाजपनेच केल्याचा आरोप राऊत यांनी केला. काटाकाटीच्या खेळावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मजेदार भाष्य केले आहे. ते म्हणाले, भाजपला शिवसेना संपवायची असल्याने ते कोंबड्याची झुंज लावावी तसे शिवसेना आणि त्यातून फु टणा-यांची झुंज लावत आहेत. तुम्ही कितीही बाण पळवले तरी धनुष्य माझ्याकडेच आहे असा इशारा दिला.

आता या इशा-यावर काय बोलावे? तुमच्या भात्यात बाणच नसतील तर धनुष्याचा काय उपयोग? तुमच्याकडे भारी तोफ आहे पण दारूगोळाच नाही तर काय उपयोग? … हत्ती गेला अन् शेपूट राहिले अशी अवस्था! ज्वलंत हिंदुत्वाचा विचार घेऊन शिवसेना फोफावली, वाढली. मात्र आज शिवसेनेची अवस्था बिकट झाली आहे. शिवसेनेची स्थापना होऊन ५५ वर्षे झाली पण तिला स्वतंत्रपणे राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही. भाजपची साथ घेऊन शिवसेना सत्तेवर आली मात्र तिची अवस्था गंभीरच झाली. एकीकडे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष दुरावताना दिसत आहेत तर दुसरीकडे भाजप आधीच दुरावला आहे. अशा बिकट परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पक्षाची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. आधीच शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. अशा स्थितीत शिवसेनेत आणखी गळती होऊ न देण्याचे मोठे आव्हान ठाकरे यांच्यासमोर आहे. सध्या तरी काहीच हातात राहणारे नाही अशी स्थिती आहे. बाळासाहेबांनंतर शिवसेनेची सर्व सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती आली मात्र त्यांना ज्येष्ठ आणि तरुण नेतृत्वाचा समन्वय साधता आला नाही. आजारपणामुळे पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवता न आल्यामुळे आज पक्ष कमालीचा कमकुवत बनला आहे.

पुत्र आदित्य ठाकरेला पुढे आणण्याची फार मोठी किंमत उद्धव ठाकरेंना चुकवावी लागत आहे. याच कारणामुळे अनेक ज्येष्ठ नेत्यांचा उद्धव ठाकरेंवर राग होता. आज शिवसेनेची जी वाताहात झाली आहे त्याला संजय राऊत यांची फाजील बडबडही कारणीभूत आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना सांभाळण्यात उद्धव ठाकरेंना अपयश आले. या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांना आवर घातल्यामुळे त्यांनी पक्ष सोडणे पसंत केले. महत्त्वाकांक्षी माणूस जसा मोठा होतो तसा पक्षही मोठा होतो. मात्र आपल्या माणसांना समाधानी ठेवणे उद्धव ठाकरेंना जमले नाही. उलट त्यांनी आपल्या माणसांचे पंख छाटण्याचे काम केले. त्यामुळे अनेकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. आज शिवसेनेचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. या निकालाद्वारे शिवसेनेला दिलासा मिळतो की धक्का ते स्पष्ट होईलच पण आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्ष संघटना मजबूत करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यासाठी त्यांना महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. नसता ‘…हाती आले धुपाटणे’ अशी स्थिती होईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या