27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeसंपादकीयअहंकाराचा ‘अड्डा’ !

अहंकाराचा ‘अड्डा’ !

एकमत ऑनलाईन

देशातील सर्व पक्ष संपतील, फक्त भाजपच राहील, असे विधान भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले आहे. आपण जर आपल्या विचारधारेवर चालत राहिलो तर देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील असे ते म्हणाले. बिहारमधील भाजपच्या १४ जिल्हा कार्यालयांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिवसेना संपत आलेला पक्ष असल्याचा उल्लेख करताना ते म्हणाले, भाजपच्या विरोधात लढणारा एकही राष्ट्रीय पक्ष आज शिल्लक राहिलेला नाही. आपली खरी लढाई कुटुंबवाद आणि घराणेशाहीविरोधात आहे.विचारधारेवर चालणारा एकमेव पक्ष असल्याने फक्त भाजपाच राहणार, असा दावाही त्यांनी यावेळी केला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबत लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता पक्ष, समाजवादी पक्ष, बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती अशा अनेक पक्षांचा उल्लेख त्यांनी केला. तामिळनाडूत घराणेशाही, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही घराणेशाही आहे. काँग्रेस तर आता भाऊ-बहिणीचा पक्ष झाला आहे.

शिवसेना संपत आली आहे असे सांगून नड्डा म्हणाले, आपल्या विचारधारेमुळे सर्व राज्यांमध्ये कमळ फु लेल. या विचारधारेतूनच जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आले. काँग्रेसने कितीही प्रशिक्षण केंद्रे घेतली तरी त्यांना फायदा होणार नाही. टिकण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षित कार्यकर्त्यांची गरज लागते. दोन दिवसांत पक्षाचे संस्कार आत्मसात होत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. अनेक राजकीय पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. शिवसेनाही संपण्याच्या मार्गावर आहे. तसेच आता ज्यांचे अस्तित्व टिकून आहे ते पक्षही लयाला जातील आणि फक्त भाजप टिकेल. भाजपची लढाई वंशवाद आणि घराणेशाहीवाल्या पक्षांशी आहे. भाजपचा वैचारिक पाया इतका मजबूत आहे की २०-३० वर्षे दुस-या पक्षात राहिलेले नेते-कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होत आहेत, असे नड्डा म्हणाले. राज्या-राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष लोकांच्या आशा-आकांक्षांवर सत्तेत आले पण नंतर घराणेशाहीवाले पक्ष बनले, अशी टीकाही त्यांनी केली. प्रादेशिक पक्ष एकेका कुटुंबाकडून चालवले जात आहेत. भाजपला हे घराणेशाहीवाले पक्ष आणि वंशवाद या दोन्ही समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. देशात लोकशाही व्यवस्था भक्कम करायची असेल तर भाजपला घराणेशाहीवाल्या पक्षांशी लढावे लागेल, असा विचार नड्डा यांनी बोलून दाखवला. परंतु या विचारामागे अहंकाराचा दर्प असल्याचे जाणवते. घराणेशाहीवाल्या पक्षांनी विकास आणि गरिबांच्या कल्याणाच्या मार्गात सातत्याने अडथळे आणले आहेत.

आता या घराणेशाहीवाल्या पक्षांची दुरवस्था झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये २८७ मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. काँग्रेस भावा-बहिणीचा पक्ष झाला आहे. काँग्रेसने ४० वर्षे परिश्रम घेतले तरी भाजपला आव्हान देऊ शकणार नाही असे नड्डा म्हणाले. इथे नड्डा यांच्या अहंकाराचा दर्प दिसतो. कारण प्रत्येक पक्षाच्या वाट्याला बरे-वाईट दिवस येत असतात. कोणीही अमरपट्टा घेऊन येत नसतो. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आदी पक्ष संपतील असे भाकित भाजप अध्यक्ष नड्डा यांनी केले असले तरी जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले आहे. राष्ट्रीय पातळीवर पक्ष टिकविण्यासाठी अशी वक्तव्ये करावी लागतात. काही वर्षांपूर्वी आम आदमी पार्टी हा मुख्य पक्ष असेल असे कोणालाही वाटले नव्हते. पण दोन राज्यांमध्ये हा पक्ष सत्तेत आहे, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल या राज्यांनी समर्थ पर्याय असल्यास राज्यात भाजपचे काय होते हे सिद्ध केले आहे. हे भाजप नेतृत्वाच्या लक्षात आलेले दिसते, त्यामुळे तो पक्ष विरोधी पक्षमुक्त व्यवस्था प्रस्थापित करू पाहतो आहे. आगामी दोन वर्षांत अनेक राज्यांत विधानसभेच्या व नंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत. सध्या केंद्रातील सत्ताधारी ईडीसारख्या संस्थांचा उपयोग करून विरोधी पक्षांना खिंडार पाडून आपला विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहेत.

नड्डा म्हणतात त्याप्रमाणे साम-दाम-दंड-भेद या मार्गांनी देशात फक्त भाजप टिकेल पण त्यानंतर काय या प्रश्नाचे उत्तर भाजप देऊ शकेल काय? कारण केवळ विरोधकांना संपविणे एवढेच उद्दिष्ट नसावे, सुशासनाबाबत जनतेच्या अपेक्षाही वाढतील त्याचे काय? २०१४ पासूनचा आढावा घेतल्यास केंद्रात किंवा कोणत्याही राज्यात भाजपने कर्जभार कमी केल्याचा, राज्यात उद्योगनिर्मिती झाल्याचा आणि त्यामुळे राज्यातील बेकारी कमी झाल्याचे दिसत नाही. देशात फक्त भाजपच टिकेल हे गृहित धरले तरी भाजपच सारा देश विकेल अशी लक्षणे दिसत आहेत. कारण, भाजपने आपल्या आठ वर्षांच्या कारकीर्दीत देशाची अमूल्य राष्ट्रीय संपत्ती विक्रीस काढल्याचे दिसून येते. एलआयसीची वाट लावण्यात आली, रिझर्व्ह बँकेकडून बेसुमार लाभांश घेण्यात आला, विमानतळे व रेल्वे खासगी मित्रांकडे सोपविण्यात आली, बेरोजगारी वाढवली, सरकारी व सार्वजनिक उद्योग जाणूनबुजून डबघाईस आणून आपल्या मित्रांची चांदी करण्यात आली, महागाई प्रचंड प्रमाणात वाढवून गरिबांचे जिणे हराम करण्यात आले अशी अनेक उदाहरणे देता येतील. तेव्हा असा हुकूमशाहीकडे झुकणारा पक्ष टिकून कोणाचे भले होणार आहे? लोकसभा निवडणुकीला अजून दोन वर्षे बाकी आहेत पण त्याआधीच भाजप नेत्यांच्या फु शारक्या सुरू झाल्या आहेत. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लादून विरोधकांना नामोहरम करण्याचा आणि न्यायपालिकेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांनाही जनतेपुढे हार पत्करावी लागली होती. आज भाजपही त्याच मार्गाने जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांचे काहीच ऐकायला तयार नाहीत. धक्कातंत्राचा वापर करणे हा त्यांचा आवडता खेळ आहे. भाजपची आक्रमकता अशी की, सत्ता सहज मिळाली तर ठीक नसता साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करून ती मिळवायचीच! देशात एकाधिकारशाही आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण जनता शहाणी अन् सजग असल्याने भाजपचे मनसुबे पूर्ण होतील असे वाटत नाही. भाजपची विचारधारा मजबूत असल्याने देशात फक्त भाजपच टिकेल हा नड्डा यांचा आशावाद दुटप्पी आहे. कारण भाजप सत्तेसाठी आपली विचारधारा पातळ करतो, लोकशाहीचे नियम व संकेत पायदळी तुडवतो आणि मजबूत विचारधारेचे गोडवेही गातो. तसे नसते तर त्यांनी सत्तेसाठी काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तींबरोबर युती केली नसती, मिळालेल्या सत्तेचा दुरुपयोग करत केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केलाच नसता, अन्य पक्षातील भ्रष्ट नेत्यांना पावन करून घेतलेच नसते! विरोधी विचार संपवण्याची भाजपची पद्धत लोकशाहीशी सुसंगत नाही. भारत हा बहुभाषिक, बहुसांस्कृतिक परंपरांचा देश आहे. त्यामुळे या सर्वांना सामावून घेणारी बहुपक्षीय लोकशाही हाच या देशासाठी सशक्त नैसर्गिक पर्याय आहे. त्यामुळे देशातील ही सर्वसमावेशक बहुपक्षीय लोकशाही व्यवस्था संपवून देशावर एकपक्षीय, एकाधिकारशाही-हुकूमशाही लादण्याचा भाजपचा प्रयत्न सफल होणार नाही. जे. पी. नड्डा यांचा विचार अहंकाराचा ‘अड्डा’ बनू नये एवढेच!

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या