22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeसंपादकीयगिधाडांचा देश?

गिधाडांचा देश?

एकमत ऑनलाईन

मंगळवारी राजधानी नवी दिल्लीतील कोरोनाच्या उद्रेकानंतर सर्व यंत्रणा कुचकामी ठरल्यावरून उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान संतप्त होत ‘गिधाडांसारखे वागू नका. ही गिधाडे होण्याची वेळ नाही,’ असे सरकारी यंत्रणा व कंपन्यांना सुनावले. कोरोनाच्या दुस-या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर औषधांचा व ऑक्सिजन सिलिंडरचा काळा बाजार होतोय हे तुम्हाला माहिती नाही का? तो रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांनी कठोर कारवाई केली का? ज्या कंपन्या व लोक काळा बाजार करत आहेत त्यांची या संकटकाळातील वर्तणूक मानवी म्हणता येईल का? असे अत्यंत मार्मिक व माणूस म्हणून देशातील प्रत्येकाला अंतर्मुख करणारे प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केले.

अर्थात ज्या याचिकांवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने हे संतप्त व मार्मिक सवाल उपस्थित केले त्या याचिका राजधानी दिल्लीतील अव्यवस्थेच्या, अनागोंदीच्या व गैरव्यवहाराच्या संदर्भातील असल्याने माध्यमांमध्ये केजरीवाल सरकार, कंपन्यांना फटकारले, झापले, खडसावले वगैरे मथळ्यांच्या बातम्या प्रकाशित झाल्या. त्यात प्रसार माध्यमांची लघुदृष्टीच! कारण जरी न्यायालय समोर आलेल्या याचिकासंदर्भात बोलले हे खरे असले तरी ही परिस्थिती केवळ दिल्लीतच आहे, असे अजिबात नाही. संपूर्ण देशात व सर्व राज्यांमध्ये हीच परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात जनतेला सोसावी लागते आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेला ‘गिधाडांसारखे वागू नका’, हा इशारा केवळ दिल्लीचे सरकार व काही कंपन्यांपुरताच आहे. बाकी सगळीकडे अक्षरश: माणुसकीच्या गंगाच वाहतायत असे समजून केजरीवाल सरकार व काही कंपन्यांना ‘बरे झाले, न्यायालयाने झोडपले’ म्हणत खिजवण्यात आणि त्याचा आनंद लुटण्यात काहीच अर्थ नाही.

मात्र, आपल्या देशात हे होते कारण आपण सगळेच एवढ्या संकुचित व लघुदृष्टीचे बनलो आहोत. शिवाय आपली कातडी एवढी टणक व निगरगट्ट बनली आहे की, जोवर तिच्यावर थेट प्रहार होत नाही तोवर ती थरथरतही नाही. त्यामुळे न्यायालयाच्या मार्मिक प्रश्नांनी माणूस म्हणून अंतर्मुख होण्याची गरजच आपल्याला वाटत नाही. उलट निगरगट्टपणे व शहाजोगपणे या निर्णयावरून आपल्या पोटातील मळमळ काढण्यात, तोंडसुख घेण्यात, राजकीय धुळवड रंगवण्यातच आपण धन्यता मानतो. आपल्या या सार्वत्रिक मानसिकतेनेच गिधाडांसारखे प्रत्येक बाबीत माणुसकीचे लचके तोडण्यासाठी टपून बसलेल्यांचे फावते व साधतेही. त्यांना समाज दंड वा शिक्षा करत नाही की, वठणीवर आणत नाही. त्यातून ही गिधाडे केवळ शक्तिशालीच बनत नाहीत तर सुसंघटित होतात. त्याचाच पुरावा मंगळवारी मिळाला!

एकीकडे न्यायालयाने संतप्त होत ‘गिधाडांसारखे वागू नका’ असे सुनावले आणि दुसरीकडे त्याच दिल्लीत कोविड रुग्णालयात कार्यरत एक नर्स रुग्णालयातल्याच रेमडेसिवीर इंजेक्शनचा बिनधास्तपणे काळा बाजार करत असल्याची ऑडिओ क्लिप प्रसार माध्यमांमध्ये व्हारल झाली. कोरोना योद्धे म्हणून देशाने मानवंदना दिलेल्या आरोग्य यंत्रणेचे सडलेले सत्य रूप या नर्सने आपल्या कृतीतून दाखवून दिले. एका रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी ४० हजार रुपये द्यावे लागतील ते ही अ‍ॅडव्हान्स, हे निर्लज्जपणे सांगतानाच या नर्सने तिच्याकडे हे इंजेक्शन कुठून उपलब्ध होतात याचे गुपितही तेवढ्याच निर्लज्जपणे व बिनधास्तपणे जाहीर करून टाकले. रुग्णालयात रुग्ण मरण पावला तरी आम्ही त्याला इंजेक्शन दिल्याचे दाखवून ते फोडून ठेवतो. त्यामुळे तुम्हाला चारपैकी दोन रेमडेसिवीर इंजेक्शन सील फोडलेली मिळतील, असे या नर्सने समोरच्या व्यक्तीला बजावून सांगितले.

रुग्णालयांमध्ये सध्या कोणत्या पातळीवरची माणुसकी व सेवाभाव यांचा धबधबा कोसळतोय, त्याचा हा प्रातिनिधिक पुरावाच! मात्र, मंगळवारी घडलेली ही एकमेव घटना नक्कीच नाही. जालन्यात कोविड सेंटरमध्ये काम करणा-या वॉर्ड बॉयने १५ रेमडेसिवीर विकल्याचे उघडकीस आले व त्याला आणि त्याच्या साथीदारांना अटक झाली. ही तब्बल सात जणांची टोळी आहे. आणि विशेष म्हणजे हे सगळे कुठल्याना कुठल्या कामामुळे कोविड सेंटरमध्ये कार्यरत असणारेच आहेत. याच दिवशी म्हणजे मंगळवारीच लातूरमध्येही रेमडेसिवीरचा काळा बाजार करणा-या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. या झाल्या प्रातिनिधिक घटना. मात्र, जर आपण जरा आपल्या स्मरणशक्तीला थोडासा ताण दिला तर आपल्याला हे लगेच लक्षात येईल की, जसे आपल्या देशावर कोरोनाचे संकट कोसळले तसे आपल्यातच वावरणा-या, समाजाच्या भाग असणा-या, गिधाडी प्रवृत्ती घेऊनच जगणा-या प्रत्येकासाठी हे संकट मानवजातीवरचे संकट वगैरे नव्हे तर माणुसकीचेच लचके तोडून घरे भरण्याची इष्टापत्ती ठरली आहे.

त्यामुळे कितीही कोकलले तरी कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी देश व देशातील जनता काही एकत्रितपणे उभी राहिली नाही पण संकटाला इष्टापत्ती बनवणारी या देशातील गिधाडे मात्र झटक्यात सरसावली, संघटित झाली. मग मास्क, सॅनिटायझरच्या काळ्या बाजारापासून रेशनच्या काळ्या बाजारापर्यंत सर्व काही या देशात उघडपणे सुरू राहिले. त्यात भ्रष्ट व पोखरली गेलेली यंत्रणा व आरोग्य व्यवस्थाही मागे राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता या सगळ्यावर नियंत्रण ठेवायचे कुणी? तर सत्ताधारी व राज्यकर्त्यांनी. मात्र, तिथेही हीच प्रवृत्ती हाच या क्षेत्रात टिकण्याचा मूलमंत्र आणि अत्यावश्यक निकष! त्यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा कमी करण्यासाठी व काळा बाजार थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची आपल्यावरची जबाबदारी या मंडळींच्या गावीही नाही.

उलट हेच रेमडेसिवीरचा प्रचंड तुटवडा असल्याच्या बोंबा मारत एकमेकांवर आरोप करत राजकीय हिशेब चुकते करण्यात मग्न! त्याच्या परिणामी जनतेत ‘पॅनिक’ निर्माण होणे अटळच आणि एकदा का असे पॅनिक निर्माण झाले की, त्याचा फायदा लाटणारा बाजार ‘फुलो फलो, दूधो नहाओ’ सूत्राने टिपेला पोहोचणे अटळच! त्यामुळे कोरोनाच्या पॅनिकने दारू, सिगारेट, गुटखा, सुगंधित सुपारी, किराणा यासारख्या अर्थाअर्थी या रोगाशी दुरान्वयेही संबंध नसणा-या सर्वच बाबींचा काळा बाजार फुलतो. त्याला कारणीभूत ठरते ती कोरोनाच्या नावावर पसरवली व खपवली जाणारी दहशत. ही दहशत निर्माण होण्यासाठीही पुन्हा यंत्रणाच कारणीभूत. कारण स्वत:चे नाकर्तेपण व निष्क्रियता लपविण्यासाठी यंत्रणाच संकटाचा बागुलबुवा उभा करणार आणि तो रोखण्यासाठी फार मोठे काम करतोय असा आभास निर्माण करण्यासाठी काय उपाययोजना करणार तर आपला परमप्रिय ‘कडकडीत बंद’! एकतर कडकडीत बंदने लोकांना गप्प करता येते आणि वर या ‘बंद’ने यंत्रणेसाठी अक्षरश: सुगीचे दिवस येतात.

त्यामुळे ‘बंद आवडे सर्वांना’ हेच आपले आवडते ब्रीदवाक्य! प्रश्न हाच की, मग या देशाला उद्या जगाने ‘गिधाडांचा देश’ म्हणून संबोधले तर आपल्याला संताप का यावा? मात्र, तो येतो कारण तो ही राज्यकर्ते व यंत्रणा जागे करते. खरं तर संताप यायला हवा तो आपण समाज, देश म्हणून अशी गिधाडे पोसतो याचा! समाजाने एकसंधपणे आपल्यातीलच ही गिधाडे व गिधाडी प्रवृत्ती रोखण्यासाठी, सुधारण्यासाठी काय केले? हा खरा कळीचा प्रश्न! त्याचे उत्तर दिले तर चार बोटे स्वत:कडेच येण्याची स्थिती. म्हणून या प्रश्नाचे उत्तर काय तर दुस-याकडे बोट दाखवत राहणे! हाच खेळ सध्या देशात सुरू आहे आणि आपण सगळेच त्यात आकंठ डुंबतो आहोत. न्यायालयाने जागे करण्यासाठी आपल्या पेकाटात लाथ घातल्यावर तरी आपण जागे होऊ व यंत्रणा, व्यवस्था, राज्यकर्त्यांना जागे करू, हीच अपेक्षा! तिथेही आपण झोपेचे सोंग सोडणार नसू तर मग ‘जैसे ज्याचे कर्म तैसे..’ हे निश्चित!

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या