28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeसंपादकीयगुणवत्तावाढ की चमत्कार?

गुणवत्तावाढ की चमत्कार?

एकमत ऑनलाईन

कोरोनाच्या संकटाने निर्माण केलेल्या अभूतपूर्व स्थितीने मानवी जीवनाच्या सर्वच अंगांबाबत निर्माण झालेले प्रचंड अनिश्चिततेचे सावट चार महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला असतानाही कमी होण्याची चिन्हे नाहीत़ या परिस्थितीला शैक्षणिक क्षेत्रही अपवाद नाही़ मानवी विकास व प्रगतीसाठी आवश्यक मूलभूत बाब म्हणजे शिक्षण! एखाद्या देशाच्या शिक्षणाचा दर्जा काय? यावरच त्या देशाचे वर्तमान अवलंबून असते व त्यावरच त्या देशाचे भवितव्यही अवलंबून असते़ जगाचा इतिहास अभ्यासला तर याची खात्री पटावी़ मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटाने देशातील शिक्षणक्षेत्राला व शिक्षणाच्या प्रक्रियेला जबरदस्त खीळ बसलेली आहे़ देशात प्रदीर्घ टाळेबंदीच्या कालावधीनंतर सरकारने अनलॉक किंवा ‘पुनश्च हरिओम’चा नारा दिलेला असला व ही प्रक्रियाही आता तिस-या टप्प्यात आलेली असली तरी देशातील व राज्यातील शिक्षण क्षेत्राचे ‘लॉक’ अद्याप उघडलेले नाहीच.

अशा सगळ्या स्थितीत गुरुवारी राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठीच्या तीन महत्त्वाच्या बाबी एकाचवेळी घडल्या, हा योगायोगच! पहिली बाब म्हणजे प्रचंड अनिश्चिततेने त्रस्त व चिंतित झालेल्या राज्यातील विद्यार्थी व पालकांना दहावीचा निकाल जाहीर झाल्याने प्रचंड मोठा दिलासा मिळाला़ खरे तर राज्यातील यावर्षीचा दहावीचा निकाल हा विक्रमी ठरला आहे़ मागच्या साडेचार दशकांतला हा उच्चांकी निकाल ठरलाय! ऐन परीक्षा कालावधीत कोरोनाचे संकट घोंघावत असताना आणि त्याचा फटका बसून दहावी परीक्षेचे काही विषयांचे पेपरच रद्द करण्याची वेळ ओढावलेली असताना यावर्षी दहावीचा राज्याचा निकाल एवढा विक्रमी लागावा, हे आनंदाचा जबरदस्त धक्का देणारे मानायचे की चमत्कार? असाच प्रश्न पडतो.

विशेषत: मागच्या वर्षीच्या दहावीच्या राज्याच्या निकालाने अनेक वर्षांतील निचांकी निकाल हे विशेषण प्राप्त केलेले असताना यावर्षी कोरोनाच्या सावटातही उच्चांकी निकालाचा नवा विक्रम प्रस्थापित होतो, याला गुणवत्तावाढीचा चमत्कारच मानावे लागेल़ हा चमत्कार का व कसा घडला? याचे तज्ज्ञांकडून यथावकाश विश्लेषण होईलच! त्यामुळे त्यावर लगेचच भाष्य करून विद्यार्थी व पालकांच्या आनंदावर विरजण घालणे अनिष्टच! यात या दोघांचाही दोष नाहीच. जी प्रचलित शिक्षणपद्धती आपण स्वीकारलेली आहे, त्यानुसारच विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश मिळविलेले आहे़ त्यामुळे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व कौतुकच! तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा!

Read More  प्रासंगिक : अजरामर गायक मोहम्मद रफी

मात्र, आपण स्वीकारलेल्या शिक्षणपद्धतीत आदल्या वर्षीचा राज्याचा निकाल ७७.१० टक्के आणि यावर्षी थेट ९५.३० टक्के, तोही कोरोनाच्या ‘न भूतो न भविष्यति’ वातावरणात, ही बाब चमत्कारच संबोधावी लागेल़ केवळ गुणांच्या आधारावरच गुणवत्तेचे मूल्यमापन करण्याची शिक्षण पद्धती पाहता, अशा चमत्कारिकरीत्या वाढलेल्या गुणवत्तेवर भल्याभल्यांना शंका येणे साहजिकच! खरे तर या शैक्षणिक चमत्कारावर काय भाष्य करावे? हाच यक्ष प्रश्न आहे आणि जे बिचारे चार-साडेचार टक्के विद्यार्थी या चमत्कारापासून वंचित राहिले, त्यांचे सांत्वन कसे करावे? काय कारणमीमांसा करावी? हा दुसरा त्याहून मोठा यक्ष प्रश्न! असो!! हा अत्यंत आग्रहाने आपण सर्वांनी पुन्हा एकवार सुरू करण्यास भाग पाडलेल्या अंतर्गत परीक्षेच्या २० गुणांच्या खिरापतीचा आशीर्वाद व रद्द झालेल्या पेपरसाठी देण्यात आलेल्या सरासरी गुणांची कृपा आहे का? हे यथावकाश स्पष्ट होईलच!

मात्र, कोरोना रोखण्यासाठी सतत हात धुऊन घ्या, हा संदेश बोर्डाने विद्यार्थ्यांना गुण देतानाही तंतोतंत पाळला व गुणांच्या गंगेत विद्यार्थ्यांचे हात धुऊन टाकण्याचे पुण्यकर्म पार पाडले, हे मात्र नक्की! असो!! एकीकडे गुरुवारी राज्यात दहावीच्या विक्रमी निकालाने अत्यानंदाचा महापूर आलेला असतानाच दुसरी महत्त्वाची बाब दिल्लीत घडली आणि ती म्हणजे ३४ वर्षांनंतर केंद्राने देशासाठीचे नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले़ सध्याच्या शिक्षण पद्धतीतील कालबाह्य किंवा काळाशी असंगत ठरलेल्या बाबी, कच्चे दुवे व दोष दूर करून काळाशी सुसंगत अशी शिक्षणपद्धती अवलंबून गुणवत्तावाढीसाठी, दर्जा सुधारण्यासाठी आणि शिक्षणाने विद्यार्थ्यांच्या जीवनास आकार देण्यास थेट हातभार लावण्यासाठी हे नवे धोरण अमलात येणार असल्याचा दावा केंद्र सरकारने हे धोरण जाहीर करताना केला आहे.

हा दावा कितपत खरा ठरतो ते या धोरणाचा सविस्तर मसुदा आल्यावर व त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर कळेलच़ मात्र, सध्या आपण स्वीकारलेल्या शिक्षण पद्धतीत अनेक दोष आहेत, गुणवत्ता व दर्जा वाढविण्यात अनेक त्रुटी आहेत आणि ही शिक्षणपद्धती काळाशी सुसंगत नसल्याने त्यात मोठे बदल करणे आवश्यक आहे, हे सरकारने मान्य केले हे विशेष! या नव्या शैक्षणिक धोरणाने आता १०+२ च्या प्रचलित पद्धतीऐवजी ५+३+३+४ अशी पद्धती लागू होणार आहे. म्हणजेच सरळ भाषेत सांगायचे तर दहावी व बारावीला सध्या मिळत असलेले प्रचंड महत्त्व कमी होणार आहे. शिवाय सहाव्या इयत्तेपासून मूळ संकल्पना शिकवण्यापुरताच अभ्यासक्रम मर्यादित करून आकलनावर व मूल्यमापनावर भर दिला जाईल. शिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमावर जादा भर दिला जाईलग़ुणांऐवजी कौशल्ये व क्षमतांवर आधारित प्रगतिपत्रक असेल.

Read More  प्रासंगिक : अजरामर गायक मोहम्मद रफी

थोडक्यात सध्याच्या पाठांतराच्या पद्धतीला व त्यावरून गुण मिळवण्याच्या रस्त्याला फाटा देण्यात आला आहे़ राज्यातील विक्रमी निकालाने गुणांची झोळी तुडुंब भरलेल्या विद्यार्थ्यांना आता या नव्या शैक्षणिक पद्धतीला सामोरे जाऊन, ती आत्मसात करून आपली दहावीत प्राप्त केलेली गुणवत्ता पुढेही सिद्ध करावी लागेल, हा याचा मतितार्थ! त्यातून दहावीत भरभरून यश मिळवणा-या मुलांचा व त्यांच्या जास्तीत जास्त गुणप्राप्तीसाठी जिवाचे रान करणा-या पालकांचा अपेक्षाभंग येत्या काळात होऊ नये, हीच अपेक्षा! शिवाय गुणप्राप्ती हेच एकमेवाद्वितीय लक्ष्य हेच विद्यार्थी, पालकांच्या मनावर पक्के बिंबवून त्यांचे साचेबद्ध व ठोकळेबाज ‘पॅटर्न’ तयार करणा-या शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासवाल्यांची नव्या शिक्षणपद्धतीने मोठी अडचण होणार आहे, हे वेगळेच! असो!!

शिक्षणक्षेत्रात या महत्त्वाच्या घटना घडत असतानाच तिसरी महत्त्वाची बाबही घडलीय आणि ती म्हणजे अनलॉक ३़० मध्येही ३१ आॅगस्टपर्यंत शाळा-महाविद्यालयांना लागलेले कुलूप कायमच राहणार आहे कारण देशातील व राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती अद्यापही अटोक्यात आलेली नाहीच! म्हणजेच विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक वर्षाच्या भवितव्यावरचे प्रश्नचिन्ह अद्याप कायमच आहे़ प्रवेश प्रक्रियेपासून सर्वच बाबी विद्यार्थ्यांना आॅनलाईनच कराव्या लागणार आहेत आणि या आॅनलाईनचा सरकारने कितीही बोलबाला केला तरी त्यात असणा-या असंख्य अडचणी व समस्या लपून राहिलेल्या नाहीतच! दहावीत भरघोस गुण मिळाल्याचा ग्रामीण भागातील बहुसंख्य गरीब विद्यार्थ्यांचा आनंद आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील अडचणीच्या डोंगरांनी विरून जाऊ नये, म्हणजे मिळविले़ सरकार तर आॅनलाईनचा पर्याय समोर करते मात्र, हा पर्याय उपलब्ध होण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची हमी घेणारी ठोस यंत्रणा अद्याप अस्तित्वात आणत नाही़ त्यामुळे प्रवेश प्रक्रिया असो की, आॅनलाईन शिक्षण, सर्वत्र त्रांगडेच निर्माण झालेले आहे, हे मात्र निश्चित! विक्रमी निकालाची प्रेरणा घेऊन सरकार हे त्रांगडे विक्रमी तत्परतेने दूर करेल, हीच अपेक्षा!

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या