24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeसंपादकीयआरोग्यवर्धक खाद्यसंस्कृतीची गरज

आरोग्यवर्धक खाद्यसंस्कृतीची गरज

एकमत ऑनलाईन

आरोग्यपूर्ण जीवनासाठी व्यक्तीच्या शरीराला अनेक प्रकारच्या पोषक घटकांची आवश्यकता असते. त्यात फायबर किंवा तंतुयुक्त पदार्थ महत्त्वाचे आहेत. फळे आणि भाज्यांमध्ये तसेच कडधान्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. हे फायबर आपल्या पचनक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. आपण जे खातो-पितो त्याचा आपल्या शरीरावर कोणता परिणाम होतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृतीने पूर्वीपासूनच शुद्ध, सात्विक भोजन घेण्यावर भर दिला आहे. भारतीय शास्त्राप्रमाणे आंबट, कडू, तेलकट, तळलेले अन्नपदार्थ अधिक प्रमाणात सेवन केल्याने तामसी विचारांमध्ये वाढ होते. त्यामुळे असे भोजन टाळले पाहिजे. आपल्याकडे उपवासाला दूध, दही, फळे आणि सात्विक आहार घेण्याची परंपरा आहे. अलीकडे वातावरणात बदल झाला की आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज वेगवेगळे आजार येऊ लागले आहेत. कमी वयाचे लोक अशा आजारांना बळी पडू लागले आहेत. आजकाल आरोग्याचे नुकसान करणारे जंक फूड, फास्ट फू ड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी लोक शुद्ध भोजन करीत असत. म्हणून ते सरासरी ८० ते १०० वर्षापर्यंतचे आयुष्य निरोगी राहून जगत असत. अलीकडे चंगळवादाचे प्रमाण खूपच माजल्याने मांसाहाराचे प्रमाणही वाढले आहे.

जे लोक डबाबंद मांस पसंत करतात, त्यांना उच्च रक्तदाब, शुगर आणि हाय कोलेस्टेरॉलसारखे आजार कमी वयातच जडतात. त्यामुळे शाकाहारी भोजनाचे महत्त्व वाढले आहे. एका अहवालानुसार दररोजच्या भोजनात हिरव्या पालेभाज्या, बीन्स आणि मटारसारखे पदार्थ, अक्रोड, बदाम, पिस्ता यासारखा सुकामेवा आणि दररोज एक ते दोन फळे असा आहार घेतला तर अशी व्यक्ती आयुष्यभर निरोगी राहू शकते. पुरुषाने आपल्या आहारात विसाव्या वर्षापासून पौष्टिक पदार्थांचा समावेश केला तर त्याचे आयुष्य १३ वर्षांनी तर महिलेचे आयुष्य १० वर्षांनी वाढू शकते. एका अध्ययनात असे आढळून आले आहे की, जर ६० वर्षाच्या व्यक्तीने आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि संतुलित प्रमाणात सुकामेवा अशा घटकांचा नियमितपणे समावेश केला तर पुरुषाच्या आयुष्याची ९ वर्षे तर महिलेचे ८ वर्षांनी आयुष्य वाढू शकते. एका व्यक्तीला दररोज २८ ग्रॅम फायबर आवश्यक असते. डाळी, हरभरा, घेवडा, मटार, मसूर आदी कडधान्ये खाल्ल्यास त्यातून शरीराला प्रथिनांबरोबर फॉलेट आणि लोहासारखे पोषक घटक मिळतात. बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, शेंगदाणे यात फायबरचे प्रमाण अधिक असते. अर्धा कप घेवड्यात आठ ग्रॅम फायबर आढळते. गहू, मका, ब्राऊन राईस, ब्लॅक राईस, बाजरी अशा अन्नधान्यांमध्ये फायबर व्यतिरिक्त प्रथिने, ब जीवनसत्व, अ‍ॅन्टी ऑक्सिडंट्स, लोह, झिंक, कॉपर, मॅग्नेशियम यासारखी खनिजे आढळून येतात. जगाच्या पाठीवर अनेक लोक दीर्घायुषी आणि निरोगी दिसतात. त्यांच्या दीर्घायुष्याचे गुपित म्हणजे हे लोक कधीही भुकेपेक्षा अधिक खात नाहीत.

हे लोक सर्वसाधारणपणे रताळी, टरबूज यासारख्या पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात करतात. या पदार्थांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आणि खनिजे असतात. त्यापैकी पोटॅशियम रक्तदाब कमी करते तर फायबर पोट साफ ठेवते. जिममध्ये जाण्याऐवजी ही मंडळी नैसर्गिक ठिकाणी खुल्या जागी व्यायाम करण्यास प्राधान्य देतात. व्यायाम हा या लोकांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. शारीरिकदृष्ट्या सक्रिय असल्यामुळे हे लोक अनेक आजारांपासून दूर राहतात. शरीराच्या आरोग्याबरोबरच मनाच्या आरोग्याकडेही ते लक्ष देतात. हे लोक बागकाम वगैरे करतात आणि किमान सात तासांची झोप घेतात. आगामी २०२३ हे वर्ष संयुक्त राष्ट्रातर्फे ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. भारत सरकारने त्याबाबत संयुक्त राष्ट्रांना विनंती केली होती. भारतीय पद्धतीच्या जेवणात भरड धान्यांचा वापर केला जातो. मात्र तो दररोज नसतो. अलीकडे मात्र भरड धान्ये वारंवार खाल्ली जावीत असा प्रचार सुरू आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर (वरई), राळा, भादली अशी ७-८ भरड धान्ये आहेत. देशात फार पूर्वीपासून याची शेती कुठे ना कुठे केली जात होती पण अलीकडे त्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. ऊर्जा व पोषणद्रव्ये देणा-या भरड (मिलेट) धान्याचे आरोग्यदायक खूप फायदे आहेत मात्र त्याविषयीची जनजागृती करण्याची गरज आहे.

भविष्यात धान्याचा तुटवडा पडू नये म्हणून भरड धान्यांचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जगभरात गहू व तांदूळच सर्वाधिक वापरला जातो. मात्र वाढत्या लोकसंख्येनुसार त्याचा कसा पुरवठा करता येईल याबाबत प्रश्नचिन्ह आहे. शिवाय या धान्याच्या उत्पादनाला जमीन, पाणी खूप लागते तसेच हवामानही पोषक असावे लागते. म्हणून या धान्यांना पर्याय शोधणे आवश्यक बनले आहे. म्हणूनच भरड धान्यांचे महत्त्व वाढले आहे. भरड धान्यापासून मिळणारे आरोग्यासंबंधीचे फायदे खूप आहेत. जगात होणा-या भरड धान्याच्या उत्पादनापैकी ४१ टक्के उत्पादन भारतात होते आणि त्यांचा वापर व उपयोग भारतातच सर्वाधिक होतो. भरड धान्यांना निरोगी धान्य असेही म्हटले जाते कारण या पिकांसाठी कोणत्याही वरखतांची आवश्यकता नसते. यावर कोणतीही कीटकनाशके, बुरशीनाशके वापरावी लागत नाहीत. देशात सध्या अन्नधान्य उत्पादन विशेषत: गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्याने दिलासादायक वातावरण आहे. येत्या वर्षभरात देशातील कल्याणकारी योजनांसाठीची गरज भागल्यानंतरही सुमारे ८० लाख टन गहू उपलब्ध असेल असे सरकार सांगते. गव्हाबरोबरच देशात यंदा ऊस उत्पादनही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. मात्र जागतिक बाजारात साखरेला फारशी किंमत मिळत नाही.

ऊस हे इतर पिकांच्या तुलनेत कमी श्रमात अधिक उत्पन्न देणारे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी ऊस हे आळशी लोकांचे पीक असल्याचे म्हटले आहे. याचे कारण एक वर्ष ऊस लावला की पुढील तीन वर्षे नवी पेरणी करण्याची गरज भासत नाही. केवळ पाणी देत राहिल्यास उसाचा खोडवा वाढत जातो. श्रम कमी असले तरी उसाला सर्वांत जास्त अनुदानाचा लाभ मिळतो. जागतिकीकरणाच्या काळातही उसाला केंद्र व राज्य सरकारचे पाठबळ मिळते. असे संरक्षण उसाच्या व साखरेच्या अर्थकारणाला बळ देणारे असल्यामुळे जिथे पाणी आहे तिथे शेतकरी ऊस लागवडीकडे वळताना दिसतो. उसाला जशी हमीभावाची हमी मिळते तशी अन्य पिकांना मिळत नाही. आज हरभरा, तूर आदी पिकांना हमीभावाची हमी मिळत नाही. या पिकांना तसेच भरड धान्यांना हमीभावाची हमी मिळाली तर शेतकरी उसाकडून या पिकांकडे निश्चितपणे वळेल. तसे झाल्यास अतिरिक्त उसामुळे निर्माण होणा-या समस्याही उद्भवणार नाहीत. पाण्याच्या दृष्टीनेही ते सोयीचे ठरेल. आज देशात कोरडवाहू शेतीमध्ये पाण्याचा वापर कमी असूनही त्यांना अनुदानच नाही. कोरडवाहू शेतकरी पावसाच्या पाण्यावर धान्योत्पादन घेत असेल तर त्याला वाढीव अनुदानाचे पाठबळ द्यायला हवे. भरडधान्याची सवय लागण्यासाठी आणि प्रोत्साहनासाठी ते आवश्यक आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या