35.2 C
Latur
Monday, March 8, 2021
Home संपादकीय ‘सीरम’ची अग्निपरीक्षा !

‘सीरम’ची अग्निपरीक्षा !

एकमत ऑनलाईन

अहंकाराने लडबडलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माज भारतीय संघाने गॅबा मैदानावर उतरवला. चार सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकून भारताने भीमपराक्रम गाजवला. त्याचे जगभर कौतुक झाले. भारत कोणत्याच क्षेत्रात मागे नाही हेच यातून सिद्ध झाले. ऑस्ट्रेलियातील अग्निपरीक्षेत भारत खरा उतरला, तावूनसुलाखून निघाला. गतवर्षात जगभरात कोरोना विषाणूने उच्छाद मांडला. कोरोनाचे महासंकट परतवून लावण्यासाठी जगभर शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. या विषाणूवर परिणामकारक लस शोधण्यासाठी जगभरात जंगजंग पछाडण्यात आले. या शर्यतीत भारताचाही सहभाग होता. पुणेस्थित सीरम संस्थेने कोव्हिशील्ड तर भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लस तयार केली. या लसींबाबत दक्षतेच्या सूचनाही देण्यात आल्या. स्तनदा माता, गर्भवती महिला व ताप आलेल्या व्यक्तींनी लस घेऊ नये असा सल्लावजा इशारा भारत बायोटेक कंपनीने दिला. कोव्हॅक्सिन ही लस हैदराबादेतील भारत बायोटेक कंपनीने तयार केली असून तिला तिस-या टप्प्यातील चाचण्यांआधीच मान्यता देण्यात आली आहे.

या लसीची परिणामकारकता अजून सिद्ध झालेली नाही. तिस-या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे ही लस घेतल्यानंतर कोव्हिड-१९ विषाणू विरोधातील प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करावे लागणार आहे. ज्याला अ‍ॅलर्जी म्हणजे एखाद्या घटकाचे वावडे असेल तर त्याला ही लस घेता येणार नाही. ज्यांना खूप ताप असेल, रक्तस्त्राव होत असेल, जे लोक रक्त पातळ ठेवण्याची औषधे घेत असतील त्यांनी ही लस घेऊ नये असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यात आणखी भर पडली ती लसीकरण करण्यात येत असलेल्या काही डॉक्टरांनी कोव्हॅक्सिनऐवजी कोव्हिशील्ड लसीची मागणी केल्याने. कोव्हॅक्सिन लसीच्या दोन मात्रा चार आठवड्यांच्या अंतराने घ्यायच्या आहेत. आतापर्यंत या कंपनीने ३० कोटी मात्रा तयार केल्या आहेत. या लसीला मर्यादित वापरासाठी आपत्कालीन परवानगी देण्यात आली आहे.

या स्वदेशी लसीबाबत डॉक्टरांच्याच मनात संदेह आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनातही संभ्रम उत्पन्न होणे साहजिक आहे. सीरम संस्थेनेसुद्धा लसीतील काही घटकांचे वावडे असणा-या व्यक्तींनी कोव्हिशील्ड लस घेऊ नये असा सल्ला दिला आहे. सीरम संस्थेने म्हटले आहे की, लस घेणा-या व्यक्तींनी त्यांच्या वैद्यकीय स्थितीची कल्पना लस देणा-या संस्थांना दिली पाहिजे. औषध घटकाचे, अन्नपदार्थांचे किंवा लसीतील घटकाचे वावडे असेल तर त्याची माहिती लसीकरणाआधी देण्याची गरज आहे. लस घेणा-याने त्याला ताप, प्रतिकारशक्ती कमकुवत असणे, रक्ताचे आजार असतील तर त्याची कल्पना देणे गरजेचे आहे. आधी दुसरी कुठली कोव्हिड-१९ प्रतिबंधक लस दिली असेल तर त्याचीही कल्पना देण्याची गरज आहे. स्वदेशी लस म्हणून मान्यता पावलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या ४५ लाख मात्रांची मागणी सरकारने भारत बायोटेक कंपनीकडे नोंदवली आहे. यापैकी ८ लाख मात्रा मॉरिशस, फिलीपाईन्स, म्यानमार या देशांना सदिच्छा म्हणून मोफत देण्यात येणार आहेत.

भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे निधन

सरकारने पहिल्या टप्प्यात भारत बायोटेककडे ५५ लाख मात्रांची मागणी नोंदवली होती. कंपनीने १६.५ लाख मात्रा सरकारला देणगीपोटी दिल्या आहेत. देशात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ झाला आणि बघता बघता अफवांचा बाजार भरला. ही लस सुरक्षित व कार्यक्षम असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे. जगभरातील देश आपल्याकडे लसीची मागणी करत असताना आपलेच लोक याविषयी शंका उपस्थित करत आहेत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. २० तारखेपर्यंत सुमारे चार लाख आरोग्यसेवकांनी लसीकरण करून घेतले. त्यापैकी सुमारे ५८० जणांना काही प्रमाणात त्रास झाला. ही संख्या तशी नगण्य आहे तरीही लोकांच्या मनात लसीकरणाबाबत शंका आहे. या संदर्भात योग्य ती माहिती देऊन केंद्र व राज्य सरकारांनी लोकांच्या मनातील शंकेचे निरसन केले पाहिजे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्यसेवक लसीकरणासाठी गेले नाहीत.

म्हणून पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्र व राज्यांचे मंत्री, राज्यपाल यांनी सर्वप्रथम लसीकरण करून घ्यायला हवे होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष, ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी सर्वप्रथम लस घेऊन लसीकरणास प्रारंभ केला होता. परंतु भारतात ‘तुम लडो, हम कपडे संभालते है’ असे नेत्यांचे वागणे लोकांच्या मनात अविश्वास निर्माण करणारे ठरले. आता लसीकरणाच्या दुस-या टप्प्यात पंतप्रधान मोदींसह ५० वर्षांवरील सर्वच मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी लस टोचून घेणार आहेत म्हणे! लसीकरणासंबंधीच्या गदारोळात एक वेदनादायक वृत्त आले ते पुणेस्थित ‘सीरम’ संस्थेत लागलेल्या आगीचे. कोरोना लसनिर्मिती सुरू असलेल्या सीरम संस्थेत गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. त्यात पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. नऊ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. या आगीमुळे कोव्हिशील्ड लसनिर्मितीवर परिणाम होणार नसल्याचे सीरम संस्थेने स्पष्ट केले आहे.

सीरम संस्थेने मृतांच्या कुटुंबियांना २५ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारने या आगीची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सीरम संस्थेत आग लागली की लावली? अशी शंका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनीही आगीबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. सुमारे शंभर एकर जागेवर सीरम संस्था उभी आहे. ज्या इमारतीला आग लागली तेथे लसनिर्र्मितीचे काम होत नव्हते ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. तिस-या मजल्यावर लागलेली आग पाचव्या मजल्यापर्यंत पसरली होती. अग्निशमन दलाच्या १०-१५ गाड्यांनी सुमारे २-३ तासांत ही आग नियंत्रणात आणली. आता अनेक शंका-कुशंकांना पेव फुटेल. ते मात्र नियंत्रणात आणणे कठीण जाईल. तिस-या मजल्यावर वेल्डिंगचे काम सुरू होते. त्यातील ठिणग्यांमुळे आग लागल्याचे बोलले जाते. बहुतेक शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असाही अंदाज आहे. चौकशीअंती काय ते स्पष्ट होईलच. सध्या तरी सीरम संस्थेला अग्निपरीक्षा द्यावी लागतेय. अशा कठीण प्रसंगी राष्ट्रीय संपत्तीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकीचे बळ उभे करायला हवे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या