24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeसंपादकीयसंकटाचे ‘गुलाबी चक्र’!

संकटाचे ‘गुलाबी चक्र’!

एकमत ऑनलाईन

एकदा एक संकट कोसळले की त्याची मालिकाच सुरू होते. निसर्गाचा हा विचित्र योगायोग म्हणावा लागेल. अर्थात याला माणसाचे ‘कर्तृत्व’ही कारणीभूत आहे याची जाणीव माणसाला नसते. उलट निसर्गचक्रच बदलले आहे, असा निसर्गावरच ठपका ठेवून तो मोकळा होतो. असे का होत आहे याचा शांत मनाने तो विचारच करीत नाही. परिणामी त्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतात. आता गुलाब चक्री वादळ बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहे. त्यामुळे राज्याला ३-४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याआधी निसर्ग, तौक्ते आणि यास या चक्री वादळांचा फटका आपण सहन केला आहे. आता गुलाब चक्री वादळाचा धोका निर्माण झाला आहे. निसर्ग आणि तौक्ते चक्री वादळाने पश्चिम किनारपट्टीचे नुकसान केले होते. यास चक्री वादळाने पूर्व किनारपट्टीला झोडपून काढले.

आता गुलाब चक्री वादळ बंगालच्या उपसागरात दाखल झाल्याने पूर्व किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश व ओडिशा राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असल्याने राज्याला ३-४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. यासंबंधीचा इशारा हवामान विभागाचे उपमहासंचालक होसाळीकर यांनी दिला. गुलाब चक्री वादळाचा जोर वाढण्याची शक्यता असली तरी सोमवारनंतर वादळाचा धोका कमी होण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. चक्री वादळाचा धोका लक्षात घेऊन अनेक ठिकाणी यलो आणि काही ठिकाणी ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला होता. बंगालच्या उपसागरातील गुलाब चक्री वादळ ओडिशा व आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे आगेकूच करीत असल्याने वादळापूर्वी आंध्र प्रदेश व ओडिशात पावसाला सुरुवात झाली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात २८ सप्टेंबर रोजी पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे.

विदर्भापासून कोकणपर्यंत सर्वच भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे ‘गुलाब’ चक्री वादळात रूपांतर झाल्याने २८ सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. अमेरिकेतील ‘बायो-सायन्स’ नावाची एक संशोधन पत्रिका दर महिन्याला प्रसिद्ध होते. या पत्रिकेत जगभर सुरू असलेल्या जीवशास्त्रविषयक अभ्यासाची व संशोधनाची माहिती असते तसेच या संशोधनावर विविध शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेली मतेही प्रसिद्ध होत असतात. त्यानुसार सध्या जगात होत असणारे टोकाचे ऋतुबदल हे पृथ्वीवरील निसर्ग-संसाधनांच्या अतिरिक्त शोषणामुळे घडत असून त्यामुळे आता पृथ्वीवर आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

पृथ्वीवरील संसाधनांचा हा -हास थांबविण्यात जगातील सर्व देशांची सरकारे अपयशी ठरली आहेत. २०१९ पासून जगात तीव्र उष्मावाढ, प्रदीर्घ अवर्षणकाळ, अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, महापूर, जंगलात अकस्मात पेटणारे वणवे, समुद्रातील चक्री वादळे यांचे फटके यूरोप, कॅलिफोर्निया, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, दक्षिण आशिया, आग्नेय आशिया या प्रदेशांना बसत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, वनसंहार, हरितगृह-वायूंचे उत्सर्जन, पर्वतीय हिमनद्या, सागरातील हिमखंड याची कमी होत जाणारी घनता, सागरांचे व भूमीवरील जलस्रोतांचे होणारे प्रदूषण यामुळे मानवाला मोठ्या समस्यांना सामोेरे जावे लागत आहे. २०२०-२१ मध्ये कोरोनाच्या साथीमुळे जगभरात सक्तीची टाळेबंदी आणि संचारबंदी लादली गेली होती. त्यामुळे या काळात प्रदूषणाची पातळी थोडी घटली असली तरी वातावरणातील कर्बवायूच्या व मिथेनच्या उत्सर्जनाचे प्रमाण सर्वाधिक होते, असेही शास्त्रज्ञांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. २०१९ मध्ये जगातल्या सर्व सागरांच्या जलाचे तापमानही वाढले नि सागरी पाण्याची पातळीही वाढली.

त्यामुळे जगभरात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, नद्यांना पूर येणे, ग्रामीण आणि शहरी भागांत कमरेपर्यंत पाणी साचणे अशा घटना घडल्या. भारतात ढगफुटी व अतिवृष्टीमुळे मुंबई, रत्नागिरी, खेड, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद आदी शहरांत महापुराची स्थिती निर्माण झाली. अलीकडे वाढते प्रखर उष्णतामान अनपेक्षित आणि धक्कादायक असले तरी तो मानवनिर्मित हवामान बदलाचाच एक भाग आहे. या हवामान बदलाला त्या राष्ट्रातील ‘विकासा’ची प्रक्रियाच कारणीभूत आहे. ऋतुबदलाच्या दुष्परिणामांमुळे आज जगात आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. ही आपत्ती टाळण्यासाठी खनिज इंधनाचा वापर पूर्णपणे बंद करणे, जमीन-पाणी-हवा यांचे प्रदूषण करणा-या गोष्टी नाकारणे, नैसर्गिक परिसंस्थांचे संरक्षण-संवर्धन सातत्याने करणे, सर्व देशांनी वनस्पतिजन्य आहारास प्राधान्य देणे, चैनीच्या अनावश्यक वस्तूंचे उत्पादन, अतिरिक्त शहरीकरण व काँक्रिटीकरण आदी -हासकारी विकास-प्रक्रिया नाकाराव्या लागतील शिवाय लोकसंख्या नियंत्रणही ठेवावे लागेल.

असो. गुलाबी चक्री वादळाचा मराठवाड्याला जोरदार तडाखा बसला आहे. लातूर जिल्ह्यात गत काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असून पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य भागांत अतिवृष्टी झाल्याने जलप्रकल्पही तुडुंब भरले आहेत. अतिवृष्टी व नदीचे पाणी नदीकाठच्या शेतात घुसले. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. काही जणांच्या जमिनी पिकांसह वाहून गेल्या. काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. खरीप पीक तर हातचे गेले आहे. आता किमान रबीची पेरणी तरी करता यावी, अशी शेतक-याला आशा आहे. शासन निकषानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान आणि ६५ मि.मी. पेक्षा अधिकचा पाऊस झाल्यास पंचनामे करण्याची गरज नाही. लातूर जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान आणि ९५ मि.मी.पेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. काही गावांत घरांची पडझडही झाली आहे. मराठवाड्यात याआधीच जोरदार पाऊस झाला होता.

त्यामुळे तलाव,सर्व प्रकल्प तुडुंब भरले होते. आताच्या पावसाने नद्या पुन्हा ओसंडून वाहात असून नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरीचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत तसेच बीड जिल्ह्यातील मांजराचे दरवाजेही पुन्हा उघडण्यात आले. परभणी जिल्ह्यात निम्न दुधना, येलदरीचे दरवाजे उघडावे लागले. गोदावरीसह कयाधू, मांजरा व मराठवाड्यातील इतर नद्या ओसंडून वाहात असल्याने नदीकाठावरील पिके पाण्याखाली गेली आहेत तसेच शेतशिवारातही पाणी थांबल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील अन्य पिके जोमात असताना पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन, कापूस, तूर ही पिके उद्ध्वस्त झाली आहेत.सोयाबीनच्या शेंगाला कोंब फुटत असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील मांजरा, सिंदफणा, मणकर्णिका, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती या नद्या दुथडी भरून वाहात आहेत. वडवणी तालुक्यातील ३७ गावांचा संपर्क तुटला आहे. माजलगाव, बीड, वडवणी, शिरूर तालुक्यांमध्ये ढगफुटीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या