27 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home संपादकीय नामांतराचे राजकारण !

नामांतराचे राजकारण !

एकमत ऑनलाईन

नावात काय आहे? या प्रश्नाला उत्तर देताना भल्या भल्यांची गाळण उडते. उत्तर आणि समाधान यांचा मेळ बसत नाही. काही जणांना वाटतं नावात काय असतं? काहीच नसतं तर काही जणांना वाटतं, नावात खूप काही असतं. नावाप्रमाणे सारं काही घडतंच असं नाही. नाव ठेवण्यामागे चांगली भावना, विचार असतो. मात्र नामांतरामुळे फार मोठा बदल होतोच असं नाही. दोन-तीन दशकांपूर्वी नामांतराचा वाद खूपच गाजला होता. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावरून मतभिन्न प्रवाह वाहिले होते. समाज जीवनात खळबळ माजली होती. नामांतरानंतर सारे कसे शांत शांत झाले हेही खरे. आता पुन्हा एकदा काही शहरांच्या नामांतरावरून वाद माजला आहे. नामांतराच्या भट्टीवर काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नांत आहेत. पक्षा-पक्षात भांडण लावून देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

काही जण नामांतराला धर्मकारण जोडू पाहताहेत. समन्वयातून एखादा तिढा सोडवावा, असे कोणालाच वाटत नाही असे दिसते. सामोपचारातून एखादा प्रश्न सुटू शकतो परंतु त्यासाठी तुमच्याकडे संयम असायला हवा. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव, असे नामांतर करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे, त्याला काँग्रेसचा प्रखर विरोध आहे. मुळात असे नामांतर व्हावे, अशी भाजपचीही इच्छा आहे. पण राज्यात भाजपची सत्ता होती तेव्हा त्यांनी त्याबाबत काहीच केले नाही. आता या प्रश्नावर शिवसेना आणि काँगे्रसमध्ये आग भडकणार असे दिसताच तेल ओतण्यासाठी भाजप सरसावली आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत सत्ता काबीज करण्याचे भाजपचे उद्दिष्ट असून त्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. औरंगाबादच्या नामांतरावरून वाद सुरू झाल्याचे पाहून शिवसेनेने आता नामांतर करावे आणि आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

राज्यात भाजप पाच वर्षे शिवसेनेसह सत्तेत होती तेव्हा त्यांना नामकरण करण्यापासून कोण रोखले होते हा प्रश्न उपस्थित होतो. बाळासाहेब ठाकरे यांची याबाबतची मागणी नाकारून शिवसेनेला या नामांतराचे श्रेय मिळू नये या शुद्र हेतूने तेव्हा नामांतर केले गेले नव्हते हे स्पष्ट आहे. महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रम पत्रिकेवर हा विषय नसूनही येत्या महापालिका निवडणुकीत हा मुद्दा वापरण्यासाठी शिवसेनेने हा विषय रेटला आहे यात शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेस या विषयावर मूग गिळून गप्प आहे, तेव्हा हा मुद्दा एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यासाठी वापरला जात आहे यात शंका नाही. औरंगाबादच्या नामांतरावरून महाविकास आघाडीत मतभेद असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती देताना मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटरवरून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर झाल्याने राजकीय गोंधळ सुरू झाला. त्यानंतर ७ जानेवारी रोजी पुन्हा मुख्यमंत्री ट्विटरवरून संभाजीनगर असा उल्लेख झाल्याने शिवसेनेचा मानस स्पष्ट झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य काँग्रेस नेत्यांनी औरंगाबादचे नामांतर करण्यास विरोध केला आहे, असे असताना शासकीय निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा कसा काय होऊ शकतो? ट्वीट करताना संबंधित व्यक्तीकडून गफलत झाल्याचे स्पष्टीकरण मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले.

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश; आम्हीच नंबर वन असल्याचा भाजपाचा दावा

ट्वीट करताना काही चूक झाली का याची माहिती घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पण ही चूक चुकून झाली की जाणीवपूर्वक करण्यात आली यावरून राजकीय गोंधळ सुरू झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना ‘धाराशिव’ उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली. काँग्रेसने या आधीच शहरांच्या नामांतराला विरोध केला आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव या नामकरणावर ठामच असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अशा प्रकारे शहरांच्या नामांतराला काँग्रेसचा विरोध असल्याचे स्पष्ट केले होते. छत्रपती संभाजी महाराज हे आमचेही आराध्य दैवतच आहेत पण नामांतराने कोणत्याही शहरांचे प्रश्न सुटतात का? सामान्य माणसाच्या, गरिबांच्या समस्या सुटतात का? असा सवाल केला होता. बाळासाहेब थोरात तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा प्रकारचे विषय हे आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीतच सोडविण्यात येतील, असे स्पष्ट केले होते.

औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. मित्रपक्षांना विश्वासात घेऊनच नामांतराचा निर्णय घेण्यात येईल, असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर चांगले काम करीत आहे. त्यामुळे उगीच वातावरण खराब करण्याची गरज नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिन्ही पक्ष किमान समान कार्यक्रमावर एकत्र आले आहेत. त्यानुसार त्यांनी काम केले पाहिजे. एकीमध्ये बेकी होणार नाही याची काळजी तिन्ही पक्षांना घ्यावी लागेल. काही राज्यांमध्ये शहरांची नावे बदलण्यात आली परंतु त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या जीवनात काहीच फरक पडला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. नामांतरावरून आघाडीमध्ये ऐक्य नसल्याने भाजपने जोरदार टीका सुरू केली आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेसला चिमटा काढताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, औरंगजेब प्रिय असणा-यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! यावरून शिवसेनेवर निशाणा साधताना भाजप नेते आशीष शेलार यांनी म्हटले आहे की, शिवसेना सत्तेसाठी लाचारी करीत आहे. ही पापं कुठं फेडाल, असा सवालही त्यांनी केला आहे.

स्वत:च्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा उद्धट भाषा आणि आता संभाजीनगरचा राज्याच्या अस्मितेचा विषय येताच काँग्रेसला ‘कोपरापासून साष्टांग दंडवत’! नामांतराच्या मुद्यावरून काही मंडळी शिळ्या कढीला ऊत आणून स्वत:चा स्वार्थ साधू पहात आहेत. गत पाच वर्षे सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करीत आहेत हा ढोंगीपणा नव्हे काय?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या