28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeसंपादकीयपंतप्रधानांची पंचसूत्री !

पंतप्रधानांची पंचसूत्री !

एकमत ऑनलाईन

यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असल्याने देशात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह चरमसीमेवर असणे व स्वातंत्र्यदिन दणक्यात साजरा होणे साहजिकच! मोदी सरकारने त्यात मोठा पुढाकार घेतल्याने तो तसा दणक्यात व जल्लोषात साजरा झाला. ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा करून व त्याची व्यापक अंमलबजावणी होईल याची दक्षता घेऊन सरकारने स्वातंत्र्यदिन दणक्यात साजरा होईल याची तजवीज केलेलीच होती. हाच जल्लोष व उत्साह लाल किल्ल्याच्या यावेळच्या वेगळ्या व भव्यदिव्य सजावटीतही पहायला मिळाला. ‘इव्हेंट मॅनेजमेंट’मध्ये मोदी सरकारचा हात सध्या तरी कुणी धरू शकत नाही, हेच या निमित्ताने पुन्हा एकवार सिद्ध झाले. असो! मात्र, देशाला खरी उत्सुकता असते ती स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान देशवासियांना काय संदेश देतात याची. त्या अनुषंगाने पंतप्रधान मोदी यांचे ८२ मिनिटांचे विक्रमी भाषण हे पुन्हा एकवार सोनेरी स्वप्नांची साखरपेरणी करणारेच होते. मोदी यांचे पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून झालेले हे नववे भाषण! त्यामुळे त्यात काही मुद्दे पुन्हा येणे अपरिहार्यच! त्यानुसार मोदी यांच्या भाषणात घराणेशाही व भ्रष्टाचाराचे मुद्दे आले. पंतप्रधान झाल्यापासून मोदी या दोन मुद्यांवर विशेष भर देऊन बोलत आहेत पण प्रत्यक्षात त्याबाबतची देशातील स्थिती थोडीफार तरी बदलली आहे का? या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर स्वत: पंतप्रधानांनीच शोधायला हवे.

प्रत्यक्षात भाजपच्या ‘वॉशिंग मशिन’ने त्यांच्याकडे येणा-या अनेकांची पापे धुऊन त्यांना पवित्र करून घेतल्याचे चित्र देशात पहायला मिळते. आणि राजकारणातील अनेक मातब्बर घराणी भाजपमध्ये सहभागी झाल्याची व होत असल्याची दिसतात. मग पंतप्रधानांची या दोन मुद्यांवर प्रामाणिक तळमळ असूनही ते आपल्याच पक्षात होणारे हे प्रकार का रोखू शकत नाहीत? हाच खरा प्रश्न! पंतप्रधान व त्यांच्या पक्षाची मातृसंस्था रा.स्व. संघ साधनशुचिता व स्वच्छ, पारदर्शी कारभाराचा डांगोरा पिटत असतानाही देशात विविध राज्यांतील विरोधी पक्षांची सरकारे पाडताना वा अस्थिर करताना भाजपला साधनशुचितेचा विसर का पडतो? पक्षाला हा विसर पडताना तो दिसूनही पंतप्रधान व रा. स्व. संघ तो दुरुस्त करण्याऐवजी सोयीस्कर मौन का बाळगतात? या प्रश्नांची उत्तरे देशातील जनतेला मिळायला हवीत. मात्र, वर्तमानातील बोचरे व अडचणीचे प्रश्न व त्या प्रश्नांना द्यावी लागणारी उत्तरे टाळण्याचा सर्वांत सोयीस्कर व सोपा मार्ग म्हणजे भविष्याच्या सोनेरी स्वप्नांची पेरणी! पंतप्रधान मोदी ही पेरणी मागच्या ८ वर्षांपासून करीत आहेतच. आता नवव्या वर्षी त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करताना देश विकसनशील या वर्गवारीतून विकसित या वर्गात गेलेला असेल, असा आशावाद व्यक्त केला. याबद्दल आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. आपला देश व देशाचे नागरिक म्हणून आपण विकसित झालो तर ते कोणाला आवडणार नाही? त्यामुळे पंतप्रधानांच्या या आशावादाचे स्वागतच! तसं स्वातंत्र्यदिन सोहळ्यास उपस्थित असणा-यांनी टाळ्यांच्या कडकडाटात पंतप्रधानांनी दाखविलेल्या स्वप्नाचे स्वागत केलेच आहे. मात्र, हे स्वागत होत असताना पंतप्रधानांनी काही वर्षांपूर्वी जे लक्ष्य प्राप्त करण्याच्या घोषणा केल्या होत्या त्याचा लेखाजोखा त्यांनी देशासमोर मांडला असता तर फार बरे झाले असते.

उदाहरणार्थ २०२२ हे वर्ष देशातील शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या लक्ष्यपूर्तीचे वर्ष. हे लक्ष्य कितपत पूर्ण झाले हे पंतप्रधानांनी देशवासियांना सांगायला हवे होते. मात्र, अशा मागे दाखविलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेचा हिशेब देण्यासाठी पंतप्रधानांकडे बहुधा वेळच नसावा कारण ते सतत देशाच्या सोनेरी भविष्याचा विचार करण्यात व त्यात आणखी काय भर घालता येईल याच्याच योजनांमध्ये व्यग्र असतात! हे लक्षात घेता आपण त्यांनी मागच्या लक्ष्यांच्या पूर्ततेचा लेखाजोखा न मांडणे हे समजून घेऊ! मात्र, देशाच्या शताब्दीच्या स्वातंत्र्य वर्षात जे लक्ष्य प्राप्त करण्याचे पंतप्रधानांनी स्वप्न बाळगले आहे व देशाला दाखविले आहे त्यात रंगून जाण्यापूर्वी सध्याच्या वास्तव स्थितीची योग्य जाणीव असणे आवश्यक! कारण अशी जाणीव नसेल तर लक्ष्यपूर्ती हे केवळ स्वप्नरंजन ठरण्याची शक्यता जास्त! विकसित राष्ट्र या गटात जाण्याचे लक्ष्य ठेवताना सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असतो तो अर्थकारण! देशाच्या अर्थव्यवस्थेची आजची स्थिती काय? याचे प्रामाणिक विश्लेषण केले व ते मनापासून स्वीकारले तरच लक्ष्यपूर्तीच्या मार्गातील अडथळ्यांवर मात करता येईल, उणीवा दूर करता येतील. तरच त्यावेळी भारताच्या स्थानामध्ये सुधारणा होईल. पंतप्रधानांनीच मागे भारतीय अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सची करण्याची घोषणा केली आहे.

त्यांची ही घोषणा अगदी मुदतीत पूर्ण झाली तरीही देशाची वाढती लोकसंख्या व अर्थव्यवस्थेचा आकार हे समीकरण लक्षात घेतले तर त्यावेळीही भारत मध्यमवर्गीय गटातच गणला जाईल. याचाच अर्थ पंतप्रधानांनी जी अर्थगती ठरवली आहे ती त्यांच्याच लक्ष्यपूर्तीसाठी पुरेशी ठरणारी नाही तर ती कैकपटीने वाढवावी लागेल. त्यासाठी सरकार काय भरीव नियोजन करणार याचा रोडमॅप सरकारने देशाला सांगायला हवा. तो काही मोदींनी ८२ मिनिटांच्या विक्रमी भाषणात देशवासीयांना सांगितला नाही. विकसिततेच्या वाटेवरचे आणखी काही महत्त्वाचे टप्पे म्हणजे शिक्षण व आरोग्य! या दोन्ही बाबतीत देश कुठे आहे हे स्पष्टच झाले आहे. शिक्षणासाठी परदेशात जाणा-या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण दरवर्षी वाढतच चालले आहे व ते आपल्याच आकडेवारीतून सरकारने मान्य केले आहे. आरोग्य व्यवस्था कशी आणि कुठे आहे, हे कोरोना संकटाने देशाला लख्खपणे दाखवून दिले आहे. मात्र, देशाला विकसित गटात समाविष्ट करण्याचे लक्ष्य बाळगताना प्रत्यक्षात मोदी सरकार त्यातले शिक्षण व आरोग्य हे दोन महत्त्वाचे टप्पे गाठण्यासाठी कितपत निधी खर्च करते, हे अर्थसंकल्पात दिसून आलेच आहे.

आरोग्य व शिक्षणासाठीची आपली तरतूद ही विकसित राष्ट्रांच्या तुलनेत निव्वळ नगण्य अशीच! त्यात काय सुधारणा करणार हे मोदी यांनी देशवासियांना सांगायला हवे. असे कुठले बदल सरकार प्रत्यक्षात करणार नसेल तर विकसित राष्ट्राचे लक्ष्य हे आणखी एक स्वप्नरंजनच ठरणार नाही का? यावरचा उपाय म्हणून पंतप्रधानांनी आपल्या याच भाषणात स्वत:सह देशातील प्रत्येक नागरिकासाठी पंचसूत्री मांडली. त्याचे स्वागतच! प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे भान ठेवणे व त्याचे पालन करणे आवश्यकच! त्याला आक्षेप वा विरोध असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना पंतप्रधानांना देशाला पंचसूत्री सांगून त्याच्या पालनाचे आवाहन करावे लागते हा अंतर्विरोधच नाही का? हाच अंतर्विरोध आपल्या देशात ठासून भरलेला असल्यानेच आजही महिलांना सन्मानाने वागवा हे ओरडून सांगावे लागते, जाती-धर्माच्या नावावरची विभागणी टाळा, भ्रष्टाचाराला विरोध करा अशा ‘बेसिक’बाबी सांगाव्या लागतात. हे भेदाभेद, भ्रष्टाचार, विभागणी याची जननी कोण? हे देशाला माहिती आहे. पंतप्रधानांनाही ते ज्ञात असेलच. या रोगावर समूळ उपचारासाठी सरकार म्हणून त्यांनीच पुढाकार घ्यायला हवा. तसा तो ते घेणार का? हा खरा प्रश्न!

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या