22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeसंपादकीयतिस-या लाटेचा धसका!

तिस-या लाटेचा धसका!

एकमत ऑनलाईन

दीड वर्षापासून देश कोरोना विषाणूशी झुंजतोय. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तीव्रतेने आली. या लाटेने आरोग्य यंत्रणाच उद्ध्वस्त करून टाकली. राज्या-राज्यात हाहाकार माजला. यातून सावरण्याचा राज्ये प्रयत्न करू लागली. कुठे ऑक्सिजनची कमतरता, कुठे इंजेक्शन तर कुठे आरोग्य कर्मचा-यांची कमतरता. या लाटेला थोपवण्यासाठी टप्प्याटप्प्याने लसीकरण सुरू झाले परंतु लसपुरवठ्यातही गोंधळ.. एक ना धड भाराभर चिंध्या! केंद्र आणि राज्या-राज्यात ताळमेळ नाही. त्यामुळे जगभरात भारताची छी..थू! हे सारे कधी थांबणार ते दयाघनालाही सांगता येणे कठीण. दुस-या लाटेशी सामना करत असतानाच आता तिसरी लाटही अटळ असल्याचे सांगितले जात आहे. दुसरी लाट रोखण्यासाठी कडक निर्बंध घाला अशा सूचना उच्च न्यायालय देत आहे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत कठोर निर्बंध घातल्याने हा विषाणू आटोक्यात येत आहे.

राज्यातील मुंबई-पुण्यासह काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केल्याने तो आटोक्यात येत आहे. त्यामुळे हाच पॅटर्न करण्यात यावा अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. मुळात या विषाणूला रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याने त्यांना कानपिचक्या देण्यासाठी न्यायालयाला पुढाकार घ्यावा लागला. मुंबईसह राज्यातील रुग्णालयांत खाटांची कमी, रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनचा अपुरा साठा आदी समस्यांवर बोट ठेवत काहींनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्याची न्यायालयाने दखल घेतली. न्यायालयाने पुणे शहराबरोबर राज्यातील अन्य शहरांतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर चिंता व्यक्त केली. मुंबईसारख्या शहरात कोरोना आटोक्यात आणण्यात महापालिकेने ब-यापैकी यश मिळवले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पॅटर्नचे कौतुक केले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे यांनी यशस्वी मॉडेलपासून प्रेरणा घेत समान कार्यक्रम राबवावा असा सल्ला खंडपीठाने दिला आहे. त्यामुळेच की काय आता लातूर जिल्ह्यातही कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

दुस-या लाटेची ही कथा असताना कोरोनाची तिसरी लाट अटळ असून त्यासाठी आपण सतत खबरदारी घेतली पाहिजे असे केंद्राचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी म्हटले आहे. कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे कारण विषाणू अजून ब-याच प्रमाणात फिरत आहे. पण ही लाट केव्हा येईल., तिचे स्वरूप काय राहील हे सांगणे कठीण आहे. सध्याच्या कोरोना विषाणू प्रकारावर आताच्या लसी परिणामकारक आहेत पण अजूनही कोरोनाचे नवे विषाणू येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे राघवन म्हणाले. जगभरात नवीन विषाणू प्रकार येतील तसे भारतातही ते येतील, त्यामुळे संक्रमणही वाढेल. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांत ढिलाई करून चालणार नाही. सध्याची कोरोनाची लाट गंभीर असून तिचे भाकित कोणालाही करता आले नव्हते. कोरोना प्राण्यातून माणसात पसरत नाही तर माणसातून माणसात पसरतो. कोरोनाची तिसरी लाट अधिक हानीकारक असेल असा इशारा त्यांनी दिला आहे. या कोरोना लाटेस सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी करा अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिल्या आहेत.

देशात दैनंदिन रुग्णसंख्या आणि कोरोनाबळींच्या संख्येत वाढच होत चालली आहे. गत २४ तासांत सुमारे ४ लाख १२ हजार रुग्ण आढळले तर सुमारे ४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण रुग्णसंख्या सुमारे दोन कोटी १० लाख ७७ हजार तर मृतांची संख्या सुमारे २ लाख ३० हजार झाली आहे. तिस-या लाटेबाबत चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, या लाटेत लहान मुले आजारी पडली तर पालकांनी काय करायचे? तिस-या लाटेसाठी ऑक्सिजन, औषधे, लस अशा सर्वच तयारीची गरज असून लहान मुलांचाही लसीकरण मोहिमेत समावेश करण्याचा सल्लाही न्यायालयाने दिला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्येक जिल्ह्यात बेडची संख्या वाढवा, कुशल मनुष्यबळ, डॉक्टर्स, औषधे, ऑक्सिजन याबाबत स्वयंपूर्ण व्हा अशा सूचना जिल्हाधिका-यांना दिल्या आहेत. दुस-या लाटेबाबत आरोग्यसेवेत जो ढिसाळपणा झाला तसा तिस-या लाटेदरम्यान होऊ नये याची खबरदारी राज्य शासन घेत आहे असे दिसते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुरुवारी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत देशातील कोरोना महामारीचा राज्य आणि जिल्हानिहाय स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यांनी आरोग्य यंत्रणांच्या बळकटीसाठी राज्यांना मदत व मार्गदर्शन करण्याची आणि लसीकरणाचा वेग कायम ठेवण्यासाठी राज्यांनी संवेदनशीलतेने काम करण्याची गरज व्यक्त केली. सध्या राज्यात लसीअभावी खासगी लसीकरण केंद्रे बंद आहेत. त्या अनुषंगाने लस पुरवठ्याबाबत पंतप्रधानांनीसुद्धा संवेदनशील राहण्याची गरज आहे. लसपुरवठा व्यवस्थित झाला तर राज्यांना लसीकरणाचा वेग कायम ठेवणे शक्य होईल. भारतातील कोरोना विषाणू संक्रमणाची स्थिती सध्या अतिशय गंभीर आहे. त्याबाबत जगभर चिंता व्यक्त केली जात आहे. पोप फ्रान्सिस यांनी भारतीयांबद्दल प्रार्थना केली आहे. भारतामध्ये दुस-या लाटेमुळे जी भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे ती संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा आहे असा इशारा युनिसेफने दिला आहे.

या कठीण परिस्थितीत जगाने भारताची मदत करण्याची गरज आहे असेही युनिसेफने म्हटले आहे. या संस्थेतर्फे भारताला २० लाख फेसशील्ड आणि दोन लाख मास्कसह जीवनावश्यक उपकरणे पाठवली आहेत. भारतातील कोरोनाविरुद्ध लढ्याला बळ देण्याची गरज आहे असेही युनिसेफने म्हटले आहे. अमेरिकेतील सुमारे ४० कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी जागतिक कृति दल स्थापन केले आहे. त्यांच्यातर्फे भारताला एक हजार व्हेंटिलेटर्स आणि २५ हजार ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स पाठवले जाणार आहेत. सा-या जगासह भारतानेही संभाव्य तिस-या लाटेचा धसका घेतला आहे. कोरोनाची भारतातील सद्यस्थिती पाहता सर्व काही पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहण्यात अर्थ नाही. देशातील सद्यस्थिती हाताळण्यासाठी व्यवस्थापनाचे नेतृत्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे द्यावे असे मत खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले आहे.

उद्या शहरातील दोन केंद्रावर लसीकरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या