18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeसंपादकीय...झाले मोकळे आकाश!

…झाले मोकळे आकाश!

एकमत ऑनलाईन

संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोना विषाणूने प्रत्येक नागरिकाला हादरवून टाकले. चीनच्या वुहान प्रांतात जन्माला आलेला हा विषाणू प्राण्यापासून माणसाच्या शरीरात घुसला. माणसाचा माणसाशी साधा संपर्क झाला अथवा सहवास आला तरी या रोगाचा झपाट्याने प्रसार होऊ लागला. त्यामुळे माणसाला माणसाचीच भीती वाटू लागली. या रोगाची लागण होऊ नये म्हणून प्रत्येकजण विशिष्ट काळजी घेऊ लागला. लोकांचा एकमेकांशी संपर्क होऊ नये म्हणून प्रत्येक देशाने संचारबंदी केली, वर्षभर लॉकडाऊन केले. माणसे घरात बंदिस्त झाली. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना लॉकडाऊन, संचारबंदी, विलगीकरण, सॅनिटायझर, मास्क या शब्दांची ओळख झाली. माणसाचे जगणेच विस्कळीत झाले. मुलांची शाळा-महाविद्यालये बंद झाली, देवालये कुलूपबंद झाली. जगातील सुमारे १६० कोटी विद्यार्थ्यांवर कोरोना संकटाचा परिणाम झाला. भारतात सुमारे ३२ कोटी विद्यार्थ्यांवर कोरोनाचा परिणाम झाल्याचा अंदाज आहे. प्राथमिक शाळा बंद झाल्यामुळे मुलांच्या बाराखडीवर परिणाम झाला. शिक्षणाची सुरुवातच बाराखडीपासून होते मग साधी बेरीज-वजाबाकी तर दूरच. देशात गत वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे प्राथमिक शाळा बंद झाल्या. ऑफलाईन शिक्षणाला पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले.

श्रीमंतांची मुलं ऑनलाईन शिक्षणात रुळली पण गरिबांच्या मुलांसमोर अनंत अडचणी निर्माण झाल्या. लॅपटॉप, स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी मागे राहिले. सुमारे दीड वर्षापासून या मुलांना ऑफलाईन किंवा ऑनलाईन शिक्षण मिळालेले नाही. गरीब कुटुंबातील, कमी उत्पन्न गटातील मुलांवर शाळा बंद असल्याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट आली. आता दुसरी लाट ओसरू लागल्याने सरकारने हो-ना करत आठवी ते दहावीपर्यंतची शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. महाविद्यालयेही सुरू होत आहेत. हळूहळू सारे व्यवहार सुरू झाले आहेत. गत दीड वर्षात मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांना कोविड संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचे आढळून आले आहे. शिक्षण बंद झाल्याने आधीच किमान दोन पिढ्या बरबाद झाल्या आहेत. आता शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ‘झाले मोकळे आकाश’ असे म्हणता येईल. मुलांच्या लसीकरणाबाबत वेगवेगळी मते व्यक्त केली जात होती. परंतु आता मुलांचे लसीकरणही लवकरच केले जाणार आहे.

देशातील २ ते १८ वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा मार्ग लवकरच मोकळा होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या वयोगटासाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा आपत्कालीन वापर करण्यास परवानगी देण्याची शिफारस तज्ज्ञ समितीने औषध महानियंत्रकांकडे केली आहे. कोव्हॅक्सिन लसीच्या चाचण्या देशभरात करण्यात आल्या होत्या. औषध महानियंत्रकांनी या लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली असली तरी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या लसीच्या वापरास मान्यता दिली नसल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे या लसीच्या वापरासंदर्भात संभ्रमाचे वातावरण आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट अद्याप ओसरली नसल्याने कोरोना नियंत्रणात आल्यानंतर भाजपने मंदिरे उघडण्यासाठी राज्य सरकारच्या निषेधार्थ घंटानाद आंदोलन केले होते. राज्य सरकारने घटस्थापनेपासून राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी मंदिरांसह सर्वच प्रार्थनास्थळे खुली झाली. आता भाजप आणि सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे दिसते. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर राज्य सरकारने नियमात शिथिलता आणत अनेक व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली होती.

भाजपने मंदिरे उघडण्यासाठी राज्यभर आंदोलने केली होती. त्याला मनसेची साथ मिळाली होती. आपल्या आंदोलनामुळे राज्य सरकारला मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा लागला असा भाजपचा दावा आहे. भाजपनेते जिल्हा परिषद निवडणुकांत रंगले असताना राज्य सरकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय जाहीर करून कुरघोडी केली असे म्हटले जात आहे. कोरोनाची देशातील स्थिती एका विशिष्ट टप्प्यावर स्थिर आहे. अजूनही देशात दररोज संसर्गाचे २० हजार नवे रुग्ण आढळत असल्याने चिंता कायम आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. योग्य ती खबरदारी न घेतल्यास सणासुदीत व लग्नसराईच्या काळात कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे लोकांनी ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यांमध्ये विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांनी केले आहे. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, अनावश्यक प्रवास टाळावा आणि घरातूनच डिजिटल माध्यमाद्वारे सण-उत्सव साजरे करावेत तसेच खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

म्हणजे प्रार्थनास्थळांना अजून तरी मोकळा श्वास घेता येणार नाही! कोरोना महामारीने चित्रपट क्षेत्राला तसेच नाट्यभूमीला जोरदार तडाखा दिला होता. या दोन्ही क्षेत्रात भयाण शांतता होती. या क्षेत्रातील अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. राज्य सरकारने २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिल्याने या क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेतील कार्यक्रमांनाही नियंत्रित स्वरूपात सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नियम शिथिल केले असले तरी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. नाट्यगृहांमध्ये आसन क्षमता ५० टक्केच राहणार आहे. कोरोनाची तीव्रता कमी होत असल्याने केंद्र सरकारने १८ ऑक्टोबरपासून देशांतर्गत विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मुभा दिली आहे. यंदा जुलै महिन्यात प्रवासी विमान वाहतूक काही प्रमाणात सुरू करण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू मर्यादा वाढवत ती १८ सप्टेंबरपासून ८५ टक्क्यांपर्यंत नेण्यात आली. आता १०० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परदेशी पर्यटकांना देशात प्रवेशाची परवानगीही देण्यात आली आहे. चार्टर्ड विमानाने प्रवास करणा-यांना १५ ऑक्टोबरपासून आणि नियमित विमानांनी प्रवास करणा-यांना १५ नोव्हेंबरपासून पर्यटक व्हिसा देण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच आकाश मोकळे होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या