23.1 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home संपादकीय जिद्द आणि संयमाची परीक्षाच!

जिद्द आणि संयमाची परीक्षाच!

एकमत ऑनलाईन

२०२१ साल उजाडताना आपल्यासोबत कोरोना महामारीवर लस प्राप्त झाल्याचे शुभ वर्तमान घेऊन आल्याने मानवजातीने सुस्कारा सोडला! अर्थात हे लसीकरण सोपे काम नाहीच. त्यासाठी मानवजातीला आणखी एक मोठी लढाई व तीही दीर्घकालीन लढावीच लागणार आहे. मात्र, आता दिलासा हाच की, या लढाईत मानवजातीच्या हाती लसीचे शस्त्र उपलब्ध आहे. तथापि, लढाई संपलेली नाहीच, हा संदेश ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने मानवजातीला दिलाच आहे. या इशा-याकडे गांभीर्याने न पाहण्याची किंमत सध्या ब्रिटनच्या जनतेला मोजावी लागते आहे. पुन्हा एकवार या देशात कडकडीत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे व ती फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. याचा स्पष्ट अर्थ हाच की, आताशा हळूहळू सुरळीत होत असलेले जनजीवन पुन्हा ठप्प होणार आहे. या नव्या स्ट्रेनची माहिती मिळताच जगातील इतर देशांनी व भारतानेही हा कोरोनाचा नवा अवतार आपल्या घरात घुसू नये म्हणून तातडीने प्रतिबंधात्मक उपाय करत ब्रिटनशी संपर्क तोडण्याचे पाऊल उचलले खरे मात्र, तोवर या नव्या अवताराने आपला डाव साधलाच!

भारताने ब्रिटनमधून येणाºया विमानांवर बंदी घातली असली तरी त्याअगोदरच ब्रिटनमधून जे लोक भारतात आले होते त्यांनी आपल्यासोबत हा नवा अवतार भारतात आणलाच! अर्थात कोरोनाचा हा नवा अवतार पसरणार नाही यासाठी यावेळी सरकार व प्रशासन दक्ष असल्याने पहिल्या विषाणूने जो प्रमाद देशात घडवला तो यावेळी घडणार नाही, ही तूर्त तरी आशा आहे. शिवाय हा नवा अवतार पहिल्याइतका जीवघेणा आहे की नाही? याबाबतही तज्ज्ञांचे अद्याप एकमत झालेले नाहीच. मात्र, हीच स्थिती अफवांचा बाजार पुन्हा एकवार गरम करण्यास पूरक ठरते आहे. दुर्दैवाने याबाबत ज्यांची भूमिका निर्णायक ठरते ते सरकार या रोगाच्या दहा महिन्यांच्या प्रदीर्घ अनुभवातूनही शहाणपण घेताना दिसतच नाही. कोरोना महामारीकडे युरोप व अमेरिकेच्याच चष्म्यातून पाहण्याची सरकारात बसलेल्यांची दृष्टी कायमच आहे आणि या दृष्टीतूनच निर्माण होणारे अंधानुकरणही कायम आहे. त्यातूनच तर्कसंगतीचा लवलेशही नसणारा रात्र संचारबंदीचा निर्णय जनतेवर लावून सरकार नामक यंत्रणा ‘भरून पावलो’च्या आनंदात मग्न राहते.

मात्र, त्यामुळे नव्या स्ट्रेनचे रुग्ण सापडणे टाळता येत नाहीच की, त्यांनी दिवसा केलेला या नव्या अवताराचा प्रसारही थांबत नाही, हे सरकारला समजावून सांगण्यासाठी आता प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाच देशात यावे लागेल, अशीच स्थिती आहे. असो!! सरकार नामक यंत्रणा कोरोनाच्या दहशतीतून बाहेर पडायला तयार असो की नसो पण जनतेला ही दहशत बाजूला सारून जिद्द व संयमाची कास धरत ‘जगणे वाचविणे’ भाग आहेच! देशातील जनतेला हे आता पूर्णपणे लक्षात आल्यानेच जनता सजगतेने, जिद्दीने व संयमाने कोरोनाचा सामना करत जगणे वाचविण्याची धडपड करते आहे आणि त्याला यश येत असल्याचेही चित्र आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस रोडावत चालले आहे व जनजीवन सुरळीत होत असल्याने कोमात गेलेले अर्थकारणही हळूहळू सुधारण्याच्या मार्गावर आहे. देशात लसीकरणाला लवकरच सुरुवात होण्याचे मिळालेले संकेत सर्वसामान्यांनी आपल्या हाती घेतलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ देणारेच आहेत. मात्र, अशा दिलासादायक स्थितीत एका जुन्याच संकटाने देशात नव्याने डोके वर काढत संयम व जिद्दीची लढाई संपलेली नाहीच, असा इशारा दिला आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचार्‍यांना ड्रेसकोड लागू; राज्यात पहिलेच परभणी कार्यालय

हे जुनेच पण नव्याने डोके वर काढणारे संकट म्हणजे ‘बर्ड फ्लू’! देशातील चार राज्यांमध्ये बर्ड फ्लू धडकल्याच्या बातम्या आहेत. विशेष म्हणजे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत या रोगाचा विषाणू अत्यंत वेगाने संक्रमित झाल्याने सरकार व प्रशासनाची अक्षरश: पाचावर धारण बसल्याने देशभरात ‘हाय अलर्ट’जारी करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशात एका सरोवराच्या परिसरात मोठ्या संख्येने पक्षी मृतावस्थेत आढळून आल्यानंतर बर्ड फ्लू पुन्हा भारतात दाखल झाल्याचा इशारा मिळाला. प्रशासनाने त्वरेने याबाबत हालचाल केली व संक्रमण झालेल्या भागात पक्ष्यांना मारण्याबरोबरच कोंबड्या, अंडी यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र, तरीही हा विषाणू वेगाने दक्षिणेपर्यंत पोहोचल्याचे वृत्त आहे. सध्या राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड व केरळ या राज्यांमध्ये या विषाणूने थैमान सुरू केले आहे. विशेष म्हणजे मृत पक्ष्यांमधील विषाणूंची तपासणी प्रयोगशाळेत केली जात असताना मृत कावळ्याच्या शरीरात ‘एच५एन१’हा मानवात संक्रमित होणारा व धोकादायक असणारा विषाणू आढळून आल्याने नव्या धोक्याची घंटा वाजली आहे. हा विषाणू पक्ष्यांना मृत्यू देतोच पण तो मानवासाठीही धोकादायक प्रकारात मोडणाराच आहे.

विशेषत: कोंबड्यांच्या माध्यमातून तो वेगाने संक्रमित होण्याची शक्यता असल्याने कोरोनाच्या अफवांच्या धक्क्यात कोलमडून पडल्यावर आता हळूहळू सावरत असलेल्या देशातील पोल्ट्री उद्योगावर पुन्हा संकटाची गडद छाया निर्माण झाली आहे. सुदैवाने देशातील चार-पाच राज्ये वगळता इतर राज्यांत हा विषाणू संक्रमित झाल्याचे वृत्त अद्याप नाही. मात्र, पूर्वानुभव पाहता याबाबत गाफील राहणे परवडणारे नाहीच. कारण सध्या पक्षी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्याचा काळ सुरू आहे. भारतात सर्वच राज्यांमध्ये मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झालेले आहे. हे स्थलांतरित पक्षीच या विषाणूच्या संक्रमण व प्रसाराचे मूळ आहेत. त्यामुळे इतरवेळी आपल्याला हरखून टाकणारे हे पक्षी स्थलांतर यावेळी मात्र धडकी भरवणारे ठरते आहे.

त्यामुळे वेळीच याबाबत पूर्ण दक्षता बाळगणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, स्थलांतरित पक्षी प्रामुख्याने मुक्कामी असणा-या पाणथळांच्या ठिकाणांवर कडक निगराणी ठेवणे आवश्यक आहे. सुदैवाने प्रशासन यावेळी लवकर जागे झाले आहे व कामाला लागले आहे. शिवाय या विषाणूला यशस्वीपणे कसे रोखता येते याचा पूर्वानुभवही आपल्या गाठीशी आहेच. २००६ मध्ये भारतात प्रथम या विषाणूचा प्रवेश झाल्याची नोंद नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे झाली होती. त्यावेळी गोंधळ उडाला होता व भीतीपोटी कोंबड्या मारून टाकण्याचे सत्र सुरू झाल्याने राज्यातला पोल्ट्री व्यवसाय अक्षरश: उद्ध्वस्त झाला होता. त्याची पुनरावृत्ती आता होणार नाही याची दक्षता जशी सरकार, प्रशासनाने घेतली पाहिजे तशीच सर्वसामान्यांनीही घेतली पाहिजे. समाज माध्यमांवर व्यक्त होण्याचा सोस म्हणून बिनडोकपणे फॉरवर्ड केल्या जाणाºया निराधार तर्कट व अफवांमुळे काय प्रमाद घडतात, याचे ताजे अनुभव कोरोना संकटाने आपल्या सगळ्यांना दिलेच आहेत.

निव्वळ अफवा व निराधार वृत्तांनी आणि त्यावरून केल्या जाणाºया वायफळ तर्कटांनी कोरोना काळात केवळ पोल्ट्री उद्योगाचेच नव्हे तर हॉटेलिंग, दुग्ध व्यवसाय, भाजीपाला व फळे एवढेच काय वृत्तपत्र व्यवसायालाही जबरदस्त तडाखे देत विनाकारण त्यांचे कंबरडे मोडून टाकले होते, याचे स्मरण सर्वांनी ठेवायलाच हवे. याची पुनरावृत्ती बर्ड फ्लूच्या काळात होऊ न देणे ही देशातील प्रत्येक जबाबदार नागरिकाची जबाबदारी आहे. विषाणू जशी आरोग्य यंत्रणा, प्रशासन, सरकारची परीक्षा घेतोय तशीच तो नागरिकांच्याही संयमाची व जिद्दीची परीक्षा घेतोय, हे निश्चित! आपल्या सगळ्यांना ही परीक्षा एकत्रितरीत्या पार करावीच लागेल!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,437FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या