24.4 C
Latur
Friday, February 26, 2021
Home संपादकीय संकटमोचक हरपला!

संकटमोचक हरपला!

एकमत ऑनलाईन

भारताचे तेरावे राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे ३१ ऑगस्ट रोजी निधन झाले आणि त्यांच्या निधनाने स्वातंत्र्योत्तर भारताची ‘कल्याणकारी राज्या’च्या मूल्यव्यवस्थेने जडणघडण करण्यासाठी आयुष्यभर आग्रही व प्रयत्नरत असणा-या राजकीय नेत्यांच्या पिढीतील सुवर्णपानच गळून पडले. प्रगल्भ, बुद्धिवंत व कार्यतत्पर राजकीय नेता म्हणून प्रणवदांचे नाव राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सर्वसामान्य जनतेतही कायम आदरानेच घेतले जायचे व यापुढेही ते कायम स्मरणात राहील. प्रणवदांच्या शीघ्रकोपी स्वभावाचे अनेक किस्से राजकीय वर्तुळात चर्चिले गेले असले तरी त्यात द्वेष किंवा तिरस्काराची भावना कधीच नव्हती त्यामुळे ते राजकीय क्षेत्रात ‘अजातशत्रू’च राहिले व त्यांच्या या गुणवैशिष्ट्यांमुळेच ते सदैव काँग्रेस पक्षासाठी संकटमोचकच राहिले.

पक्के काँग्रेसी असलेल्या प्रणवदांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत कुठल्याही प्रसंगात काँग्रेसवरील निष्ठा कधीच ढळली नाही. या कर्तबगार नेत्याला त्याचा हक्क असतानाही पंतप्रधानपदाने एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीन वेळा हुलकावणी दिली तरीही त्यांची काँग्रेसवरची निष्ठा कधी ढळली नाही की, त्यांनी संकटात सापडलेल्या पक्षाकडे कधी पाठ फिरवली नाही. ते कायम संकटमोचक बनून धावून गेले आणि पक्षाला त्यांनी संकटातून बाहेर काढले. प्रणवदांच्या पिढीत काँग्रेसमध्ये दोनदा मोठी फूट पडली. १९६९ व १९७७ या दोन्ही वेळी स्व. इंदिरा गांधी यांच्यामागे प्रणवदा ठामपणे उभे राहिले. प्रणवदांचे आकलन तर उत्तम होतेच पण चौफेर विचार करण्याची त्यांची अफाट व विलक्षण क्षमता होती.

त्यासोबतच कुशाग्र बुद्धी, निर्दोष मसुदे बनवण्याचे तंत्र, उत्तम व्यवस्थापन आणि कार्यतत्परतेने काम वेगाने हातावेगळे करण्याची हातोटी हे गुण त्यांच्यात ठासून भरलेले होते. इंदिरा गांधी यांनी त्यांचे हे गुण हेरून त्यांना १९७३ मध्ये मंत्रिमंडळात समाविष्ट केले आणि त्यांच्या राजधानीतील प्रदीर्घ कारकीर्दीला सुरुवात झाली. अवघ्या ७ वर्षांत प्रणवदा १९८० मध्ये काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतील नेते बनले. १९८० नंतर इंदिरा गांधी राजधानीत नसतील तर प्रणवदा मंत्रिमंडळ बैठकीचे संचालन करायचे. एवढा विश्वास त्यांनी कमावला होता आणि आपल्या कार्यकर्तृत्वाची छापही पाडली होती. काँग्रेसच्या ‘मायक्रो मॅनेजमेंट’मध्ये प्रणवदा यांचा हात धरणारा दुसरा नेताच झाला नाही इतकी त्यांची विलक्षण हातोटी होती.

प्रणवदांचे वेगळेपण

कुठल्याही राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली की, त्या राज्यात कुठे काय घडते आहे, याची सविस्तर माहिती त्यांच्याकडे कायम असायची. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातच प्रणवदांना आपण देशाचे नेतृत्व करू शकतो याची सुस्पष्ट कल्पना आलेली होती. मात्र, तीन वेळा त्यांना नशिबाने हुलकावणी दिली. आणीबाणीतील पराभवानंतर इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या व त्यात प्रणवदांच्या संकटमोचक या भूमिकेचा मोठा वाटा होता. त्यामुळे साहजिकच १९८० नंतर प्रणवदांची राजकीय कारकीर्द बहरली. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर पंतप्रधानपद प्रणवदांकडेच येणार असाच कयास होता पण ती संधी हुकली व राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यामुळे प्रणवदा काही काळ राजीव गांधी यांच्यापासून दुरावले. मात्र, नंतर राजीव गांधी यांनी प्रणवदांना सन्मानाने पाचारण करून मंत्रिमंडळात स्थान दिले.

प्रणवदा अर्थमंत्री असताना डॉ. मनमोहन सिंग हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. मात्र, त्याच प्रणवदांना डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागले. प्रणवदांनी पक्षावरील निष्ठेमुळे त्याची सल कधीच मनात ठेवली नाही. उलट ते डॉ. मनमोहन सिंग सरकारचे कायम ‘संकटमोचक’च ठरले. अमेरिकेशी झालेल्या अणुकरारावरून डाव्या पक्षांनी डॉ. मनमोहन सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यावर हे सरकार पडणार, असाच अंदाज सर्व राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत होते. या राजकीय रणधुमाळीत प्रणवदा काँग्रेससाठी संकटमोचक ठरले आणि सरकार तरले. डॉ. सिंग यांच्या दोन्ही टर्ममध्ये प्रणवदा सरकार व काँग्रेससोबत भक्कमपणे उभे राहिले व त्यांनी कायम सरकारवरची सर्व संकटे परतवून लावली.

त्याच्याच परिणामी तीनदा पंतप्रधानपदाची संधी हुकलेले प्रणवदा राष्ट्रपतिपदी विराजमान झाले व जेत्याला साजेसा असा त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा समारोप झाला. राजकीय क्षेत्रात कुणाशीही संवाद न तोडणे आणि भविष्यावर नजर ठेवत मित्र तयार करत राहणे, हे सर्वांत आवश्यक गुणवैशिष्ट्य आहे. हे गुणवैशिष्ट्य प्रणवदांच्या अंगात ठासून भरलेले होते. त्यामुळेच ते ‘संकटमोचक’ म्हणून मान्यता प्राप्त करू शकले. त्याचेच प्रत्यंतर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवेळी शिवसेना एनडीएत असतानाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे प्रणवदांना पाठिंबा देण्यावरून मिळाले. प्रणवदांनीही मुंबई दौ-यात ‘मातोश्री’वर जाऊन आवर्जून बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली.

राजकारणातील ध्रुवतारा काळाच्या पडद्याआड

प्रणवदा राष्ट्रपती असताना नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मात्र प्रणवदांच्या कार्यकाळात त्यांचे व मोदी यांचे कधीही मतभेद अथवा संघर्ष अजिबात झाला नाही. उलट मोदी सरकार सत्तेत असताना प्रणवदांना ‘भारतरत्न’ सन्मान देऊन त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीचा यथायोग्य सन्मान करण्यात आला. सध्याच्या राजकारणाचा पोत पाहता, हे होणे अवघडच पण ते घडले कारण प्रणवदा आपल्या कार्यशैलीने राजकारणात पूर्ण सक्रिय राहूनही अजातशत्रू होते. प्रणवदा जेवढे मुरब्बी राजकारणी तेवढेच मनस्वी स्वभावाचे व्यक्ती होते. त्यातून त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक वादळे निर्माण झाली पण त्यांनी त्याची कधीच पर्वा केली नाही. त्याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे राष्ट्रपतिपदावरून पायउतार झाल्यावर मिळालेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समारंभाला लावलेली हजेरी! प्रणवदांनी हे निमंत्रण स्वीकारल्यावरून देशात प्रचंड मोठा राजकीय धुरळा उडाला होता.

मात्र, तिथे संघाच्या व्यासपीठावरून त्यांनी जे विचार व्यक्त केले त्याने या घटनेचे टीकाकार व समर्थकच नाही तर सर्वसामान्यांनाही अंतर्मुख केले. प्रणवदांच्या राजकीय, बौद्धिक व तात्त्विक प्रगल्भता आणि परिपक्वतेची ही प्रचितीच होती. इंदिरा पर्वानंतर काँग्रेस पक्षाची वाटचाल कायम चढ-उताराची राहिलेली असताना आणि काही काळ पक्षापासून दुरावल्याने गांधी कुटुंबाशी असणारे संंबंध अस्थिर बनल्यानंतरही पुन्हा पक्षात आणि सरकारमध्ये स्वत:चे अनन्यसाधारण स्थान निर्माण करणे, हे सोपे काम नक्कीच नाही. मात्र, प्रणवदा ते करू शकले ते पक्षनिष्ठा आणि कार्यनिष्ठेच्या जोरावरच!

कुठलेही काम झोकून देऊन करणे हा त्यांच्या मनस्वी स्वभावातून निर्माण झालेला गुण होता व त्यांनी तो राष्ट्रपतिपदावरून पायउतार होईपर्यंत कायम जपला. यामुळेच राष्ट्रपतींकडे येणा-या दयाअर्जांपैकी एकही अर्ज प्रलंबित न ठेवता पदावरून पायउतार होण्याचा अभूतपूर्व पायंडा फक्त प्रणवदाच निर्माण करू शकले. राजकीय क्षेत्रात सध्या अत्यंत विरळ होत चाललेल्या कामावरील श्रद्धेच्या वातावरणात प्रणवदांनी त्यांच्या कार्यपद्धतीने स्वत:ला ‘कर्मयोगी’सिद्ध केले होते. त्यांच्या जाण्याने या पर्वाचा अस्त झाला आहे. या ‘कर्मयोग्या’ला ‘एकमत’ची भावपूर्ण आदरांजली!

रुग्णवाढीचा पुन्हा उच्चांक, १७ हजार ४३३ नवे रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या