24.4 C
Latur
Friday, February 26, 2021
Home संपादकीय प्रणवदांचे वेगळेपण

प्रणवदांचे वेगळेपण

एकमत ऑनलाईन

भारतरत्न आणि भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मृत्यूशी सुरू असणारी झुंज अखेर संपली. त्यांच्या जाण्याने भारतीय राजकारणातील एका अभ्यासू आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाची अखेर झाली आहे. राजकारणाचा विचार करता, मुखर्जी यांनी इंदिरा गांधींच्या कार्यकाळापासून मनमोहनसिंगांच्या कार्यकाळापर्यंत अनेकदा संकटमोचक म्हणूनच जबाबदारी पार पाडली. १९८२ मध्ये बॅ. ए. आर. अंतुले यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता, त्यावेळीही संपूर्ण घटनाक्रमात प्रणव मुखर्जी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आंध्र आणि अन्य अनेक अशी राज्ये होती, जिथे मुख्यमंत्री सतत बदलले जात होते. अशा राज्यांत इंदिरा गांधी यांचे प्रमुख दूत म्हणूनच मुखर्जी यांनी भूमिका बजावली. कोलकाता येथे १९६३ मध्ये पोस्ट आणि तार खात्यातील डेप्युटी अकाऊंटंट जनरलच्या कार्यालयात अप्पर डिव्हिजन क्लार्क म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. तेथपासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. राज्यशास्त्र आणि इतिहास घेऊन एम. ए. झाल्यानंतर त्यांनी एलएल. बी. ची पदवी संपादन केली आणि त्यांना राज्यशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून विद्यानगर कॉलेजमधून बोलावणे आले.

मुखर्जी यांनी ‘देशेर दाक’ (मातृभूमीची हाक) नावाच्या नियतकालिकात काही काळ पत्रकारिता केली आहे, हे फारच कमी लोकांना ठाऊक आहे. त्यांची राजकीय कारकीर्द १९६० च्या दशकात, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सुरू झाली. राज्यसभेचे तिकिट देऊन इंदिरा गांधींनी मुखर्जी यांना दिल्लीत आणले. १९७७-७८ मध्ये जेव्हा काँग्रेसच्या ब-याच मोठ्या नेत्यांनी इंदिरा गांधींची साथ सोडली, तेव्हा मुखर्जी इंदिरा गांधींसमवेत राहिले. एवढेच नव्हे तर मूठभर पक्ष पदाधिका-यांनी नवी दिल्ली येथील २४, अकबर रोड येथे सुरू केलेल्या इंदिरा काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात खजिनदार म्हणून कामही केले. इंदिरा गांधी आणि त्यांचा पक्ष या दोहोंसाठी हा कसोटीचा काळ होता. इंदिरा गांधी स्वत: त्या काळात ‘बेघर’ होत्या.

कोरोना रुग्णांसाठी खासगी रुग्णालयातील खाटा आणखी तीन महिने राखीव !

१९८० मध्ये इंदिरा गांधींचे जोशात पुनरागमन झाले तेव्हा मुखर्जी यांनी त्यांच्यासाठी प्रमुख संकटमोचक म्हणून कामगिरी पार पाडली होती. १९८४ मध्ये ‘युरोमनी’ नियतकालिकातर्फे मुखर्जी यांना जगातील पाच सर्वोत्कृष्ट अर्थमंत्र्यांच्या यादीत स्थान देण्यात आले. इंदिरा गांधी यांचा मुखर्जी यांच्यावर एवढा विश्वास होता, की ब-याच वेळा आर. व्यंकटरामन, पी. व्ही. नरसिंह राव आणि एन. डी. तिवारी या तीन ज्येष्ठ मंत्र्यांप्रमाणेच महत्त्वाची जबाबदारी त्या मुखर्जी यांच्यावर सोपवीत असत.

एखाद्या मुद्यावर मंत्रिमंडळाचे मतैक्य अत्यंत सहजगत्या घडवून आणून ते पंतप्रधानांना किती मदत करीत असत, हे त्यांच्या मंत्रिमंडळातील सहका-यांना निश्चित आठवत असेल. कायदा, इतिहास, अर्थ आदी अनेक विषयांमध्ये त्यांना प्रचंड ज्ञान असल्यामुळे त्यांनी अनेक मंत्रिपदांची जबाबदारी सहजपणे हाताळली. डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात सुमारे डझनभर मंत्रिगटांचे आणि समित्यांचे नेतृत्व मुखर्जी यांच्याकडे होते.

साधारणपणे २००१ च्या सुरुवातीच्या दिवसांत प्रणव मुखर्जी यांनी एक मुलाखत दिली होती. आपण या देशाचे पंतप्रधान कधीच का बनू शकलो नाही, याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली होती. त्यावेळी राज्यसभेचे सदस्य असणा-या मुखर्जींनी यासाठी तीन कारणे दिली होती. पहिले कारण म्हणजे, हिंदीवर प्रभुत्व नसणे. दुसरे कारण म्हणजे जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, ज्योती बसू, राजीव गांधी, ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेतृत्वगुणांचा अभाव आणि तिसरे कारण म्हणजे, लोकसभा निवडणूक जिंकण्यात आलेले अपयश.

डोंगरगावच्या ग्रामस्थांचे आमरण उपोषण

(त्यानंतर २००४ मध्ये प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेची निवडणूक प्रथमच जिंकली. याच मुलाखतीत स्वत:च्या अंगी असलेल्या अन्य गुणांसंदर्भात विचारले असता, मुखर्जी यांनी भारतीय राजकारणाचा अभ्यासक या नात्याने एके दिवशी भारताचा राष्ट्रपती बनण्याचे आपले स्वप्न आहे, असे सांगितले होते. तो दिवस जुलै २०१२ मध्ये उजाडला आणि सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतिपदासाठी संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली. मुखर्जी यांच्या पाच दशकांच्या प्रदीर्घ सेवेचे फळ म्हणून त्यांचा राष्ट्रपती भवनाचा मार्ग खुला झाला होता.

सोनियांच्या निकटवर्तीयांच्या म्हणण्यानुसार, २००७ मध्ये त्यांनी प्रणव मुखर्जी यांना आपण राष्ट्रपतिपदासाठी इच्छुक नसल्याचे जाहीर करण्याची विनंती केली होती; मात्र २०१२ मध्ये त्यांनी मुखर्जी यांच्या निष्ठेची, राजकीय कारकीर्दीची तसेच देशाच्या आणि पक्षाच्या सेवेची दखल घेऊन त्यांना संधी दिली. परंतु मुखर्जी हे कदाचित भारताला कधीच न लाभलेले चांगले पंतप्रधान होते, असे म्हणता येईल.

अनेक दशकांच्या राजकीय जीवनात प्रणव मुखर्जी यांच्या गांधी कुटुंबीयांपैकी काही व्यक्तींशी असलेल्या संबंधांमध्ये अनेक चढ-उतार आले. संजय गांधी आणि इंदिरा गांधी यांच्यासाठी ते नेहमीच विश्वासातील व्यक्ती होते. राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या बाबतीत मात्र त्यांच्या संबंधात बरेच चढ-उतार आले. ‘द टर्ब्युलंट इयर्स (१९८०-१९९६)’ हा त्यांच्या आत्मकथनाचा दुसरा भाग रूपा पब्लिकेशनने प्रकाशित केला असून, त्यात त्यांनी राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यातील त्यांचे संबंध कसे औपचारिक स्वरूपाचे होते आणि त्याउलट इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्याशी त्यांचे संबंध कसे खुले होते, याचे वर्णन केले आहे.

राजकारणातील ध्रुवतारा काळाच्या पडद्याआड

राजीव गांधी यांच्याबद्दल ते नेहमी तोलूनमापून आणि मोजकेच बोलत. ‘‘संपूर्णपणे परिपक्व कुणीच नसतो, हे खरे आहे. काही सल्लागारांवर आणि मित्रांवर अतिरिक्त विश्वास असल्याबद्दल राजीव गांधी यांच्यावर नेहमी टीका केली जाते. त्यांनी ‘बाबालोग सरकार’ स्थापन केल्याचे बोलले जाते,’’ असे त्यांनी म्हटले होते. एप्रिल १९८६ मध्ये राजीव गांधी यांनी प्रणव मुखर्जी यांना पक्षातून निलंबित केले होते. ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलापती त्रिपाठी आणि वसंतदादा पाटील या दोघांनी याबद्दल राजीव गांधींना विरोध दर्शविला होता. १९८८ मध्ये मुखर्जी यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले.

राजीव गांधी यांच्याशी मुखर्जी यांचे अत्यंत मर्यादित संबंध असल्यामुळेच कदाचित सोनिया गांधींनी नंतरच्या काळात देशाच्या गृहमंत्रिपदासाठी किंवा पंतप्रधानपदासाठी मुखर्जी यांच्या नावाचा कधी विचार केला नसावा, असे मानले जाते. परंतु ‘१०, जनपथ’च्या निकटवर्तीयांच्या मते सोनिया गांधी यांनी मुखर्जी यांच्या योगदानाची नेहमीच मुक्तकंठाने स्तुती केली आहे. सिक्कीमचा भारतीय राज्य म्हणून अंतर्भाव करताना घटनात्मक अडचणी आल्यामुळे घबराट उडाली होती आणि त्या बाबतीत इंदिरा गांधी यांच्या धोरणाविषयी आपला गैरसमज झाला होता, असे राव यांनी समितीला सांगितले होते.

हे समजल्यावर सोनियांनी लागलीच राव यांना क्लीन चिट दिली. आपल्याला राव यांच्याविषयी अतीव आदर असून, आपल्या सासूबाईंनाही (इंदिरा गांधी) राव यांच्याविषयी प्रचंड आदर होता, असे सोनियांनी त्यावेळी म्हटले होते. बदलत्या काळाचा विचार करून शांतपणे निर्णय घेणारा नेता ही मुखर्जी यांच्या व्यक्तिमत्त्वाची खासीयत. जुन्या काळातील नेते मुखर्जी यांना नियमांचा पक्का असलेला राजकारणी म्हणून ओळखतात. १९८० च्या दशकात सुरुवातीला ते अर्थमंत्री होते आणि इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळातील क्रमांक २ चे नेते म्हणून मान्यता पावले होते. एस-२२, ग्रेटर कैलाश या खासगी निवासस्थानीच ते त्यावेळी राहत असत.

त्यांची मोटार सावित्री सिनेमागृहाजवळ येताच ते चालकाला हॉर्न न वाजविण्याची सूचना देत. आपले शेजारी त्यामुळे विचलित होतील, असे त्यांना वाटत असे. त्यानंतर मुखर्जी यांनी २ जंतरमंतर लेन येथे वास्तव्य केले. ६ रायसिना रोड या अटलबिहारी वाजपेयींच्या निवासस्थानानजीक हा बंगला होता. टोकाचे वैचारिक मतभेद असतानासुद्धा रात्रीच्या जेवणानंतर ते नेहमी वाजपेयींशी गप्पा मारीत असत. वाजपेयींची मानसकन्या नम्रता याही मुखर्जी यांच्याकडून नेहमी ‘बंगाली अचार’ आणत असत. असे सर्वसमावेशक, प्रगल्भ व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रणव मुखर्जी होत.

रशिद किडवई
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या