29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeसंपादकीयही दोस्ती तुटायची नाय!

ही दोस्ती तुटायची नाय!

एकमत ऑनलाईन

आपला शेजारी, मित्र व ज्या राष्ट्राच्या जन्मात भारताने अत्यंत मोलाची भूमिका बजावली अशा बांगलादेशच्या स्थापनेचा सुवर्णमहोत्सव साजरा होतो आहे. या देशाच्या स्थापनादिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशचा दौरा केला. जगावर कोरोना संकट कोसळल्यानंतर सगळे जग मागच्या वर्षभरापासून जागच्या जागीच ठप्प झाले आहे. या विषाणूविरुद्ध लढताना जगातल्या सर्वच नित्य व्यवहारांवर साहजिकच मोठी बंधने आली आहेत. तशी ती पंतप्रधानांच्या विदेश वा-यांवरही आलेली आहेत आणि ते अत्यंत स्वाभाविकही आहे. त्यामुळे मोदींनी पंतप्रधान झाल्यावर जगभरातील देशांना भेटी देण्याचा जो धडाका लावला होता त्याला कोरोना काळाने करकचून बे्रक लावला होता. सध्याही जगावरचे व भारतावरचे कोरोना संकट अजिबात कमी झालेले नाही.

वैज्ञानिकांनी कोरोनावरील लस शोधण्यात यश मिळविल्याने मागचे वर्षभर या अज्ञात शत्रूविरुद्ध सुरू असलेल्या जगाच्या नि:शस्त्र लढाईत आता जगाच्या हाती एक प्रभावी शस्त्र आले आहे हे मान्यच पण अद्याप या शस्त्राने जगाला संपूर्ण सुरक्षा कवच-कुंडले मिळवून दिलेली नाहीतच. त्यामुळे अद्याप जगाची व भारताचीही कोरोनाविरुद्धची लढाई संपलेली नाही. लसीकरणाचा वेग व त्याचा प्रभाव वाढत गेल्यावर या लढाईत कोरोनाही आजवरच्या इतर आजारांप्रमाणे मानवी इच्छाशक्ती व संशोधनासमोर नक्कीच नतमस्तक होईल हे नक्की, पण त्यासाठी काही काळ लागणार हे स्पष्ट आहे. असो! मूळ मुद्दा हाच की, कोरोना संकट संपण्याऐवजी ‘मी पुन्हा येईन’ म्हणत फिरून देशात परतलेले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश दौ-याचा आपला निर्णय कायमच ठेवला नाही तर पारही पाडला. साहजिकच त्यावरून देशातच नव्हे तर जगभरात चर्चा होणे व अनेकांच्या भुवया उंचावणे, वाकड्या होणे अटळ.

भारतात तर राजकारणाचा सध्याचा स्तर हा निचांकी निर्देशांकालाही लाजून मान खाली घालायला लावणारा असल्याने आणि त्यातच सध्या देशात प. बंगालसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने मोदींच्या या दौ-यावरून राजकीय धुळवड साजरी होणे अटळच! तशी ती सुरूही झाली आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने तर हा आचारसंहितेचा भंग आहे. पंतप्रधानांवर कारवाई करा, अशी थेट तक्रारच निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर इतर राजकीय पक्ष मोदींच्या या दौ-यावर टीका करण्यासाठीचे मुद्दे शोधण्यात व्यस्त आहेत. हे होणे अटळच कारण सध्या देशात एक नवीन म्हण प्रचलित आहे व व्यवहारात पुरती रुजलीही आहे ती म्हणजे ‘केवळ प्रेमात आणि युद्धातच नव्हे तर राजकारणातही सर्व काही माफ असतं’! याचा प्रत्यय देशातील जनता सध्या पावलोपावली घेते आहेच.

कृषि कायदे व्हाया यू. एस. ए.

विशेष म्हणजे या नव्या म्हणीच्या मनस्वी आचरणात एकही राजकीय पक्ष सन्मान्य अपवाद नाहीच. त्यामुळे या दौ-यावरून उठलेला राजकीय धुरळा पाच राज्यांतील निवडणूक निकाल लागल्याशिवाय खाली बसणारच नाही. असो! त्याबाबत भाष्य करण्याचे व ‘कुणाचा शर्ट कुणापेक्षा स्वच्छ?’ या वादात गुरफटण्याचेही कारण नाहीच. या दौ-याची त्यापुढे जाऊन मीमांसा व्हायला हवी कारण हा दौरा देश म्हणून भारताचे आंतरराष्ट्रीय धोरण, शेजारी राष्ट्रांशी असणारे संबंध, त्याबाबत देश म्हणून स्वीकारली जात असलेली धोरणात्मक दिशा व देशाच्या या परराष्ट्र धोरणाचे भविष्यात होणारे बरे-वाईट परिणाम या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे मोदींच्या या बांगलादेश दौ-याचे फलित व मीमांसा ही या निकषांवर होणे, केली जाणे जास्त महत्त्वाचे आणि संयुक्तिकही आहे. त्यादृष्टीनेच या दौ-याची मीमांसा केली तर एका गोष्टीसाठी मोदी सरकारचे नक्कीच स्वागत करावे लागेल आणि ती म्हणजे सहा वर्षांच्या सत्ता प्रवासात मोदी सरकारने आपल्या धोरणात्मक चुकांपासून घेतलेला बोध आणि त्यात सुधारणा करण्यासाठीचे सुरू केलेले प्रयत्न!

मोदी-शहा जोडीने देशाची सत्ता हस्तगत करताना देशांतर्गत जे मुद्दे अत्यंत प्रखरपणे मांडत त्यांचा संबंध थेट राष्ट्रभक्ती व राष्ट्रपे्रमाशी जोडण्याची जी चूक केली होती त्याची कबुलीच म्हणजे कोरोनाकाळातही मोदींनी ठरवून तडीस नेलेला हा बांगलादेश दौरा! खरे तर बांगलादेश निर्मितीत भारताने अमेरिकेसारख्या महासत्तेचा दबाव झुगारून दिलेल्या अमूल्य योगदानाने आपले हे शेजारी राष्ट्र आपला नैसर्गिक मित्र तर आहेच पण तो भारताप्रति कृतज्ञही आहे. भारतासोबतची मैत्री अभेद्य ठेवत व दोन देशांतील हे संबंध आणखी दृढ होतील याचे सतत स्मरण ठेवणारी धोरणे आखत बांगलादेशने सातत्याने ही कृतज्ञता व्यक्तही केली आहे. बांगलादेशातील कट्टरपंथीय मुस्लिमांचा भारताला विरोध आहे व भारतावर रागही आहे. मात्र, तरीही पंतप्रधान शेख हसिना यांनी त्यांना नियंत्रणात ठेवत भारतासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध कायम राहतील याची पूर्ण दक्षता घेतलेली आहे.

मात्र, भारतात मोदी सरकार सत्तेवर आले व ते सत्तेवर येताना देशातील बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीचा मुद्दा गरजेपेक्षा जास्त आक्रमकतेने व व्यस्त गुणोत्तरात मांडला गेल्याने दोन राष्ट्रांच्या अभेद्य दोस्तीत तणाव निर्माण झाला होता. मात्र, आता सहा वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. पाकिस्तानसोबत संघर्ष संपलेला नाही तर चीनच्या विखारी साम्राज्यवादी धोरणाने भारताने चीनशी मैत्री वाढवण्याचे केलेले प्रयत्न मातीमोलच झालेत. उलट चीन भारताच्या सर्व शेजा-यांवर आपले वर्चस्व निर्माण करून त्यांना कह्यात घेण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान तर चीनचा बटीक झालाच आहे पण नेपाळ, श्रीलंका, म्यानमारही चीनच्या वळचणीला जाताना दिसत आहेत. भारतासोबत तर चीनने सीमेवर थेट संघर्षच उभा केला आहे. अशा स्थितीत भारताचा कायम मित्र असलेला बांगलादेश मात्र, चीनच्या दबावाला बळी पडलेला नाही व त्याने भारतासोबतच्या मैत्रीतही अंतर पडू दिलेले नाही. हे केवळ भारताच्या मदतीवर तो आहे म्हणून नाहीच कारण आता ती परिस्थितीही बदलली आहे.

बांगलादेशाने स्वबळावर प्रगती करत जगाला तोंडात बोटे घालायला लावली आहेत. अर्थात या देशातील गरिबी पूर्णपणे संपली असा त्याचा अर्थ नाहीच. ती आहेच पण त्याचे प्रमाण लक्षणीय कमी होते आहे. साहजिकच त्यामुळे बांगलादेशींचे भारतात येणारे लोंढेही रोडावत आहेत. अशा बदलत्या स्थितीत आशिया खंडातला आपला सच्चा व विश्वासू मित्र गमावणे ही परराष्ट्र धोरणातील ऐतिहासिक चूक ठरू शकते याची उपरती आता तरी मोदी सरकारला झाली व पंतप्रधान मोदींनी आपली चूक सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले, हाच मोदींच्या या दौ-याचा अन्वयार्थ! या अन्वयार्थाचे देश म्हणून राजकारणाच्या कुंपणापलिकडे जाऊन स्वागतच करायला पाहिजे. मोदींच्या दौ-याने ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हा संदेश अतिशय स्पष्टपणे जगाला दिलाय हे अत्यंत महत्त्वाचे! बाकी राजकारण व राजकीय धुळवड अटळच, ती चालतच राहणार! त्याकडे किती गांभीर्याने पहायचे, हे ज्याचे त्याने ठरवणे योग्य, हे मात्र निश्चित!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या