आसाममधील कामाख्या देवीचा नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील मंत्री व आमदारांनी नुकतीच या मंदिराला भेट दिली. सर्वांनी मनापासून पूजा केली. सर्वांना समाधान लाभले असून सर्व जण आनंदात आहेत, अशी प्रतिक्रिया देवीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली. यावर पापभिरू सर्वसामान्य जनता काय बोलणार? देवी, देवता किंवा बाबा महाराज, ज्योतिषी यांच्या नादी लागणारे राजकारणी आजच्या इंटरनेट युगातही आहेत हे पाहून सखेद आश्चर्य वाटते. आपल्या श्रद्धा, भावना याचं प्रदर्शन आपल्याला निवडून देणा-या जनतेसमोर लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे करणं खचितच योग्य नाही. अशा प्रकारच्या कुठल्याही धार्मिक विधीपासून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू दूर राहायचे. म्हणूनच सोमनाथ मंदिराच्या कार्यक्रमाला कोणत्याही नेत्याने सरकारच्या वतीने हजर राहू नये, असा त्यांचा आग्रह होता. आज काय परिस्थिती आहे? गंगा पूजनापासून ते प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात आणि रस्ता उद्घाटनात आमच्या प्रधानमंत्र्यांचा हिरीरीने सहभाग असतो.
व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणायचे ते यालाच! स्वत: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनण्याच्या आधी आपल्या समर्थकांसह कामाख्या मंदिरात जाऊन नवस बोलून आले होते, त्यामुळेच कदाचित ३० जूनला ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यात यशस्वी ठरले होते. आता त्या नवसाची पूर्तता म्हणून शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार नवस फेडून आल्याचे बोलले जाते. कामाख्या मंदिरात नवस म्हणून विविध प्रकारचे प्राणी, पक्षी यांचा बळी दिला जातो म्हणे… अगदी रेडा, म्हशी यांचाही! शिंदे आणि कंपनीने रेड्याचा बळी दिला की उंटाचा… माहीत नाही! वैज्ञानिक भारताचा पाया घालणा-या पंडित नेहरूंना एकनाथ शिंदेंची अदाकारी पाहून निश्चितच धक्का बसला असता. अर्थात असे राजकारणी प्रत्येक पक्षात असतात. १९८० ला स्व. इंदिरा गांधी सत्तारूढ झाल्यानंतर वैष्णोदेवीच्या मंदिरात गेल्या होत्या. देशात अनेक राजकारणी ज्योतिषशास्त्र, बाबा, महाराज यांच्यावर विश्वास ठेवणारे,
श्रद्धा ठेवणारे आहेत. सर्वच पक्षांत अशा लोकांची मांदियाळी आहे. एकनाथ शिंदे यांच्या श्रद्धेची काही जणांनी टिंगल-टवाळीही उडविली आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, बेळगाव महाराष्ट्रात यावे, हा नवस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मंत्री व आमदारांना घेऊन गुवाहाटीला का जात नाहीत? कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आक्रमक असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र मौन बाळगले आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. राज्यातील जनतेला अनेक प्रश्न भेडसावत आहेत. कर्नाटकने आपल्या तलावात पाणी सोडले आणि आपले राज्य सरकार सत्तेच्या पाण्यात गटांगळ्या खात आहे. या नेभळटपणाविरोधात सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. खरे पाहता देशात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात मग्न आहेत. सत्ताधारी विरोधकांना सातत्याने विचारतात, ७० वर्षात काय केले? त्याला उत्तर देताना विरोधक म्हणतात, ७० वर्षाचे सोडा, गत आठ वर्षात तुम्ही काय केले ते सांगा. स्वातंत्र्यानंतर लोकशाही जपत जवळपास सर्वच क्षेत्रात मागास असलेल्या देशाला आम्ही प्रगतिपथावर आणून ठेवले आहे, असे विरोधक म्हणतात तर थोड्याच कालावधीत आम्ही देशाला उच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे, असे सत्ताधारी म्हणतात. दोघांचीही जुगलबंदी न संपणारी आहे. त्यांचे एकमेकांकडे हिशेब मागणे सुरूच राहणार आहे.
पूर्वीपेक्षा आता सत्ताकारणासाठी मोठ्या प्रमाणात राजकारण केले जात आहे. आरोप-प्रत्यारोप करीत सत्ता मिळविण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक कायम प्रयत्नात असतात. आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी दुस-याकडे बोट दाखविण्यात दोघांनीही धन्यता मानली आहे. देश बदलला आहे पण तो कोणा एका पक्षामुळे बदलला नाही. राजकारण्यांची श्रद्धा हा मोठा गमतीचा विषय आहे. गुजरातमध्ये १२ वाजून ३९ मिनिटांचा मुहूर्त शुभ मानला जातो. भाजप, काँग्रेस या दोन्ही पक्षांची नेतेमंडळी आपला अर्ज अथवा कोणतेही नवीन काम याच मुहूर्तावर करतात. श्रद्धा-अंधश्रद्धा प्रकरणात महाराष्ट्रातील नेतेही मागे नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी आहे, असे विधान केले होते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये राजसत्तेमध्ये धर्मसत्तेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. राजसत्तेमध्ये कुणावर तरी राज्य करतो असा भाव आहे. कुणी तरी राजा आणि कुणी तरी प्रजा असा भाव आहे. धर्मसत्तेमध्ये एकच भाव आहे, तो म्हणजे त्यागाचा भाव, असे फडणवीस म्हणाले होते. २०१६ मध्ये मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी रत्नागिरी येथे नरेंद्राचार्य महाराजांची भेट घेतली होती. दुस-यांदा सत्तेत येण्यासाठी फडणवीस यांनी ‘मिरची हवन’ केले होते म्हणे. पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर मध्य प्रदेशातील बागलामुखी मंंदिराच्या पुजा-याकडून फडणवीसांनी हे हवन करून घेतल्याचे सांगितले जाते. सर्व पक्षाच्या नेत्यांचा त्यांच्या भक्तमंडळीत समावेश आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रावर कमालीचे प्रेम आहे. त्यांच्या कारचा क्रमांक ६६६६ आहे. त्यांनी लक्ष्मीनारायण स्वामी मंदिराचे पुजारी लक्ष्मी धर्माचार्य यांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्रिपदाची शपथ चार मिनिटे उशिरा घेतल्याचे सांगितले जाते. ज्योतिषाच्या सांगण्यावरून राव यांनी पक्षाचे तेलंगणा राष्ट्र समिती हे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले आहे. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कारकीर्दीत चंद्रास्वामी हे नाव खूप गाजले होते. ते त्यांचे अत्यंत जवळचे सल्लागार मानले जात. याच चंद्रास्वामीवर राजीव गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप होता. चंद्रास्वामी यांनी मार्गारेट थॅचर ब्रिटनच्या पंतप्रधान होणार असल्याची भविष्यवाणी केली होती म्हणे. हिटलरसुद्धा महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी ज्योतिषाचा सल्ला घ्यायचा म्हणे! असो. श्रद्धा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण ज्या देशाचा पाया पंडित नेहरूंसारख्या विज्ञानवादी व्यक्तीने घातला आहे त्या देशात आजही अवैज्ञानिक गोष्टींवर विश्वास ठेवणारे लोक आहेत ही दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल! आमचा महाराष्ट्र पुरोगामी आहे, असे आम्ही कोणत्या तोंडाने म्हणणार?