17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeसंपादकीयठोको ताली!

ठोको ताली!

एकमत ऑनलाईन

अलीकडे राजकीय क्षेत्रात बरीच उलथापालथ सुरू आहे. आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका लक्षात घेता या राजकीय घडामोडींना अधिक जोर आला आहे. नुकतेच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची गच्छंती झाली. त्यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. विजय रूपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर त्यांच्या जागी झालेली भूपेंद्र पटेल यांची निवडही तेवढीच धक्कादायक ठरली. ही उलथापालथ होण्याआधी एक दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातमध्ये दाखल झाले तेव्हा तेथे काही तरी होणार याची चाहूल लागली होती. भूपेंद्र पटेल हे कडवे पाटीदार नेते आहेत. विशेष म्हणजे ते उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय आहेत तरीही त्यांचे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाव नव्हते. केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला, मनसुख मांडविया, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर.पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत होती पण भाजपने भूपेंद्र पटेल यांना संधी देऊन सर्वच राजकीय विश्लेषकांना आश्चर्याचा धक्का दिला.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने वर्षभरात चार राज्यांतील पक्षाच्या पाच मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी केली. कर्नाटकमध्ये येदियुरप्पा, हिमाचलमध्ये आधी त्रिवेंद्रसिंह रावत नंतर तीरथ सिंह रावत, आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल आणि गुजरातमध्ये गच्छंती झालेले विजय रूपाणी हे पाचवे… ठोको ताली! मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान आणि हरियाणात मनोहरलाल ठक्कर यांच्यावरही ही नामुष्की येऊ शकते. मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण होऊ न देण्याची रीत काँग्रेसमध्ये रुजलेली आहे असे दिसून येते. महाराष्ट्रात मारोतराव कन्नमवार आणि वसतंराव नाईक वगळता एकही काँग्रेसी मुख्यमंत्री पाच वर्षे पदावर राहिला नाही. काँगे्रसचे मुख्यमंत्री नेहमीच ‘हायकमांड’च्या मर्जीवर राज्यात राज्य करीत असतात., अशी टीकाही केली जात होती. या संदर्भात बाबासाहेब भोसले, ए. आर. अंतुले यांची नावे घेतली जातात. या टीकेला प्रत्युत्तर देताना पक्षश्रेष्ठींच्याच जिवावर निवडणुका लढविल्या जात असतील तर मुख्यमंत्री कोण या प्रश्नाला फार महत्त्व देण्याची गरज काय, असा सवाल काँग्रेसतर्फे केला जात असे. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी काँग्रेसला निवडणुका जिंकून दिल्या.

काँग्रेसच्या काळातील मुख्यमंत्री बदलाचे वारे भाजपमध्ये जाऊन थडकले आहे, अशी टीका आज केली जात आहे. पूर्वी भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलले जात नसत. लोकनेत्यांचा आदर केला जातो, असे भाजप अभिमानाने सांगत असे पण केंद्रात सत्ता आली की पक्षाची धोरणे बदलतात. राज्यातील सत्ता हातून जाण्यापेक्षा मुख्यमंत्री बदला हे धोरण अधिक प्रभावी ठरते. भाजपलाही राज्या राज्यातील सत्ता अधिक महत्त्वाची वाटू लागली आहे… ठोको ताली! २०१६ मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीआधी आनंदीबेन पटेल यांना काढून रूपाणी यांना मुख्यमंत्रिपदावर बसवले पण ते प्रभावहीन ठरल्याने गुजरातमधील निवडणुकीआधी १४ महिने त्यांनाही पायउतार व्हावे लागले आहे. मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीने पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या चेह-यावर ओरखडा पडणार नाही याची काळजी घ्यायची असते. पटेल-रूपाणी अथवा रावत यांना आपली जबाबदारी नीट पार पाडता आली नाही असे दिसते. नुकतेच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सतत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. गत काही महिन्यांपासून पंजाबच्या राजकीय क्षेत्रात धुसफूस सुरू होती.

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात आडवा विस्तू जात नव्हता. कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये शेर-शायरी करीत हास्यस्फोट घडविताना ‘ठोको ताली’चे आवाहन करणा-या सिद्धूची अलीकडेच प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती अमरिंदर यांना रुचली नाही. त्यामुळे दोघांतील तेढ वाढतच गेली. पंजाब काँग्रेसमध्ये गत काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गटबाजीची परिणती अमरिंदर यांच्या राजीनाम्यात झाली. शिरोमणी अकाली दलास सत्तेवरून खाली खेचून आणि ‘आप’च्या सत्तेवर येण्याच्या आशा धुळीस मिळवून काँग्रेसला पुन्हा सत्तारूढ करण्याचे श्रेय अमरिंदर यांना दिले जाते. अमरिंदर यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याची मागणी करणारे पत्र काँग्रेसच्या ५० हून अधिक आमदारांनी सोनिया गांधी यांना लिहिले होते. पंजाबच्या ११७ सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे ८० आमदार आहेत. पक्षाने आमदारांना पाचारण करण्याची ही तिसरी वेळ आहे. तुम्हाला माझ्याविषयी शंका आहे. त्यामुळे मला अपमानित झाल्यासारखे वाटते, असे अमरिंदर यांनी म्हटले आहे. अमरिंदर यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीआधी राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला.

काँग्रेसच्या शक्तिशाली अशा प्रादेशिक नेतृत्वांपैकी एक असलेले अमरिंदर आपल्या पुढील वाटचालीबद्दल म्हणाले, भविष्यातील राजकारणाबद्दल पर्याय नेहमीच उपलब्ध असतो. वेळ येईल तेव्हा मी पर्यायाचा उपयोग करीन. काँग्रेस नेतृत्व पाठीशी नसल्याने नाराज असलेले अमरिंदर भाजपमध्ये दाखल होऊ शकतात अशी चर्चा आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल. मुख्यमंत्रिपदासाठी नवज्योतसिंग यांचे नाव पुढे केले गेल्यास त्याला आपला तीव्र विरोध राहील कारण सिद्धू हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे मित्र आहेत. शिवाय पाकचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशीही त्यांची दोस्ती आहे, असे अमरिंदर म्हणाले होते. मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धू, सुखजिंदर रंधवा, सुनील जाखड, प्रतापसिंह बाजवा, अंबिका सोनी यांची नावे चर्चेत होती; परंतु पक्षाने चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. चन्नी हा दलित शिख चेहरा मानला जातो. राज्यात दलित शिख समाजाची संख्या सुमारे ३२ टक्के आहे. पंजाब सरकारमध्ये त्यांच्याकडे तंत्रशिक्षण मंत्रिपद होते. अमरिंदरच्या विरोधात त्यांनीही आवाज उठविला होता.

ड्रग आणि त्यासंबंधीच्या जाहिरातीविरोधात त्यांनी निषेध व्यक्त केला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते किती शक्तिशाली मुख्यमंत्री सिद्ध होतात याबाबत उत्सुकता आहे. चन्नी यांची निवड झाल्यानंतर सुखजिंदर सिंह रंधवा म्हणाले, हा हायकमांडचा निर्णय आहे, त्याचे मी स्वागत करतो. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंह सिद्धू असे दोन गट तयार झाले आहेत त्याचा फायदा उठवीत भाजपला ‘ठोको ताली’ असे म्हणण्याची संधी मिळू नये म्हणजे झाले!

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या